Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Banana Production : जितेंद्र पाटील यांच्या संयुक्त कुटुंबाची निंबोल (ता. रावेर, जि. जळगाव) येथील शिवारात २०० एकर काळी कसदार जमीन आहे. त्यांनी विधी शाखेत पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे.
Banana Farming
Banana FarmingAgrowon
Published on
Updated on

Banana Cultivation : शेतकरी नियोजन

पीक : केळी

शेतकरी : जितेंद्र पाटील

गाव : निंबोल, ता. रावेर, जि. जळगाव

एकूण क्षेत्र : २०० एकर

केळी क्षेत्र : १०० एकर

एकूण झाडे : दीड लाख

जितेंद्र पाटील यांच्या संयुक्त कुटुंबाची निंबोल (ता. रावेर, जि. जळगाव) येथील शिवारात २०० एकर काळी कसदार जमीन आहे. त्यांनी विधी शाखेत पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. वयाच्या विसाव्या वर्षांपासून जितेंद्र शेती करीत आहे. तापी नदीवरील हतनूर धरणाचा लाभ होतो. तापी- पूर्णा नदीच्या संगमावर निंबोल शिवाराचा भाग आहे. संपूर्ण शेती बागायती आहे. सिंचनासाठी ४० कूपनलिका आहेत. केळी प्रमुख पीक असून मका, कापूस, हळद ही पिके घेतात. रब्बीत मका, हरभरा, गहू या पिकांची लागवड असते.

केळी बागेत मुख्यतः मृग बहर (जून, जुलै लागवड) धरला जातो. परंतु अलीकडे बारमाही केळी लागवड करण्यावर भर दिला जात आहे. ही लागवड फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होते. विविध टप्प्यांत लागवड केल्याने चांगले दर मिळण्यास मदत होते. बाजारात दर कमी असले तरीही त्याचा विशेष फटका बसत नाही. असे जितेंद्र सांगतात.

केळी लागवडीसाठी ग्रॅण्ड नैन वाणाच्या १०० टक्के उतिसंवर्धित रोपांचा वापर केला जातो. गादीवाफ्यावर लागवड करण्याचे नियोजन असते. त्यासाठी १० इंच उंच तर साडेतीन फूट रुंद गादीवाफा ठेवला जातो. सिंचनासाठी सिंगल लॅटरल असतात. साडेपाच बाय साडेपाच या अंतरात केळीची लागवड केली जाते. जमीन सुपीकतेसाठी तूर, धैंचा, पपई ही पिके घेतली जातात. केळी लागवडीमध्ये काका भागवत विश्‍वनाथ पाटील, वडील जगन्नाथ पाटील, काका संजय पाटील, बंधू राजेंद्र पाटील आदींचे मार्गदर्शन मिळते, असे जितेंद्र यांनी सांगितले.

Banana Farming
Banana Farming : वाढत्या तापमानात केळी बागेत घ्यावयाची काळजी

लागवड नियोजन

केळी लागवडीसाठी काळ्या कसदार जमिनीची निवड केली जाते. या हंगामाची लागवड फेब्रुवारी मध्ये करण्याचे नियोजित होते. त्यानुसार जानेवारी महिन्यात पूर्वतयारीस सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात प्रत्यक्ष लागवड सुरू झाली.

रोप लागवडीच्या ८ दिवस आधी नियोजित बागेच्या पूर्व, पश्‍चिम व दक्षिण दिशेने धैंचा पिकाची लागवड केली. धैंचामुळे पिकास नैसर्गिक सावली मिळते. तसेच पिकास हिरवळीचे खतही मिळते.

सिंचनासाठी १६ मिमी आकाराची लॅटरल टाकून घेतली. त्या माध्यमातून ताशी तीन लिटर पाणी एका झाडास मिळते. दोन ड्रीपमधील अंतर सव्वाफूट इतके राखले आहे.

एकरी सहा ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरून घेतले. नंतर मशागतीची कामे करून घेतली.

त्यानंतर गादीवाफे तयार केले. त्यात सिंगल सुपर फॉस्फेट एकरी ६ गोण्या प्रमाणे टाकून जमिनीत मिसळून घेतले.

