
Indian Agriculture: या सदरातील मागचा लेख मी कोरडवाहू शेतीतल्या फायद्यांविषयी लिहिला होता. त्याला अभूतपूर्व म्हणावा असा प्रतिसाद मिळाला. शेकडो फोन आले, तेही आठवडाभर. अनेकांशी चर्चा झाली. सोशल मीडियावर म्हणजे माझ्या फेसबुक भिंतीवरही असंच घडलं. लाखो लोकांनी लेख बघितला. पन्नासपेक्षा अधिक लोकांनी तो शेअर केला. सुरुवातीला मी ही अचंबित झालो. हा लेख एवढा का आवडला असावा याचा मी बारकाईने विचार केला तेव्हा बऱ्याच बाबी लक्षात आल्या. आपण शेती करतोय म्हणजे चुकीचा व्यवसाय करतोय, कमी दर्जाचं काम करतोय, असा अपराधभाव अनेकांच्या मनात होता. माझी भूमिका वाचून हा भाव त्यांच्या मनातून दूर झाला.
मी या लेखात फार काही नवीन सांगितलंय असं नाही. पण या दृष्टीने त्यांनी आपल्या कामाकडे कधी बघितलं नव्हतं. लेख वाचून त्यांना अचानक शोध लागला, की अरे, आपण करीत असलेल्या कोरडवाहू शेतीत कितीतरी फायदे आहेत. शेतीत आनंद आहे. शेती करणं हे इतर कामापेक्षा उच्च दर्जाचे आहे. फक्त शेतीतच एका दाण्याचे शंभर दाणे तयार होतात. स्वत:ची गरज भागविण्यासाठी शेती करीत असलो तरी इतरांना जगवण्याचे कामही करतो.
यात कसली लबाडी नाही, कोणाची फसवणूक, पिळवणूक नाही. जे मिळतं ते कष्टाचं. त्यामुळं हे काम नैतिकदृष्ट्याही उच्च दर्जाचं आहे. या लेखाने या सगळ्या बाबींची जाणीव करून दिल्यामुळे शेतकरी वाचक खूष झाले आणि माझ्याशी भरभरून बोलले. खूप जणांनी मला भेटायची इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्यांना मला सांगावं लागलं, की मी कोणी बाबा, दादा, बापू, श्री वा साधू-संत नाही. माझ्याकडं कुठली जादूची कांडी नाही की मंत्र नाही;
ज्यामुळे तुमचं लगेच भलं होईल. तुमच्यासारखाच मी एक विचारी शेतकरी आहे. फरक असलाच तर इतकाच, की मी फक्त माझ्या डोक्याचा वापर करून स्वत:साठी शेती करतो. शेतीत उत्पादन काढणं हा माझा हेतू आहेच पण या कामातून आनंद मिळवणे, हे मी अधिक मोलाचं मानतो. मी केवळ बोलत, लिहीत नाही तर तशी कृती करतो. मला भेटणं म्हणजे दोघांचाही वेळ वाया घालवणं आहे. मी जे लिहितो तेच जगतो, किंबहुना जे जगतो तेच लिहितो. भेटून तरी वेगळं काय बोलणार? माझी भूमिका जर मनापासून पटली असेल तर शेतीत ती भूमिका घेऊन जगा म्हणजे तुम्हीही कोरडवाहू शेतीत आनंद घेऊ शकाल.
पांढरपेशा मध्यम वर्गाचा शेतीकडं बघण्याचा दृष्टिकोन चांगला नाही. शेतकऱ्यांनी पिकविलेलं अन्न खाऊनच ते जगत असले, तरी त्यांना शेती करणारे लोक कमी दर्जाचे वाटतात. शेतीत काम करणं म्हणजे गाढवमेहनत आणि कार्यालयात खुर्चीवर बसून लोकांची अडवणूक करणं म्हणजे प्रतिष्ठेचं वाटतं. अर्थात, बरी-वाईट माणसं सगळीकडं आहेत. शेती करणं म्हणजे अप्रतिष्ठेचं काम हा अपराधभाव कमी-जास्त शेतकऱ्यांमध्ये आहेच.
