Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Tea Company : ‘समाज, बाजार आणि सरकार’ या तिन्ही पातळ्यांवर हल्ली जेव्हा जेव्हा शेती प्रश्‍नांचा विषय निघतो तेव्हा ठरलेला परवलीचा शब्द समोर येतो तो म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी. नव्याने आकाराला येत असलेल्या या व्यवस्थेने टाटा टीसारख्या कंपनीकडून काय शिकायला हवे?
Tata Tea
Tata Tea Agrowon

इरफान शेख

Farmers, learn from the Tata Tea Company : आजघडीला राज्यात शेतकरी उत्पादक कंपनी या नाण्याची चलती असल्यामुळे दिसामाजी शेकडो कंपन्यांची नोंदणी सुरू आहे; पण यातल्या किती यशस्वी होताना दिसतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. विशेषतः कोरडवाहू पिकांवर काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कंपन्या तर अगदीच तकलादू स्थितीत आहेत.

एखादा उद्योग यशस्वी करायचा असेल तर जमीन, कामगार, भांडवल आणि व्यवस्थापन (लँड, लेबर, कॅपिटल आणि मॅनेजमेंट) या मूलभूत गोष्टी लागतात. हे सर्व जुळून आले तरी जगभरातल्या स्पर्धेत टिकण्यासाठी, उद्योगात अधिकाधिक कार्यक्षमता आणून नफा वाढविण्यासाठी तुमचा उद्योग मोठ्या स्केलवर करणे गरजेचे आहे. अन्यथा, टिकाव लागणे कठीण आहे. (अपवाद युनिक बाबींच्या उद्योगाचा). एकूण व्यवस्थाच अशी आहे, की छोट्या मासे जगूच शकत नाहीत. त्यातही कृषी आधारित उद्योगात तर ‘जमीन, कामगार, भांडवल आणि व्यवस्थापन’ फक्त इतकेच जुळवून चालत नाही तर पूर्ण मूल्यसाखळी आणि ती सुद्धा जागतिक मानकांवर आधारित, उभी करावी लागते.

जमीन, कामगार, भांडवल आणि व्यवस्थापन या सर्व बाबी असतानाही एखादा शेती आधारित उद्योग यशस्वी कसा होत नाही आणि मग तो यशस्वी करण्यासाठी काय करावे लागेल याची उत्तम केस स्टडी म्हणजे ‘टाटा टी कंपनी.’

टाटांकडे फक्त भारतात एकूण जवळपास २३,७८३ हेक्टर (५९,४५७ एकर) जमिनीवर चहाचे मळे होते (आहेत), तर १२ हजारांहून अधिक कामगार या मळ्यांमध्ये काम करायचे. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होती आणि टाटांकडे व्यवसाय व्यवस्थापनाचा पिढीजात अनुभव होता. एकूण ॲसेट बघता ही जगातील सर्वाधिक चहा पिकवणारी कंपनी होती. त्यांच्याकडे असलेले कॉफीचे मळेसुद्धा आशिया खंडातील सर्वांत मोठे होते. याच्याशिवाय इन्स्टंट टी निर्मितीची सर्वाधिक क्षमता भारतात त्यांच्याकडेच होती.

Tata Tea
Indian Tea Board : कीटकनाशकांची परिणामकारकता साधण्यासाठी टी बोर्डाची संहिता

जगातील सर्वांत मोठे चहा निर्यातदार हेच होते. असे असूनही सुरुवातीला त्यांनी जेम्स फिनले कंपनीसोबत संयुक्त व्यवसाय (जॉइंट व्हेंचर) केला. या जॉइंट व्हेंचरमध्ये टाटा एक प्रकारे फक्त गुंतवणूकदार होते, तर फिनले कंपनी ही चहाचा व्यवसाय करे. पुढे काही कारणांनी फिनले कंपनी भारत सोडून निघून गेली. परिणामी, हा इतका मोठा चहाचा व्यवसाय अनिच्छेने का असेना टाटांनाच पाहण्याची वेळ आली. व्यवसाय तोट्यात जायला लागला. इथे शिकण्याजोगी बाब अशी की लँड, लेबर, कॅपिटल आणि मॅनेजमेंट मुबलक, सक्षम असून सुद्धा शेती ही अशी गोष्ट आहे, की जी टाटांनी केली तरी ती तोट्यातच जाते.

यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाटा आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपल्या कामगारांसाठी आपल्या खर्चाने विविध विकास उपक्रम सुद्धा राबवायचे. त्यात कामगारांच्या मुलांचे शिक्षण, त्यांच्या कुटुंबांचे आरोग्य इ.चा समावेश असायचा. त्यामुळे खर्चाचा भार आणखीच वाढायला लागला.

