
Pune News: रब्बी पिकांची पेरणी जवळपास पूर्ण झाली. रब्बीची पेरणी २७ जानेवारीपर्यंत गेल्यावर्षीपेक्षा १२ लाख हेक्टरने अधिक असून ६५५ लाख हेक्टरवर पोचली. गहू आणि मक्याला यंदा शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. भात आणि कडधान्याचा पेराही यंदा वाढला. मात्र भडधान्य आणि तेलबिया पिकांची पेरणी घटली आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने देशातील रब्बी लागवडीची माहीती दिली आहे. रब्बीचे देशातील सरासरी पेरणीक्षेत्र ६३५ लाख हेक्टर आहे. मागील हंगामात ६४३ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. मात्र यंदा सरासरी क्षेत्रापेक्षा आणि मागील वर्षीच्या लागवडीपेक्षा रब्बीची पेरणी अधिक झाली. २७ जानेवारीपर्यंत देशात ६५५ लाख हेक्टरवर रब्बीचा पेरा झाला होता. देशात झालेला चांगला पाऊस आणि रब्बी पेरणीसाठी पोषक हवामान असल्याने रब्बीचा पेरा वाढल्याचे कृषी मंत्रालयाने म्हटले आहे.
यंदा तेलबिया पिकांचे भाव कमी आहेत. खरिपातील सोयाबीनसह इतर तेलबियांना भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात तेलबिया पिकांची पेरणी कमी केली. गेल्या हंगामात १०२ लाख हेक्टरवर तेलबिया पिकांची पेरणी झाली होती. यंदा मात्र ९८ लाख हेक्टरवर पेरा झाला. मोहरी, सूर्यफूल, करडी आणि तिळाची लागवड कमी झाली, तर भूईमुगाची लागवड काहीशी वाढली.
शेतकऱ्यांनी भडरधान्यालाही यंदा कमी पंसती दिल्याचे दिसते. एकूण भरडधान्याची पेरणी ५५ लाख ६७ हजार हेक्टरवर झाली. यंदाची पेरणी गेल्यावर्षीपेक्षा केवळ २२ हजार हेक्टरने कमी आहे. भरडधान्यात केवळ मक्याची लागवड वाढली आहे. तर ज्वारी, बाजरी, रागी आणि बार्लीची लागवड कमी झाली. ज्वारीची लागवड सरासरी क्षेत्रापेक्षाही कमी आहे.
शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीतही कडधान्याची पेरणी वाढवली आहे. कडधान्याचा पेरा १४२ लाख हेक्टरवर पोचला. गेल्यावर्षीपक्षा कडधान्याचे क्षेत्र ३ लाख हेक्टरने वाढले आहे. कडधान्यात हरभरा, उडीद आणि मुगाची लागवड वाढली. तर मसूर, वाटाणा पेरणीत घट झाली आहे.
हरभरा लागवड वाढली
हरभरा पेरणी आता पूर्ण झाली. काही बाजारात नवा हरभरा दाखलही होत आहे. देशातील हरभरा पेरणी अडीच लाख हेक्टरने वाढून ९८ लाख ५५ हजार हेक्टरवर पोचली. लागवड गेल्यावर्षीपेक्षा वाढली तरी सरासरी क्षेत्रापेक्षा लागवड कमीच आहे. आतापर्यंततरी हरभरा पिकाला पोषक हवामान असल्याने उत्पादनात वाढीचाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
गहू, मक्याची पेरणी उच्चांकी
यंदाच्या रब्बीत शेतकऱ्यांनी गहू आणि मक्याला चांगलीच पसंती दिली. दोन्ही पिकांची पेरणी गेल्यावर्षीपेक्षा आणि सरासरीपेक्षा वाढली आहे. गव्हाची लागवड ३२४ लाख हेक्टरवर पोचली. गेल्यावर्षी जवळपास ३१६ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. तर मक्याची लागवड जवळपास २४ लाख हेक्टरवर झाली आहे. गेल्यावर्षीची लागवड २२ लाख हेक्टरवर झाली होती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.