Maharudra Mangnale : या खरीप हंगामातून मुक्त झालो!

Kharif Season : खऱ्या अर्थाने हे आनंददायी जगणं आहे.पैसा,प्रतिष्ठा, मान,सन्मान यापलिकडंच मुक्त जगणं आहे.तरीही हे जखडून टाकणारं आहे.शेतीचा मालक बनणं,ही गुलामी आहेच.
Maharudra Mangnale
Maharudra MangnaleAgrowon

Agriculture News : केवळ वडिलोपार्जित जमीन नावावर आलीय,अतिरिक्त पैसे गुंतवायचेत म्हणून जमीन घेतलीय,काळा पैसा लपवायचा एक मार्ग म्हणून जे शेतकरी बनलेत,ज्यांना चांगल्या पगाराची नोकरी आहे, ज्यांचे चांगले व्यवसाय आहेत,तरीही ते शेती करतात,जे पूर्णवेळ राजकारण करतात तरीही स्वत:ची ओळख शेतकरी म्हणून करून देतात,अशा कोणाही शेतकऱ्यांबद्दल मी कधीच लिहीत, बोलत नाही.

मी मुख्यत: शेतीवर अवलंबून असलेल्या कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यांबद्दल लिहीतो. शेतीवर माझं पोट नसलं तरी,मी प्रत्यक्ष शेतीवर राहून शेती करतो.शेतकरी, शेतमजूर अशा दोन्ही भूमिका वठवतो..आणि माझे शेतीतले अनुभव तटस्थपणे मांडतो.

शेतीतील त्रासाचे, दु:खाचे,अपयशाचे आयुष्यभराचे अनुभव पाठिशी असल्याने, आपली मुलं शेतीमध्ये येऊ नयेत,ती शिकावीत,नोकरी,व्यवसायाला लागावीत अशीच वडिलांची इच्छा होती.शेतीशी नाळ जुळलेली असतानाही,मी शिकलो ते त्यामुळंच.पत्रकारितेतून प्रकाशनात उतरलो.दोन्ही ठिकाणी मनाजोगतं आनंददायी काम केलं.

मात्र या काळातही शेतीशी असलेली नाळ तुटू दिली नाही. २००९ नंतर परिस्थितीच अशी निर्माण झाली की,मला गावाकडं येणं आवश्यक बनलं.दोन्ही आईंचा जिव्हाळा होता.एक जन्मदात्री आई तर दुसरी काळी आई.ही ओढ अशी होती की,शहरातील सर्व मोह बाजुला सारून थेट शेतीत आलो.गावात नाही तर शेतीतच राहायचं,हा निर्णय आधीच केला होता.

इथं आलो आणि माझ्या स्वप्नातील रुद्रा हटचं विश्व निर्माण करण्याच्या कामाला लागलो...पूर्णही केलं.मुळात स्वप्नचं साधसुधं,जमिनीवरचं,माझ्या आवाक्यातील होतं.शेतात छोटसं घर बांधायचं आणि त्याच्या आजुबाजुला सर्व फळा,फुलांची झाडं लावून जंगल करायचं.स्वप्न साधं असलं तरी कठीण होतं.सगळ्यात मोठी अडचण म्हणजे,शेतात बारमाही पाहण्याचा स्त्रोत नव्हता.

पंचवीस-तीस फुट खोलीची दगडाचं खिळपट असलेली विहीर होती.कधी काळी तिला चांगलं पाणी होतं.पाऊस कमी होत गेला,जमिनीतील पाण्याची पातळी खोल चालली,तसं उन्हाळ्यात पाणी टिकेना.पण विहीर हीच खात्रीची सोय होती.

दगडी खिळपट काढून, तिला सिमेंटचं कडं घातलं.तीन वेळा विहीर खोदाई करून विहीर ७२ फुट केली.दोन वेळा आडवे बोअरवेल घेतले.विहिरीचं पुनरभरण केलं. तरीही उन्हाळ्यात पाण्याची सोय होऊ शकली नाही.मात्र भरपूर साठवणूक झाली.पाच बोअरवेल घेतले.सगळ्या बोअरवेल नी चार लाखाला पाठ लावली.