शेतीतले रडगाणे गाणाऱ्यांची संख्या अफाट आहे. व्यवस्थेवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. उलट शेतकऱ्यांच्या मनातील अपराधभाव वाढतो आहे. त्याचा स्वत:चा शेतीकडं बघण्याचा दृष्टिकोन अधिक नकारात्मक बनतो. माझा प्रयत्न हा दृष्टिकोन सकारात्मक बनावा, असा आहे. समोरची परिस्थिती बदलत नाही तेव्हा स्वत:ला बदलणं, हाच प्रभावी मार्ग आहे.
कसं बदलायचं हे प्रत्येक शेतकऱ्याने स्वत: ठरवायचं आहे. शेतीचे मूलभूत प्रश्न सारखे असले तरी एक व्यक्ती म्हणून प्रत्येक शेतकऱ्याच्या समस्या वेगळ्या आहेत. त्यामुळं सर्वांसाठी एकच एक असा कोणता उपाय नाही. दहा रोगांवर एकच औषध सांगणारे भोंदू बाबा असतात. प्रत्येकाने आपल्या रोगाचे निदान करून, त्यावर उपाय शोधणे, आपला मार्ग निश्चित करणे गरजेचे आहे.
मी शेतीतील शारीरिक कष्ट इतर कष्टांपेक्षा उच्च दर्जाचे आहेत असं मानत नाही. कष्ट कष्टच आहेत. इतर ठिकाणी केलेल्या कष्टाचा कमी-जास्त मोबदला मिळण्याची खात्री असते. शेतीतील कष्टाचा परतावा मिळेलच याची खात्री नसते. शेतीमध्ये जेवढ्या जोखीम आहेत, तेवढ्या दुसऱ्या कुठल्याही व्यवसायात नाहीत. याला तोंड देत देत तो कष्ट करतो, हे त्याचं वेगळेपण! शेतीत सतत प्रतिकूल परिस्थितीत काम करावं लागलं. ऊन, थंडी वा पाऊस याचा बाऊ करता येत नाही. काहीही घडलं तरी शेतीत काम करावंच लागतं. इथं सुट्टी घेता येत नाही. पशुपालक शेतकऱ्याला वेळेवर जनावरांचं चारा-पाणी करावंच लागतं.
इतर कामांमध्ये जो तोच तोपणा असतो तो इथं नाही. शेतीतील कामांची यादी केली तर किमान ५०-६० प्रकारची कामं दिसतील. त्यामुळे नवखा माणूस शेतीतील शारीरिक कष्ट करू शकत नाही. इतर कष्टकऱ्यांपेक्षा शेतीत काम करणाऱ्यांची प्रकृती अधिक काटक असते, याचं कारण हेच आहे. मी शेतीत करीत असलेल्या विविध शारीरिक कष्टांच्या कामाचे सातत्याने फोटो टाकतो. याचे कारण या कामाकडं बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा, या कष्टांची जाणीव लोकांना व्हावी हा आहे.
मी करीत असलेली कामं देशातील करोडो शेतकरी नित्यनेमाने करीत असतातच. मी वेगळं काही करतोय असं नाही. पण मी पत्रकार, प्रकाशक, लेखक असूनही ही कामं करतोय याचं अप्रूप वाचकांना असतं. मी नेहमीच म्हणतो, फोटो काढण्यासाठी मी शेतीत काम करीत नाही. शेतीत भरपूर काम करतो, त्याची नोंद म्हणून फोटो काढतो. माझ्या वास्तव जगण्याचं दस्तावेजीकरण करतो. याचा सकारात्मक परिणाम होत असल्याचं मला दिसतंय. अनेकांनी शेतीत छोटसं घर बांधून शेतीत कष्ट करायला सुरुवात केलीय. असे बरेच लोक माझ्या संपर्कात आहेत.
