Adsali Sugarcane Farming: आडसाली उसासाठी खत, पाणी व्यवस्थापन

Sugarcane Crop Guidance: ऊस लागणीपासून मोठ्या बांधणीपर्यंत दर आठवड्याच्या अंतराने समान २० हप्त्यांत किंवा दर पंधरा दिवसांच्या अंतराने समान १० हप्त्यांत नत्रखताची मात्रा ठिबक सिंचनातून विभागून दिल्यास उत्पादनात चांगली वाढ होते.
Sugarcane Farming Management
Sugarcane Farming ManagementAgrowon
Published on
Updated on

डॉ. राजेंद्र भिलारे, डॉ. सूरज नलावडे, डॉ. किरणकुमार ओंबासे

Sugarcane Cultivation Tips: ऊस लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. अधिक उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जमिनीचा सामू ६.५ ते ८ पर्यंत असावा. सेंद्रिय कर्बाचे किमान प्रमाण ०.५ टक्क्यापेक्षा अधिक असावे. लागवड करण्यापूर्वी ताग किंवा धैंचा ही हिरवळीची पिके घ्यावीत. माती तपासणी करून त्याप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापनाची दिशा ठरवावी. लोह, जस्त, मँगेनीज आणि बोरॉन या सूक्ष्मअन्नद्रव्यांची कमतरता असणाऱ्या जमिनीसाठी हेक्टरी २५ किलो फेरस सल्फेट, २० किलो झिंक सल्फेट, १० किलो मँगेनीज सल्फेट आणि ५ किलो बोरॅक्स चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये (१० : १ प्रमाणात) ५ ते ६ दिवस मुरवून लागवडीच्या अगोदर सरीतून द्यावे. हुमणी प्रादुर्भाव कमी होण्यासाठी लागवडीच्या वेळी निंबोळी पेंड हेक्टरी २ टन सरीत मिसळावी.

आडसाली ऊस लागवडीसाठी को.८६०३२ (निरा), कोएम ०२६५ (फुले २६५), फुले ऊस १५०१२, फुले ऊस १३००७ आणि फुले ऊस १५००६ या अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची लागवड करावी. जास्त पावसाच्या प्रदेशात लागवड रोप लागण पद्धतीने महिनाभर उशिरा करावी म्हणजे एक शिवडी ऊस राहणार नाही. दर तीन वर्षांनी बेणे बदलावे. ऊस बेणे बदलाचे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा अधिक असावे. रोपांपासून लागवड करण्यासाठी फुले सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. ऊस बेणे प्रक्रिया करूनच रोपनिर्मिती किंवा लागवड करावी.

आडसाली ऊस लागवड १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत करावी. रिजरच्या साह्याने भारी जमिनीत १५० सेंमी आणि मध्यम भारी जमिनीत १२० ते १३५ सेंमी अंतरावर सऱ्या पाडाव्यात. सरीची लांबी उतारानुसार २० ते ४० मीटर ठेवावी. एक डोळा पद्धतीने डोळा वरच्या बाजूस ठेवून १ फूट अंतरावर आणि दोन डोळ्यांची टिपरी वापरावयाची असल्यास दोन टिपऱ्यांमधील अंतर अर्धा फूट ठेवून लागण करावी. जोडओळ पट्टा पद्धतीने लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीसाठी २.५ फुटांवर तर भारी जमिनीसाठी ३ फुटांवर सलग सऱ्या पाडाव्यात.

Chart
ChartAgrowon

आंतरपिके

आडसालीमध्ये उसामध्ये सोयाबीन, भुईमूग, चवळी, भाजीपाला इत्यादी आंतरपिके घेता येतात. ऊस पिकामध्ये ताग, धैंचा यासारख्या हिरवळीच्या पिकांचा आंतरपीक म्हणून समावेश करता येतो. बाळबांधणीच्या वेळी हिरवळीची पिके सरीमध्ये गाडून बाळ बांधणी करावी. यामुळे जमिनीची सुपीकता टिकविण्यास मदत होते.