नंतर शाश्वत पाणी मिळवण्याचे प्रयत्न थांबवले.विहीरीत हिवाळ्यात पुरेसं पाणी साठवलं की ,त्यावर उन्हाळा निघू लागला.आपल्याला उन्हाळ्यात पाणी मिळणार नाही, साठवलेलंच पाणी काटकासरीने वापरून पावसाळा गाठला पाहिजे, हे वास्तव स्विकारून रुद्रा हटचं आनंददायी जगणं सुरू झालं.

(Agro Special)

माझा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून नसला तरी,दरवर्षी शेतीत तोटा होणं ही काही कौतुकाची, आनंदाची बाब नाही. त्यामुळं गेल्या १२ वर्षांत शेतीत पीक पध्दतीचे,लागवडीचे मी कितीतरी प्रयोग केले.माझा म्हशीपालनाचा प्रयोग चार- पाच वर्षे फायदेशीर ठरला.

मात्र नोटबंदी आणि करोनामुळं तो ही नुकसानीत आला.गतवर्षीपासून तो बंद केला.तीन वर्षांपूर्वी माझ्याकडं ३८जनावरं होती.आता दोन कालवडी,एक म्हैस,एक वगार व एक छोटा हाल्या आहे.वगार नरेशची आहे. म्हणजे माझ्याकडं फक्त चार जनावरं आहेत.

४० जनावरांचं शेड असलं तरी,मी भविष्यात म्हशी वा गोपालन करणार नाही.तो अनुभव सुखद नाही.शेतीतील प्रत्येक यशकथा ही तीन-चार वर्षांत अपयशकथा बनते,याचं हे एक उदाहरण आहे.यात आर्थिकदृष्ट्या मला फटका बसला नाही,हेच त्यातल्या त्यात समाधान.

एकूणच नैसर्गिक परिस्थिती, सरकारची शेतीविरोधी धोरणं आणि मध्यमवर्गीयांचीशेतीमाल कमीत कमी किमतीत मिळावा,ही मानसिकता, यामुळे शेतीला चांगले दिवस येणे शक्य नाही. त्यातही कोरडवाहू शेतीची स्थिती अधिक वाईट असणार आहे.

याची मला खात्री पटलेली असल्याने, मी शेतीत उतरतानाच आनंददायी शेतीची कल्पना डोक्यात ठेवून उतरलो.आता शेतीत कमीत कमी तोटा कसा होईल, ते मी पाहातो.निसर्गाच्या सानिध्यात राहाता येणं,त्याचा आनंद घेता येणं हा मुख्य उद्देश.

शेतीत राहतोच आहोत तर,शेती करायची. हा दुय्यम भाग.मात्र मातीशी नाळ जुळलेली असल्याने, शेती करतो ती मनापासून. आम्ही दोघेही आनंदाने शारीरिक कष्ट करतो.एक खरा शेतकरी ज्या आत्मियतेने शेती करतो,तशीच आम्ही करतो.शेती करणं ही आमची आता लाईफ स्टाईल बनलीय.

पैशांचा हिशोब घातला तर,ही आनंददायी शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नाही, हे स्पष्टच आहे. मात्र त्या पलिकडं जाऊन जगण्याचा विचार केला तर,कितीही पैसे मोजले तरी हे जगणं विकत मिळू शकत नाही.अशी वनराई, फळांची झाडं,शुध्द हवा, शांतता आणि स्वच्छता, बाहेर अनुभवणं शक्य नाही. आम्ही टी.व्ही.वापरत नाही, ही एकच बाब आम्ही इथल्या जगण्यात किती बिझी,आनंदी आहोत,हे दाखवण्यास पुरेशी आहे.

