Tomato Farming : माकोडे बंधू झाले टोमॅटो शेतीत कुशल

Tomato Production : वर्षातील दोन हंगामातील टोमॅटो शेतीतून यश आणि उत्पन्न वाढवण्याचा निर्धार केला. तो प्रत्यक्षात उतरवला. आज शिराढोण ( जि. धाराशिव) येथील सुभाष आणि कल्याण या माकोडे बंधूंनी टोमॅटो शेतीतील कुशल शेतकरी अशी आपली ओळख तयार केली आहे.
Subhash and Kalyan Makode and their Farm
Subhash and Kalyan Makode and their FarmAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : शिराढोण ( ता. कळंब, जि. धाराशिव) येथील सुभाष (वय ३८) आणि शरद ( वय ३२) या माकोडे बंधूंची सुमारे २३ एकर शेती आहे. वडिलोपार्जित जमीन कमी होती. आई महादेवी व वडील कल्याण यांनी मोठ्या कष्टातून १५ एकर जमीन घेतली. पोटाला पीळ देऊन, जिवाचे रान करून पंधरा वर्षांत ती कसदार केली. त्यामुळे आई-वडिलांचे जमिनीवर जिवापाड प्रेम होते. दिवसभर ते शेतात राबायचे. जून २०१८ मध्ये आईचा अपघात झाला. डोक्याला गंभीर मार लागला. सोलापूर व पुणे येथील रुग्णालयात उपचार केले. नऊ महिने आई ‘व्हेंटिलेटर’ वर होती. यात काही लाख रूपयांचा खर्च झाला. प्रसंगी जमीन विकायची तयारी ठेवली.

माकोडे यांचे कृषी सेवा केंद्रही आहे. घरातून व तेथून रक्कम उभी केली. कर्जाचा मोठा डोंगरही झाला. सर्व प्रयत्न करूनही आईला वाचवणे शक्य झाले नाही. त्याचा मोठा धक्का दोघा भावांना बसला. परंतु हताश होऊन बसणे शक्य नव्हते. कर्ज फेडणे, जगण्यासाठी पुढील मार्ग काढणे गरजेचे होते. अशावेळी दोघा बंधूंनी पीक पद्धती, बाजारपेठांची मागणी, वर्षभरातील दरांची स्थिती यांचा अभ्यास केला. त्यातून व्यावसायिक दृष्टीने टोमॅटो हे पीक निवडले. तिथून भाजीपाला शेतीचा प्रवास सुरू झाला.

टोमॅटोची शेती

आजमितीला माकोडे बंधूंचा टोमॅटो शेतीत चार- पाच वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. सुरवातीला तीन एकरांपर्यंत असलेले क्षेत्र आज १६ एकरांपर्यंत असते. वर्षांतील दोन हंगामात टोमॅटो शेती होते. ऑगस्टला पहिली लागवड केल्यानंतर १५ ऑक्टोबरपासून जानेवारी अखेरपर्यंत काढणीहोते. मार्चला दुसरी लागवड होते. मेपासून जुलै दरम्यान काढणी व विक्री सुरू असते. गादीवाफा व मल्चिंग पेपरचा वापर लागवडीमध्ये होते. बाजारपेठेत ज्या वाणाला मागणी आहे त्यानुसार तसेच ज्या वाणाला रोगांचा त्रास अधिक आहे त्यानुसार वाणबदल केला जातो. प्रति एकरी ५० टनांपर्यंत उत्पादन मिळते. दोन्ही हंगामांतील उत्पन्नामुळे शेतीचे अर्थकारण सशक्त करणे माकोडे यांना शक्य झाले आहे.

