
संतोष मुंढे
Agriculture Success Story : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वरूडकाझी येथील बळिराम दांडगे यांनी एकत्रित कुटुंब पद्धतीच्या शेतीची मुख्य जबाबदारी सांभाळली आहे. टोमॅटो व त्यानंतर कारले अशी मुख्य व्यावसायिक पीकपद्धती त्यांनी निश्चित करून त्यानुसार त्याचे तंत्र व व्यवस्थापन हाताळले आहे. त्यातून आर्थिकदृष्ट्या सक्षमता त्यांनी प्राप्त केली आहे.
वरूड काझी (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथे दांडगे संयुक्त परिवाराची एकूण सुमारे १८ एकर शेती आहे. त्याची मुख्य जबाबदारी बळिराम दांडगे पाहतात. वडील शिवाजीराव व काका बाबासाहेब ही मुख्य वडीलधारी मंडळी आहेत. या दोघांसह बळिराम यांना आजी शेवंताबाई, आई ताराबाई, पत्नी संजीवनी, काकू चंद्रकला, चुलतभाऊ, वहिनी कविता यांचे विशेष सहकार्य लाभते. एकी व नात्यांचा ओलावा कुटुंबीयांतील सदस्यांनी आजच्या काळातही चांगल्या प्रकारे जपला आहे हे विशेष.
टोमॅटो, कारले या पिकांत या कुटुंबाचा हातखंडा आहेच. शिवाय दर्जेदार व अधिक उत्पादनात वरूडकाझी परिसरात त्यांचे नाव देखील आहे. समृद्धी महामार्गात दांडगे कुटुंबाची सुमारे तीन एकर जमीन गेली. त्या बदल्यात मिळालेल्या मोबदल्यातील रकमेतून जिल्ह्यातील करमाडपासून पाच किलोमीटरवरील महमदपूर शिवारात ११ एकर जमीन खरेदी केली.
तंत्रशुद्ध पद्धतीची शेती
अलीकडील काळात टोमॅटो, कारले व आले ही कुटुंबाची मुख्य पिके आहेत. टोमॅटो व कारल्याचे प्रत्येकी सुमारे नऊ एकर क्षेत्र असते. तर यंदा आल्याचेही तेवढेच क्षेत्र ठेवले आहे. शेतीत तंत्रशुद्ध पद्धतीचा वापर करण्याकडे बळिराम यांचा कल आहे. साधारण ऑगस्टच्या दरम्यान टोमॅटोची लागवड होते. ऑक्टोबर-नोव्हेंबर नंतर त्याचे दर घसरू लागतात, असा अनुभव असल्याने नोव्हेंबरमध्ये कारले लागवडीचे वेध लागतात.
टोमॅटोची काढणी सुरू असतानाचा त्या शेतात कारल्याची लागवड होते. टोमॅटो पिकला मिळणारी खते, पाणी कारले पिकासाठीही उपयोगात येतात. टोमॅटोची लागवड गादीवाफ्यावर (बेड) ५ बाय एक फुटावर असते. याच बेडवर पुढे कारले असते. त्याची पाच बाय तीन फुटांवर लागवड होते. कारल्याचा प्लॉट मार्च- एप्रिलपर्यंत चालतो. पीक घेण्यापूर्वी एकरी ४ ते ५ ट्रॉली शेणखताचा वापर होतो.
वाणांची निवड
टोमॅटोसाठी अलीकडील काळात अंड्याप्रमाणे गोल आकाराच्या , आकर्षक लाल रंगाच्या टिकवणक्षमता जास्त असलेल्या नव्या वाणाचा वापर सुरू केला आहे. त्याच्या फळाचे वजन ९० ते ११० ग्रॅमपर्यंत असते. कारल्याचे वाण निवडतानाही हिरवा रंग, छोटे फळ, टिकवणक्षमता अधिक अशा वैशिष्ट्यांचा अभ्यास केला आहे.
