Handcraft Production : शोभिवंत वस्तू निर्मिती व्यवसायाला दिला आकार

Agrowon Success Story : पूजा अविनाश कुंभार यांनी पारंपरिक कुंभार व्यवसायात बदल करीत सण- समारंभ आणि शहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन विविध कलात्मक वस्तूंच्या निर्मितीला सुरुवात केली.
Handcraft Production
Handcraft ProductionAgrowon

एकनाथ पवार

Women Success Story : पूर्वी गावागावांतील कुंभार मंडळी मातीची भांडी तयार करून गावशिवारातील विविध बाजारांमध्ये विक्रीला घेऊन जायचे. परंतु मागील काही वर्षांत मातीच्या भांड्याची जागा तांबे, पितळ आणि स्टीलच्या भांड्यांनी घेतली आणि या व्यवसायाचे अर्थचक्र मंदावले. मात्र काहींनी आपला पारंपरिक व्यवसाय बंद न करता त्यात मागणीनुसार विविध वस्तूंच्या निर्मितीला सुरुवात केली. यापैकीच एक आहे मळेवाड (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) येथील कुंभार कुटुंबीय.

सावंतवाडी-रेडी मार्गावर मळेवाड हे गाव आहे. या गावातील कुंभारवाडीमध्ये पूजा अविनाश कुंभार राहतात. पूजा यांच्या माहेरी देखील मातीपासून भांडी बनविण्याचा व्यवसाय होता. त्यामुळे लहानपणापासून माती कामाच्या वस्तू निर्मितीचे आणि विक्री व्यवसायाचे त्यांना ज्ञान होते. पूजा यांचे सासरे अर्जुन आणि पती अविनाश हे परंपरेने मातीपासून विविध गृहोपयोगी भांडी बनविण्याचा व्यवसायामध्ये आहेत. बाजारपेठेच्या मागणीनुसार त्यांनी वस्तू निर्मितीमध्ये बदल केले. या बदलाला आता पूजाताईंची साथ मिळाली आहे.

Handcraft Production
Drought Crisis : आमच्या जीवनाचा यंदा बेरंग झालाय...

वस्तू निर्मितीसाठी यंत्रांचा वापर

गेल्या दोन वर्षांपासून पूजाताईंनी मातीपासून कलात्मक वस्तू निर्मितीची जबाबदारी स्वीकारली. वस्तूंच्या विक्रीची जबाबदारी सासरे आणि पती पाहतात. पहिल्यांदा पारंपरिक पद्धतीने बनविलेल्या वस्तू बाजारपेठेत विक्रीसाठी नेल्यानंतर त्याला फारसा उठाव नव्हता. यामुळे त्यांनी बाजारपेठेतील मातीच्या विविध वस्तूंच्या गुणवत्तेचा आणि प्रकाराचा अभ्यास केला. शहरी बाजारपेठेतील व्यापारी गुजरात तसेच इतर राज्यांतून येणाऱ्या मातीच्या वस्तूंना पसंती देत होते. याचे मुख्य कारण म्हणजे वस्तूंची गुणवत्ता आणि विविधता. त्यामुळे पूजा आणि अविनाश यांनी पुन्हा एकदा बाजारपेठेतील मागणी आणि मातीच्या कलात्मक वस्तू निर्मिती तंत्रज्ञानाबाबत सखोल माहिती घेतली. तसेच विविध ठिकाणी प्रशिक्षण घेतले. आधुनिक यंत्रांची माहिती घेतली. त्यातून पुन्हा एकदा नव्याने कलात्मक भांडी आणि शोभेच्या वस्तू निर्मितीला सुरुवात केली.

