Tomato Farming : मल्चिंग, नेटमुळे टोमॅटो गुणवत्तेत वाढ

Tomato Production : सोलापूर जिल्ह्यातील खंडाळी (ता. मोहोळ) येथे राहुल पाटणे कुटुंबीयांची ६ एकर शेती आहे. राहुल, सचिन आणि नीलकंठ या तीन बंधूंचे एकत्र कुटुंब असून, आईसह १३ सदस्य आहेत.
Tomato Farming
Tomato Farming Agrowon
Published on
Updated on

शेतकरी नियोजन टोमॅटो

 शेतकरी : राहुल सुभाष पाटणे

 गाव : मु.पो. खंडाळी,

ता. मोहोळ, जि. सोलापूर

 एकूण शेती : ६ एकर

 टोमॅटो : सध्या २ एकर (नव्याने २ एकर टोमॅटो लागवडीची तयारी सुरू.)

सोलापूर जिल्ह्यातील खंडाळी (ता. मोहोळ) येथे राहुल पाटणे कुटुंबीयांची ६ एकर शेती आहे. राहुल, सचिन आणि नीलकंठ या तीन बंधूंचे एकत्र कुटुंब असून, आईसह १३ सदस्य आहेत. १९९२ पासून शेती करताना सुरुवातीला ऊस, केळी या नगदी पिकांसह टोमॅटो, कारले, दोडके, मिरची अशा फळभाज्यांवर भर दिला. आता अनुभवातून आणि मार्केटचा चांगला अंदाज आल्याने टोमॅटोकडे सर्वाधिक कल असतो.

टोमॅटो व्यवस्थापनातील बाबी

 लागवडीपूर्वी उन्हाळ्यात प्रथम जमिनीची आडवी-उभी नांगरट करून घेतली जाते.

 एकरी साधारण १० ट्रॉली शेणखत टाकले जाते.

 त्यानंतर बेडमध्ये बेसल डोस म्हणून २०० किलो १८ ः४६ः०, २०० किलो १०ः२६ः२६ किलो, ५० किलो २४ः२४ः०, २० किलो सल्फर, जिवाणूखत- ५ किलो, कॅल्शिअम बोरॉन- २० किलो, सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्रण- २० किलो आणि सेंद्रिय खत १००० किलो दिले जाते. रोटाव्हेटरने चांगल्या प्रकारे मिसळले जाते.

 दोन ओळींत सात फूट आणि दोन रोपात दीड फूट अंतर ठेवून ट्रॅक्टरद्वारे बेड तयार केले जातात.

Tomato Farming
Tomato Farming : माकोडे बंधू झाले टोमॅटो शेतीत कुशल

 बेडवर ड्रीपची सिंगल लाइन व मल्चिंग पेपर अंथरून घेतो. होल पाडण्यापूर्वी ड्रीपद्वारे बेड चांगले भिजवतो.

 दोन दिवसांनंतर मल्चिंगवर छिद्रे पाडली जातात.

 मल्चिंग पेपरला छिद्रे पाडल्यानंतर एक दिवस थांबून दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजल्यानंतर विशेषतः उष्णता कमी झाल्यानंतर रोपांची लागवड केली जाते.

 रोपे लावताना खोडाला माती लागणार नाही, याची काळजी घेतली जाते.

 लागवड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्यूमिक ॲसिड व जिवाणूखतांची आळवणी केली जाते.

 लागवडीच्या ५ व्या दिवसापासून २५ व्या दिवसापर्यंत वाढीच्या अवस्थेसाठी ड्रीपद्वारे दर चार दिवसाला १९ः१९ः१९ एकरी २ किलो सोडले जाते.

 २५ ते ३५ दिवसांपर्यंत टोमॅटो फुलोऱ्यात येतात. या काळात सुरुवातीला एकदा आणि दहा दिवसांनी एकदा अशी एकरी २ लिटर सूक्ष्म अन्नद्रव्ये सोडली जातात. त्याशिवाय १२ः६१ः० एकरी ४ किलो प्रत्येकी तीन दिवसांतून एकदा सोडले जाते.