बहुतांश शेतकऱ्यांची शेतीशी नाळ जुळलेली नाही. पण हे वास्तव त्यांच्या पचनी पडत नाही. शेती मनापासून आवडीने करणं, जीवनशैली म्हणून स्वीकारणं म्हणजे शेतीशी नाळ जुळणं. इथं नफ्या-तोट्याचा हिशोब केवळ पैशात होत नाही. शेती केल्यामुळे तुमचं जगणं आरोग्यदायी, आनंददायी होणार असेल, दहा-पाच वर्षे आयुष्य वाढणार असेल तर, त्याचे नेमके किती पैसे हिशेबात धरणार? याचं उत्तर कोणालाच देता येत नाही. कारण जगण्याचं मोजमाप पैशात करता येत नाही. शेती व्यवहारापलीकडच्या जगण्याचा अनुभव देते. शेती म्हटलं, की निसर्ग आलाच. पण केवळ अर्थार्जनासाठी शेती करणाऱ्यांना हा निसर्ग दिसतो, कळतो, भावतोच असं नाही. त्यासाठी शेतीशी नाळ जुळणे गरजेचे आहे.
परवा मी एका मित्राला म्हटलं, तू स्वत:साठी जेव्हा शेती करू लागशील तेव्हा तुला खरा आनंद मिळेल. त्याला माझं हे बोलणं विचित्र वाटलं. तो म्हणायला लागला, की मी माझ्यासाठीच तर शेती करतोय. दरवर्षी पाच-सहा लाखाचा ऊस काढतो. हे पैसे माझ्याच खात्यावर येतात. मीच तर खर्च करतो. मी म्हटलं की, तू ऊस खात नाहीस...तू तुझ्या शेतात तुझ्या खाण्यासाठी काय पिकवतोस?
तो बोलला, त्याची काय गरज? मी पाहिजे ते फळ विकत घेऊन खाऊ शकतो, घेतोही.
मी म्हटलं, ते खरंय पण स्वत: जोपासलेल्या फळझाडांची फळं खाण्याचा आनंद तू घेऊ शकत नाहीस. ज्याच्या मध्ये तुझी भावनिक गुंतवणूक आहे, अशी एकही गोष्ट तू करीत नाहीस. त्यामुळं तुझ्यासाठी शेती हा फक्त पैसे मिळविण्याचा व्यवसाय आहे. हे पैसे अधिकाधिक कसे मिळतील, हे तू पाहतोस. पण यातून तुला निसर्गाचा आनंद मिळणार नाही. तो काही वेळ विचारात पडला. बहुतेक त्याला हे प्रतिपादन पटलं असावं. तो म्हणाला, मी काय करू?
मी म्हटलं, की तू स्वत:साठी थोडी शेती कर. विविध फळांची दोन-दोन झाडं बंधाऱ्यावर लाव. काही शोभेच्या फुलांची, काही सुगंधी फुलांची झाडं लाव. याची जोपासना करता करता तुझी नाळ शेतीशी आपोआप जुळली जाईल आणि मग शेती हे केवळ पैसे कमावण्याचा मार्ग नाही तर आनंददायी जगण्याचा मार्ग आहे, हे लक्षात येईल.
शेतीत अफाट कष्ट आहेत, अनेक जोखीम, समस्या आहेत आणि कोरडवाहू शेती हा फायद्याचा व्यवसाय नाही, या बाबी स्पष्ट आहेत. पण शेती जीवनमार्ग म्हणून स्वीकारला तर, कमीत कमी खर्चात आनंददायी जगता येतं. यासाठी आपलं पोट केवळ शेतीवर अवलंबून असायला नको, ही अट आहेच. शेतकरी धार्मिक कर्मकांड, रूढी, परंपरा यात अडकलाय. यात त्याचा बराच पैसा वाया जातोय. हा सामाजिक दबाव झुगारण्याची, चुकीला चूक म्हणण्याची सुरुवात कोण करणार?
कोरडवाहू शेती कशी करावी? तर कमीत कमी जोखीम असणारी शेती करावी. स्वत:ला लागणारं धान्य, भाजीपाला, फळं उत्पादित करता येतील अशी शेती करावी. या शेतीच्या केंद्रस्थानी आपण स्वतः असलो पाहिजे. हे सगळ्यांनाच शक्य होईल असं नाही. पण ज्यांना शक्य आहे, त्यांनी ती करायला काय हरकत आहे?
९०९६१३९६६६, ९४२२४६९३३९,
(लेखक लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.