Healthy Coconut : आरोग्यदायी नारळ

आज २ सप्टेंबर. हा दिवस जागतिक नारळ दिवस म्हणून साजरा केला जातो. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या नारळामध्ये विविध औषधी गुणधर्म असतात.
Coconut
Coconut Agrowon

डॉ. दादासाहेब खोगरे

आज २ सप्टेंबर, हा दिवस जागतिक नारळ दिवस (World Coconut Day) म्हणून साजरा केला जातो. आरोग्याच्या (Healthy Coconut) दृष्टिने महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या नारळामध्ये विविध औषधी गुणधर्म असतात. अनेक मंगलप्रसंगी ‘श्रीफळ’ म्हणजेच नारळ महत्त्वाचा मानला जातो. नारळापासून विविध मूल्यवर्धित पदार्थ (Value Added Product From Coconut) तयार केले जातात.

आरोग्यासाठी महत्त्व ः

- कफ, वात, पित्त प्रकृतीच्या व्यक्तीसाठी नारळ व नारळपाणी हे गुणकारी मानले जाते.

- नारळामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे नारळाला पोषकद्रव्यांनी परिपूर्ण असा समतोला आहार म्हटले जाते.

- नारळात जीवनसत्त्वे, अनेक प्रकारची खनिजे, क्षार, प्रथिने, स्निग्धांश मुबलक प्रमाणात असतात.

- उन्हाळ्याच्या दिवसांत सतत तहान लागते. तहान भागविण्यासाठी दुपारच्या वेळी नारळ पाणी प्यावे.

Coconut
Coconut news:नारळाच्या करवंट्यांची मागणी का वाढतेय?

- बऱ्याच वेळा पावसाळ्याच्या दिवसांत त्वचा तेलकट होते. त्यासाठी नारळ पाणी उपयुक्त ठरते. चेहऱ्यावर नारळ पाणी लावल्यास त्वचा निर्मळ आणि नितळ राखली जाते.

- काही लोकांची त्वचा निस्तेज व कोरडी असते. त्यांनी नारळाच्या पाण्यामध्ये दुधावरील थोडी साय मिसळून हळुवार हाताने मालिश करावी. त्वचा उजळते.

- गर्भधारणेनंतर आठवड्यातून दोन-तीन वेळा नारळाचे पाणी नियमित प्यावे. त्यामुळे बाळाची कांती सुधारते.

- हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी नारळ उपयुक्त असतो.

- पावसाळ्यात केस धुण्यापूर्वी १ तास नारळ पाणी केसांना लावून चांगली मालिश करावी. त्यानंतर केस धुवावेत. नियमित नारळ पाणी केसांना लावल्या केस मुलायम होतात. मुळांचे पोषण चांगले होऊन केसांची वाढ होते.

- नारळाचे दूध शक्तीवर्धक मानले जाते. नारळाच्या दुधाचे सेवन केल्यास बराच काळ भुकेवर नियंत्रण राहते.

नारळाचे मूल्यवर्धित पदार्थ:

नारळाचे मूल्यवर्धित पदार्थ ः

१) पत्ताकोबी व ओल्या नारळाची कोशिंबीर ः

साहित्य ः

दोन वाट्या किसलेला पत्ताकोबी, २ वाट्या ओल्या नारळाचा चव, मीठ, साखर, फोडणीचे साहित्य, लाल मिरची, कडूलिंब, उडदाची डाळ.

Coconut
Coconut Day: जागतिक नारळ दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय कार्यशाळा

कृती ः

किसलेला पत्ताकोबी व ओल्या नारळाचा चव एकत्र करावा. त्यात चवीनुसार मीठ व दोन मोठे चमचे साखर घालून मिश्रण चांगले एकजीव करावे. गॅसवर तेल गरम करायला ठेवून त्यात मोहरी, लाल मिरची, कडूलिंब आणि उडदाची डाळ घालून फोडणी द्यावी. ती फोडणी कोशिंबिरीवर घालून मिक्स करावी. तयार कोशिंबीर पांढरीशुभ्र दिसण्यासाठी त्यात हळद घालू नये. जेवढा पत्ताकोबी असेल तेवढाच ओल्या नारळाचा चव घ्यावा. ही कोशिंबीर चवीला अतिशय उत्कृष्ट लागते.