पॉली मल्चिंग, जीआय पाइप्सचा वापर
सन २०१८ पासून सुमारे सहा एकर क्षेत्र पॉली मल्चिंगखाली आणले आहे. या तंत्रामुळे एकरी १४ हजारांच्या खर्चात शेतातील तण व्यवस्थापन मार्गी लावले आहे. त्याचबरोबर जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत झाली आहे. पूर्वी टोमॅटो, कारले शेतात आधारासाठी बांबूचा वापर व्हायचा. बांबू खरेदी, त्याची उभारणी व प्लॉट संपल्यानंतर पुन्हा काढणी असा सर्व मिळून एक लाखापर्यंत खर्च व्हायचा.
एक- दोन वर्षांनंतर बांबू मातीत खचायचा. त्याची उंची कमी- अधिक व्हायची. एखादा बांबू जमिनीतून काढताना किंवा पडला तर मोडायचा. एखादा बांबू पडला तर तारांचा त्या ओळीत दिलेला ताण पूर्णपणे कमी व्हायचा. या समस्येवर बळिराम यांनी उपाय शोधला. त्यांनी बांबूच्या ऐवजी इंग्रजी टी आकाराच्या जीआय पाइप्सचा वापर केला आहे.
पाच ते साडेपाच फूट त्याची उंची आहे. हा पाइप जमिनीत सहज रोवण्यास मदत होते. प्रत्येकी १२ फुटांवर एक या प्रमाणे एकरी सुमारे ८०० पाइप्स वापरल्या आहेत. त्यामुळे बांबूच्या वापरावर दरवेळी होणारा मोठा खर्च पूर्ण वाचला आहे. शिवाय वेलींचा अपेक्षित विस्तार होण्यासही मदत झाली आहे.
उत्पादनातील सातत्याचा फायदा
टोमॅटोचे एकरी सुमारे २० ते २५ टनांपर्यंत, तर कारल्याचे कमाल १५ टनांपर्यंत उत्पादन मिळते.
बळिराम यांचे वडील शिवाजीराव २००१ ते २०१९ दरम्यान मालवाहू वाहनाच्या साह्याने
पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा माल नागपूर, अमरावती, परभणी, नांदेड, जबलपूर आदी बाजारपेठांमध्ये घेऊन जायचे. त्या वेळी विविध बाजारापेठांचा व दरांचा अभ्यास झाला. त्यांच्या मार्गदर्शनातून उत्पादन, मालाची उपलब्धता व दर यांचा आवाका आता बळिराम यांनाही येऊ लागला आहे.
टोमॅटोचे दर सातत्याने बदलत राहतात. सन २०२२ व २०२३ या दोन वर्षांत टोमॅटो खर्चाला पुरला नाही अशी अवस्था होती. तरीही या पिकांचे तंत्र अवगत असल्याने त्यातील सातत्य कायम ठेवले. त्याचा फायदा पुढील हंगामात दिसून येतो. अलीकडे सहा एकरांत ३५०० क्रेट टोमॅटो पिकले. प्रति २५ किलो क्रेटला ११०० ते १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. कारल्याला किलोला ३०, ३५ रुपयांपासून ४० रुपयांपर्यंत दर मिळतो. कारले आजवर अपयशी ठरले नसल्याचा बळिराम यांचा अनुभव आहे. यंदाही हे पीक चांगले उत्पन्न देऊन जाईल अशी त्यांना आशा आहे.
शेतीतील ठळक बाबी व सुविधा कुटुंबातील सर्व सदस्य राबतात.
२५ वर्षाच्या अनुभवात डिसेंबर ते जानेवारी या काळात भाजीपाला दरांत मंदीचा अनुभव
यांत्रिकीकरणात कमी एचपी क्षमतेचे ट्रॅक्टर, ब्लोअर, ‘बेडमेकर’, फणपाळी, ट्रॉली आदी सामग्री. -सिंचनासाठी चार सामाईक, एक स्वतंत्र विहीर व बोअरवेलची साथ.
दोन एकर शेती मक्त्यानेही करतात.
बळिराम दांडगे ९८९०७२१८२६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.