लागवड टप्प्याटप्प्याने करण्याचे नियोजित होते. त्यानुसार रोपांची उपलब्धता करून फेब्रुवारी महिन्यात २४ हजार झाडे, मार्चमध्ये १२ हजार झाडांची लागवड केली.

पीक संरक्षण

सध्या उष्णतेत चांगलीच वाढ झाली आहे. तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. उष्णतेचा केळी रोपांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन पिकास क्रॉप कव्हर लावून घेतले आहे. क्रॉप कव्हरचा वापर रोप लागवड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी केला आहे. यामुळे रोपे स्थिरावण्यास मदत होऊन मरतुक झाली नाही.

वाढीच्या अवस्थेतील रोपांवर विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी पिकाची वेळोवेळी पाहणी केली जाते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रासायनिक

फवारणी घेतली जाते. तसेच पिकाच्या वाढीसाठी संप्रेरकांच्या फवारण्या घेतल्या जातात.

पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी वेळोवेळी तण नियंत्रण करून घेतले.

Banana Farming
Banana Cultivation : खानदेशात आगाप मृग केळीची लागवड सुरू

आगामी नियोजन

सध्या उष्णता वाढते आहे. यामुळे पिकात आंतरमशागतीची कामे करणे टाळले जाईल. कारण बैलजोडी किंवा मिनी ट्रॅक्टरने आंतरमशागतीची कामे करताना पिकाच्या मुळांना इजा होऊन नुकसान होण्याची शक्यता असते. त्याचा वाढीवर परिणाम होतो. शिवाय उष्णतेचा फटकाही बसण्याची शक्यता आहे.

रासायनिक खतांचे वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसार दर आठवड्याला सरळ खते व सूक्ष्म अन्नद्रव्ये दिली जातील. पुढील दोन ते तीन महिने एनपीके खतांची व अन्नद्रव्यांची गरज अधिक असते. यामुळे याबाबत कार्यवाही केली जाईल.

वाढत्या तापमानामुळे पिकाची पाण्याची गरज वाढते. वाढीच्या अवस्थेतील रोपांना पाण्याचा ताण बसू नये यासाठी चार ते पाच तास पाणी दिले जाईल. सिंचनाच्या कालावधीमध्ये आवश्यकतेनुसार बदल केला जाईल.

बागेत आवश्यकतेनुसार तण नियंत्रण केले जाईल. ऊन कमी झाल्यानंतर झाडास मातीची भर लावली जाईल. तसेच बैलजोडीच्या मदतीने आंतरमशागत केली जाईल.

बागेची वेळोवेळी पाहणी केली जाईल. आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक फवारण्या घेतल्या जातील. शक्यतो सायंकाळच्या वेळी फवारणीचे नियोजन केले जाईल.

बागेत करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी वेळापत्रकानुसार रासायनिक फवारणीचे नियोजन केले जाईल.

खत व्यवस्थापन

रोप लागवडीनंतर साधारण एक महिन्यात रासायनिक खतांचे बेसल डोस दिले. त्यात प्रति एक हजार झाडांना ५० किलो युरिया, ५० किलो पोटॅश, ५० किलो २४ः२४ः० हे खत दिले.

रोपांवर किडीचा प्रादुर्भाव होऊ नये, रोप स्थिरावण्यासाठी लागवडीनंतर पिकास शिफारशीत घटकांची आळवणी केली. त्यात विविध कीडनाशके, बुरशीनाशके आदींचा समावेश होता. लागवडीनंतर पाचव्या, बाराव्या व बाविसाव्या दिवशी ही आळवणी केली.

त्यानंतर ड्रीपच्या माध्यमातून रासायनिक खतांच्या मात्रा देण्यात सातत्य राखले आहे. आठवड्यातून एक वेळ सरळ व अन्य खते दिली जात आहेत. त्यात प्रति एक हजार झाडांना पाच किलो पोटॅश, सात किलो युरिया, एक किलो मॅग्नेशिअम सल्फेट याप्रमाणे मात्रा दिली जात आहे. या खतांच्या मात्रा दिल्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्ये २०० ग्रॅम प्रमाणे एक हजार झाडांना दिले.

जितेंद्र पाटील ९८२२२४३८६९ (शब्दांकन ः चंद्रकांत जाधव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com