
माधव गाडगीळ
Technology In Education: आज कृत्रिम बुद्धिमत्तेचे - गावरान भाषेत - खोट्या-नाट्या अकलेचे तारे तुटताहेत आणि एक अफलातून भाषाव्यवहाराची आणि ज्ञानव्यवहाराची क्रांती घडतेय. उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यांची चर्चा करताना सुचवले होते की, जगातील सर्व ज्ञान ज्यांच्या त्यांच्या भाषेत सगळ्यांकडे पोचवले जाणे, हा शेवटचा टप्पा असेल. हे आज प्रत्यक्षात खूपसे उतरत आले आहे. मराठीत असे ज्ञान किती सहज उपलब्ध होऊ शकते हे पाहण्यासाठी ‘स्थिर स्थिती विश्वा’च्या सिद्धांतावरच्या जयंत नारळीकरांच्या कामाचे उदाहरण घ्या.
नारळीकरांनी ‘उत्पत्ती क्षेत्र’ नावाची नवीन पदार्थ निर्माण होण्याला गणितीय आधार देणारी संकल्पना मांडली. नंतर त्यांनी अंशतः स्थिरस्थिती नावाची विश्वाचे इतिहास चक्रीय असल्याचे मानणारी सुधारित आवृत्ती सुचवली - म्हणजे विश्व वेळोवेळी प्रसरण आणि आकुंचन यांच्या लहरी अनुभवते; पण संपूर्णपणे कधीच ‘आरंभ’ किंवा ‘अंत’ होत नाही. या गहन शास्त्रीय विषयाच्या विवेचनात साहजिकच अनेक तांत्रिक पारिभाषिक शब्द येतील. परंतु सुरुवातीपासून विज्ञान मराठीत शिकत असल्यास हे बिलकुल अवघड जाणार नाही.
आता एक गणितातील उदाहरण घेऊ या. कोल्मोगोरोव हा गेल्या शतकातील सर्वश्रेष्ठ गणितज्ञ समजला जातो. त्याला शालेय शिक्षणाबद्दल बरीच आस्था होती. त्याने रशियन शाळांतील गणिताच्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीत महत्त्वाचे योगदान केले होते. आठवी व नववीच्या गणितासाठीच्या संच सिद्धांतावरच्या त्याच्या पुस्तकातील एक उतारा पाहू या. संच आणि संचांवरील क्रिया: संच म्हणजे काही वस्तूंचा (घटकांचा) समूह असतो. संचाचे घटक स्पष्ट करून सांगता येतात. उदाहरणार्थ: अ = {1, 2, 3}; किंवा एखाद्या नियमाद्वारे: ब = {क्ष | हा 10 पेक्षा लहान सम संख्येचा आहे}. एखादा घटक संचात आहे हे दाखवण्यासाठी लिहितात: 2 ∈ अ, 5 ∉ ब दोन संच समान असल्यास त्यातील सर्व घटक एकसारखे असतील:
{1, 2, 3} = {3, 2, 1}
दोन संचांचा संयुक्त संच म्हणजे दोन्हींपैकी कुठल्याही एकामध्ये (किंवा दोघांमध्ये) असलेले सर्व घटक: अ ∪ ब अ आणि ब यांचा छेदनसंच म्हणजे दोघांमध्येही असलेले घटक: अ ∩ ब अ \ ब म्हणजे असे घटक जे ‘अ’ मध्ये आहेत पण ‘ब’ मध्ये नाहीत. कोणत्याही इंग्रजीतील पाठ्यपुस्तकापेक्षा हे रशियन पाठ्यपुस्तक अधिक उच्च दर्जाचे समजले जाते. एवंच, इंग्रजी एवढीच एक ज्ञानभाषा नाही आणि आजच्या नव्या तंत्रज्ञानातून रशियनसारख्या दुसऱ्या भाषांतील अधिक सरस ज्ञानसुद्धा मराठीमध्ये झटकन उपलब्ध होते.
