Banana Farming Management : केळी लागवडीत सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Banana Cultivation : अजय पाटील यांच्या संयुक्त कुटुंबाची रूखनखेडा (प्र.चो.) (ता. चोपडा, जि. जळगाव) शिवारात १८ एकर मध्यम प्रकारची जमीन आहे. त्यापैकी ८ एकरांत बारमाही केळी लागवडीचे नियोजन असते.
Banana Farming
Banana FarmingAgrowon

Banana Farming : शेतकरी नियोजन

पीक : केळी

शेतकरी : अजय पाटील

गाव : रूखनखेडा (प्र.चो.), ता. चोपडा, जि. जळगाव

केळी लागवड : ८ एकर

एकूण झाडे : १३ हजार

अजय पाटील यांच्या संयुक्त कुटुंबाची रूखनखेडा (प्र.चो.) (ता. चोपडा, जि. जळगाव) शिवारात १८ एकर मध्यम प्रकारची जमीन आहे. त्यापैकी ८ एकरांत बारमाही केळी लागवडीचे नियोजन असते. सुरवातीच्या काळात फक्त कांदेबाग केळी लागवड असायची. मात्र अलीकडे बारमाही केळी लागवड करत आहेत. जानेवारी महिन्यापासून टप्प्याटप्प्याने केळी लागवडीचे नियोजन असते. त्यामुळे बाजारांतील दरांमधील चढ-उताराचा फटका बसण्याची शक्यता कमी होते, असे अजयराव सांगतात.

केळी बाग व्यवस्थापनामध्ये चोपडा येथील गोवर्धन संस्थेचे अध्यक्ष प्रदीप गुजराथी, कोळदा (ता. नंदुरबार) येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ पी. सी. कुंदे, अजय यांचे वडील हिंमत पाटील, डॉ. सुभाष देसाई, डॉ. रवींद्र निकम, ॲड. हेमचंद्र पाटील, प्रफुल्ल पाटील यांचे मार्गदर्शन केळी लागवडीमध्ये मिळते, असे अजयराव सांगतात.

केळी लागवड

सध्या एकूण ८ एकरांत केळी लागवड आहे. त्यापैकी ५ एकरांत ऑक्टोबर-नोव्हेंबर लागवड केलेल्या कांदेबागेची ७ हजार झाडे, तर ३ एकरांत एप्रिल महिन्यात लागवडीची ६ हजार झाडे आहेत. संपूर्ण लागवड ५ बाय ६ फूट अंतरावर आहे.

संपूर्ण लागवड १ फूट उंच गादीवाफ्यावर केली जाते. गादीवाफा साडेतीन फूट रुंद ठेवला जातो. त्यावर पाच बाय सहा फूट अंतरावर झिगझॅग पद्धतीने लागवड केली जाते. लागवडीसाठी १०० टक्के उतिसंवर्धित ग्रॅण्ड नैन वाणाची केळी रोपांची निवड केली जाते.

सिंचनासाठी काही लागवडीत डबल लॅटरल, तर काही लागवडीत सिंगल लॅटरलचा वापर होतो.

Banana Farming
Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

अन्नद्रव्य व्यवस्थापन

लागवडीनंतर दुसऱ्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि १९ः१९ः१९ यांची आळवणी केली जाते. त्यानंतर ४ दिवसांनी चिलेटेड मॅग्नेशिअम सल्फेट आणि १२ः६१ः०, त्यानंतर पुढील ४ दिवसांनी चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि १३ः४०ः१३ यांची आळवणी केली जाते. त्यानंतर ४ दिवसांनी कॅल्शिअम नायट्रेट आणि बोरॉन यांची आळवणी केली जाते. या प्रमाणे आलटून-पालटून शिफारशीत घटकांची आळवणी करण्यावर भर दिला जातो.

रोप लागवडीनंतर २० दिवसांनी १०ः२६ः२६ हे खत १०० किलो, निंबोळी पेंड ५० किलो आणि २५ किलो युरिया या प्रमाणे प्रति एक हजार झाडांना बेसल डोस दिला जातो.

मुख्य वाढीच्या अवस्थेत चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये, १३ः४०ः१३ यांचा ठिबकद्वारे वापर केला जातो. त्यानंतर ४ दिवसांनी युरिया, पांढरा पोटॅश आणि मॅग्नेशिअम सल्फेट यांची मात्रा दिली जाते.

पीक व्यवस्थापन

केळी रोपांवर खोडकीड, हुमणी, पोंगेसड, इर्व्हिनिया रॉट या कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी लागवडीनंतर ८ दिवसांनी शिफारशीत घटकांची आळवणी महत्त्वाची ठरते. जेणेकरून प्रादुर्भाव टाळला जाईल.

याशिवाय कुकुंबर मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निमतेल आणि शिफारशीत कीडनाशकांचा वापर केला जातो. रोपे दोन महिन्यांची होईपर्यंत ८ दिवसांच्या अंतराने ही फवारणी घेतली जाते.

