Tomato Pest Management : टोमॅटो पिकावरील पांढऱ्या माशीचे एकात्मिक नियंत्रण

Pest Control : गेल्या वर्षामध्ये टोमॅटो या पिकावर हवामानातील बदलांचे विपरीत परिणाम दिसून येत आहे. या प्रतिकूल हवामानात कीड रोगांच्या प्रादुर्भावांचे पॅटर्न बदलेले दिसून येत आहेत.
Tomato Pest
Tomato PestAgrowon
Published on
Updated on

शरद दळवे

गेल्या वर्षामध्ये टोमॅटो या पिकावर हवामानातील बदलांचे विपरीत परिणाम दिसून येत आहे. या प्रतिकूल हवामानात कीड रोगांच्या प्रादुर्भावांचे पॅटर्न बदलेले दिसून येत आहेत. या पिकात प्रामुख्याने येणारी कीड म्हणजे पांढरी माशी (शा. नाव : Bemisia tabaci).

एकदा प्रादुर्भाव झाला की ही कीड टोमॅटोच्या रोपावस्थेपासून ते काढणीपर्यंत टोमॅटोच्या झाडावर ठाण मांडून राहते. त्यामुळेच टोमॅटोवर प्रादुर्भाव करणाऱ्या अन्य किडींच्या तुलनेत म्हणजेच फळ पोखरणारी अळी (शा. नाव ः Helicoverpa armigera) ३० ते ५० टक्के, नागअळी (शा. नाव ः Tuta absoluta) ३० ते ४० टक्के आणि पांढरी माशी २० ते १०० टक्क्यांपर्यंत नुकसान करत असल्याचे पुढे आले आहे.

पांढऱ्या माशी नुकसानदायक असण्याची कारणे ः

अति आणि जलद प्रजनन क्षमता : पांढऱ्या माशीचे जीवन चक्र १६ ते ३१ दिवसांत पूर्ण होते. इतक्या कमी जीवनक्रमामुळे पांढरी माशी खूप मोठ्या प्रमाणात अंडी घालून पिलांना जन्म देऊ शकते. त्यांची घनता प्रचंड वाढते. पांढऱ्या माशीच्या अनेक पिढ्या एकाच वेळी टोमॅटोच्या झाडावर आढळतात.

कीटकनाशकांप्रती प्रतिकारकता विकसित करण्याची क्षमता : शेतकरी एकाच गटातील किंवा त्याच त्या कीडनाशनाशकांचा वापर करत असल्यास त्यातून पांढरी माशी स्वतःमध्ये त्या कीटकनाशकांप्रती प्रतिकारकता विकसित करते. परिणामी, काही काळातच त्या कीटकनाशकांचा प्रभाव कमी होत जातो. परिणाम, पांढरी माशी नियंत्रणात येण्यात अडचणी येतात.

विषाणूजन्य रोगाचा प्रसार : पांढऱ्या माशीमुळे टोमॅटो वरती येणाऱ्या ‘लीफ कर्ल’ या विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो. पांढरी माशी रस शोषणापूर्वी आपली लाळ पानांमध्ये सोडते. या लाळेमधून निरोगी पानांमध्ये विषाणूंचा प्रसार होतो. या रोगामुळे झाडाची वाढ वेगाने खुंटते. पाने वेडीवाकडी होतात. या विषाणूजन्य रोगामुळे उत्पादनामध्ये ४० ते ६० टक्क्यांपर्यंत घट होते.

Tomato Pest
Tomato Pest : टोमॅटोवरील फळ पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

पोषक वातावरण : उष्ण आणि आर्द्रतायुक्त हवामान पांढऱ्या माशीच्या वाढीला खूप पोषक आहे.

नत्रयुक्त खतांचा अतिरेकी वापर : नत्रयुक्त खतांमुळे झाडांची शाखीय वाढ होते. झाड लुसलुशीत आणि हिरवेगार दिसू लागते. मात्र त्याच वेळी ते रोग प्रादुर्भावासाठी संवेदनशील बनते. असे झाड पांढऱ्या माशीच्या अतिप्रादुर्भावाच्या स्थितीत अडचणी येते.