इथं राहिल्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तब्येत चांगली राहिली.वयाबरोबर आपोआप येऊन चिटकणारे रोग आले नाहीत. निसर्गाचे सहसोबती बनून जगतोय.खरं तर,व्यावहारिक जगाशी आमचे किरकोळ संबंध आहे..ते केवळ कामापुरते.

Maharudra Mangnale
Monsoon Rain : सर्वदूर पावसाने शेतकरी सुखावला, पाणीपातळीत काहीशी वाढ

शेतीतून आर्थिक प्राप्ती नसली तरी,भावनिक गुंतवणूक आहेच.आपत्तीमध्ये जेवढं नुकसान टाळता येईल तेवढं वाचविण्याची धडपड असते.तसं त्याचं पैशात मोल फारसं नसतं.पण शेतकरी म्हणून ते अतिमोलाचं वाटतं.नुकसान बघत बसणं शक्य होत नाही. अशावेळी सहकाऱ्यासोबत हाती पडेल ते काम करतो.यावर्षी पावसाने अक्षरशः परिक्षा बघितली.

आमची जमीन एवढी हलकी,मुरमाड आहे की,तिला एक आठवड्याचाही पाण्याचा ताण सहन होत नाही. सुदैवाने विहिरीला पाणी आलं होतं. लाईटच्या लपंडावाला तोंड देत रात्री-बेरात्री पाणी दिलं. सोयाबीन वाचवलं.या काळात इतर सगळी कामं बाजूला सारून मी पूर्णवेळ शेतीच्या कामाला वेळ दिला. गुडघेदुखीचा बाऊ केला नाही.

कुठल्याही पिकाला विहीर,बोअरवेलच्या पाण्यापेक्षा पावसाचं पाणी जास्त फायदेशीर ठरतं.मात्र पाऊस नसतो तेव्हा विहीरीचं,शेततळ्याचं पाणी जीवदान देतं. भरपूर पळापळ करून आम्ही सोयाबीन वाळू दिलं नाही, याचा मला मनापासून आनंद आहे.अवर्षणाचा उत्पादनावर जो काही परिणाम व्हायचा तो होईल...पण आम्ही सोयाबीनला पाणी दिलं नाही तर,हाती काहीच लागलं नसतं,हे वास्तव अस्वस्थ करतं.

शेतात ३३५ आणि केडीएस ७५३ या दोन जातीचं सोयाबीन आहे.सोयाबीन शिवाय इतर पिकाचं धाटही नाही. दोन्ही सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणा भरतोय.आता पाणी देण्याची गरज संपलीय.शिवाय अधूनमधून ओलीवर ओल करणारा पाऊस पडतोयचं.

(Weather News)

एका दृष्टीने माझी या खरीप हंगामातील जबाबदारी संपलीय.काढणीच्यावेळी दोन आठवडे वेळ द्यावा लागेल.साधारण एक जून पासून मी शेतीत असताना, नियमितपणे फेसबुकवर नोंदी टाकत होतो.मी काय करतोय,शेती,परिसरात, निसर्गात काय घडामोडी सुरू आहेत,यासंदर्भातील या वास्तववादी नोंदी आहेत.खरं तर एकप्रकारची खरीप हंगामाची ही रोजनिशीच आहे.

शेतीतील प्रश्नांचं दस्तावेजीकरण आहे.या सगळ्या नोंदीचं पुस्तक बनतं आणि वाचक तो वाचू लागतो,तेव्हा त्याला या फेसबुक नोंदी वाटत नाहीत.त्याच्या डोळ्यापुढे त्या कालावधीतील शेती आणि निसर्गाचं समग्र चित्र उभं राहातं.

माझ्या फेसबुक नोंदींच्या पुस्तकांना वाचकांचा प्रतिसाद मिळण्याचं हे महत्त्वाचं कारण आहे, असं मला वाटतं.फेसबुक नोंदींमुळे मी दीर्घ लिहीत नाही, असा काही मित्रांचा आक्षेप आहे.तो काही प्रमाणात खरा असला तरी,आणखी निवांतपण मिळाल्याशिवाय दीर्घलेखनाला हात लावायचा नाही.शेतीत प्रत्यक्ष जगण्याचे हे विविधांगी अनूभव केवळ फेसबुक नोंदीत विरून जाण्याइतके पोकळ नाहीत. त्यांना एके दिवशी न्याय मिळेलच.

