एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी कामगंध सापळे

विशिष्ठ गंधाकडे आकर्षित होण्याच्या किटकांच्या गुणधर्माचा वापर करून कृत्रिमरित्या कामगंध सापळे तयार केले जातात. या सापळ्यांचे विविध प्रकार आणि विविध किडींसाठी पीक निहाय वापर याची माहिती घेऊ.
feromon traps for integrated pest managementq
feromon traps for integrated pest managementq

विशिष्ठ गंधाकडे आकर्षित होण्याच्या किटकांच्या गुणधर्माचा वापर करून कृत्रिमरित्या कामगंध सापळे तयार केले जातात. या सापळ्यांचे विविध प्रकार आणि विविध किडींसाठी पीक निहाय वापर याची माहिती घेऊ. कीटक समूहात राहताना आपल्या समूहाशी किंवा इतर समूहाशी विविध पद्धतीने संवाद करत असतात. त्यासून खाद्य मिळवणे, स्वतःचे संरक्षण करणे किंवा प्रजननातून पुनरुत्पादन करणे अशी जीवनावश्यक कामे करत असतात. या संवादामध्ये शरीराच्या, अवयवांच्या विशिष्ठ हालचाली, विशिष्ठ आवाज काढणे, शरीरातून विशिष्ट गंध किंवा वास किंवा रसायन बाहेर टाकणे समाविष्ट असते. विशेषतः प्रजननाच्या दृष्टीने किटकांमध्ये मादीच्या अथवा नराच्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचे रासायनिक द्राव हवेत सोडले जातात. या द्रवाच्या गंधामुळे नर अथवा मादी कीटक दूरदूरवरून मिलनासाठी एकमेकांकडे आकर्षिले जातात. या द्रवांनाच ‘फेरोमोन’ असे म्हणतात. विरुद्धलिंगी किडींना आकर्षित करण्यासाठी याचा उपयोग होतो. या फेरोमोन द्रवाच्या गुणधर्माचा वापर करून किडींवर, त्यांच्या संख्येवर व प्रजोत्पादनावर नियंत्रण मिळवता येते.

या तत्वाचा वापर सापळ्यामध्ये केला जातो. त्यात कृत्रिमरित्या तयार केलेल्या रासायनिक गंधयुक्त द्रावणयुक्त रबरी सेप्टा, ल्यूरचा वापर केला जातो. वेगवेगळ्या किडींसाठी वेगवेगळे फेरोमोन तयार केले जातात. त्याकडे आकर्षित होऊन किटक, पतंग सापळ्यात अडकतात. त्यांचा नाश होतो. या सापळ्यावर किडीच्या संख्येचा अंदाज मिळू शकतो. एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये कामगंध सापळ्यांचा (फेरोमोन ट्रॅप) वापर केल्यास कमी खर्चात कीडनियंत्रण होण्यास मदत होते. शेतातील किडींची संख्या आर्थिक नुकसानपातळीच्या खाली ठेवण्यासाठी फेरोमोन सापळ्यांचा वापर फायदेशीर ठरतो. फायदे

 • कीटकनाशके व मजुरीवरील खर्चात बचत होते.
 • फेरोमोन हे बिनविषारी असल्यामुळे प्रदूषणाचा प्रश्नच उद्भवत नाही.
 • केवळ हानीकारक ठरणाऱ्या किडीच आकर्षित होतात. त्यामुळे मित्र कीटक सुरक्षित राहतात.
 • कीटकनाशक फवारण्याची योग्य वेळ समजते ( सर्वेक्षणामुळे आर्थिक नुकसानाची पातळी- ETL कळते).
 • हाताळण्यास अत्यंत सोपे व सुरक्षित असतात.
 • फेरोमोन सापळ्यांचा उपयोग 

 • किडींच्या प्रादुर्भावाची पातळी समजण्यासाठी किंवा सर्वेक्षणासाठी
 • मोठ्या प्रमाणावर कीड पकडण्यासाठी किंवा नियंत्रणासाठी
 • पिकांमध्ये सापळे वापरण्याच्या पद्धती