बदलते हवामान : बदलत्या हवामानामध्ये पांढरी माशीसारख्या अनेक लहान किडी लवकर जुळवून घेतात. कमी कालावधीच्या जीवनक्रमामुळे त्यांच्या पुढील पिढ्या बदलत्या हवामानाला अधिक सक्षम बनतात. त्यांची गतिशीलता वाढते.

पांढऱ्या माशीतील जनुकीय बदल : पिढी दर पिढी जनुकांचे वहन होणे ही नियमित बाब आहे. याला उभ्या पद्धतीचे जनूक वहन म्हणतात. मात्र काही अतिसहवासाच्या स्थितीमध्ये राहणाऱ्या दोन वेगळ्या प्रजातींमध्येही जनूक वहन झालेले दिसून आले आहे. अशा वहनाला आडव्या पद्धतीचे जनूक वहन असे म्हणतात.

वनस्पतीमधून पांढऱ्या माशीमध्येही अशा प्रकारचे आडवे जनुकीय वहन झालेले दिसून आले आहे. संशोधनामध्ये वनस्पतीमधील ‘BtPMaT१’ हे जनुक पांढऱ्या माशीमध्ये आढळते. या जनुकामुळे पांढरी माशीमध्ये वनस्पती तयार करत असलेल्या विषारी घटकांना पचविण्याची क्षमता निर्माण होते. म्हणजेच वनस्पतींकडून पांढऱ्या माशीला होणाऱ्या विषारी प्रतिसादाचा तिच्यावर कोणताही परिणाम होत नाही.

पांढऱ्या माशीचा जीवनक्रम :

पांढऱ्या माशीची एक पिढी चार अवस्थांमधून जाते. मादी पांढरी माशी पानाच्या खालच्या बाजूने वर्तुळाकार पद्धतीने अंडे घालते. या अंड्यांमधून पाच ते नऊ दिवसांमध्ये पिल्ले बाहेर येतात. ही पिले चार अवस्थांतून कोषावस्थेमध्ये जातात. कोष पानाच्या खालच्या बाजूने तयार केले जातात. कोषावस्थेचा कालावधी कमी असतो. कोषांमधून बाहेर पडणाऱ्या माशीचा रंग पिवळा असून, त्यांचे पंख पांढरे असतात. अशा प्रकारे पांढऱ्या माशीचा संपूर्ण जीवनक्रम १६ ते ३१ दिवसांमध्ये पूर्ण होतो.

पांढऱ्या माशीचे नुकसान करण्याचे विविध प्रकार :

पांढऱ्या माशीची पिल्ले आणि प्रौढ (माशी) या अवस्था पिकांना नुकसान पोहोचवतात.

प्रत्यक्ष नुकसान : पिले आणि माशी पानांमधून मोठ्या प्रमाणात रस शोषण करतात. यामुळे पीक अशक्त होते, पिकाची वाढ खुंटते आणि पिकाचा जोमही कमी होतो. या किडीच्या शरीरामधून मधासारखा चिकट पदार्थ पानांवर टाकतात. त्यावर बुरशी वाढल्याने पाने काळी पडतात. या बुरशीजन्य काजळीमुळे प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया मंदावते.

अप्रत्यक्ष नुकसान : पांढरी माशी ही कीड विषाणूजन्य लिफ कर्ल या विषाणूजन्य रोगाचा वेगाने प्रसार करते. या दोन्ही घटकांच्या एकत्रित नुकसानीमुळे झाडाची पाने वेडी वाकडी होतात, आणि झाडाची वाढ खुंटते. या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे टोमॅटो फळांचे उत्पादन व गुणवत्ता कमी होते.

Tomato Pest
Tomato Pest And Disease Management : टोमॅटोवरील रोग, किडींचे व्यवस्थापन

पांढऱ्या माशीचे एकात्मिक व्यवस्थापन

लागवडीपूर्वीचे व्यवस्थापन :

बियाण्यांची निवड करताना लवकर पक्व होणाऱ्या संकरित आणि पांढरी माशीला प्रतिकारकत अशा वाणांची निवड करावी.

