Farming Lifestyle: आनंददायी शेतीतून गवसलेली जीवनशैली

Nature Inspired Life Story: माझ्या शेतीपूरक, निसर्गपूरक जीवनशैलीमुळे माझी तब्येत ठणठणीत आहे. मी तिशी-चाळीशीतील तरूणाप्रमाणे जगतो. त्यामुळे माझं लेखन, वाचन हे ‘क्रिएटिव्ह’ काम वाढलं. ‘जगणं तेच लिहिणं’ ही भूमिका घेतल्याने लेखन वाचकप्रिय ठरलं. माझी अधिकाधिक पुस्तकं प्रकाशित होऊ लागली.
Agriculture
AgricultureAgrowon
Published on
Updated on

Creative Writing through Farming: माझ्या शेतीपूरक, निसर्गपूरक जीवनशैलीमुळे माझी तब्येत ठणठणीत आहे. मी तिशी-चाळीशीतील तरूणाप्रमाणे जगतो. त्यामुळे माझं लेखन, वाचन हे ‘क्रिएटिव्ह’ काम वाढलं. ‘जगणं तेच लिहिणं’ ही भूमिका घेतल्याने लेखन वाचकप्रिय ठरलं.

माझी अधिकाधिक पुस्तकं प्रकाशित होऊ लागली. मी सकारात्मक कामातच गुंतून आहे. मी शेतीत नसतो तर आजच्या बाहेरच्या नैराश्यपूर्ण वातावरणात प्रकाशन बंद केलं असतं. सोशल मिडीयावरील लढायांत अडकून पडलो असतो.

आनंददायी शेतीचा हा असा थेट लाभ मला झाला. आज मी शेती करतोय, हा माझ्यासाठी अभिमानाने सांगण्याचा विषय आहे. मी शेती करीत नसतो तर, आज माझी ही जीवनशैली राहिली नसती.

मी शेतीत करीत असलेली शारीरिक कष्टाची कामे, पदभ्रमण, झाडावरच्या कसरती ते ‘मुक्तरंग''मध्ये पुस्तकांचे गठ्ठे उचलण्यापासूनची कामं बघून अनेक जण विचारतात, की तुमची जीवनशैली काय आहे? काही जण विचारतात, की तुम्ही शेतकरी आहात, की लेखक, प्रकाशक? दोन-चार वाक्यात उत्तर द्यावं, असा हा काही प्रश्‍न नाही. त्यामुळं मी त्याचं उत्तर देत नाही.

जीवनशैली म्हणजे एकूणच आपण जगतो कसं? यात झोपेतून उठल्यापासून ते परत झोपेपर्यंतचा दिनक्रम, खानपान अशा सगळ्या बाबी आल्या. माझं जगणं निसर्गपूरक आहे. मी लेखक, प्रकाशक व शेतकरी असलो तरी स्वत:ला रानसोबती म्हणवतो. हे जगणं माझ्यावर कोणी लादलेलं नाही तर मी ते विचारपूर्वक स्विकारलेलं आहे.

माझ्या आवडी-निवडी, शारीरिक क्षमता आणि गरजा यातून मी ही जीवनशैली विकसित केलीय. मला आज गावोगावी पेव फुटलेल्या कुठल्याच बाबा, बुवा, गुरू, श्री वा संताबद्दल अजिबात आकर्षण वा आदर नाही. त्यामुळे मी अशा कोणाचं काही अनुकरण करण्याचा प्रश्‍नच नाही. त्यांच्यावर टीका-टिप्पणी करण्यातही मी वेळ घालवत नाही. माझ्या जगण्याचं मुख्य सूत्र आहे- अपने पसंदकी जिंदगी!

Agriculture
Agriculture Scheme: राज्यात नैसर्गिक शेती योजनेस मंजुरी

अनियमिततेतील नियमितता

मला जगणं जसं आवडतं तसं मी जगतो. या जगण्याला मी जीवनशैलीत बसवलंय. मला अगदी बालपणापासून चालणं, शेतीत शारीरिक कष्ट करणं, वाचन करणं आवडतं. निसर्गाचा मी चाहता आहे. यात मी कधीच खंड पडू दिला नाही. शालेय, महाविद्यालयीन आयुष्यात, विद्यापीठात शिकताना आणि पत्रकारितेच्या व्यग्र काळातही मी चालत, वाचत, लिहीत राहिलो. शेतीशी असलेली नाळ तुटू दिली नाही.

वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळा व्यायाम केला. मी आठ-दहा वर्षे पोहलो. तीन-चार वर्षे कब्बडी, खो खो खेळलो. काही वर्षे सूर्यनमस्कार केले. दोन वर्षे मल्लखांबही खेळला. मी १९८८ पासून नियमित २० आसनं करतोय. चालणं सुरूच आहे. माझ्या जीवनशैलीचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, अनियमिततेतील नियमितता! हा शब्द वाचायला मजेशीर वाटेल. पण हे वास्तव आहे.

