Tomato Farming : टोमॅटो फळांचा दर्जा राखण्यावर भर

Tomato Production : परभणी जिल्ह्यातील मिरखेल (ता. परभणी) येथील अल्पभूधारक तरुण शेतकरी संभाजी कुंडलिकराव गायकवाड वैविध्यपूर्ण भाजीपाल्याचे उत्पादन घेतात.
Tomato Farming
Tomato FarmingAgrowon
Published on
Updated on

Tomato Farming Management :

शेतकरी नियोजन

पीक : भाजीपाला

शेतकरी : संभाजी गायकवाड

गाव : मिरखेल, ता. जि. परभणी

एकूण क्षेत्र : ४.५ एकर

भाजीपाला लागवड : २ एकर

परभणी जिल्ह्यातील मिरखेल (ता. परभणी) येथील अल्पभूधारक तरुण शेतकरी संभाजी कुंडलिकराव गायकवाड वैविध्यपूर्ण भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. काटेकोर व्यवस्थापनातून वाल व टोमॅटो उत्पादनात त्यांनी सातत्य राखले आहे.

संभाजी गायकवाड यांची मिरखेल शिवारात ४.५ एकर जमीन आहे. सिंचनासाठी बोअरची सुविधा आहे. मागील २० हून अधिक वर्षांपासून ते नियमित विविध भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. भाजीपाल्यासाठी २ एकर क्षेत्र दरवर्षी राखीव ठेवले जाते. साधारण ५ ते १० गुंठे इतक्या क्षेत्रावर विविध भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. तसेच २० गुंठ्यांवर शेवंती, गलांडा, झेंडू, ॲस्टर इत्यादी फुलपिकांचे उत्पादन घेतात.

Tomato Farming
Tomato Farming : माकोडे बंधू झाले टोमॅटो शेतीत कुशल

वैविध्यपूर्ण भाजीपाला

वर्षभर विविध हंगामांत येणाऱ्या पालेभाज्यांमध्ये शेपू, पालक, चुका, मेथी, कोथिंबीर, तांदुळजा, लाल माठ, तर वेलवर्गीयमध्ये दोडके, कारले, दुधी भोपळा, तोंडली, काशीफळ (लाल भोपळ), देवडांगर (गोल भोपळा) यांची लागवड असते. तसेच शेंगवर्गीय भाज्यांमध्ये गवार, चवळी, वाल, तर कंदवर्गीयमध्ये बीट रूट, कांदा, लसूण यांसह वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची आदी भाजीपाला पिकांचे प्रत्येकी ५ गुंठे क्षेत्रावर उत्पादन घेतात. अळू (चमकुरा), पुदिना भरताची वांग्याचे देखील उत्पादन घेतले जाते.

वाल लागवड

मागील २० वर्षांपासून वाल पिकाची लागवड करत आहेत. सुरुवातीला गावरान वालाचे उत्पादन घेत होते. परंतु त्यातून केवळ चार महिने उत्पादन मिळत होते. त्यामुळे मागील पाच वर्षांपासून जास्त कालावधीत जवळपास ८ ते ९ महिने उत्पादन देणाऱ्या वालाच्या सुधारित वाणांची लागवड करण्यास सुरुवात केली. दरवर्षी मे महिन्यात वाल लागवड केली जाते.

लागवडीपूर्वी जमीन तयार करून ६ फूट अंतरावर ठिबकच्या नळ्या अंथरल्या जातात. ठिबकच्या प्रत्येक ड्रीपरच्या ठिकाणी वालाच्या बियाण्याची टोकण करतात. लागवडीनंतर एक महिन्याने सरी ओढली जाते. तार बांधणी केली जाते. लागवडीनंतर साधारण दोन महिन्यांत वाल शेंगा तोडणीस सुरुवात होते. वालाचा हंगाम जुलै ते एप्रिलपर्यंत चालतो. यंदा जूनमध्ये ६ गुंठ्यांवर वाल लागवड केली आहे. ऑगस्टपासून उत्पादन सुरू झाले आहे. दररोज २० किलो वाल शेंगांचे उत्पादन मिळत आहे. यंदा सुरुवातीपासून वालाला ८० रुपये प्रति किलो इतका दर मिळत आहेत. वाल पिकामध्ये काशीफळ आणि कोहळ्याचे आंतरपीक घेतले आहे.

