Coconut Pest : नारळावरील सोंड्या भुंगा किडीचे व्यवस्थापन

Coconut Rhinoceros Beetle Pest : नारळाच्या कोणत्याही वयोगटातील झाडांना सोंड्या भुंग्याचा प्रादुर्भाव होत असला, तरी ४ ते १५ वयोगटांतील नारळ झाडे या किडीला जास्त बळी पडत असल्याचे आढळले आहे.
Coconut Pest
Coconut PestAgrowon

डॉ. संतोष वानखेडे, डॉ. किरण मालशे, डॉ. विनायक जलगांवकर

Coconut Pest Management : नारळ हे कोकणातील महत्त्वाचे बागायती फळपीक आहे. जगातील नारळ पिकविणाऱ्या ९३ देशांतील एकूण नारळ पिकाखालील क्षेत्र १२२ लाख हेक्टर असून, उत्पादन ६५,६७१ लाख नारळ एवढे आहेत. भारताचे नारळ लागवडीखालील क्षेत्र २१.९९ लाख हेक्टर आहे व उत्पादन २०,७३१ लाख नारळ एवढे आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये नारळ लागवड ४३,१६० हेक्टरवर (देशाच्या १.३३ टक्के) असून, उत्पादन २२.३६ लाख नारळ (१.२६ टक्के) इतके आहे. अशा महत्त्वपूर्ण पिकाला नुकसान पोहोचविणाऱ्या किडीमध्ये सोंड्या भुंगा ही एक महत्त्वाची कीड आहे.

सोंड्या भुंगा
आढळ ः
कोकणात सर्वत्र. मात्र दुर्लक्षित बागा आणि नवीन लागवड केलेल्या नारळ बागांमध्ये जास्त प्रमाण. हा भुंगा गेंड्या भुंग्यापेक्षाही जास्त हानिकारक आहे. वेळीच प्रादुर्भावग्रस्त झाडे न ओळखता आल्यास व उपाययोजना न केल्यास नारळ, तेलताड, खजूर, शिंदी, ताड इ. नारळ वर्गीय झाडे मरण्याची शक्यता जास्त असते. कोणत्याही वयोगटातील झाडांना सोंड्या भुंग्याचा प्रादुर्भाव होत असला, तरी ४ ते १५ वयोगटांतील नारळ झाडे या किडीला जास्त बळी पडत असल्याचे आढळले आहे.

Coconut Pest
Citrus Pest, Diseases : ग्रीनिंग रोग, सिट्रस सायला किडीचे व्यवस्थापन

किडीच्या जीवन अवस्था
- भुंगा ः तांबूस तपकिरी रंगाचा. डोक्याच्या पुढील बाजूस ठळकपणे दिसणारा लांब व सरळ वाढलेला एक सोंडेसारखा भाग असतो. थोडक्यात, तांदळात सापडणाऱ्या टोके किडीची मोठी आवृत्तीच होय. भुंगा जवळपास ३५ मि.मी. लांब व १२ ते १३ मि.मी. रुंद असतो. भुंगा सुमारे ३ ते ४ महिने जगतो.
- अंडी ः मादी आपल्या टोकदार सोंडेने नारळ झाडाच्या खोडामध्ये छिद्र पाडून त्यामध्ये किंवा गेंड्या भुंग्याने पाडलेल्या छिद्रात किंवा अन्य प्रकाराने झालेल्या जखमेत सुमारे ३०० अंडी घालते. २ ते ३ दिवसांत अंडी उबल्यानंतर त्यातून पिवळसर रंगाच्या अळ्या बाहेर पडतात.
- अळी ः सुरुवातीस ही अळी २.६ ते २.८ मि.मी. लांब असते. तिला पाय नसतात. तिचे डोके तांबडे असते. अळी खोड पोखरून त्यातील मऊ भागावर आपली उपजीविका करते. भुंग्याची पूर्ण वाढलेली अळी फिक्कट पिवळसर, अंगाने मध्यभागी फुगीर व दोन्ही बाजूंस निमुळती असून, तिच्या कातडीच्या घड्या स्पष्ट दिसतात. ती ४० ते ५० मि.मी. लांब व १२ ते १५ मि.मी. रुंद असते. अळीचे दोन्ही जबडे मजबूत आणि कणखर असल्याने ती नारळ झाडाच्या खोडाला सहजासहजी छिद्र पाडू शकते. अळीची वाढ ३६ ते ७८ दिवसांत पूर्ण होते.
- कोष ः पूर्ण वाढलेली अळी खोडातील तंतूच्या कोष करून, नारळाच्या खोडामध्येच कोषावस्थेत जाते. कोषावस्थेचा कालावधी १२ ते ३५ दिवसांचा असतो.
- किडीचा जीवनक्रम १०० ते १७० दिवसांचा असतो.