२०२० च्या नव्या शिक्षण धोरणात भाषा शिकण्यावर भर दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांचा बराच वेळ भाषा शिकण्यात घालवावा, असे सुचवले आहे. परंतु याचीही आवश्यकता राहिलेली नाही. भारतात चार वेगवेगळ्या भाषाकुलांतील भाषा आहेत. सर्वात आधी पोहोचली ऑस्ट्रो-एशियाटिक. बंगाल, बिहार, झारखंडमध्ये वस्ती असलेल्या संताल आदिवासींची संताली भाषा याचे उदाहरण आहे. दुसरे भाषाकुल म्हणजे साईनो-तिबेटी. मिझोराम राज्याची मिझो भाषा हे याचे उदाहरण. तिसरे आहे द्रविड भाषाकुल. कन्नड व आदिवासींची गोंडी ही या कुळातील भाषांची उदाहरणे आहेत. चौथे भाषाकुल म्हणजे इंडो-युरोपीय. मराठी व हिंदी ही या कुळातील आज प्रचलित, तसेच संस्कृत आणि पाली ही या कुळातील प्राचीन भाषांची उदाहरणे आहेत. एका साध्या वाक्याचे उदाहरण घ्या : मला नदीत पोहायला मजा येते:
संतालीत : अञ् गद रे पयरग एना।
मिझोत : का तूइह्लुः लुंगाह पो सवी थेइ अ नी।
कानडीत : ननगे नदीयल्ली ईजुवुदु इष्टा।
गोंडीत : नाक डोडाते पोहेमायना मतां।
हिंदीत : मुझे नदी में तैरने में मज़ा आता है।
संस्कृतात : मम नद्यां प्लवनं रोचते।
पालीत : मम नद्यं पिव्हनं पियं।
असे अनुवाद तत्क्षणी मिळतात. ही सुविधा वापरत आदिवासी भाषांसकट बहुतेक सर्व भारतीय आणि हव्या त्या परदेशी भाषांचे रसग्रहण करता येईल. आज २०२० च्या नव्या शिक्षण धोरणाची उलटसुलट चर्चा चालू आहे. या धोरणात संस्कृत भाषेतील ज्ञानावर भर दिला आहे. संस्कृतातील ज्ञानावर उच्चवर्णीय पुरुषांची मक्तेदारी होती. पुढे बौद्ध आणि जैन धर्म परंपरांनी ज्ञानावरच्या या मक्तेदारीला आव्हान दिले. त्यांनी उच्चवर्णीयांखेरीज शूद्रांकडेही जे भरपूर ज्ञान आहे, त्याला मान दिला पाहिजे, असे प्रतिपादन केले होते. आधुनिक विज्ञान बुद्धिवादी आहे आणि या बुद्धिवादाची मुहूर्तमेढ गौतम बुद्धाने कित्येक शतकांपूर्वी केली होती. त्याला जेव्हा ज्ञानप्राप्ती झाली तेव्हा बुद्धाने जमिनीकडे बोट दाखवून हे ज्ञान जगाच्या अनुभवावर आधारित आहे, कुठल्याही दैवी साक्षात्कारावर नाही, असे ठासून म्हटले होते.
दुसरा वादाचा विषय आहे तीन भाषांची सक्ती : मातृभाषा, इंग्रजी आणि हिंदी. नव्या शैक्षणिक धोरणात हिंदी आणि संस्कृतवर खूप भर देण्यात येत आहे; परंतु ज्याने स्वातंत्र्यानंतर सुद्धा इंग्रजीचे आपल्यावरचे वर्चस्व पूर्णपणे स्वीकारले आहे, असा भारत हा एकमेव देश आहे. दक्षिण कोरियाची लोकसंख्या महाराष्ट्राहूनही कमी आहे; परंतु स्वतःच्या भाषेचा अभिमान बाळगत ते कोरियाई भाषेला सर्व शिक्षणाचे माध्यम म्हणून वापरतात आणि इंग्रजी केवळ सोयीचे म्हणून थोडेफार शिकतात. अगदी उलट आपल्याकडे इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या आर्थिक सुस्थितीतील उच्चवर्णीय मुलामुलींचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्याच वेळी इंग्रजीची सक्ती ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अतिशय जाचक ठरते आहे. त्यामुळे तल्लख बुद्धीच्या ग्रामीण विद्यार्थ्यांवरही दहावी-बारावी नापासचे अपमानास्पद शिक्के बसताहेत.
आज हे सगळे बदलून महाराष्ट्रात सर्वत्र मराठी हेच सर्व शिक्षणाचे माध्यम असेल आणि इंग्रजी, हिंदी सक्तीची करण्याची काहीही आवश्यकता नाही म्हणून ठरवण्याची वेळ आली आहे. हे झाले तर शहरी आणि ग्रामीण समाजात आज सतत रुंदावत असलेली दरी भरून निघेल आणि आपले शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ, मच्छीमार, कारागीर यांच्यासहित समाजातील सार्वजन स्वाभिमानाने ज्ञानप्राप्ती करू लागतील. अर्थातच जोडीला हिंदी, इंग्रजी हे सक्तीचे नसलेले विषय सर्वांनी शिकावेत. यासाठी परिणामकारक एआय ट्यूटोरिअल्स बनवून घ्यावीत. शिवाय विद्यार्थ्यांना वेगळ्या वेळात हिंदी भाषेतील गाणी ऐकवावीत. इंग्रजीत बिरबलच्या, तेन्नालीरामाच्या, पंचतंत्रातील, ईसपनीतीतील गोष्टी ऐकवाव्यात. केशवसूत गातात: एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकीन जी मी स्वप्राणाने, भेदूनी टाकीन अवघी गगने, दीर्घ तिच्या त्या किंकाळीने। नवे तंत्रज्ञान ही अशी तुतारी आहे. आपण ती महाराष्ट्रभर जोशात फुंकू या.
( लेखक ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.