आजवर फारशी चर्चेत नसलेली अथवा दुर्लक्षित राहिलेली नारळाची करवंटी (Coconut shell) सध्या प्रकाशझोतात आली आहे. ॲक्टिव्हेटेड कार्बनची (Activated Carbon) मागणी वाढल्यामुळे नारळाच्या करवंटीचा भाव वधारला आहे. त्यामुळे खोबऱ्याचे दर वाढलेले नसतानाही कर्नाटकातील नारळ उत्पादक शेतकरी निर्धास्त आहेत, कारण या नारळाच्या करवंटीमुळे त्यांना आर्थिक आधार मिळाला आहे.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मागच्या पाच वर्षांत नारळाच्या करवंटीचे (Coconut Shells) दर दुप्पटीने वाढले आहेत. टनामागे ७ ते ८ हजार रुपये देणारी नारळाची करवंटी आता १४,५०० रुपये प्रति टन दराने विकली जात आहे.
नारळाच्या करवंटीचा वापर हस्तव्यवसाय, अगरबत्ती आणि जैविक खतांच्या निर्मितीसाठी केला जातो. याशिवाय अलिकडील काळात सोने वितळवणे आणि शुद्धीकरणासाठी ॲक्टिव्हेटेड कार्बनचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
हा कार्बन विकसित करण्यासाठी नारळाची करवंटी लागते. याखेरीज धातू शुद्धीकरण, पाणी शुद्धीकरण, इंजिन ऑइल, पेंट्स आणि औषध निर्मितीसाठी नारळ करवंटीचा वापर केला जातो. ॲक्टिव्हेटेड कार्बन निर्मितीमुळे नारळाच्या करवंटीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.
केरळ आणि तामिळनाडूनंतर नारळ उत्पादनात कर्नाटकाचा तिसरा क्रमांक लागतो. जगातील ३४ टक्के नारळ उत्पादन भारतात होते. यावर्षी नारळ आणि संबंधित उत्पादनांच्या निर्यातीतून भारताने ३२२७ कोटी रुपयांची कमाई केली. मागच्या वर्षी २२९४ कोटी रुपयांची निर्यात झाली होती.
नारळाची करवंटीही उत्तम कमाई करून देऊ शकते, हे लक्षात आल्यापासून कर्नाटकातील नारळ उत्पादक याबाबत अधिक सजग बनले आहेत. कर्नाटकातील चिक्कनयकनहळ्ळी गावात आता नारळाची एक करवंटीही वाया जाऊ दिली जात नाही. करवंट्या संकलित करणारे लोक गावोगावी जाऊन करवंट्या खरेदी करतात. काही वेळा करवंट्याचे प्रमाण जास्त असेल तर शेतकरी स्वतःच ऑटोरिक्षा अथवा ट्रॅक्टर भाड्याने घेऊन करवंट्या व्यापाऱ्यापर्यंत पोहचवत असतात.
केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागांतही करवंट्या गोळा केल्या जात आहेत. शहरातील घराघरात आणि हॉटेल्समध्ये जाऊन करवंट्या गोळा केल्या जात आहेत. संकलित केलेल्या नारळाच्या करवंट्या कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये विकल्या जातात. या नारळाच्या करवंट्यापासून ॲक्टिव्हेटेड कार्बन बनवण्यात येतो. कर्नाटकातही तसे काही प्रकल्प सुरु झाले आहेत.
कसा तयार होतो ॲक्टिव्हेटेड कार्बन?
कोळसा, नारळाची करवंटी आणि लाकडापासून ॲक्टिव्हेटेड कार्बन बनवला जातो. कार्बनचे भरपूर प्रमाण असलेले हे घटक ऑक्सिजनशिवाय ६०० ते ९०० अंश सेल्सिअस तापमानाला तापवले जातात. यानंतर हा कार्बन अरगॉन आणि नायट्रोजनसह रसायनांच्या संपर्कात येतो. त्यानंतरही त्याला पुन्हा तेवढ्याच प्रमाणात तापवले जाते.
सोने वितळवणे अथवा शुद्धीकरणासाठी ॲक्टिव्हेटेड कार्बनचा वापर केला जातो. तसेच इतर अनेक क्षेत्रांतही ॲक्टिव्हेटेड कार्बन वापरला जातो. अमेरिकेप्रमाणेच जर्मनी, रशिया, कोरिया, नेदरलँड, बेल्जियम, कॅनडा या देशांकडूनही ॲक्टिव्हेटेड कार्बनची निर्यात केली जाते.
सोन्याच्या किमतीत होणारी सततची वाढ, अधिकच्या व्यवसायासाठी सोन्याच्या खाणींचा घेतला जाणारा शोध या पार्श्वभूमीवर जगभरात ॲक्टिव्हेटेड कार्बनची मागणी वाढली आहे. त्यामुळे येत्या काळात ॲक्टिव्हेटेड कार्बनचा व्यापार वाढणार असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. भारतातील ॲक्टिव्हेटेड कार्बनलाही चांगली मागणी आहे. त्याचा थेट फायदा नारळ उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.