आकर्षक, रेखीव वस्तू बनविण्यासाठी पूजाताईंना भांडवलाची गरज होती. पहिल्यांदा त्यांनी बॅंकेतून पाच लाखांचे कर्ज घेतले. यातून गरजेनुसार यंत्रांची खरेदी केली. त्यावर विविध वस्तूंची निर्मिती करण्यास सुरुवात केली. या वस्तूंच्या विक्रीमध्येही अडथळे आले, काही व्यापाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु हार न मानता त्यांनी वस्तू संपल्यानंतर पैसे द्या, पण या वस्तू दुकानात विक्रीसाठी ठेवा, असे आवाहन त्यांनी व्यापाऱ्यांना केले. काही महिन्यांतच विविध वस्तूंची विक्री होऊ लागल्याने व्यापाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला. आता विविध शहरांतील व्यापारी आगाऊ रक्कम देऊन विविध वस्तूंची खरेदी करतात. त्यामुळे कुंभार दांपत्याचा उत्साह वाढला.यातून व्यवसायाला चांगली गती मिळाली आहे.

Handcraft Production
Dr. Venkat Mayande : ‘ॲग्रिकल्चर ४.०’ क्रांतीच्या दिशेने...

व्यवसायातून रोजगार निर्मिती

विविध वस्तूंच्या निर्मितीसाठी चिकट आणि कमी चिकट प्रकारची माती वापरली जाते. पूजा ताईंनी वस्तू निर्मितीसाठी माती मळणी यंत्र, सिंडिकेटर यंत्र, मिक्सर, मोल्डर, हॅन्डप्रेस अशा विविध यंत्रांची खरेदी केली. मात्र तयार केलेल्या भांड्यांची भाजणी करण्यासाठी भट्टी पारंपरिक ठेवली आहे. पूजा आणि अविनाश यांना सिंधुदुर्गातील संत गोरा कुंभार उत्कर्ष मंडळाने चांगले सहकार्य केले आहे. कुंभार दांपत्याने हस्तकलेच्या विविध वस्तूंच्या निर्मितीबाबत प्रशिक्षण देखील घेतले आहे. पूजाताईंनी विविध वस्तूंच्या निर्मितीसाठी तीन महिला आणि दोन पुरुषांना बारमाही रोजगार दिला आहे. दिवाळी, लग्नसराई, मकरसंक्रांतीच्या काळात गरजेनुसार मजुरांमध्ये वाढ केली जाते.

मातीपासून विविध कलात्मक वस्तूंची निर्मिती करताना पूजाताईंनी बाजारपेठेच्या मागणीचा चांगला अभ्यास केला आहे. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केल्यानंतर पारंपरिक चार-पाच प्रकारच्या वस्तू न बनविता हंगामानुसार आकर्षक आणि कलात्मक वस्तू बनविण्यावर पूजाताईंनी भर दिला. दिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमेला पणत्या, कंदील, मकरसक्रांतीसाठी सुगड आणि उन्हाळा सुरू होताच पाण्याचे मडके, घागर आणि लग्नसराई सुरू झाल्यानंतर मातीचे करे अशा वस्तूंची त्यांनी निर्मिती सुरू केली.

घागर, मडके, टोप, कढई, तवा, फ्रायपॅन, चपाती, भाकरी ठेवण्याचे भांडे, ताट, वाटी, चहाचे कप, ग्लास, तांब्या, आकाश कंदील, पणती, सुगड, बाटली, विविध आकारांच्या शोभिवंत वस्तू, फुलदाणी, घुमटी, मोठ्या पणत्या, पेन स्टॅण्डची निर्मिती.

पणती पाच रुपये ते २५ रुपये, कंदील ५० ते २०० रुपये, खाद्यपदार्थ निर्मितीची भांडी ७० ते ३०० रुपये, कुंडी ५० ते १५० रुपये, ग्लास १० ते २५ रुपये असे विक्रीचे दर. शोभिवंत वस्तूंचे दर ५०, १०० ते ३०० रुपये. आकार, कोरीव कामानुसार वस्तूचे दर ठरतात.

व्यवसायातून दरवर्षी सुमारे दहा लाखांची उलाढाल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठेसह गोवा, मुंबई, पुणे, रत्नागिरी बाजारपेठेत विविध वस्तूंची विक्री.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com