मी ठरावीक गोष्ट ठरावीक वेळेलाच केली पाहिजे, असली नियमितता पाळत नाही. अशी नियमितता पाळणाऱ्यांना वैविध्यपूर्ण जगण्याचा अनुभव घेता येत नाही. मी रात्री कधीही झोपतो. सकाळची उठण्याची वेळही अशी ठरलेली नाही. मी कधी रात्री आठलाच झोपतो, तर कधी अकरा वाजता. सकाळी साडेचार ते सहापर्यंत कधीही उठतो. रात्री किती वाजता झोपलो यावर सकाळची उठण्याची वेळ ठरते. मी शेतात घर बांधलं आहे. त्याचं नाव रुद्रा हट. तिथे राहू लागल्यापासून रात्री कितीही वाजता झोपलो तरी, उशिरात उशिरा सात वाजता उठतोच. शक्यतो सुर्योदय अनुभविण्यासाठी पूर्वेकडं नजर लावून असतो. सूर्याचं पहिलं दर्शन प्रेरणादायी असतं.

माझा उठल्यानंतरचा सकाळचा दिनक्रम मात्र ठरलेला असतो. आधी फ्रेश होऊन काळा चहा घेणं, फिरणं किंवा बागेत काम करणं. त्यानंतर ठरलेली वीस आसनं. त्याचा वेळ कमी-जास्त होतो. त्यानंतर ड्रायफ्रूट्स, चिवडा, बागेतील फळं असं थोडंसं काहीतरी खाणं. पावसाळ्यात, हिवाळ्यात दुपारी १२ वाजेपर्यंत शेतीच्या कामात सहभागी व्हायचं.

उन्हाळ्यात मात्र या वेळात वाचन, लेखन करतो. दुपारी बारा-एकला जेवण. भाकरी, वरण, भाज्या, तूप, दही, ताक, चटण्या याला प्राधान्य. जेवणात भाकरी मर्यादित, भाज्या भरपूर. नंतर चार-पाच वाजेपर्यंत वाचन-लेखन, फेसबुक बघणं. क्वचित एखादा सिनेमा. दुपारी झोपणं अपवादानेच. पुन्हा तासभर कुठलं ना कुठलं काम करायचं. त्यानंतर काळा चहा किंवा काळी कॉफी घ्यायची.

संध्याकाळी सहा-साडेसहाला शेततळ्यावर फिरायला जायचं. तिथून आल्यावर काही वेळ सायकल चालवायची. रात्री भात-वरण, भात-ताकाची कढी, कधी उप्पीट तर कधी सुशीला-पोहे. आठवड्यात दोन वेळा रात्री माझा शेतातला सहकारी नरेशसोबत चिकन बिर्याणी, चिकन भाजी-भाकरी असं जेवण होतं. रात्री झोपण्यापूर्वी तासभर वाचन, फेसबुकवर नजर मारणे आणि झोपणे. शक्यतो आठ ते नऊच्या दरम्यान झोपतो. क्वचित दहा होतात. तर सोयाबीनला पाणी देण्याच्या काळात मात्र रात्र -रात्र जागा असतो. पण हे एक-दीड महिन्यासाठी असतं. सुट्ट्या घालविण्यासाठी हर्ष धाराशिवे रुद्रा हटला येतो तेव्हा या दिनक्रमात थोडा बदल होतो.

मी आठवड्यातून दोन वेळा सकाळी लातूरला मुक्तरंगला जातो. रात्री परत येतो. मुक्तरंग ही माझी प्रकाशन संस्था. माझ्या पुस्तकांचं संपादनाचं आणि इतर काम जास्त असतं तेव्हा सलग तीन-चार दिवस थांबतो. मुक्कामी हसेगावला सेवालय या सेवाभावी संस्थेत जातो. या संस्थेचे संस्थापक रवी बापटले हे माझे जवळचे मित्र. तिथला वेळ त्यांच्यासोबतच्या चर्चेत कारणी लागतो.

Agriculture
Agriculture Journalism: वाढला गोतावळा अन् विचारांची खोली

शेती आणि प्रकाशन व्यवसाय

बहुतेकांना हे जाणून घ्यायचं असतं, की मी शेती आणि प्रकाशन व्यवसाय ही दोन्ही कामं एकाच वेळी कशी सांभाळतो. खरं तर यात काहीच कौतुक नाही. शेतीचं काम माझ्यासाठी ऐच्छिक आहे. मी सहभागी झाल्याने, शेतीतील सहकाऱ्यांना मदत होते. पण माझ्याशिवायही ती कामं होतात. मी नसलो म्हणून तिथे काही अडत नाही. पण मला या कामांची आवडही आहे. हे कष्टाचं असलं तरी ‘क्रिएटिव्ह'' काम आहे. शेतीतच राहात असल्याने, कामांसाठी वेळ काढणं सहज शक्य होतं. मी रुद्रा हटला राहतो तेव्हा पूर्णपणे इथलाच विचार करतो.