खऱ्या अर्थाने हे आनंददायी जगणं आहे.पैसा,प्रतिष्ठा, मान,सन्मान यापलिकडंच मुक्त जगणं आहे.तरीही हे जखडून टाकणारं आहे.शेतीचा मालक बनणं,ही गुलामी आहेच. परवाचा किस्सा आहे.गणपती पाठोपाठ महालक्ष्म्या आल्या. नरेश व गजानन सहकुटुंब सणासाठी त्यांच्या गावी गेले.गजाननचं गाव जवळ असल्याने, तो दिवसा येऊन जात होता.

पण या चार दिवसांत रात्री मला ,सविताला हटवरच थांबावं लागलं. पाच जनावरं आणि दोन कुत्र्यांच्या पोटापाण्याची काळजी घ्यावीच लागली.त्यांना सोडून नाही जाता आलं.आम्ही सण-वार,उत्सव पाळत नाही... तो भाग वेगळा.

पण जबाबदारी सोडून पळ काढता येत नाही. मुक्तरंगच्या बाबतीत असं नाही. तिथं जायचं की नाही, याचं स्वातंत्र्य मी घेऊ शकतो.माझ्या अटी,शर्तीवर तिथं काम चालतं...शेतीत ते करता येत नाही.शेतीतील अपरिहार्यता अटळ आहे.हे अनेकांना कळत नाही.

मी कोकणातील एका पर्यटनासाठी निघालो होतो.त्या दिवशी सेवालयात मुक्कामी असताना, दुष्काळाचं ते भयानक स्वप्न पडलं...आणि रुद्रा हटला परतलो.तेव्हापासून या खरीप हंगामात व्यस्त होतो. आज मोकळा झालो.

गबरू नको म्हटला म्हणून सकाळी फिरायला गेलो नाही.नंतर विहीरीवर, मळ्याबाहेरच्या सोयाबीन मध्ये चक्कर मारून हटवर आलो.जेवण करून ,या मच्छरदाणीत शिरलोय ते दिवसभर बाहेर आलो नाही. या हंगामातील हा सगळ्यात निवांत दिवस गेला.आता शेतीत माझ्यासाठी विशेष काम नाही.

माझ्या फेसबुक नोंदी वाचून अनेकांना रुद्रा हट हे पर्यटन स्थळ आहे असं वाटतं. अनेकजण इथं येण्याची इच्छा व्यक्त करतात.ते साहजिक आहे.पण हे व्यवहार्य नाही. हे आमचं घर आहे. तुमच्या घरासारखंचं..मी अनेकदा म्हणतो,माझ्या लेखणीने आणि फोटोग्राफीने निर्माण केलेला सुंदर भ्रम म्हणजे रुद्रा हट..तो सुंदर आहेच पण तो इथंच अनुभवण्यालायक आहे..हे नाईलाजाने वारंवार नोंदवावं लागतं.

मला माझं खाजगी जगणं प्रिय आहे.इतरांच्या खाजगी जगण्याचा मी आदर करतो.माझ्याकडं माझ्या कामांची भलीमोठी यादी आहे. यातून सहजासहजी वेळ काढणं कठीण आहे...भलेही मी रिकामा असलो तरी!

आता पर्यटनाचे वेध लागलेत.ऑक्टोभरच्या पहिल्या आठवड्यात उत्तराखंडचा ट्रेक करण्याचा विचार आहे.दोन-चार दिवसांत तो फायनल होईल.एकंदरीत हे जगणं केवळ शेतकऱ्याचं नाही, हे खरं आहे.केवळ शेतकरी म्हणून जगणं खुप कठीण आहे.त्याचा विचार न केलेलाच बरा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com