मागील कामकाज

उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेचा केळी झाडांवर तसेच रोपांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यासाठी सिंचनाचे काटेकोर नियोजन करण्यात आले. प्रति झाड प्रतिदिन साधारण ४० लिटर पाणी ठिबकद्वारे देण्यात आले.

याशिवाय उन्हाळ्यातील उष्ण वाऱ्यांमुळे बागेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यासाठी बागेभोवती ताग पिकाची लागवड केली होती.

बागेतील केळी झाडावरील पाने काढणे कटाक्षाने टाळण्यात आले. फुटवे मात्र नियमित काढण्यात आले.

Banana Farming
Banana Crop Insurance : फळ पीकविमा योजनेत केळी विमाधारकांवर अन्याय

आगामी नियोजन

सध्या ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतील केळी बाग निसवण, तर एप्रिल लागवडीतील रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत. ऑक्टोबर लागवडीतील बागेत फण्यांची विरळणी, केळफूल काढणे, फुटवे काढणे, कोरडी व पिवळी पाने कापणे आदी कार्यवाही सुरू आहे.

बागेतील झाडांना १३ः०ः४५ हे खत ४ किलो प्रति एक हजार झाडे या प्रमाणे दर चार दिवसांनी नियमितपणे दिले जाईल.

अद्यापपर्यंत अपेक्षित पाऊस झालेला नाही. तसेच किमान तापमानदेखील बऱ्यापैकी आहे. येत्या काळात कांदेबागेतील घड पक्व होण्यास सुरुवात होईल. त्यासाठी सिंचन आणि खतांचे काटेकोर व्यवस्थापन केले जाईल. त्यात पोटॅशिअम शोनाईट आणि १ किलो युरिया प्रति एक हजार झाडे याप्रमाणे दिले जाईल. वाफसा स्थितीचा अंदाज घेऊन सिंचन करण्यावर भर दिला जाईल.

कांदेबाग लागवडीत घडांना टॅगिंग करण्याचे काम सुरू आहे. बाग पुढील १५ दिवसांत १०० टक्के निसवणार आहे. यामुळे बागेत टॅगिंग सुरूच राहील. टॅगिंगमुळे प्रत्येक आठवड्याला किती केळफूल काढले याची नेमकी नोंद ठेवता येते तसेच घड काढणीवेळी किती आवक राहील, याचेही नियोजन करता येईल.

दर १० दिवसांनी बागेतील फुटवे तसेच पिवळी आणि कोरडी झालेली पाने काढली जातील.

घडांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रसशोषक किडी व बुरशीनाशकांची फवारणी घेतली जाईल. तसेच सततचे ढगाळ वातावरण व पाऊस अशी स्थिती राहिल्यास करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी योग्य कार्यवाही केली जाईल.

व्यवस्थापनातील बाबी

लागवडीसाठी मध्यम कसदार जमिनीची निवड केली जाते. लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरणी करून जमीन महिनाभर चांगली तापू दिली जाते. त्यामुळे जमिनीतील कीड-रोगांच्या अवस्था नष्ट होण्यास मदत होते. तसेच जमीन सुपीकतेला बळ मिळून पाण्याचा चांगला निचराही होतो.

एप्रिल-मे महिन्यांतील लागवड केलेल्या केळी रोपांचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी रोपांभोवती धैंचा पिकाची किमान २५ दिवस आधी लागवड केली जाते. त्यामुळे रोपांचे उष्ण वाऱ्यांपासून संरक्षण होते. त्यानंतर पावसाळ्यात हवेत गारवा निर्माण झाल्यानंतर जमिनीलगत धैंचा पीक कापून गादीवाफ्यावर पसरले जाते. त्याचा वाढीच्या अवस्थेत पिकास फायदा होतो. तर कांदेबाग केळी लागवडीपूर्वी नियोजित क्षेत्रात आधी धैंचा पिकाची पेरणी केली जाते. केळी लागवडीच्या काही दिवसआधी धैंचा पीक जमिनीत गाडून जमिनीची मशागत केली जाते. त्यानंतर केळी रोपांची लागवड होते. यामुळे जमीन सुपीकतेसह केळी बाग जोमाने येण्यास मदत होते.

लागवडीसाठी गादीवाफे तयार करण्यापूर्वी एक हजार रोपांना ३ ट्रॉली याप्रमाणे चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरले जाते.

सिंचनासाठी शेताच्या लांबीनुसार १२ मिमी व १६ मिमी आकाराच्या लॅटरलचा वापर केला जातो. त्या माध्यमातून समांतर ताशी चार लिटर पाण्याचा विसर्ग होतो. दोन ड्रीपमध्ये सव्वा फूट अंतर राखले जाते.

अजय पाटील, ९५२९८१५८०८

(शब्दांकन : चंद्रकांत जाधव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com