कृष्णा जोमेगावकर
Success Story : नांदेड जिल्ह्यातील सायाळ (ता. लोहा) येथील तरुण शेतकरी रत्नाकर गंगाधर ढगे (वय ३३ वर्षे) हे आपल्या तीन बंधूसह उत्तम शेती करत प्रगती साधली आहे. सिंचनाची सुविधा, सेंद्रिय व जैविक घटकांचा पुरेपूर वापर, यांत्रिकीकरण यांच्या साह्याने प्रत्येक पिकातून कमी खर्चात उत्तमोत्तम उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे कृषी विभागाच्या विविध पिकांच्या स्पर्धेत त्यांना तालुका, जिल्हा तसेच विभागस्तरावरील पारितोषिके मिळवलेली आहेत.
नांदेडपासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या सायाळ (ता. लोहा) येथे गंगाधर ढगे आणि बापूराव ढगे या भावंडाची एकत्रित १८ एकर शेती आहे. गंगाधर ढगे यांना अच्युत, रत्नाकर आणि उत्तम असे तीन मुले असून, तिघेही शेती करतात.
देशी जनावरांमुळे शेती सुपीक
ढगे कुटुंबाकडे ९ देशी गाई, तीन म्हशी व दोन बैल आहेत. या जनावरांच्या देखभालीचे काम प्रामुख्याने वडील गंगाधर करतात. देशी गाई पाळण्यामागे उत्तम दूधासोबतच सेंद्रिय खतांच्या उपलब्धतेचा उद्देश ठेवला आहे. घरच्या देशी गाईपासून जन्मलेल्या बैलांचा उपयोग शेतीसाठी होतो. तर कालवडी दुधासाठी राखल्या जातात. दुभत्या जनावरांचे दूध वासरांसोबतच प्रामुख्याने घरी वापरले जाते.
या जनावरांपासून दरवर्षी सुमारे १५ ट्रॉली शेणखत मिळते. त्याचा वापर शेतामध्ये केला जातो. उन्हाळ्यात जनावरे शेतात वेगवेगळ्या ठिकाणी बांधली जातात. त्यामुळे शेतात जनावरांचे मल-मूत्र मिसळते. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. सेंद्रिय खतांच्या सातत्यपूर्ण वापरामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहत असल्याचे रत्नाकर ढगे सांगतात.
दरवर्षी कपाशी, सोयाबीन, उडीद, मुगावर भर
खरिपात दरवर्षी १० ते १२ एकर कपाशी, चार एकर सोयाबीन तर जनावरांसाठी दोन एकर चारा पीक असे नियोजन असते. चार एकर कपाशीमध्ये आंतरपीक म्हणून तूरही घेतली जाते. रब्बी हंगामामध्ये हरभरा, गहू, रब्बी ज्वारी अशी पिके घेतली जातात. फेरपालटासाठी कधी भुईमूग, हळद, करडई, मिरची अशी पिके घेतली जातात. उन्हाळ्यात जनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी चारा पिकांना प्राधान्य दिले जाते.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सेंद्रिय घटकांवर भर दिल्याने खर्चात बचत ः
२०१७ पासून शेतीमध्ये प्रामुख्याने सेंद्रिय पद्धतीवर भर दिला आहे. देशी जनावरांपासून मिळणाऱ्या शेण, गोमूत्र यांपासून सेंद्रिय घटकांची निर्मिती केली जाते. शेणखतासोबत जिवामृताचा वापर करतात. रासायनिक खतांवरील खर्चातही मोठी बचत झाली आहे. जमीन चांगलीच सुपीक झाली आहे. परिणाम, त्यात पिके अधिक ताकदवान राहून रोग किडींचे प्रमाण मुळातच कमी राहते.
कधी काळी प्रादुर्भाव झालाच तर पीक संरक्षणासाठी दशपर्णी अर्क, धनामृत, निंबोळी अर्क यावर भर असतो. सोबतच पक्षिथांबे, चिकट सापळे, कामगंध सापळे यांचा वापर केल्यामुळे कमी खर्चात पिकाचे संरक्षण होते. बाकीच्या शेतकऱ्यांना सुमारे १० फवारण्या कराव्या लागत असताना केवळ तीन चार फवारण्यामध्ये चांगले उत्पादन हाती येते.
वार्षिक उत्पन्नातून केला शेताचा विकास ः
मागील वर्षी १२ एकर क्षेत्रामध्ये असलेल्या कपाशीपासून १४० क्विंटल उत्पादन मिळाले. तर मागील वर्षी चार एकरांमध्ये ६० क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळाले. कपाशी व सोयाबीनला चांगला दर मिळेल, अपेक्षा असल्यामुळे वाट पाहत आहे. दरवर्षी रब्बीमध्ये साधारण चार एकर ज्वारी, चार एकरवर हरभरा, एक एकर करडई अशी पिके घेतो. ज्वारीचे उत्पादन १२ ते १५ क्विंटल प्रति एकर, हरभऱ्याचे १० ते ११ क्विंटल प्रति एकर, करडईचे चार ते पाच क्विंटल प्रति एकर इतके उत्पादन मिळते. रत्नाकर ढगे यांना खरीप व रब्बी हंगामातून दरवर्षी १४ ते १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. मिळणाऱ्या उत्पन्नातून काही रक्कम दरवर्षी शेतीच्या विकासासाठी ठेवली जाते. त्यातून आजवर सर्व अठरा एकर शेतीमध्ये पाइपलाइनचे
काम पूर्ण केले आहे.