मुक्तरंग मी माझ्या अटी व शर्तीने चालवत असलो, तरी ते काम माझ्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. खऱ्या अर्थाने तो एकखांबी तंबू आहे. माझ्या पुस्तकांच्या टायपिंगचं काम मीच करतो. ले-आउट राघवेंद्र करतात. ले-आउट झाल्यानंतर त्याची पीडीएफ फाइल माझ्याकडं येते. रुद्रा हटवर वेळ मिळेल तेव्हा मोबाइलवर ते वाचून चुका नोंदवतो. मुक्तरंगमध्ये बसून त्या दुरुस्त करून घेतो. मी फोटो काढून देतो, ते त्यावरून कव्हर डिझायनिंग करतात. पुस्तक छपाईला जाण्याआधी मी पुन्हा एकदा बारकाईने बघून घेतो. पुस्तकाचा मजकूर मेलने प्रेसला जातो. एक फोन केला की कागद पोहोचतो.

पुस्तकं तयार झाली, की ती टेम्पोने मुक्तरंग व स्टॉक रूमकडं रवाना होतात. वितरणाची साखळी तयार आहे. आमच्या या साखळीत मुक्तरंग हे ब्रॅण्डनेम आहे. गुणवत्तेच्या बाबतीत पुस्तकं नेहमी सरस असतात. कमीत कमी नफा, हे आमचं सूत्र आहे. त्यामुळे पुस्तक वितरण सहजतेनं होतं. या सगळ्यासाठी मला काही दिवस द्यावे लागतात. त्यानंतरचं काम माझे सहकारी आत्माराम कांबळे हे बघतात. वेळेचं काटेकोर नियोजन, अचूक काम, कामाची गती व स्वावलंबन या बाबींमुळे सगळं सुरळीत पार पडतं. प्रकाशनाचा एवढा व्याप फक्त तिघे जणच सांभाळतो, हे अनेकांना खरं वाटत नाही.

शेती हा अभिमानाचा विषय

मी ही माझी जीवनशैली ‘ॲग्रोवन’च्या वाचकांना का सांगतोय, असा कोणालाही प्रश्‍न पडेल. खरं तर माझ्या जीवनशैलीबद्दलची विचारणा फेसबुक मित्रांनी केलीय. परंतु फेसबुक मित्रांपेक्षा शेतकऱ्यांना माझ्या या जीवनशैलीचा उपयोग काही प्रमाणात होऊ शकतो. एकाच कामात अडकून पडण्यापेक्षा वैविध्यपूर्ण, मुक्तपणे कसं जगता येईल, याबाबत ते आत्मचिंतन करू शकतील. मी माझा वेळ निरर्थक बाबींसाठी अजिबात वाया घालवत नाही. वृत्तपत्र वाचत नाही, टी.व्ही. बघत नाही.

मोबाइलचा वापर विचारपूर्वक, काटेकोर करतो. माझ्या शेतीपूरक, निसर्गपूरक जीवनशैलीमुळे माझी तब्येत ठणठणीत आहे. मी तिशी-चाळिशीतील तरुणाप्रमाणे जगतो. त्यामुळे माझं लेखन, वाचन हे ‘क्रिएटिव्ह’ काम वाढलं. ‘जगणं तेच लिहिणं’ ही भूमिका घेतल्याने लेखन वाचकप्रिय ठरलं. त्यामुळे आर्थिक लाभ वाढला. माझी अधिकाधिक पुस्तकं प्रकाशित होऊ लागली. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मी सकारात्मक कामातच गुंतून आहे. मी शेतीत नसतो तर आजच्या बाहेरच्या नैराश्यपूर्ण वातावरणात प्रकाशन बंद केलं असतं.

सोशल मीडियावरील लढायांत अडकून पडलो असतो. आनंददायी शेतीचा हा असा थेट लाभ मला झाला. आज मी शेती करतोय, हा माझ्यासाठी अभिमानाने सांगण्याचा विषय आहे. मी देशाच्या जीडीपीत भर घालतोय, हे वास्तव आहेच. मी शेती करीत नसतो, तर आज माझी ही जीवनशैली राहिली नसती आणि कोणी मला यासंदर्भात प्रश्‍नही विचारला नसता! ज्यांचं पोट केवळ शेतीवर अवलंबून आहे, त्यांची स्थिती बिकट आहे.

त्यांची शेतीतून बाहेर पडण्याची इच्छा असूनही समोर मार्ग दिसत नाही. हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. त्यावर मी वेळोवेळी लिहितोच. मात्र ज्यांच्याकडं जगण्याचे इतर पर्याय आहेत व शेतीही आहे; त्यांनी शेतीत येऊन नव-नवे प्रयोग करण्याची, निसर्गपूरक जगण्याचा आनंद घेण्याची गरज आहे. अर्थात, यासाठी तुमचं मातीशी नातं असण्याची किंवा नव्याने ते जोडण्याची तयारी हवी. नाही तरी निष्क्रिय जगणं, हे काही जगणं नसतंच!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com