Sugarcane Farming Management
Sugarcane Farming: आडसाली लागवडीत वेळेवर सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

रासायनिक खतांचा वापर

आडसाली उसाला हेक्टरी ४०० किलो नत्र, १७० किलो स्फुरद आणि १७० किलो पालाशची वापरण्याची शिफारस केली आहे. युरिया खत देताना निंबोळी पेंडीच्या भुकटी बरोबर ६ः१ या प्रमाणात मिसळून द्यावे.

Chart
ChartAgrowon

पाणी व्यवस्थापन

आडसाली उसासाठी हेक्टरी ३२५ ते ३५० हे. सेंमी पाण्याची गरज असते. साधारणपणे ३८ ते ४० पाण्याच्या पाळ्या लागतात. दोन पावसाळ्यामुळे ८ ते १० पाणी पाळ्या कमी लागतात. ठिबक सिंचन पद्धतीमुळे ५० टक्क्यापर्यंत पाण्याची बचत, उत्पादनात २० टक्के वाढ तसेच खतामध्ये २५ टक्के बचत होते. जमिनीची भौतिक तपासणी करून ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करावा.

Chart
ChartAgrowon
Sugarcane Farming Management
Sugarcane Farming: ऊस पुर्नःरोप लागण पद्धत अन् व्यवस्थापन

मोठ्या बांधणीपर्यंत सर्वसाधारणपणे पाण्याच्या पाळ्या हेक्टरी ८ सें.मी. खोलीच्या द्याव्यात. त्यानंतर १० सेंमी खोलीच्या पाळ्या द्याव्यात. हंगामानुसार व आवश्यकतेनुसार उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांनी, पावसाळ्यात १४ ते १५ दिवसांनी आणि हिवाळ्यात १८ ते २० दिवसांनी पाणी द्यावे.

वाढीच्या अवस्थेनुसार किती पाणी द्यायचे, याची माहिती तक्ता ३ मध्ये दिली आहे.तर प्रत्येक महिन्यामध्ये ठिबक संच किती चालवावा, याची माहिती तक्ता ४ मध्ये दिली आहे.

उसामध्ये पाचटाचा वापर केल्यास पाणी ८ ते १० दिवस उशिराने दिल्यास पाण्याची बचत होते. ऊस वाढीच्या अवस्थेनुसार पाणी नियोजन करावे. पाण्याची कमतरता असल्यास दोन सरींमध्ये पाचटाचे आच्छादन वापरून पीक वाचविता येते.

Chart
ChartAgrowon

विद्राव्य खतांचा वापर

ठिबक सिंचनातून खते दिल्यास खतांची कार्यक्षमता ९० टक्क्यापर्यंत वाढते, तर प्रचलित पद्धतीत ३५ ते ४० टक्के खते उपयोगी पडतात.

लागणीपासून मोठ्या बांधणीपर्यंत दर आठवड्याच्या अंतराने समान २० हप्त्यांत किंवा दर पंधरा दिवसांच्या अंतराने समान १० हप्त्यांत नत्रखताची मात्रा ठिबक सिंचनातून विभागून द्यावे. उत्पादनात भरीव वाढ होते.

नत्रासाठी युरिया, स्फुरदयुक्त खतांसाठी फॉस्फोरिक आम्ल किंवा १२:६१:०० या खतांचा वापर करावा. पालाशसाठी पांढरे पोटॅशिअम क्लोराइड वापरावे.

पाण्यात विरघळणाऱ्या मिश्र खतात १९:१९:१९, २०:२०:२०, २०:०९:२०, १५:०४:१५ तर द्रवरूप खतात ४:२:८, ६:३:६, ६:४:१०, १२:२:६, ९:१:६ अशा विविध ग्रेडची खते उपलब्ध आहेत. ही खते प्रमाणबद्ध व शिफारशीप्रमाणे वापरावीत.

डॉ. राजेंद्र भिलारे, ९८२२०७२४२८

(ऊस विशेषज्ञ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com