सिंचनासाठी आठ कूपनलिका घेतल्या आहेत. त्यातील चार कूपनलिकेचे पाणी चाळीस फूट खोलीच्या विहिरीत सोडले जाते. आठ एकर क्षेत्रासाठी साडेपाच लाख रुपये खर्चून ठिबक संच, दोन तुषार सिंचन संच बसवले आहेत. सोबतच ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरच्या अवजारांची हळूहळू खरेदी केली आहे. २०१४ मध्ये दोन गुंठे क्षेत्रावर मोठे घर बांधले आहे. त्यासाठी १८ लाख रुपये खर्च आला.
- सहा कि.मी. अंतरावरील सुनेगाव तलावातून तीन एकर क्षेत्रावर १०० टिपर गाळमाती टाकली. त्यासाठी प्रति टिपर १८०० रुपये खर्च आला.
खर्चाचे नियोजन ः
- १७ लोकांचे मोठे कुटुंब असल्यामुळे घरखर्चासाठी दरवर्षी साडेपाच लाख रुपयांपर्यंत खर्च होतो.
- तिन्ही भावंडाची आठ मुले आहेत. सहा मुले शिक्षणासाठी लोहा येथे ठेवली असून, त्यासाठी दरवर्षी दीड ते पावणेदोन लाख रुपये खर्च होतो.
- सोबतच वैद्यकीय व अन्य खर्चासाठी सुमारे एक लाख रुपये लागतात.
- विविध यंत्रे, अवजारे यांच्या देखभालीसह वीज बिल, इंधन, मजुरी, वाहतूक इ. साठी दोन लाख रुपये खर्च होतो.
- बियाणे, निविष्ठा व अन्य खर्चासाठी दीड लाख रुपये बाजूला ठेवले जातात.
- शेतीतून शिल्लक राहणाऱ्या नफ्यातून एखादा लाख रुपये इतकी रक्कम अचानक येणाऱ्या अडीअडचणीसाठी म्हणून वेगळी ठेवली जाते.
- तिघा भावांच्या नावाने दरवर्षी १२,७०० रुपये प्रमाणे ३८,१०० रुपयांचा विमा हप्ता भरला जातो. यासोबतच तिघा भावांच्या नावे बँकेतून तीन हजार रुपये प्रतिव्यक्ती प्रमाणे विमा रक्कम कपात होते.
पीक स्पर्धेत बक्षिसांची रांग...
रत्नाकर ढगे हे लोहा तालुक्यात प्रयोगशील शेतकरी म्हणून परिचित आहेत. दरवर्षी पिकांची फेरपालट करतात. यातून त्यांच्या उत्पादनात सातत्य टिकून असल्याचे ते सांगतात. ते कृषी विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या पीक स्पर्धेमध्ये मुद्दाम भाग घेतात. त्यातून आपल्या व्यवस्थापनामध्ये काटेकोरपणा वाढतो. उत्पादनामध्ये वाढ होत जाते. मागील वर्षी जानेवारीमध्ये प्रयोग म्हणून वीस गुंठे शेतात राजगिरा पिकाची लागवड केली होती. ९० दिवसांमध्ये २ क्विंटल उत्पादन मिळाले. हळदीचे उत्पादन एकरी २५ क्विंटलपर्यंत मिळते. आजवर २० गुंठे कांदा व लसूण हे पीक घेतले होते. एक एकर भुईमुगातून पाच ते सहा क्विंटल उत्पादन मिळाले.
पीकस्पर्धेत तालुका, जिल्हा व विभाग पातळीवर विविध बक्षिसे रत्नाकर ढगे यांनी मिळवली आहेत.
- २०१९-२०२० मध्ये त्यांनी रब्बीमध्ये हरभरा पिकाच्या स्पर्धेत भाग घेऊन हेक्टरी २८ क्विंटल उत्पादन काढले होते. यामुळे त्यांना तालुकास्तरीय पहिले पाच हजाराचे बक्षीस मिळाले.
- २०२१-२०२२ मध्ये मूग पीक स्पर्धेत भाग घेऊन हेक्टरी १२.७० क्विंटल काढल्यामुळे त्यांना जिल्हास्तरीय पहिले १० हजार रुपयांचे बक्षीस मिळाले.
- २०२१-२०२२ मधील रब्बी हंगामात ज्वारीचे हेक्टरी ३७.५० क्विंटल उत्पादन मिळविल्यामुळे त्यांना लातूर विभागातून पहिले २५ हजाराचे बक्षीस मिळाले.
- २०२२ मध्ये सोयाबीनचे हेक्टरी ५८.४० क्विंटल उत्पादन मिळविल्याने त्यांना लातूर विभागात दुसऱ्या क्रमांकाचे २० हजार रुपयांचे बक्षीस मिळाले.
संपर्क ः रत्नाकर गंगाधर ढगे, ८२०८६३९२३५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.