 • सर्वेक्षणासाठी प्रत्येक जातीच्या कीटकांसाठी हेक्टरी पाच सापळे आवश्यक असतात. किडीचे पतंग मोठ्या प्रमाणावर पकडण्यासाठी हेक्टरी १५ ते २० सापळे गरजेचे असतात. लहान क्षेत्र असल्यास सापळे शेताच्या आकारानुसार लावावेत.
 • सापळे लावताना पिकाच्या उंचीवर साधारणपणे एक ते दीड फूट उंचीवर लावावेत. दोन सापळ्यांमध्ये १५ ते २० मीटर अंतर ठेवावे. शेताच्या आकारमानानुसार हे अंतर कमी - जास्त करता येईल.
 • सापळ्यामधील ल्यूर लावताना पॅकिंग वर दिलेल्या सूचनांचे पालन करून १५-२१ दिवसांनंतर ल्यूर बदलावेत.
 • प्रत्येक जातीसाठी वेगवेगळे सापळे वापरावेत. सापळ्यात अडकलेले पतंग दर आठवड्याला काढून नष्ट करावे.
 • सापळा साधारणतः पिकाच्या उंचीनुसार जमिनीपासून दोन ते तीन फुटांवर राहणे आवश्यरक.
 • सापळ्यांचे प्रकार नरसाळे/ फनेल सापळा नरसाळे (फनेल) सापळ्याच्या वापर प्रामुख्याने तूर, हरभरा, सोयाबीन, सुर्यफुल, भुईमुग, टोमॅटो, भेंडी, मिरची इ. पिकांमध्ये केला जातो. या सापळ्यांमध्ये खालील भागाला एक लांबट प्लॅस्टिक पिशवी बसवलेली असते. त्या पिशवीमध्ये किडींचे नर पतंग पकडले जातात. हरभऱ्यावरील घाटेअळी, सोयाबीनवरील लष्करी अळी, टोमॅटो व भेंडीवरील फळे पोखरणारी अळी, तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी, कपाशीमधील शेंदरी बोंड अळी, ढोबळी मिरचीवरील फळे पोखरणारी अळी, भातामधील खोडकिडीच्या नियंत्रणासाठी ल्युर बसवलेला असतो. पाण्याचा सापळा ल्युरचा वापर करून आकर्षित केलेले पतंग त्याखाली ठेवलेल्या पाण्यात पडून मरतील, अशा प्रकारची रचना यामध्ये असते. यामध्ये नरसाळ्याच्या आकाराच्या प्लास्टिकच्या भांड्यात पाणी राहील अशी रचना असते. त्यावर छोट्या दांड्याची टोपी लावून तिच्या खाली ल्युअर बसवतात. नरसाळे काठीवर उभे केले जाते. फेरोमोन ल्युरकडे आकर्षित झालेले पतंग या पाण्यात पडून मरतात. हा सापळा वांग्यावरील शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळी, कोबी/फ्लॉवरमधील चौकोनी ठिपक्याचा पतंग नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. फ्लाय टी ट्रॅप  हा सापळा वेलवर्गीय भाजीपाला व फळझाडांवरील फळमाशीकरिता वापरला जातो. फळमाशीने फळात अंडी घातल्यानंतर अळ्या आतील गर खातात. परिणामी फळे पोसत नाहीत, कुजतात व गळून पडतात. या किडीमुळे फळे व फळभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. उदा. काकडी, दोडका, भोपळा, कारली, घोसाळी, टरबूज, कलिंगड इ. पिकांवर ही कीड आढळते. वेलवर्गीय भाज्यांच्या फळमाशी नियंत्रणाकरता बॅक्यू ल्युर वापरली जाते. तसेच आंबा, पेरू, चिक्कू, डाळींब, मोसंबी, संत्रे इ. फळझाडांवर आढळणाऱ्या फळमाशीच्या नियंत्रणासाठी बॅडोर ल्युर वापरली जाते. सापळा पिकात मध्यभागी १.५ ते २ मीटर उंचीवर ठेवावा. आकर्षित झालेल्या फळमाश्या खालच्या बाजूने असलेल्या पोकळीतून आत शिरतात. पाण्यात पडून मरतात. नंतर फळमाश्या काढून पाणी बदलावे. सदरचे ल्युर या सापळ्यात सुमारे ९० ते १०० दिवस परिणामकारक राहते. बकेट सापळा  बकेट सापळा हा नारळ, सुपारीवरील गेंडा भुंगा व लाल सोंड्या भुंगा यांच्या नियंत्रणासाठी वापरला जातो. गेंडा भुंगा नारळाच्या शेंड्यांमध्ये येणारा नवीन कोंब खातो. त्यामुळे नवीन येणारी पाने त्रिकोणी कापल्यासारखी दिसतात. सोंड्या भुंगा किडीच्या अळ्या नारळाच्या खोडातील मऊ गाभा खातात. सापळा लावण्याची पद्धत प्लास्टिकच्या छोट्या बादलीच्या आकाराच्या भांड्यात पाणी, कीटकनाशक, नारळाच्या फळाचा मऊ गर भुंग्यांना खाण्यायोग्य ठेवला जातो. झाकणाला आतून आर.पी.डब्ल्यू./ आर.बी. ल्युर लावली जाते. प्रकाश सापळे अळीवर्गीय किडी उदा. तंबाखुवरील पाने खाणारी अळी, घाटे अळी, ऊंट अळी, केसाळ अळी यांचे पतंग निशाचर असतात. त्यांची कार्यक्षमता रात्रीच्या वेळेस जास्त असते. हे पतंग रात्रीच्या वेळी समागमासाठी आणि अंडी घालण्यासाठी बाहेर पडतात. प्रकाशाकडे आकर्षित होतात. त्यांच्या या गुणधर्माचा वापर करून पतंगांचे नियंत्रण करता येते. सापळ्याची रचना अत्यंत सोपी आहे. शेतात पिकामध्ये साधे कंदील मोठ्या परातीत ठोकळ्यावर ठेऊन परातीत रॉकेल मिश्रित अथवा कीटकनाशक मिश्रित पाणी ठेवावे. किंवा तिकाटण्यावर गॅसबत्ती टांगून त्याखाली फळीवर किंवा स्टूलवर रॉकेल अगर कीटकनाशक मिश्रित पाण्याची परात ठेवावी. किंवा शक्य असल्यास विजेचा बल्ब लाऊन त्याखाली एका टबमध्ये रॉकेल किंवा कीटकनाशक मिश्रित पाणी ठेवल्यास पतंग, भुंगे इ. आकर्षित होऊन पाण्यात पडून मरतात. प्रमाण – प्रति एकरी १ चिकट सापळा (स्टिकी ट्रॅप) चिकट सापळ्याच्या दोन्ही बाजूंना चिकट, न सुकणारे द्रव्य लावलेले असते. रस शोषणाऱ्या किडी विशिष्ट रंगामुळे आकर्षित होतात. चिकट द्रव्यावर घट्ट चिकटून तेथेच मरतात. चिकट सापळ्याचा उपयोग प्रामुख्याने पांढरी माशी, फुलकिडे, तुडतुडे, मावा, नागअळी या किडींच्या व्यवस्थापनासाठी केला जातो. हे चिकट सापळे गडद पिवळ्या, गडद निळ्या आणि काळ्या रंगाचे असतात. गडद पिवळ्या रंगाचे चिकट सापळे पांढरी माशी, तुडतुडे, मावा व नागअळी या किडींना आकर्षित करतात. गडद निळ्या रंगाचे चिकट सापळे फुलकिडे आणि मावा किडींना आकर्षित करतात. तर काळ्या रंगाचे चिकट सापळे टुटा नागअळीला आकर्षित करतात. सापळे हाताळतांना घ्यावयाची काळजी