पीक संरक्षण

वाल पिकामध्ये शेंगा पोखरणारी अळी या किडींचा मुख्यतः प्रादुर्भाव दिसून येतो. पावसाळ्यात फुलगळ होते. त्यासाठी शिफारशीत कीटकनाशकांची, बुरशीनाशकांची फवारणी केली जाते. तसेच हुमणी कीड व मर रोगाची प्रार्दुभाव रोखण्यासाठी शिफारशीत घटकांचा वापर केला जातो. रासायनिक खत व्यवस्थापनामध्ये १०ः२६ः२६ या खताची लागवडीच्या वेळी तसेच लागवडीनंतर दर महिन्याला मात्रा दिली आहे. दर आठ दिवसांच्या अंतराने सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केला जातो.

Tomato Farming
Tomato Pest Management : टोमॅटो पिकावरील पांढऱ्या माशीचे एकात्मिक नियंत्रण

मागील महिन्यातील कामकाज

टोमॅटो लागवडीसाठी पॉवर टिलरने प्रत्येकी पाच फूट अंतरावर बेड तयार केले. बेडवर १०ः२६ः२६ या खतांची १० किलो मात्रा दिली. त्यानंतर ठिबकच्या नळ्या अंथरून घेतल्या. लागवडीपूर्वी बेड चांगले भिजवून घेतले.

लागवडीसाठी २० ऑक्टोबरच्या दरम्यान खासगी रोपवाटिकेतून रोपांची खरेदी केली. साधारण १ रुपया २० पैसे प्रति रोप दराने टोमॅटो रोपे विकत आणली.

लागवडीपूर्वी रोपांच्या मुळावर ह्युमिक ॲसिडची प्रक्रिया केली.

साधारणपणे सव्वा फूट अंतरावर टोमॅटो रोपांची लागवड केली.

लागवडीनंतर तिसऱ्या दिवशी सूक्ष्म अन्नद्रव्ये तसेच चार दिवसांनंतर विद्राव्य खतांची मात्रा दिली.

टोमॅटो पिकामध्ये रसशोषण करणाऱ्या किडींचा तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता होती. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रासायनिक घटकांची फवारणी घेतली.

सूक्ष्म अन्नद्रव्ये, १९ः१९ः१९ या ग्रेडच्या विद्राव्य खतांच्या गरजेनुसार मात्रा दिल्या आहेत.

पिकामध्ये तण नियंत्रणासाठी खुरपणी केली.

सिंचन व्यवस्थापनामध्ये ठिबकद्वारे प्रतिदिन एक तास प्रमाणे सिंचन केले.

आगामी काळात मिरची, ब्रोकोली तसेच कोबी लागवडीचे नियोजन होते. त्यानुसार लागवडीसाठी जमीन तयार केली.

आगामी नियोजन

येत्या काळात पाऊण एकर क्षेत्रावर मिरची लागवडीचे नियोजन आहे. त्यानुसार पूर्वतयारी सुरू आहे.

साधारण १० गुंठे क्षेत्रावर ब्रोकोली, कोबी, कोथिंबीर लागवडीचे नियोजन आहे.

त्यानुसार ब्रोकोली आणि कोबी लागवडीसाठी रोपांची उपलब्धता केली आहे. रोपवाटिकेतून ब्रोकोलीची १ हजार रोपे प्रति रोप दीड रुपया, तर कोबीची दोन हजार रोपे प्रति रोप एक रुपया दराने खरेदी केली आहेत.

सप्टेंबरमध्ये लागवड केलेल्या टोमॅटो पिकाचे उत्पादन पुढील २० दिवसांनी सुरू होईल. आगामी काळात टोमॅटो लागवडीत फळांचा दर्जा राखण्यासाठी सिंचन आणि खत व्यवस्थापनावर भर दिला जाईल. आवश्यकतेनुसार पीक संरक्षणासाठी उपाय केले जातील.

टोमॅटो लागवड नियोजन

टोमॅटो पिकाची वर्षभरात दोन ते चार टप्प्यांत १० गुंठे क्षेत्रावर लागवडीचे नियोजन असते. लागवडीसाठी सुधारित वाणांचा वापर केला जातो. टोमॅटो पिकामध्ये रासायनिक खतांचा बेसल डोस म्हणून १०ः२६ः२६ दिली जाते. त्यानंतर गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा देतात. लागवडीनंतर साधारण दीड महिन्याने टोमॅटो झाडांना आधार देण्यासाठी बांबू व ताराची बांधणी करून करतात. टोमॅटोचा हंगाम दोन ते तीन महिने चालतो. यंदा सप्टेंबर महिन्यात ६ गुंठे क्षेत्रावर लागवड केली आहे. सध्या या लागवडीतील टोमॅटो झाडांना हिरवी टोमॅटो लगडलेली आहेत. येत्या २० ते २५ दिवसांत लाल रंग येताच टोमॅटोचा तोडा सुरू होईल, असे संभाजीराव सांगतात.

संभाजी गायकवाड, ९७६३५७१५५९

(शब्दांकन : माणिक रासवे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com