
डॉ. संतोष वानखेडे, डॉ. किरण मालशे
Eco Friendly Pest Control: कोकणासह महाराष्ट्राच्या अन्य भागातही नारळ फळबागेची लागवड वाढत आहे. नारळ झाडांवर इरिओफाइड कोळी या किडीचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत असून, या किडीच्या नियंत्रणासाठी सामुदायिकरीत्या प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
मेक्सिको या देशात १९६५ मध्ये इरिओफाइड कोळी ही कीड सर्वप्रथम आढळून आली. त्यानंतर आशिया खंडातील श्रीलंका या देशामध्ये १९९७ मध्ये या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला. त्यानंतर भारतामध्ये केरळ राज्यातील कोची भागात १९९८ मध्ये इरिओफाइड कोळी ही सूक्ष्म कीड सर्वप्रथम नारळावर आढळली. त्यानंतर दक्षिण भारतातून कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये या किडीचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला.
कोकणामध्ये ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यामध्ये २००२ मध्ये ही सर्वप्रथम आढळून आली. आता कोकणामध्ये पाचही जिल्ह्यांमध्ये या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या किडीमुळे काथ्या उद्योगाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. फळांचा आकार लहान राहून त्याला दर कमी मिळतात. त्यामुळे बागायतदारांचे आर्थिक नुकसान होते. या किडीचे सामूहिक व एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करण्याची गरज आहे.
ओळख व जीवन अवस्था
नारळ फळाच्या देठाखालील घट्ट आवरणाखाली इरिओफाइड कोळी ही कीड मोठ्या संख्येने राहते.
ही भुरकट पांढऱ्या रंगाची असून, आकाराने गांडुळासारखी असते. पुढील भागात पायाच्या दोन जोड्या असतात. तोंड सुईसारखे असते.
इरिओफाइड कोळीची लांबी ०.२० ते ०.२५ मि.मी., तर जाडी ०.०३६ ते ०.०५२ इतकी असते.
या किडीचा जीवनक्रम अंडी, पिलू, सुप्तावस्थेतील पिलू व प्रौढावस्था या चार अवस्थांमध्ये पूर्ण होतो.
कोळीची मादी पोय निघाल्यापासून ५० दिवसांनंतर फळाच्या देठाखालील आवरणाच्या (नारळ फळाच्या पुष्पाधाराखाली) आत २०० ते २५० अंडी घालते.
सुमारे तीन दिवसांनी अंड्यातून पिले बाहेर येतात. पिलू अवस्था साधारणपणे सात दिवसांची असते. या किडीची एक पिढी पूर्ण होण्यास सुमारे दहा दिवसांचा कालावधी लागतो.
या किडीची मादी साधारणपणे १५ दिवस, तर नर ९ दिवस जगतो.
प्रसार
इरिओफाइड कोळीचा प्रसार मुख्यतः वाऱ्यामार्फत होतो. याशिवाय ज्या मधमाश्या व इतर कीटक पोईवर येतात, त्यांच्यामार्फत देखील प्रसार होतो.
नुकसानीचा प्रकार
प्रौढ कोळी आणि पिले नारळ फळाच्या पुष्पाधाराखाली मोठ्या प्रमाणात राहतात. त्यांच्या टोकदार सुईसारख्या तोंडाद्वारे फळातील रस शोषून घेतात. परिणामी, देठाच्या खालच्या भागात लांबट पांढरे चट्टे दिसतात. नंतर हे चट्टे वाढत जाऊन त्यांचा आकार त्रिकोणी बनतो. जसजसे फळ आकाराने वाढत जाते, तसतसे अशा फळांवर काळपट तपकिरी रंगाच्या रेषा उमटू लागतात. या रेषा वाढत जाऊन हळूहळू बाहेरील आवरण तडकते. त्यामुळे फळाची वाढ व्यवस्थित होत नाही. पर्यायाने नारळ लहान राहून खोबऱ्याचे उत्पादन कमी होते. काही तुरळक ठिकाणी लहान फळांची गळ होत असल्याचे आढळून आले आहे. काथ्याची प्रतही घटते व काथ्या काढणे कठीण होते. अशा फळांना बाजारामध्ये दर कमी मिळतो. नारळ कोवळे म्हणजेच १ ते ५ महिन्यांचे असताना प्रादुर्भाव जास्त असतो.
व्यवस्थापन
या किडीचा प्रसार वाऱ्यामार्फत होतो. तो टाळण्यासाठी सर्वप्रथम प्रादुर्भावित व गळून पडलेली फळे जाळून नष्ट करावीत. प्रादुर्भावित फळांची एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहतूक करू नये. या किडीच्या नियंत्रणासाठी कडुनिंबयुक्त अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरॅक्टीन (१००० पीपीएम) ७.५ मि.लि. समप्रमाणात पाण्यात मिसळून मुळावाटे देण्याची शिफारस केली आहे. किंवा फेनपायरोक्सिमेट (५ टक्के प्रवाही) १० मि. लि. अधिक २० मि. लि. पाण्यात मिसळून मुळावाटे मार्च महिन्यात द्यावे.
फवारणीची पद्धत
नारळ घडांवर फवारणी करणे शक्य असल्यास निंबोळी अर्क (१ टक्का) किंवा ॲझाडिरॅक्टीन (१०,००० पी.पी.एम.) ४ मि. लि. प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. फवारणी देठाकडील आवरणाच्या ठिकाणी करणे आवश्यक आहे. ही फवारणी सूक्ष्म कणांद्वारे २ ते ७ महिने वयाच्या नारळ फळांवर होणे आवश्यक आहे. परागीभवन न झालेल्या घडांवर फवारणी करू नये. फवारणी वर्षातून तीन वेळा म्हणजेच एप्रिल-मे, ऑक्टोबर-नोव्हेंबर व जानेवारी-फेब्रुवारी या महिन्यात करावी. बागेतील सर्व नारळाच्या झाडांवर शक्यतो एकाच वेळी फवारणी करावी.