यातून कसे सावरायचे याचा अभ्यास करण्यासाठी टाटा केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक दरबारी सेठ यांना पाठवण्यात आले. त्यांनी पुढील निष्कर्ष काढला- ‘पैसा किंवा आपल्या मालाचे मूल्य शेतात बनणार नाही, ते बनेल ग्राहकाला हव्या त्या आकर्षक स्वरूपात, परवडणाऱ्या किमतीत उत्पादन देऊन आणि ब्रॅण्ड तयार करून.’ त्या नंतर टाटांनी चहाची पूर्ण मूल्यसाखळी उभी केली आणि ‘टाटा टी’ हा जागतिक ब्रॅण्ड म्हणून विकसित झाला.

टाटांनी केलेले महत्त्वाचे बदल समजून घेणे महत्त्वाचे आहे. यांच्याकडे त्या वेळी असलेल्या एकूण १७ मळ्यांमध्ये चहा पिकवला जायचा. यात चहा पिकवणे, मजुरी, व्यवस्थापन या सगळ्यात टाटांना मुख्य तोटा होत होता. हे सांभाळणे हा मुख्य अडचणीचा भाग होता. तेव्हा ही कंपनी बंद करण्यापेक्षा किंवा विकून टाकण्यापेक्षा जो पर्याय टाटांनी निवडला तो अभूतपूर्व असाच होता.

टाटांनी या भागाच्या सर्व चहा मळ्यांची मिळून एक कंपनी बनवली. तिचे नाव कनन देवन हिल प्लांटेशन्स कंपनी प्रा. लि. (पुढे हीच टाटा टी लि. बनली). आणि यातले साधारण ६८ टक्के शेअर्स हे यातील मजूर/कर्मचाऱ्यांना विकण्यात आले आणि १८ टक्के शेअर्स व्यवस्थापन करणाऱ्या बोर्ड मेम्बर्सना विकण्यात आले. तर १४ टक्के शेअर्स टाटा ट्रस्टला देण्यात आले; जेणेकरून या कर्मचाऱ्यांसाठीचे कल्याणकारी उपक्रम सुरू ठेवता येतील. त्यामुळे आता हे मजूर/कर्मचारीच या कंपनीचे मालक झाले. हेच शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये शेतकऱ्यांनी करणे अपेक्षित आहे. आपल्या मालाचे उत्पादन करण्यासाठी आवश्यक निविष्ठा (बियाणे, खते, कृषी रसायने इ.) पासून अंतिम उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची पूर्ण साखळी अर्थात मूल्यसाखळी शेतकऱ्यांनी उभी करणे आवश्यक आहे. यात फक्त शेतकरीच शेअर होल्डर असू शकतात. त्यातूनच संचालक मंडळ निवडावे लागते आणि यातून मिळणारा नफा विक्री केलेल्या मालाचा प्रमाणात बोनस स्वरुपात (१५ टक्के मर्यादेत) मिळवता येतो.

टाटा चहा उद्योगात येण्याअगोदर चहा मळ्यातून चहा ग्राहकांना मिळेपर्यंत साधारण आठ महिन्यांचा वेळ लागायचा. टाटांनी यात नावीन्य आणत फक्त १६ दिवसांमध्ये ताजा चहा ग्राहकांना पोहोचवला. दुसरा बदल म्हणजे अगोदर बहुतांश चहा सुट्टा म्हणजे पॅकिंग शिवाय असायचा आणि मोजका पॅकिंगचा चहा खूप महाग असायचा. टाटांनी पहिल्यांदा हिरव्या रंगात (ताजेपणा दर्शविण्यासाठी) पॉलीपॅक सिस्टिम आणली ज्यामुळे ती अधिक आकर्षक आणि चहाची गुणवत्ता टिकवण्यासाठी उपयुक्त ठरली.

Tata Tea
Tea Powder Production : भारताची चहा पावडर खालच्या दर्जाची, अनेक देशांनी दाखवली नापसंती, ३० टक्क्यांनी घसरली निर्यात

तिसरा बदल विक्रीच्या दरात केला. सामान्य/ सुट्ट्या चहापेक्षा थोडा अधिक दर, परंतु तेव्हाचा प्रस्थापित ब्रँडपेक्षा थोडा कमी दर ठेवत भारतीय ग्राहकांना उत्तम पर्याय उपलब्ध करून दिला. टाटांना हे करणे शक्य झाले, कारण त्यांना इतर मध्यस्थांना पैसे किंवा नफ्यातला वाटा द्यायची गरज नव्हती. चहाचे मळे स्वत:चे, प्रक्रिया केंद्र स्वतःचे आणि वितरण व्यवस्थाही स्वतःची त्यामुळे उत्तम गुणवत्ता देत दर योग्य ठेवणे त्यांना परवडलेच नव्हे तर नफ्याचे ठरले. शेतकरी उत्पादक कंपन्यांनासुद्धा आपापल्या पिकात याच धर्तीवर मॉडेल उभे करणे आवश्यक आहे.

