

Mumbai News : देशाच्या उद्योगचक्राला गती देत अर्थकारणाची पायाभरणी करणाऱ्या टाटा उद्योग समूहाचे ‘चेअरमन ऑफ एमिरेट्स’ आणि ज्येष्ठ उद्योगमहर्षी रतन टाटा (वय ८६) यांचे बुधवारी (ता. ९) रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वरळी येथील स्मशानभूमित गुरुवारी (ता. १०) सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थिव स्मशानभूमीत आणल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रतन टाटा यांचे निधन झाल्याने राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
रतन टाटा यांच्या जाण्याने उद्योगक्षेत्रातील महामेरू हरपला असून, त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. रतन टाटा यांना प्रकृतीच्या कारणास्तव सोमवारी (ता. ७) ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्रख्यात पारशी कुटुंबात १९३७ मध्ये जन्मलेल्या रतन टाटा यांनी प्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूल तसेच कॉर्नेल विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आणि तरुण वयातच कौटुंबिक व्यवसायाची सूत्रेही हाती घेतली.
त्यांच्या औद्योगिक कौशल्ये आणि नेतृत्व गुणांमुळे अल्पावधीतच टाटा समूहाने विविध क्षेत्रात प्रगती साधली. त्यांची १९९१ मध्ये टाटा समूहाची कंपनी असलेल्या ‘टाटा सन्स’च्या अध्यक्षपदी निवड झाली. रतन टाटा यांच्या नेतृत्वात टाटा समूहाने नव्या व्यवसायांमध्ये प्रवेश करण्याबरोबरच प्रतिष्ठित जग्वार-लॅंडरोव्हर तसेच कोरस स्टील कंपनीवर मोहोर उमटविली होती. केवळ आर्थिक नफ्याचाच विचार न करता देशाच्या उभारणीमध्येही रतन टाटा यांनी मोलाचे योगदान दिले.
सामाजिक कार्य आणि परोपकारी विचारांमुळे त्यांनी जगातील सर्वांत मोठ्या एनजीओंपैकी एक असलेल्या ‘टाटा ट्रस्ट’ला वेगळी ओळख दिली. या ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्यसेवा, शिक्षण आणि ग्रामीण विकासासाठी काम केले जाते. टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून (२०१२ मध्ये) पायउतार झाल्यानंतरही ते मार्गदर्शक म्हणून कार्यरत राहिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.