Orange Orchard Management : संत्रा बागेमध्ये खत- पाणी व्यवस्थापनावर भर

Article by Vinod Ingole : कुऱ्हा या गावात नितीन वरठी राहतात. वडिलांसोबतच लहानपणापासून नितीन हे शेतात येत असत. त्यातूनच त्यांना शेतीचा लळा लागला. पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पूर्ण वेळ शेतीत काम करू लागले.
Nitin Varthi
Nitin VarthiAgrowon

Farmer Planning :

शेतकरी नियोजन

पीक : संत्रा

शेतकरी नाव : नितीन शेषराव वरठी

गाव : कुऱ्हा, ता. तिवसा, जि. अमरावती

शेती : १५ एकर

एकूण संत्रा झाडे : १२८०

मोसंबी झाडे : ३००

१७ हजार लोकसंख्येच्या कुऱ्हा या गावात नितीन वरठी राहतात. त्यांचे वडील शेषराव हे होमिओपॅथीचा वैद्यकीय व्यवसाय करत असले, तरी रोज दुपारी शेतीमध्ये काम करत. वडिलांसोबतच लहानपणापासून नितीन हे शेतात येत असत. त्यातूनच त्यांना शेतीचा लळा लागला. पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पूर्ण वेळ शेतीत काम करू लागले.

त्यांच्याकडे एकूण १५ एकर शेती आहे. त्यात संत्र्यांची पाच वर्षे वयाची ७५० झाडे आहेत. लागवड अंतर १८ फूट बाय १८ फूट आहे. सात वर्षांची ३०० झाडे असून, त्यातील लागवड अंतर २० फूट बाय २० फूट आहे. १४ ते १५ वर्षांची २३० झाडे असून, त्याचे लागवड अंतर १८ फूट बाय १८ फूट आहे. संत्र्यांसोबतच सहा वर्षांची मोसंबीची ३०० झाडे असून, त्यातील लागवड अंतर १५ फूट बाय १५ फूट याप्रमाणे ठेवलेले आहे.

Nitin Varthi
Orange Orchard : नियोजनबद्ध संत्रा बाग व्यवस्थापनावर भर

पहिल्यांदाच मृग बहर

आंबिया बहरात काही कारणांमुळे उत्पादन मिळाले नाही तर मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे २४० झाडांवर यंदा मृग बहर घेतला आहे. पहिल्याच प्रयत्नात फळांचा दर्जा आणि आकार चांगला मिळाला आहे.

दांड पद्धतीचा होता फायदा

ट्रॅक्‍टर रिपरच्या व्ही -पासला पाटली (लाकडी ओंडका) बांधून, त्याद्वारे दांड (पट्टा) पाडला जातो. त्याद्वारे पाणी देण्याचे नियोजन केले. झाडाचे वय अधिक असल्याने, त्यांची मुळे दूरवर पसरलेली आहे. त्यांना जितका दूरपर्यंत ओलावा मिळेल, तितकी मुळे कार्यक्षम राहतात. त्यांची भूकही मोठी असते. दांड पद्धतीने पाणी देण्याच्या पद्धतीमुळे पाणी थोडे अधिक लागत असले तरी झाडांची जोमदार वाढ होते. त्यांची प्रतिकारशक्ती वाढून कीड-रोगांचा प्रादुर्भावही कमी राहतो.

खताचे व्यवस्थापन

आंबिया बहर घेण्यासाठी प्रति झाड तीन टोपणे शेणखत टाकले जाते. त्यासोबत एकरी दोन पोते सिंगल सुपर फॉस्फेट दिले जाते. पुढे पाणी देतेवेळी १०ः२६ः२६ किंवा १५ः१५ः१० प्रति झाड एक ते दीड किलो, झिंक सल्फेट २५० ग्रॅम प्रति झाड याप्रमाणे देतो. यामुळे नवीन पालवी फुटण्यास मदत होते.

सूक्ष्म अन्नद्रव्ये २०० ते २५० ग्रॅम, ह्युमिक ॲसिड प्रति झाड १०० ते १५० ग्रॅम दिले जाते. त्यानंतर १५ दिवसांनी दुसऱ्या पाण्यासोबत मोरचूद १०० ग्रॅम प्रति झाड दिले जाते. त्यानंतर १० मे पर्यंत जमिनीच्या वाफशाच्या अंदाजानुसार आठ-आठ दिवसांच्या कालावधीत पाणी देण्यावर भर राहतो. या काळात फुटीचा अंदाज राहतो. १० मेनंतर पाणी बंद करतो. २५ डिसेंबर ते १० जानेवारी या कालावधीत पाणी सुरू केले जाते.

Nitin Varthi
Orange Orchard : संत्रा बागेत अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर

मृग बहराची बाग

२८ फेब्रुवारीला बागेतील मृगाच्या फळांची तोड होईल. त्या पार्श्‍वभूमीवर १० एप्रिलपर्यंत पाणी देणार आहे. १० एप्रिलपासून पाणी बंद करतो. एप्रिल ते जून या कालावधीत बाग ताणावर सोडली जाते. पावसाच्या पाण्याची वाट पाहतो. आंबिया बहराचा ताण वरच्या पावसावरच तुटतो.

संत्रा बागेत आंतरपीक

सात वर्षांची बाग असलेल्या परिसरात आंतरपीक म्हणून तूर पीक घेतले आहे. दीड एकरातून १४ ते १५ क्‍विंटल उत्पादन होईल, अशी अपेक्षा आहे.

पाच वर्षांच्या बागेत सोयाबीन लावले होते. चार एकरांतील या क्षेत्रातून २३ क्‍विंटलचे उत्पादन मिळाले.

२६ मे रोजी दीड एकर मध्ये कपाशी लावली होती. सप्टेंबर महिन्यातील पावसामुळे नुकसान झाले. पहिली वेचणी ८ ते ९ क्‍विंटलची अपेक्षित होती, पण पावसामुळे बोंड सडली. परिणामी अपेक्षित उत्पादन झाले नाही. दुसरी व तिसरी वेचणीतून ४ क्‍विंटल याप्रमाणे उत्पादन मिळाले. त्यानंतर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने काहीच हाती लागले नाही.

आठवड्यातील कामे

पाच वर्षांच्या बागेत पाणी दिले. त्यामुळे आंबियाची फूट सुरू झाली.

सात वर्षे वयाच्या असलेल्या बागेत देखील पाणी देण्यात आले.

मावा किडीचा प्रादुर्भाव व काही प्रमाणात काळे डाग आढळल्यामुळे शिफारसीप्रमाणे कीडनाशकाची फवारणी केली.

झिंक-बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांचीही एक फवारणी घेतली आहे.

पुढील नियोजन

सात वर्षांच्या बागेतील झाडांना युरिया प्रति झाड अर्धा किलोप्रमाणे देण्याचे नियोजन आहे.

फळ माशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकरी १० ट्रॅप लावले आहे.

वन्यप्राण्यांपासून बागेच्या संरक्षणासाठी सातत्याने लक्ष ठेवून उपाय करत आहे.

नितीन शेषराव वरठी, ९९७५०८९१०३

(शब्दांकन : विनोद इंगोले)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com