पुढे राज्यनिहाय, उत्पन्नाचा वर्गनिहाय (टार्गेट ग्रुप नुसार) चहाचे ब्रँड बनवण्यात आले. उदा. ज्यांना चहाचा फक्त बारीक दाणा/ डस्ट हवीय त्यांच्यासाठी टाटा टी प्रीमियम डस्ट हा ब्रँड बनविण्यात आला तर ज्यांना मोठा दाणा हवा त्यांच्यासाठी टाटा टी प्रू-लीफ ब्रँड बनविण्यात आला. मध्यम वर्गीयांसाठी टाटा टी अग्नी हा तर उच्च मध्यमवर्गासाठी टाटा टी गोल्ड ब्रँड विकसित झाले. अशा कस्टमरनिहाय, सेग्मेंटनिहाय ब्रँडिंगमुळे टाटांचे मार्केटवर प्रभुत्व वाढत गेले.

परिणामी, टाटा टी हा प्रचंड यशस्वी ब्रँड बनला आणि त्याचा विस्तार देशाबाहेर सुद्धा सुरू झाला. प्रत्येक व्यवसायामध्ये स्पर्धा असते. त्यामुळे टाटांनी भारतापुरते मर्यादित न राहता भारताबाहेरसुद्धा आपला व्यवसाय वाढवला. सर्वप्रथम टाटांनी आशिया खंडातील सर्वाधिक विकणारा कॉफी ब्रँड ‘कन्सॉलिडिटेड कॉफी’ विकत घेतला. नंतर श्रीलंकेतील ‘वाटावाला टी स्टेट’ खरेदी केले. त्यांच्याकडे १२,४४२ हेक्टर जमीन आणि त्यापैकी ५१०० हेक्टरवर चहाचे मळे आहेत.

नंतर एक महत्त्वाचा चहा ब्रँड ‘टेटली’ विकत घेतला. त्यामुळे टाटांचाच नव्हे तर भारतीय उद्योगाचा मान जगभर वाढला. टेटली हा चहाचा जगातला दुसऱ्या क्रमांचा ब्रॅण्ड असला तरी त्यांच्याकडे स्वतःचे चहाचे मळे नव्हते. ते इतरांकडून चहा विकत घेऊन स्वतःच्या ब्रॅण्डनेमने विकायचे. म्हणजे टेटलीकडे स्वतःची चहाची शेती नसूनही ती जगातली दुसरी सर्वांत मोठी कंपनी बनली आणि टाटांकडे २८,८८३ हेक्टर चहाचे मळे असूनही त्यात मार्जिन मिळत नव्हते. तर हा फरक ब्रॅण्डचा असतो. हे ज्यांना ज्यांना कळले ते आपापल्या उद्योगात मोठे झाले.

अमूलने दुधात हीच पद्धत अवलंबली. पार्ले ॲग्रोने फ्रूट ड्रिंकमध्ये (उदा. फ्रुटी) हीच पद्धती अवलंबली. चिप्स बनवण्यात बालाजी वेफर्सने हीच पद्धती अवलंबली. या प्रत्येक कृषी आधारित उद्योगाची मालकी, शेअर पॅटर्न, उत्पादन, वेगवेगळे आहेत मात्र उद्योगाची नस सारखीच वाटते. यापासून बोध घेऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांना याच दिशेने वाटचाल करावी लागेल. त्यासाठी गरज आहे सक्षम लीडरशिप, गरजू-समविचारी भागधारक, धोरणात्मक राजाश्रय, आपापल्या पिकातील सर्वोत्तम व्यवसाय आराखडा आणि कसोशीने प्रयत्न करत शेतकऱ्यांच्या मालकीची व्यवस्था निर्माण करण्याची. ‘टाटा टी’कडून प्रेरणा घेत आपापल्या पिकांमध्ये मूल्यसाखळी उभी करण्याचा संकल्प करायला हवा.

- इरफान शेख, ९०२१४४०२८२,

(लेखक बालाघाट फार्म्स, बीडचे संचालक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com