Bitter Gourd : कारले लागवडीत खत, कीड-रोग व्यवस्थापनावर भर

Bitter Gourd Farming : नाशिक जिल्ह्यातील नारायण टेंभी (ता. निफाड) येथील श्रीनिवास गवळी यांनी कारले लागवड करण्याचा निर्णय घेतला.
Bitter Gourd
Bitter GourdAgrowon

Farmer Management in Bitter Gourd :

शेतकरी नियोजन पीक :कारले

शेतकरी : श्रीनिवास शिवाजी गवळी

गाव : नारायण टेंभी, ता. निफाड, जि. नाशिक

एकूण क्षेत्र : १५ एकर

कारले लागवड : ३ एकर

नाशिक जिल्ह्यातील नारायण टेंभी (ता. निफाड) येथील श्रीनिवास गवळी गेल्या ३० वर्षांपासून द्राक्ष शेती करत होते. मात्र वाढता उत्पादन खर्च, हवामान बदल आणि दर इत्यादी आव्हाने निर्माण झाल्याने द्राक्ष लागवड काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या वर्षी द्राक्ष बाग काढत त्याजागी वेलवर्गीय पिकांची लागवड करत पीकबदल करण्याचे ठरविले. द्राक्ष बाग काढून टाकल्यानंतर या बागेतील उभा सांगाड्यांचा वापर कसा करता येईल यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला.

Bitter Gourd
Bitter Gourd Disease : कारले पिकातील ‘लीफ ब्लाइट’

त्यानंतर उपलब्ध स्ट्रक्चरवर त्यांनी कारले लागवड करण्याचा निर्णय घेतला. कारले लागवडीचे हे पहिलेच वर्ष असल्याने या पिकातील लागवडीपासून पीक नियोजन, खत तसेच कीड-रोग व्यवस्थापन आदी बाबींविषयी माहिती घेत समजून घेतले. लागवडीचे पहिलेच वर्ष असल्याने कारले लागवडीतील अनुभव नसल्याने टप्प्याटप्प्याने सुधारणा करत गेलो, असे श्रीनिवासराव सांगतात.

लागवड नियोजन

द्राक्ष बाग काढून घेतल्यानंतर सुरुवातीच्या काळात सेन्सर रोटाव्हेटरचा वापर करून बोध व गल्ल्या भुसभुशीत करून घेतल्या.

कारले लागवडीसाठी निरोगी व गुणवत्तापूर्ण रोपांची आगाऊ नोंदणी रोपवाटिकेत करून ठेवली.

लागवड करण्यापूर्वी १८:४६, सेंद्रिय खते यासह दाणेदार सल्फर अशी भरखतांची मात्रा देण्यात आली.

पूर्वतयारी झाल्यानंतर १४ एप्रिलपासून लागवडीस सुरुवात केली. त्यानुसार रोपवाटिकेतून रोपांची उपलब्धता करून घेतली.

तीन एकरांतील लागवडीसाठी सुमारे ५७०० रोपांची उपलब्धता केली. १४ एप्रिलपासून पुढे साधारण दोन दिवसांत लागवड पूर्ण करण्यात आली. उन्हाळ्यात उन्हाचा चटका अधिक असल्याने सायंकाळी लागवड करण्यावर भर देण्यात आला.

लागवड द्राक्ष बागेतील उपलब्ध स्ट्रक्चरनुसार ३ बाय ८.५ फूट या अंतराने रोपांची लागवड केली आहे. संपूर्ण लागवड मल्चिंग पेपरवर करण्यात आली आहे.

लागवडपश्‍चात नियोजन

कारले पिकाला वाढीच्या अवस्थेत आधार देणे ही महत्त्वाची बाब असते. तसेच नवीन फुटीच्या माध्यमातून वाढीला चांगला वाव मिळून पुढे फळधारणा चांगली होण्यास मदत होते. त्यामुळे दर्जेदार व अधिक उत्पादन वाढीसाठी मंडपाचे नियोजन महत्त्वाचे ठरते.

वेलींना वरील बाजूस चढविण्यासाठी क्रॉप नेटचा वापर करण्यात आला. रोपांची वाढ झाल्यानंतर पुढील पंधरा दिवसांनंतर वेली वर जाण्यासाठी जाळी पसरून तसे नियोजन करण्यात येते. त्यामुळे फळांना इजा होण्याचा धोका कमी होतो. शिवाय फुलकळी घासून होणारी गळ टाळण्यास मदत होते.

