Cotton Gray Weevil : कपाशी, वांगी पिकांतील राखाडी भुंगा

Cotton Crop : कपाशी पिकामध्ये मुख्यत: पांढरी माशी, मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि गुलाबी अळी या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
Gray Weevil
Gray WeevilAgrowon

राहुल वडघुले

Cotton Crop Disease : महाराष्ट्रामध्ये कपाशी हे पीक अत्यंत महत्त्वाचे पीक म्हणून ओळखले जाते. प्रामुख्याने खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये कपाशी लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कपाशी पिकामध्ये मुख्यत: पांढरी माशी, मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि गुलाबी अळी या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो.

कपाशी पिकामध्ये आढळणाऱ्या राखाडी भुंगा ही साधारण कमी नुकसानकारक कीड म्हणून ओळखली जायची. मात्र अलीकडच्या काळात ही कीड कपाशीतील मुख्य कीड होण्याच्या मार्गावर आहे. बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये या किडीबाबत संभ्रमता आढळून येत आहे. बहुतांश शेतकरी या किडीला ‘मित्रकीटक’ समजत आहेत.

या किडीचे नाव ‘कॉटन ॲश व्हीव्हिल’ म्हणजेच ‘कपाशीवरील राखाडी भुंगा’ असे आहे. या किडीच्या सुमारे ३३० प्रजाती आहेत. त्यापैकी ३ ते ४ प्रजाती प्रामुख्याने आपल्याकडे दिसून येतात.

नमुना मिळण्याचे ठिकाण

सदर किडीचा नमुना आम्हाला सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर येथून २०२३ मध्ये मिळाला होता.

किडीची माहिती

किडीचे नाव : राखाडी भुंगा, ॲश व्हीव्हिल (Ash Weevil)

किडीचे जनुकीय नाव : Myllocerus

किडीच्या प्रजाती : Mylocerus viridanus (पाठीवर ठिपके नसतात.) Mylocerus subfasciatus (पाठीवर काळे ठिपके किंवा पट्टे असतात.)

किडीच्या अवस्था : प्रौढ (भुंगा), अंडी, अळी, कोष.

नुकसान करणारी अवस्था ः प्रौढ (भुंगा), अळी

नुकसान : ही कीड प्रामुख्याने पाने, फुले यांचे नुकसान करते. या किडीमुळे साधारणतः जास्त नुकसान होत नाही. परंतु वांगी पिकात ६० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.

यजमान पिके : वांगी, आंबा, लिंबू, ज्वारी, बाजरी, मका, सूर्यफूल, रताळी, इ.

Gray Weevil
Cotton Disease : बोंडसडवर लवकरच शोधणार उपाय

लक्षणे

या किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे पिकाच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत, म्हणजेच रोप अवस्थेपासून पीक काढणीपर्यंत दिसून येतात. अगदी सुरुवातीच्या २ पानांवर देखील लक्षणे दिसू लागतात.

सुरुवातीला पाने कुरतडलेली किंवा पानांना छिद्रे पडलेली दिसतात. कुरतडलेली जागा इंग्लिश ‘U’ किंवा ‘V’ आकाराची दिसते.

किडीचा जीवनक्रम

ॲश व्हीव्हिल या किडीच्या प्रौढ (भुंगा), अंडी, अळी आणि कोष अशा एकूण चार अवस्था असतात. याला संपूर्ण रूपबदल (complete Metamorphosis) असे म्हणतात.

Gray Weevil
Cotton Disease : कपाशील लाल्या येण्याची कारणे काय आहेत?

अवस्था

प्रौढ अवस्था : प्रौढ (भुंगा) ३ ते ६ मि.मी. असून राखाडी रंगाचा असतो. त्याच्या पुढच्या पंखांवर काळे ठिपके असतात, पट्टे असतात किंवा काहीही नसते. तर मागचे पंख पारदर्शक असतात. मादी भुंगा हा नर भुंग्यापेक्षा मोठा असतो. प्रौढ भुंगे ४ ते ५ महिने जिवंत राहू शकतात.

अंडी अवस्था : मादी भुंगा एका ठिकाणी ३०० अंडी वेगळी वेगळी किंवा पुंजक्यात घालतो. मादी भुंगा जमिनीमध्ये मुळांच्या कक्षेत अंडी घालतो. अंडी रंगाने पांढरी असतात. अंडी अवस्था ३ ते ५ दिवस असते.

अळी अवस्था : अंड्यातून निघालेली अळी फिक्कट पिवळ्या रंगाची असते. अळी अवस्था ही साधारण ३० ते ६० दिवसांची असते. या अवस्थेमध्ये अळी वाढीच्या ४ टप्प्यांमधून जाते. अळी अवस्था जमिनीमध्ये राहते. अळीला पाय नसतात.

कोष अवस्था : कोष ही पिवळसर रंगाची हालचाल न करणारी अवस्था असते. कोष ६ मिमी असतो. ही अवस्था ७ ते १० दिवसांची असते. कोष अवस्था शक्यतो जमिनीमध्ये कवच बनवून असते.

नुकसानीचा कालावधी

जुलै ते ऑगस्ट या कालावधीत नुकसान होते.

किडीच्या वर्षभरात एकूण ४ ते ५ पिढ्या पूर्ण होतात.

नियंत्रणाचे उपाय

प्रौढ भुंगे गोळा करून नष्ट करावेत.

निमपेंड एकरी १०० ते २०० किलो प्रमाणे शेवटच्या नांगरणीच्या वेळी द्यावे.

पीक फेरपालट करावी. यजमान पिकांची विशेषतः वांग्याचे लागवड शेताजवळ असू नये.

बिव्हेरिया बॅसियाना, मेटाऱ्हायझिअम यासारख्या जैविक कीटकनाशकांची जमिनीवर फवारणी करावी. किंवा शेणखतामध्ये मिसळून त्यानंतर वापर करावा.

जमिनीमध्ये परोपजीवी सूत्रकृमींचा वापर करावा.

नियंत्रणासाठी शिफारशीत कीटकनाशकांचा वापर करावा.

शिफारस करण्यात आलेली कीटकनाशके

डायमिथोएट (३० टक्के ईसी)

बायफेन्थ्रीन (८ टक्के) अधिक क्लोथियानिडीन (१० टक्के एससी) (संयुक्त कीटकनाशक)

नुकसानीचा प्रकार

अंड्यातून निघालेली अळी जमिनीमध्ये मुळांवर आपली उपजीविका करते. त्यामुळे झाडे कमकुवत होते. प्रादुर्भावग्रस्त झाडे सहज उपटून येतात. मुळांना नुकसान केल्यामुळे जमिनीद्वारे होणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव पिकामध्ये होण्याची शक्यता जास्त असते.

प्रौढ भुंगे पानाच्या कडा खातात. काही वेळा संपूर्ण पानाचे नुकसान करतात. त्यामुळे पानांची कार्यक्षमता कमी होते. काही भागांत झाडे जळल्यासारखी दिसतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com