 • सापळा बांबूस बांधताना घट्ट बांधावा, त्यामुळे वाऱ्याने पडणार नाही.
 • ल्यूर लावताना हातास उग्र उदा. कांदा, लसूण यांच्यासारखा वास नसावा.
 • ल्यूरचे पॅकिंग फोडण्यापूर्वी ते फाटलेले नसल्याची खात्री करून घ्यावी.
 • पॅकिंग फाटलेले असले तर अपेक्षित परिणाम मिळत नाही.
 • जोराची हवा व पाऊस असल्यास सापळ्यांचे वेळोवेळी निरीक्षण करावे. सापळ्यात येणारे पावसाचे पाणी काढण्याची व्यवस्था ठेवावी.
 • सापळ्याची पिशवी बांबूस घट्ट बांधावी. त्यामुळे वाऱ्याने न फडफडता नुकसान होणार नाही.
 • ल्यूर वेळेवर बदलावेत. त्यामुळे अपेक्षित परिणाम मिळतात.
 • सापळ्यात अडकलेले पतंग मेल्यानंतर वेळच्या वेळी ते काढून टाकावेत.
 • संपर्क- कमलाकर चापले, ७०२०६७९६१८ (वरिष्ठ संशोधन सहाय्यक (कीटकशास्त्र), केंद्रिय कापूस संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्र, नागपूर)

  Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

  ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  agrowon.esakal.com