Bitter Gourd
Bitter Gourd Farming : कारले लागवडीत राखले सातत्य

रोपांच्या संरक्षणासाठी आच्छादन

उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र सूर्यकिरणांपासून कारले रोपांचे नुकसान होण्याची शक्यता असे. त्यासाठी सुरुवातीच्या काळात छोटे कागदी ग्लास खालील भागात कापून ते रोपाच्या वरून टाकण्यात आले. त्यामुळे रोपांचे संरक्षण होण्यास मदत झाली. उन्हाळ्यात पिकावर कापडाचे आच्छादन करण्यात आले. त्यामुळे तीव्र सूर्यप्रकाशामुळे रोपांचे संरक्षण झाले. सध्या कारले लागवड तीन महिन्यांची झाली आहे. मागील महिनाभरापासून टप्प्याटप्प्याने फळांची काढणी सुरू असून दर्जेदार उत्पादन मिळत आहे.

रोग-कीड व्यवस्थापन

कारले पिकावर वाढीच्या कालावधीत विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. यासह पांढरी माशी, तुडतुड्यांचा प्रादुर्भावामुळे पाने आणि शेंड्यामध्ये विकृती दिसून येते. तसेच नागअळीच्या प्रादुर्भावामुळे पाने खराब होतात. प्रादुर्भाव टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शिफारशीत कीटकनाशकांचा वापर करण्यात आला. त्यामुळे नुकसान टाळण्यास मदत झाली. आणि फळांची गुणवत्ता टिकून राहिली.

रासायनिक फवारणी घेण्यापूर्वी प्रत्यक्ष लागवडीमधील निरीक्षणे घेऊन आवश्यकता असेल तरच फवारणी करण्यावर भर देण्यात आला.

यासह एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी चिकट सापळे आणि कामगंध सापळे लावण्यात आले. त्यामुळे रासायनिक फवारणीवरील खर्चात मोठी बचत झाल्याचे श्रीनिवास सांगतात.

विक्री नियोजन

लागवड साधारण साठ दिवसांची झाल्यावर माल काढणीस तयार होतो. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात उष्णता अधिक असल्याने फळांची वाढ मंदावली होती. त्यामुळे सरासरी ७० दिवसांनंतर तोडणीने वेग घेतला. त्यानंतर मजुरांची उपलब्धता करून कारले तोडणी करण्यात आली.

आठवड्यातून दोन दिवसाआड तोडे घेण्यात आले. प्रत्येक तोड्याला साधारण ८० ते ९० क्रेट उत्पादन मिळाले आहे.

कारले तोडणीनंतर मालाची हाताळणी व प्रतवारी अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे बाजारात चांगले दर मिळण्यास सुरुवात होते.

उत्पादित मालाची नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री करण्यात आली.

चांगल्या प्रतीच्या कारल्याला सरासरी ७०० ते ८०० रुपये प्रति क्रेट, तर दुय्यम प्रतीच्या मालाला ४०० ते ४५० रुपये दर मिळाला आहे. चांगले दर मिळविण्यासाठी गुणवत्तापूर्ण उत्पादन ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.

अन्नद्रव्ये व्यवस्थापन

लागवड केल्यानंतर पिकांची जोमदार वाढ होण्यासह उत्पादन वाढीसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. दर्जेदार उत्पादनासाठी पीक संरक्षण आणि अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर देण्यात आला.

रासायनिक खतांमध्ये १२:६१ः०, ०:५२:३४, १९:१९:१९, २४:२४:०, ०:०:५०, १३:०:४५, ०.६०:२०, ५५:१८:० या खतांचा वापर केला.

रासायनिक खतांचे योग्य नियोजन पिकाच्या वाढीच्या विविध टप्प्यांमध्ये केल्यामुळे वेलीची वाढ, फुलधारणा, फुगवण व फळ वाढीसाठी चालना मिळाला. टप्प्याटप्प्याने खतांच्या मात्रा दिल्याने पिकाच्या वाढीसह उत्पादनात त्याचा फायदा दिसून आला आहे.

श्रीनिवास गवळी ९४२२८३९६४५

(शब्दांकन : मुकुंद पिंगळे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com