२) दलियाची खीर ः

साहित्य ः

दोन वाट्या दलिया, १ वाटी ओल्या नारळाचा चव, १ वाटी खजूर, १ लिटर दूध, अर्धी वाटी साखर, वेलदोडा पावडर.

कृती

कुकरमध्ये दलिया पाण्यात बुडेल एवढे पाणी घालून दोन शिट्ट्या काढून घ्याव्यात. मंद आचेवर एक लिटर दूध गरम करण्यास ठेवावे. दूध उकळल्यानंतर त्यात शिजलेला दलिया घालावा. ओला नारळ आणि खजुराचे लांब तुकडे करून त्यात घालावेत. नंतर साखर घालून मंद आचेवर छान घट्ट होईपर्यंत शिजू द्यावे. शिजत असताना त्यात वेलदोडा पावडर घालावी. ही खीर गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे खाण्यास छान लागते.

दडपे पोहे ः

साहित्य ः

दोन वाट्या पातळ पोहे, २ कांदे, हिरवी मिरची, कोथिंबीर, किसलेले आले, २ चमचे लिंबाचा रस, मीठ, साखर, १ वाटी ओले खोबरे, थोडे नारळातले पाणी, तेलाची खमंग फोडणी, भाजलेल्या शेंगदाण्याची भरड.

कृती

कांदा, मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे. एका पसरट परातीमध्ये पोहे घेऊन त्यावर नारळाचे पाणी शिंपडून हलवून घ्यावे. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, ओले खोबऱ्याचा किस, आल्याचा कीस हे सर्व साहित्य घालून मिसळून घ्यावे. या मिश्रणात मीठ, साखर, तेलाची खमंग फोडणी आणि लिंबाचा रस घालावा. सर्व साहित्य झाकण ठेवून १५ ते २० मिनिटे दडपून ठेवावे. शेवटी कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

कोकोनट राईस ः

साहित्य ः

अर्धा किलो तांदूळ, १ नारळ, मीठ, ८-१० काजू तुकडे, १ चमचे हरभरा व उडदाची डाळ, फोडणीचे साहित्य.

कृती

नेहमीप्रमाणे भात करून घ्यावा. मंद आचेवर तेल गरम करून त्यात फोडणी करावी. त्यात काजू, हरभरा डाळ आणि उडदाची डाळ, लाल मिरच्या, खोवलेला नारळ घालून दोन मिनिटे परतून घ्यावे. तयार फोडणी भातावर घालून पुन्हा परतावे. हा भात लोणचे किंवा टोमॅटो सारासोबत छान लागतो.

तिखट वड्या ः

साहित्यः

ओल्या नारळाचा कीस २ वाट्या, बेसन पीठ २-३ चमचे, गूळ, चिंचेचा कोळ, हळद, मीठ, सांबर मसाला, हिरवी मिरची, कोथिंबीर, तेल.

कृती ः

प्रथम चिंचेच्या कोळात थोडा गूळ टाकून तयार करावा. २-३ हिरव्या मिरच्या बारीक वाटून घ्याव्यात. कोथिंबीर बारीक चिरावी. नंतर ओल्या खोबऱ्यात गूळ-चिंचेचा कोळ, हळद, मीठ, सांबराचा मसाला, वाटलेल्या मिरच्या, कोथिंबीर घालावी. वड्या तयार करता येतील इतपत बेसन मिसळून सर्व जिन्नस एकजीव करावे. त्याच्या गोल किंवा चौकोनी-चपट्या वड्या करून तेलात तळून काढाव्यात. रूचकर लागतात.

------------------

- डॉ. दादासाहेब खोगरे, ९३७०००६५९८

(विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र तडसर ता. कडेगाव जि. सांगली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com