
Pest Free Farming Management:
शेतकरी नियोजन । पीक : हळद
शेतकरी : अनिल दत्तात्रय शिंगारे
गाव : बावची, ता. वाळवा, जि. सांगली
एकूण शेती : १२ एकर
हळद क्षेत्र : साडेचार एकर
बावची (ता. वाळवा) येथील अनिल दत्तात्रय शिंगारे हे मागील अठरा वर्षांपासून हळद लागवड करत आहेत. अभ्यास आणि प्रयोगशीलतेच्या बळावर अनिल यांनी हळद उत्पादनात सातत्य राखले आहे. फेरपालट पद्धतीने ऊस, हळद, केळी अशी पिके घेतात. शिवाय आंतरपीक पद्धतीचे प्रयोगही सुरू आहे. बेणे निवड, लागवड पद्धती यासह काटेकोर व्यवस्थापनात सातत्य ठेवत त्यांनी हळद उत्पादनात हातखंडा तयार केला आहे.
अनिल यांनी एमएस्सी कीटकशास्त्राचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिंगारे यांची १२ एकर शेती आहे. बहुतांश शेती माळरान तर काही शेती काळी अशा दोन्ही प्रकारची आहे. त्यापैकी किमान दोन एकर तर जास्तीत जास्त साडेचार एकरावर दरवर्षी हळद लागवडीचे त्यांचे नियोजन असते. हळद पिकाबरोबर ऊस, केळी, भुईमूग या पिकांची देखील लागवड केली जाते. या वर्षी एकूण क्षेत्रापैकी अर्ध्या क्षेत्रामध्ये उसाचे आंतरपीक, तर उर्वरित क्षेत्रात केवळ हळद लागवड आहे.
नियोजनातील बाबी
हळद लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीची खोल नांगरट केली जाते. ऊस पीक गेल्यानंतर पाला कुट्टी केली.
नांगरट केल्यानंतर एकरी १० टन प्रमाणे चांगले कुजलेले शेणखत किंवा २० टन कंपोस्ट खत शेतात विस्कटून रोटर फिरविला.
लागवडीसाठी तीन फूट किंवा साडेचार फूट सरीचा अवलंब केला जातो. सलग लागवडीच्या हळदीसाठी तीन फुटांच्या सरी, तर आंतरपीक लागवडीसाठी साडेचार फुटांच्या सरी काढण्यात आल्या आहेत. सरी सोडल्यानंतर सरीत तीन फुटांवर कुळवाच्या साह्याने रेषा काढून त्यात डीएपी, पोटॅश, गंधक, मॅग्नेशिअम सल्फेट असा रासायनिक खतांचा बेसल डोस दिला.
ठिबकच्या लॅटरल सऱ्यांवर पसरून शेत पूर्णपणे भिजविले घेतले. जेणेकरून बेणे लागवड करणे अधिक सोयीचे होईल.
या वर्षी लागवड दोन टप्प्यांत करण्यात आली आहे. त्यापैकी सलग लागवड २० मे, तर उसाची आंतरपीक लागवड २९ मेच्या दरम्यान करण्यात आली. दरवर्षी साधारण १५ मे ते १५ जूनच्या दरम्यान हळद लागवड पूर्ण करण्याचे नियोजन असते.
दोन सरींत तीन फूट, तर दोन गड्ड्यांत ९ ते १२ इंचांपर्यंत अंतर राखून लागवड करण्यात आली.
लागवडीपूर्वी ठिबकने पाणी दिल्यामुळे माती भुसभुशीत झालेली असते. त्यामुळे लागवड करणे सोपे होते. लागवडीवेळी त्यामध्ये कंद ठेवून हाताने सहज दाबला जातो.
लागवड झाल्यानंतर उगवणपूर्व शिफारशीत रासायनिक तणनाशकांचा वापर करण्यात आला. जेणेकरून उगवणीच्या अवस्थेतील पिकात तणांचा प्रादुर्भाव होणार नाही.
लागवडीनंतर दोन महिन्यानंतर अमोनिअम सल्फेट, करंजी पेंड, सरकी पेंड, निंबोळी पेंड यासह ठिबकद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करण्यात आला. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये फेरस सल्फेट, झिंक सल्फेट यांचा वापर केला जातो.
आगामी नियोजन
सध्या हळद पीक अडीच महिन्याचे झाले आहे. मागील आठवडाभरात भरणीची कामे पूर्ण करण्यात आली. तीन फुटांच्या सरीत बैलजोडीच्या साह्याने, तर साडेचार फुटांच्या सरीत पॉवर टिलरच्या साह्याने भरणी करण्यात आली.
भरणी करतेवेळी डीएपी, निंबोळी पेंड, करंजी पेंड, सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा देण्यात आल्या. भरणी करण्यापूर्वी मजूर लावून शेतात उगवलेले तण काढून घेतले.
बुरशीजन्य करपा, कंदकुज या रोगांचा प्रादुर्भाव पिकात होण्याची शक्यता असते. त्यासाठी ट्रायकोडर्मा, स्युडोमोनास या जैविक घटकांचा वापर केला जाईल. जेणेकरून प्रादुर्भाव टाळला जाईल.
कंदमाशीसाठी सापळे लावण्याचे नियोजन आहे. पिकामध्ये कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर सापळे लावले जातील. किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेळेवर उपाययोजना केल्या जातील.
कंद चांगले पोसण्यासाठी ०ः५२ः३४, पोटॅशिअम शोनाईटचा वापर केला जाईल. आवश्यकतेनुसार सिलिकॉन, निंबोळी अर्क यांची फवारणी घेतली जाईल.
पावसाचा अंदाज घेऊन आणि जमिनीतील वाफसा स्थिती पाहून सिंचनाचे नियोजन केले जाईल.
बेणेप्रक्रिया
लागवडीसाठी दरवर्षी निरोगी, रोग-कीडमुक्त बेणे वापरण्यावर भर दिला जातो. लागवडीसाठी हळदीच्या सेलम या वाणाचे बेणे वापरले जाते. दरवर्षी मागील हंगामातील घरचे बेणे लागवडीसाठी वापरले जाते. त्यासाठी हळदीची काढणी केल्यानंतर दर्जेदार मातृकंद वेगळे काढून ठेवले जातात. सलग पाच वर्षे हेच बेणे वापरले जाते. साधारणपणे पाच ते सहा वर्षांतून एकदा बेणे बदल केला जातो. लागवडीसाठी एकरी सरासरी १० ते १२ क्विंटल बेण्याची आवश्यकता भासते. लागवडीपूर्वी बेण्यास शिफारशीत जैविक आणि रासायनिक घटकांची बेणेप्रक्रिया केल्यानंतरच लागवड केली जाते.
अनिल शिंगारे, ९७३०२८०२४५
(शब्दांकन : अभिजित डाके)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.