 ३५ ते ५० दिवसांपर्यंत टोमॅटो फळअवस्थेत असताना ड्रीपमधून १३ः४०ः१३ एकरी ४ किलो प्रमाणे ४ वेळा देतो. कॅल्शिअम नायट्रेट ३ किलो, बोरॉन अर्धा किलो दर पाच दिवसांतून एकदा असे तीन वेळा दिले जाते.

Tomato Farming
Tomato Farming : टोमॅटो फळांचा दर्जा राखण्यावर भर

 ५० ते ६५ दिवसांत फळधारणा चांगली होते. फळे पक्व होण्याच्या या कालावधीत ०ः५२ः३४ एकरी ३ किलो आणि ०ः०ः५० एकरी ४ किलो या प्रमाणे आलटून-पालटून दर ४ दिवसाला सोडले जाते. त्याशिवाय सल्फर १ किलो दिले जाते.

 ६५ दिवसांपासून फळ काढणीच्या वेळी अधून-मधून सूक्ष्म अन्नद्रव्य प्रत्येकी एकरी २ किलो सोडले जाते. तर ०ः५२ः३४ एकरी ३ किलो आणि मॅग्नेशिअम सल्फेट ७ किलो एकरी दर तीन दिवसाला सोडतो.

 कीडरोगाच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी गरजेनुसार दर आठ दिवसातून एक फवारणी घेतली जाते.

 साधारण पुढे ६५ दिवसांपासून १२० दिवसांपर्यंत दर एक दिवसाआड टोमॅटोची काढणी केली जाते.

 एकरी साधारण ४० ते ५० टन उत्पादन मिळते.

पाणी नियोजन

रोपांच्या लागवडीनंतर २० दिवसांपर्यंत ठिबकने रोज १ ते २ तास पाणी संध्याकाळी सोडले जाते. २० ते ५० दिवसांपर्यंत रोज दीड ते अडीच तास पाणी दिले जाते. यातही वाफसा आणि वातावरण यानुसार ऐनवेळी कमी जास्त केले जाते.

विषाणूला प्रतिबंध

टोमॅटोमध्ये सीएमव्ही आणि ग्रोव्हेल हे दोन विषाणूजन्य रोग (व्हायरस) सर्वाधिक बाधक आहेत. त्यासाठी लागवडीपासूनच योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे. सीएमव्ही हा प्रामुख्याने हवेतून, पांढरी माशीसारख्या रसशोषक किडीमुळे पसरतो. त्यासाठी लागवडीपूर्वी प्लॅाटच्या चारही बाजूने इन्सेक्ट नेट लावून घेतली जाते. सोबतच चारही बाजूंनी मका लागवड केली जाते. ग्रोव्हेलसाठी पाण्याचे योग्य नियोजन आणि नत्रयुक्त खतांचे प्रमाण यावर नियंत्रण ठेवतो. शिवाय ड्रीपद्वारे सल्फर, पोटॅश, स्फुरदयुक्त खते दिल्यामुळे विषाणू नियंत्रणात राहतात. किडीसाठी चिकट सापळे, कामगंध सापळे लावले जातात.

वर्षातून दोन वेळा उत्पादन

टोमॅटोची वर्षातून दोन वेळा उन्हाळी (मार्च) आणि खरीप हंगामात (जून) अशा दोन्ही वेळी टोमॅटोची लागवड करतो. सध्या उन्हाळी टोमॅटोचा २ एकरांचा प्लॉट सुरू आहे, तर खरीप हंगामातील टोमॅटोच्या लागवडीची तयारी सुरू आहे. दरवर्षी साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागवड करतो. पुढे ६५ दिवसांत जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात उत्पादन सुरू होऊन ऑगस्ट अखेरपर्यंत चालते. स्थानिक, परराज्यातील व्यापारी थेट बांधावरून टोमॅटो खरेदी करतात. त्यामुळे वाहतूक खर्चासह अन्य खर्च वाचतो.

- राहुल पाटणे ९८८१११०९५२

(शब्दांकन ः सुदर्शन सुतार)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com