पांढरी माशी ही अनेक पिकांवरही प्रादुर्भाव करते. त्यामुळे टोमॅटो पिकाच्या शेजारी वांगे, भेंडी, मिरची, कपाशी व वेलवर्गीय पिके (उदा. काकडी, भोपळा इ.) पिकांची लागवड करू नये.

काही तणांवर (उदा. पेटारी, गाजर गवत, तांदूळजा इ.) तणांवरती जिवंत राहू शकतात. त्यामुळे पांढऱ्या माशीच्या पर्यायी वाढीसाठी उपयुक्त ठरणारी तणे शेत, बांध आणि परिसरातून काढून टाकावीत.

ओळींमधील आणि झाडांमधील अंतर योग्य प्रमाणात ठेवावे. त्यामुळे पिकामध्ये हवा खेळती राहून पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी राहतो.

लागवडपश्‍चात व्यवस्थापन :

नत्रामुळे झाडाची शाखीय वाढ होते. परिणामी, पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे नत्र खतांचा अति प्रमाणात वापर करू नये.

जास्त प्रमाणात दिलेल्या पाण्यामुळे सुद्धा पांढऱ्या माशीची पैदास वाढते. त्यामुळे योग्य प्रमाणात आणि योग्य काळाने जमिनीतील ओलावा पाहून पाण्याचे नियोजन करावे.

पिकांमध्ये सूर्यकिरणे परावर्तित करणाऱ्या प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर करावा. त्यामुळे पानाखाली राहणाऱ्या पांढऱ्या माशी तिथे राहणे टाळतात. त्यांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.

पिवळ्या रंगाकडे पांढरी माशी आकर्षित होते. त्यामुळे पिवळ्या रंगाचे चिकट सापळे प्रति हेक्टरी ४० या प्रमाणात लावावेत.

चिकट सापळ्यांची उपलब्धता नसल्यास पिवळ्या रंगाच्या कागदावरती एरंड तेल लावूनही असे सापळे तयार करता येतात. त्यांचा वापर करावा.

जैविक पद्धतीने पांढऱ्या माशीवर उदरनिर्वाह करण्याकरिता एन्कार्सिया फोरमोसा, एन्कार्सिया शफिई, इरेटमोसेरस स्पे. यांसारखे परजीवी कीटक आणि जिओकोरीस स्पे. झेलस कोळी, सिरफीड माशी, क्रायसोपर्ला, लेडी बर्ड बीटल यांसारखे परभक्षी कीटक येत असतात. असे कीटक शेत परिसरामध्ये आढळत असल्यास त्यांच्या संगोपन संवर्धनासाठी प्रयत्न करावेत.

व्हर्टिसिलिअम लेकॅनी २.५ किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात फवारणी करावी.

निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरॅक्टीन (दहा हजार पीपीएम) २ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी केल्यास अंडी आणि पिले नष्ट होतात.

रासायनिक नियंत्रण :

फवारणी प्रति लिटर पाणी.

इमिडाक्लोप्रिड (१७.८ एसएल) ०.५ मिलि.

थायामेथोक्झाम (२५ टक्के डब्ल्यूपी) ०.४ ग्रॅम.

सायॲन्ट्रानिलीप्रोल (१०.२६ टक्के ओडी) १.२ मिलि.

स्पाइरीमेसिफेन (२२.९ टक्के एससी) १ मिलि.

रासायनिक नियंत्रण पद्धतीचा वापर करताना एकाच प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर टाळावा. वरील कीटकनाशकांचा शिफारशीत प्रमाणात आणि आलटून पालटून वापर करावा. (लेबल क्लेम आहेत.)

शरद दळवे, ९९७५९७०८८८

(सहायक प्राध्यापक - कीटकशास्त्र,

डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामती)

कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत. फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे. खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे. बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे.  लेबल क्लेम वाचावेत. पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत. रसायनांचा गट तपासावा. पीएचआय, एमआरएल तपासावेत. पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.मधमाशी, मित्रकीटकांना हानिकारक कीडनाशकांचा वापर टाळावा. पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीडनाशकांचा समंजस वापर करावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com