Fertilizer Using : कसा कराल खतांचा कार्यक्षम वापर?

Soil Testing : प्रथमतः माती परीक्षण आणि त्यानंतर माती परीक्षण अहवालानुसार खतांच्या कार्यक्षम वापराबाबत कृषी विभागाने व्यापक प्रबोधन करायला पाहिजे.
Fertilizer Uses
Fertilizer UsesAgrowon
Published on
Updated on

Fertilizer Rate : मागील पाच-सहा वर्षांत रासायनिक खतांच्या दरात मोठी वाढ झाली. कधी ही वाढ केंद्र सरकारने केलेल्या अनुदान कपातीमुळे झाली, तर कधी जीएसटी आकारण्याच्या घोळात रासायनिक खतांचे दर वाढविण्यात आले आहेत. शिवाय अलीकडे इंधन दरवाढ आणि रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणूनही खतांचा पुरवठा विस्कळीत होऊन दरवाढ करण्यात आली आहे.

आता जागतिक बाजारातील कच्च्या मालाच्या किमती घटल्या आहेत. अशावेळी केंद्र सरकारने खत अनुदानात थोडी वाढ केली असती, एवढेच नव्हे तर हे अनुदान मागील वर्षी एवढे ठेवले असते तर या वर्षीच्या खरीप हंगामात रासायनिक खतांचे दर थोडेफार कमी होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता.

परंतु जागतिक बाजारात कच्च्या मालाच्या किमती कमी झालेल्या असताना केंद्र सरकारने रासायनिक खतांवरील अनुदान कपात केली आहे. गेल्या वर्षी खत अनुदानासाठी सव्वादोन लाख कोटी रुपयांची तरतूद केली होती, या वर्षी त्यात कपात करून पावणेदोन लाख कोटींचीच तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे खतांचे दर कमी न होता स्थिर राहतील.

अर्थात, दराबाबत शेतकऱ्यांना दिलासा मिळणारच नाही. अशा परिस्थितीत खतांची बचत करून खर्चातही बचत करण्याचा सल्ला विकास पाटील कृषी संचालक, गुणनियंत्रण व निविष्ठा विभाग यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून त्याच्या आधारावरच रासायनिक खतांचा वापर केला पाहिजे, असे सांगितले जाते. परंतु राज्यात किती शेतकरी माती परीक्षण करून खतांचा वापर करतात, हा संशोधनाचा विषय ठरू शकतो.

शेतकऱ्यांनी माती परीक्षण केले, तरी त्यातून त्यास खते वापराबाबत बोध होत नाही. अशावेळी प्रथमतः माती परीक्षण आणि त्यानंतर त्यानुसार कार्यक्षम खते वापराबाबत कृषी विभागाने व्यापक प्रबोधन करायला पाहिजे. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया अवश्य करायला पाहिजे.

Fertilizer Uses
Fertilizer Selling : खतांची जादा दराने विक्री केल्यास कारवाई

द्विदलवर्गीय कडधान्यांमध्ये (सोयाबीन, मूग, उडीद) रायझोबियम जैविक खतांची बीजप्रक्रिया केली, तर हवेत असलेला नत्र ही पिके शोषून घेतात. त्यामुळे नत्रयुक्त खते कडधान्यांना देण्याची गरज पडत नाही. एकदल पिकांसाठी ॲझोटोबॅक्टरचा वापर आपण करू शकतो. मागील अनेक वर्षांपासून कृषी विभाग, विद्यापीठे हे सांगतात.

परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद का मिळत नाही, याचाही विचार झाला पाहिजे. आता द्रवरूपात जैविक खते काही कंपन्यांनी आणली असून, त्याचा बीजप्रक्रियेसाठी वापर वाढायला पाहिजे. शेतकऱ्यांनी अगोदर बुरशीनाशके त्यानंतर कीटकनाशके आणि शेवटी जिवाणू खते या क्रमानुसार बीजप्रक्रिया करूनच पेरणी करायला पाहिजे. असे केल्याने कमी खर्चात उत्‍पादनात १० ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.

पेरणी करताना अनेक शेतकरी खते फेकून देतात. त्यामुळे बरेच खत वाया जाते. त्याऐवजी शेतकऱ्यांनी खते पेरून द्यायला पाहिजेत. तसेच संयुक्त दाणेदार खतांची कार्यक्षमता केवळ ३० टक्के असल्याने ते एकदाच देण्याऐवजी विभागणी करून खत मात्रा द्यायला हव्यात.

शिवाय विद्राव्य खतांचा वापर शेतकऱ्यांनी वाढवायला हवा. विद्राव्य खते फवारणी अथवा ठिबकद्वारे देता येतात. यांची कार्यक्षमता ६० टक्के असून, ते पिकांना लवकर उपलब्ध होतात. सोयाबीनसह इतरही पिकांमध्ये वाढीच्या, फुले धरण्याच्या, दाणे भरण्याच्या अवस्थेत विद्राव्ये खते दिली, तर उत्पादन वाढ शक्य आहे.

विद्राव्य खतांवर शासन अनुदान देत नाही. त्यामुळे ती थोडी महाग आहेत. परंतु कार्यक्षम आहेत. आता नॅनो खते (युरिया, डीएपी) देखील आली असून, त्यांची कार्यक्षमता ९० टक्के आहे. हे बीजप्रक्रिया तसेच फवारणीच्या स्वरूपात वापरता येतात.

नॅनो खतांमुळे कमी खर्चात आवश्यक तेवढे अन्नद्रव्ये पिकांना मिळून उत्पादन वाढ साधता येते. रासायनिक खतांच्या अशा कार्यक्षम वापराबाबत कृषी विभागाने प्रबोधन वाढविले पाहिजे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com