एकात्मिक खत व्यवस्थापन
नारळ झाडांना शिफारशीप्रमाणे विभागून खते द्यावीत. रासायनिक खतांसोबत निंबोळी पेंड १० किलो प्रति माड प्रती वर्ष दोन वेळा विभागून द्यावे. विद्यापीठाने शिफारस केलेले सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत (जस्त ३.५%, मॅग्नेशिअम १.८ %, तांबे ०.६५%, लोह १.९७%, मॅंगनीज २.०%, मॉलीब्डेनम ०.०५% आणि बोराॅन ०.६८%) प्रति माड १.५ किलो या प्रमाणात जून, सप्टेंबर व फेब्रुवारी महिन्यात तीन वेळा विभागून द्यावे. माडाच्या बुंध्याभोवती नारळाचा भुस्सा वापरून आच्छादन करावे. कुजलेले शेणखत व गांडूळ खत प्रत्येकी २० किलो प्रति माडास मे महिन्यांमध्ये टाकावे. माडाच्या आळ्यात हिरवळीचे खत म्हणून चवळी किंवा धैंचा पेरावा व नंतर जमिनीत गाडावे. अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापन केल्यास किडीचे प्रमाण निश्चितच कमी होईल.
नारळावरील इरिओफाइड कोळीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी वर्षभरामध्ये शिफारशीप्रमाणे करावयाची कामे -
शिफारशीप्रमाणे ३ किलो स्फुरद, ७५० ग्रॅम युरिया व ६५० ग्रॅम पोटॅश जूनमध्ये, ७५० ग्रॅम युरिया व ६५० ग्रॅम पोटॅश ऑक्टोबर तसेच फेब्रुवारी मध्ये प्रतिमाडास द्यावे.
शेणखत १० किलो प्रतिमाड मे, सप्टेंबर मध्ये द्यावे.
गांडुळखत १० किलो प्रतिमाड मे, सप्टेंबरमध्ये द्यावे.
निंबोळी पेंड ५ किलो प्रति माडास जूनमध्ये द्यावे.
चवळी)५० ग्रॅम माडाभोवती जूनमध्ये पेरावी.
काथ्या/सोडणं जूनमध्ये माडाच्या आळ्यात पुरावे.
सूक्ष्म अन्नद्रव्य ५०० ग्रॅम प्रतिमाडास जून तसेच ऑक्टोबर मध्ये द्यावे.
बॅसिलस मेगाटेरीएम १०० ग्रॅम प्रती माडास वाफसा स्थितीत ऑक्टोबरमध्ये द्यावे.
फेनपायरोक्सिमेट (५% प्रवाही) १० मिलि अधिक २० मिलि पाणी याचे द्रावण मुळाद्वारे वरील सुचविलेल्या पद्धतीने मार्च महिन्यामध्ये द्यावे.
गंधक पावडर (८० टक्के प्रवाही) ५ ग्रॅम + पामतेल २०० मि.लि. आणि शिफारसीत सरफॅक्टंटचे प्रमाण प्रति ८०० मि.लि. पाणी या प्रमाणे द्रावणाची फवारणी फक्त फळांवर डिसेंबर महिन्यामध्ये प्रति माडास देण्याची शिफारस करण्यात येत आहे.
(नोंद : वरील शिफारशीला ‘संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती’ने मान्यता दिलेली आहे.)
मुळांवाटे कडूनिंब अर्क देण्याची पद्धत
नारळ झाडाच्या बुंध्यापासून दोन ते अडीच फूट अंतरावर टिकावाच्या साह्याने खोदावे. त्या ठिकाणी नारळाची रताळ्याच्या रंगाची मुळे आढळतात. यापैकी पेन्सिलच्या जाडीचे एक जिवंत मूळ निवडावे. त्याच्या टोकाला तिरका काप द्यावा. एका ६ × ४ इंच प्लॅस्टिकच्या पिशवीत निंबोळी अर्क किंवा कीडनाशक वरील प्रमाणात घ्यावे. त्यात सुचविलेल्या प्रमाणात पाणी मिसळून हलवून एकजीव करावे. जिवंत व तिरक्या कापलेल्या मुळाचे टोक त्या प्लॅस्टिक पिशवीतील द्रावणात बुडेल या प्रमाणे ठेवावे. नंतर पिशवीचे टोक बांधावे. म्हणजे त्यातील द्रावण मुळांद्वारे शोषले जाते. ते वरपर्यंत जाऊन किडीच्या नियंत्रणास मदत होते.
मुळावाटे कडूनिंब अर्क देताना घ्यावयाची काळजी :
मुळावाटे कडुनिंब अर्कयुक्त द्रावण देण्यापूर्वी दोन ते तीन दिवस माडाला पाणी देऊ नये.
मुळावाटे द्रावण शोषले गेले की नाही, याची खात्री करावी. द्रावण गेले नसल्यास दुसरे मूळ निवडून पुन्हा द्रावण द्यावे.
एप्रिल ते मे, ऑक्टोबर ते नोव्हेंबर व जानेवारी ते फेब्रुवारी अशा प्रकारे वर्षातून तीन वेळा मुळावाटे द्रावण द्यावे.
- डॉ. संतोष वानखेडे, ८०१०८९०८६२
साहाय्यक प्राध्यापक - कीटक शास्त्र, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये, ता. जि. रत्नागिरी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.