
Sugarcane Farming Management:
शेतकरी नियोजन । आडसाली ऊस
शेतकरी : बाळासो निवृत्ती कुंभार
गाव : करनूर, ता. कागल, जि. कोल्हापूर
एकूण लागवड : साडेचार एकर
कागल तालुक्यातील करनूर येथे बाळासो कुंभार यांची संपूर्ण साडेचार एकरांत ऊस शेती आहेत. जमीन खडकाळ असूनदेखील सिंचन आणि खते यांचा योग्य मेळ घालून आडसाली लागवडीला प्राधान्य दिले आहे. या माध्यमातून उत्पादन वाढीत सातत्य मिळवले आहे. सध्या ४५ गुंठ्यांत मागील वर्षीचा लागण ऊस, ३० गुंठ्यात खोडवा, तर ५० गुंठे क्षेत्रात यंदा जून महिन्यात नवीन लागण केली आहे.
आडसाली ऊस लागवडीतून जास्त उत्पादन मिळत असल्याने गेल्या आठ ते दहा वर्षांपासून आडसाली लागवडीत सातत्य राखले आहे. आडसाली उसात कोणतेही आंतरपीक घेतले जात नाही. दोन पावसाळे आणि एक उन्हाळा पिकाला मिळत असल्याने उसाची वाढ चांगली होते असा श्री. कुंभार यांचा अनुभव आहे.
मागील हंगामातील लागण
मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये खोडवा तुटून गेल्यानंतर मोकळ्या झालेल्या शेतात रोटर मारून पालाकुट्टी करून घेतला. जमीन नांगरून पलटी मारून चार महिने तापू दिली जाते. त्यानंतर रोटाव्हेटर मारून चार फुटी सऱ्या सोडून कांडी लागण केली. ट्रॅक्टरद्वारे सरी सोडून त्यामध्ये कांड्या रोवून घेतल्या. त्यानंतर पाटाने सिंचन केले जाते. जमीन खडकाळ असल्याने पाण्यामध्ये कांडी लागण व्यवस्थित होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरी सोडून नंतर कांडी लागण करून नंतर पाणी देण्यास प्राधान्य दिले जाते. यामुळे रोपांची उगवण चांगली होण्यास मदत मिळते, असा त्यांचा अनुभव आहे.
लागवडीच्या अगोदर १०:२६:२६ खताची मात्रा बेसल डोस म्हणून दिली जाते. डोळे जमिनीतून बाहेर आल्यानंतर १९:१९:१९, १२:६१ः०, ह्युमिक ॲसिड यासह रासायनिक कीटकनाशकांची १५ दिवसांच्या अंतराने आळवणी करण्यात आली.
लागण केल्यानंतर साधारण ५५ व्या दिवशी जेठा कोंब मोडण्यात आला. त्यानंतर बैलजोडीच्या मदतीने मशागत केली जाते.
साधारण ६० ते ६५ दिवसांनी बाळभरणीवेळी २०:२०:१३, अमोनिअम सल्फेट, पोटॅश, युरिया या खतांच्या मात्रा दिल्या. हवामानाचा अंदाज घेऊन ठिबकद्वारे दररोज सिंचन करण्यात आले.
साधारण ९० ते ९५ दिवसांनी पॉवर टिलरच्या मदतीने मोठी भरणी केली. त्यावेळी डीएपी, पोटॅश, अमोनिअम सल्फेट आणि युरिया खताची मात्रा दिली.
मोठी भरणी केल्यानंतर पुढील तीन महिने ड्रीपद्वारे ३० दिवसांच्या अंतराने ०.०.५०, अमोनिअम सल्फेट आणि युरिया खताची मात्रा देण्यात आल्या.
ठिबक सिंचनातून एसओपी, अमोनिअम सल्फेट, युरिया ही विद्राव्य खते देण्यास प्राधान्य दिले जाते. पिकात फुटव्यांची संख्या योग्य ठेवण्यास भर देण्यात आला.
उसाच्या वाढीसाठी व्हीएसआय निर्मित उत्पादनांची तसेच १३ः०ः४५ ची फवारणी घेतली.
नवीन आडसाली लागण
नवीन आडसाली लागवड नियोजनानुसार बेणे मळ्यातून उसाच्या ८६०३२ या जातीची रोपे तयार करून घेतली.
खोडवा गेल्यानंतर रोटर मारून पालाकुट्टी करून जमीन तापू दिली. त्यानंतर साधारण १५ मेच्या दरम्यान लागवडीसाठी साडेचार फुटी सरी काढून घेतली.
मजुरांच्या मदतीने त्यानंतर ४ जूनच्या दरम्यान साडेचार बाय दीड फूट अंतरावर रोप लागण केली.
लागणीच्या वेळी सिंगल सुपर फॉस्फेट खताचा बेसल डोस देण्यात आला.
लागणीनंतर ४ दिवसांनी १९ः१९ः१९, ह्युमिक ॲसिड आणि रासायनिक कीटकनाशकांची आळवणी केली. त्यानंतर ८ दिवसांनी १२ः६१ः०, ह्युमिक ॲसिड आणि रासायनिक कीटकनाशकाची दुसरी आळवणी केली.
लागणीनंतर २१ व्या दिवशी डीएपी, आणि पोटॅशची मात्रा देऊन खते मातीआड केली.
पावसामुळे लागवडीत तणांचा प्रादुर्भाव दिसून येत होता. तणे ३,४ पानांवर असताना शिफारशीत तणनाशकाची फवारणी केली.
आगामी नियोजन
नवीन लागवडीत प्रत्येक रोपाला किमान ४ फुटवे आले आहेत. सध्या जेठा कोंब मोडण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर बैलजोडीच्या साह्याने फुटव्याला मातीची भर दिली जाईल. पुढील साधारण ३० दिवसांनी बाळभरणी करून नियोजनानुसार रासायनिक खतमात्रा दिली जाईल. पावसाचा अंदाज घेऊन सिंचन केले जाईल.
मागील हंगामातील आडसाली सध्या २० ते २८ कांड्यांवर तयार झाला असून पिकात जाणे शक्य होत नाही. त्यामुळे पिकात कोणताही कामे केली जाणार नाही. केवळ ठिबक मधूनच खते देण्याचे नियोजन आहे. पुढील काळात ऊस तुटून जाईपर्यंत साधारण १५ दिवसांच्या अंतराने ०ः०ः५० या खताची मात्रा दिली जाईल. हा ऊस साधारणपणे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुटून जाईल. या वर्षीही एकरी ऊस उत्पादन १०० ते ११० टन येणे अपेक्षित आहे. जमिनीला विश्रांती व योग्य प्रमाणात खते व पाण्याचे नियोजन केल्याने मागील काही वर्षांपासून उसाचे वजन चांगले भरण्यास मदत मिळत आहे, असे बाळासो कुंभार यांनी सांगितले.
बाळासो कुंभार ७३५३७०१०६०
(शब्दांकन : राजकुमार चौगुले)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.