Subhash and Kalyan Makode and their Farm
Tomato Pest Management : टोमॅटो पिकावरील पांढऱ्या माशीचे एकात्मिक नियंत्रण

टोमॅटो बाजाराचे गणित तोंडपाठ

माकोडे बंधूंनी बाजारपेठेचे बारकावे चांगलेच अवगत करून घेतले आहेत. वर्षभरातील कोणकोणत्या महिन्यांत कुठून टोमॅटो येतो, केव्हा आवक कमी, जास्त असते, परराज्यात मागणी केव्हा, किती असते या बाबींचा त्यांनी चांगला अभ्यास केला आहे. त्यामुळेच आपल्या टोमॅटोला अधिकाधिक दर मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. क्षेत्रही सोळा एकरांच्या दरम्यान असल्याने एकाचवेळी व्यापाऱ्यांना जागेवर मोठ्या प्रमाणात टोमॅटो उपलब्ध होतो. वर्षभराचा विचार केल्यास प्रति २५ किलोच्या क्रेटला ५०० रुपयांपासून ते १५०० रुपयांपर्यंत दर मिळतो असे सुभाष यांनी सांगितले.

प्रगतीकडे वाटचाल

सुभाष सांगतात की टोमॅटोचा उत्पादन खर्च एकरी दोन- अडीच लाखांहून अधिक आहे. टोमॅटो शेतीचे नियोजन उत्तम साधून उत्पादन खर्चात बचत करण्याचा प्रयत्न असतो. कर्जाचा बोजा कमी झाला आहे. कुटुंबाची आर्थिक प्रगती साधली. नवी जमीन खरेदी केली. प्लॉट घेतला. कृषी सेवा केंद्राच्या व्यवसायाची उलाढाल वाढवणे शक्य होऊ लागले. मागील वर्षी जम्मूमध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटो पाठवला. आता शेतीतील ज्ञानात भर पडली आहे. कौशल्य विकसित झाले. पुढील दिवस निश्चितच चांगले येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Subhash and Kalyan Makode and their Farm
Tomato Farming : शेतकरी वळताहेत टोमॅटो पिकाकडे

गटशेतीला चालना

सुभाष पुढे सांगतात की कमी प्रमाणातील टोमॅटोसाठी मुंबई, दिल्ली, दक्षिणेकडील व्यापारी खरेदीसाठी येत नाहीत. त्यांना चारशे ते पाचशे क्रेट टोमॅटो दररोज लागतो. अन्यथा ते मोठ्या बाजारपेठांत जातात. मराठवाड्यातील जमिनीत टोमॅटोला चांगला रंग येतो. दर्जेदार माल तयार होतो. व्यापाऱ्यांना बाजारात आमच्या टोमॅटोची प्रतिक्षा असते. त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी लातूर, शिराढोण व अहमदपूर येथील १२ शेतकऱ्यांनी गट तयार केला आहे. दररोज दोन हजार क्रेट माल उपलब्ध होईल असे नियोजन केले जाते. व्यापाऱ्यांची संख्या वाढली की स्पर्धा निर्माण होऊन चांगला दर मिळतो असेही सुभाष म्हणाले.

हिरवळीचे खत

एकाच जमिनीत सलग टोमॅटो पीक घेतला की उत्पादन व दर्जावर परिणाम होत असल्याचे दिसूनआले. त्यामुळे सुभाष यांनी अन्य शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेत यंदापासून बोरू हे हिरवळीचे पीक घेण्यास सुरवात केली आहे. सुमारे ७५ दिवसांत हे पीक फुलोऱ्यावर येते. मल्चरच्या साह्याने तुकडे करून ते जमिनीत गाडले आहे. त्यानंतर टोमॅटोची लागवड केली आहे. या प्रयोगामुळे जमिनीचा कस सुधारणार असून उत्पादनाची गुणवत्ता सकस मिळणार असल्याचे सुभाष सांगतात. दरवर्षी या प्रयोगाचे नियोजन केले आहे.

मिरचीचा बेवड

यंदा टोमॅटोत फेरपालट व बेवड म्हणून जुलैमध्ये दीड एकरांत ढोबळी मिरची घेतली आहे. आत्तापर्यंत सुमारे ४८ टनांपर्यंत उत्पादन मिळाले आहे. अतिवृष्टीमुळे यंदा भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला. त्याचा फायदा चांगला दर मिळवण्यात झाला आहे. सध्या किलोला ३० रुपयांपासून ते ७० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे सुभाष म्हणाले.

सुभाष माकोडे ९६०४७५९९९८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com