Fruit Crop Fertilizers
Fruit Crop FertilizersAgrowon

Fruit Crop Fertilizers : कोरडवाहू फळझाडांना द्या संतुलित खते

Agriculture Fertilizers Update : फळझाडांच्या लागवडीचे यश हे जमीन, हवामान, खत आणि सिंचन व्यवस्थापन या बाबींवर अवलंबून असते. यापैकी खत व्यवस्थापनास ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

डॉ. आदिनाथ ताकटे, राहुल पाटील

Indian Agriculture : फळझाडांच्या लागवडीचे यश हे जमीन, हवामान, खत आणि सिंचन व्यवस्थापन या बाबींवर अवलंबून असते. यापैकी खत व्यवस्थापनास ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. फळझाडांची लागवड केल्यानंतर नियमित आणि भरपूर उत्तम दर्जाच्या फळ उत्पादनासाठी जमीन सुपीक ठेवणे जरूरीचे आहे.

फळझाडांची वाढ आणि त्यावर होणारी फलधारणा जमिनीतून मिळणाऱ्या पोषक अन्नद्रव्यांवर आणि स्थानिक हवामानावर अवलंबून असते. त्यामुळे जमीन सुपीकतेकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जमिनीच्या सुपीकतेकडे दुर्लक्ष झाल्यास झाडांची वाढ कमी होते.

फळझाडे कीड- रोगास बळी पडतात. झाडांची वाढ निकोप होण्यासाठी योग्य मशागत, तणांचा वेळीच बंदोबस्त, खतांचा संतुलित वापर, आछादनासाठी सेंद्रीय पदार्थांचा वापर, आंतरपिके इत्यादी मार्गांनी जमिनीची सुपिकता चांगली ठेवणे फायदेशीर ठरते.

खते देण्याची योग्य वेळ :

सर्वसाधारणपणे फळझाडांना जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्टोबर आणि जानेवारी-फेब्रुवारी या महिन्यांत खते द्यावीत. परंतु खतमात्रा देताना प्रत्येक फळझाडाचा बहार येण्याचा व फळे पक्व होण्याचा कालावधी लक्षात घेऊन खते द्यावीत.

सर्वसाधारणपणे जून-जुलै महिन्यांत संपूर्ण शेणखत अथवा कंपोस्ट खत, संपूर्ण स्फुरद व पालाश यांची मात्रा द्यावी. नत्राची मात्रा एक ते दोन हप्त्यांत विभागून द्यावी. खते देण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Fruit Crop Fertilizers
Fruit Crop Issue : मृग बहरातील फळपिकांसाठीचे हवामान धोके

खते देण्याची पद्धत :

खताची मात्रा देताना मोठ्या विस्ताराच्या झाडाखाली खोडापासून एक मीटर लांब ४० ते ५० सेंमी रुंद आणि १५ सेंमी खोल वर्तुळाकार चर काढावा. चरामध्ये प्रथम पालापाचोळा, शेणखत आणि त्यानंतर रासायनिक खते सर्व बाजूंनी टाकावीत. त्यानंतर चर मातीने बुजवावा.

फळपीकनिहाय खत व्यवस्थापन :

बोर :

पूर्ण वाढलेल्या झाडास शेणखत ५० किलो प्रति झाड याप्रमाणे छाटणीनंतर द्यावे. २५० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद, ५० ग्रॅम पालाश प्रति झाड (अर्धा किलो युरिया, दीड किलो एसएसपी व १ किलो एमओपी) प्रति वर्ष प्रमाणे द्यावे. नत्राची मात्रा दोन समान हप्त्यांत विभागून द्यावी.

आवळा :

पूर्ण वाढलेल्या (५ वर्षे व त्यावरील) झाडास ५० किलो शेणखत, ५०० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद, २५० ग्रॅम पालाश प्रति झाड (१ किलो युरिया, दीड किलो एसएसपी व अर्धा किलो एमओपी) प्रति वर्ष प्रमाणे द्यावे. नत्र दोन समान हप्त्यांत विभागून द्यावे.

Fruit Crop Fertilizers
Fruit Crop Insurance : पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा, डाळिंबासाठी १४ जुलैची मुदत

चिंच :

पूर्ण वाढलेल्या (५ वर्षे व त्यावरील) झाडास ५० किलो शेणखत, ५०० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद, २५० ग्रॅम पालाश प्रति झाड (एक किलो युरिया, दीड किलो एसएसपी व अर्धा किलो एमओपी) प्रति वर्ष प्रमाणे द्यावे. नत्र दोन समान हप्त्यांत विभागून द्यावे.

कवठ :

पूर्ण वाढलेल्या (५ वर्षे व त्यावरील) झाडास ५० किलो शेणखत, ३५० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद, २५० ग्रॅम पालाश (पाऊण किलो युरिया, दीड किलो एसएसपी व अर्धा किलो एमओपी) प्रति झाड प्रति वर्ष या प्रमाणे द्यावे. नत्र दोन समान हप्त्यांत विभागून द्यावे

सीताफळ :

पूर्ण वाढलेल्या (४ वर्षांपेक्षा जास्त वय) झाडास ३० ते ४० किलो शेणखत, ५५० ग्रॅम नत्र, १२५ ग्रॅम स्फुरद, १२५ ग्रॅम पालाश प्रति झाड (५५० ग्रॅम युरिया, ८०० ग्रॅम एसएसपी व २०० ग्रॅम एमओपी) प्रति वर्ष याप्रमाणे द्यावे. नत्राची मात्रा दोन समान हप्त्यांत विभागून द्यावी. शेणखताबरोबर ॲझोस्पिरिलम व पीएसबी या जिवाणू खतांचा वापर करावा.

जांभूळ :

पूर्ण वाढलेल्या (५ वर्षे व त्यावरील) झाडास ५० किलो शेणखत, ५०० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद, २५० ग्रॅम पालाश प्रति झाड (१ किलो युरिया, दीड किलो एसएसपी व अर्धा किलो एमओपी) प्रति वर्ष प्रमाणे द्यावे. नत्र दोन समान हप्त्यांत विभागून द्यावे.

कोरडवाहू फळझाडांना वयोमानानुसार (५ वर्षे व त्यावरील) द्यावयाची खते

फळझाड शेणखत किंवा कंपोस्ट खत (किलो प्रति झाड) रासायनिक खतमात्रा (ग्रॅम प्रति झाड)

नत्र (युरिया) स्फुरद (एसएसपी) पालाश (एमओपी)

सीताफळ ५० २५० (५५०) १२५ (८००) १२५ (२००)

बोर ५० २५० (५५०) २५० (१५००) ५० (१००)

चिंच ५० ५०० (१०००) २५० (१५००) २५० (५००)

जांभूळ ५० ५०० (१०००) २५० (१५००) २५० (५००)

आवळा ५० ५०० (१०००) २५० (१५००) २५० (५००)

कवठ ५० ३५० (८००) २५० (१६००) २५० (४००)

डॉ. आदिनाथ ताकटे (मृदा शास्रज्ञ), ९४०४०३२३८९

(एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com