Coconut Pest
Millipede Pests : मिलीपीड किडीचे व्यवस्थापन

नुकसानीची पद्धत व लक्षणे ः
पूर्ण वाढलेले भुंगे खऱ्या अर्थाने फारसे नुकसान करत नाहीत. मात्र या किडीची अळी अवस्था माडाचे जास्त नुकसान करते. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळी खोडाला छिद्र पाडून आत प्रवेश करते. अळी खादाड असून, ती झाडाच्या खोडातील तंतू व मऊ भाग कुरतडून खात असते. त्यामुळे झाड आतून पूर्णपणे पोखरले जाते. सोंड्या भुंग्याचा प्रादुर्भाव झाडाच्या जमिनीजवळील भागावरच प्रामुख्याने दिसून येतो. अळी खोड खालून वर पोखरत जाते. प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या झावळ्या पिवळसर निस्तेज दिसतात. झाडाची वाढ खुंटते. खोड जास्त पोखरले गेल्यास असे झाड वाऱ्यामुळे कोलमडते.
बऱ्याच वेळा नारळाच्या झाडास या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे, हे ओळखण्यात उशीर होतो. हे टाळण्यासाठी पुढील लक्षणांवर सातत्याने लक्ष ठेवावे.
१) झाडाच्या खोडावर तांबूस तपकिरी रंगाचा स्राव दिसून येतो.
२) हा स्राव नंतर ओघळल्यासारखा दिसतो. स्राव हवेच्या संपर्कामुळे काळपट तपकिरी होतो.
३) खोडावर बारीकसारीक छिद्रे दिसून येतात. त्यातून ताजा भुस्सा बाहेर येतो.
४) खोडाला सकाळी किंवा सायंकाळच्या शांत वेळी कान लावल्यास ‘करकर’ असा आवाज येतो.
५) या भुंग्याचा प्रादुर्भाव झाडाच्या शेंड्याकडील भागावरही होतो. अळ्या झाडाच्या कोंबात राहून आतील भाग खातात, त्यामुळे वाढणारी सुई निस्तेज दिसते. झावळ्या निस्तेज दिसतात. कालांतराने कोंब आणि झावळ्या सुकून झाड दगावते.

एकात्मिक कीड व्यवस्थापन
१) सोंड्या भुंग्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून झाडावर जखमा करणे, झाडावर चढण्यासाठी खोडावर खाचा पाडणे या गोष्टी टाळणे आवश्यक आहे. अशा जखमांवर सोंड्या भुंग्याची मादी अंडी घालते आणि माडाला उपद्रव सुरू होतो.
२) झाडाच्या खालील बाजूकडील हिरव्या झावळ्या तोडू नयेत आवश्यकता असेल तर त्या खोडापासून १२० सेंमी. अंतरावर तोडून त्यावर डांबर फासावे.
३) झाडाच्या खोडावर खोलवर केलेल्या जखमा किंवा गेंड्या भुंग्यानी पाडलेली छिद्रे नंतर भरून येत नाहीत. अशी छिद्रे निमपेंड व वाळू यांच्या समप्रमाणात केलेल्या मिश्रणाने वेळोवेळी भरून घ्यावीत.
४) सोंड्या भुंग्यामुळे मेलेले झाड त्वरित बागेतून काढून नष्ट करावे.
५) सोंड्या भुंगे आकर्षित करण्यासाठी फरोलूर या गंध सापळ्याचा वापर करावा. एक ते दोन सापळे प्रति हेक्टर पुरेसे आहेत. या गंधाला नर अणि मादी भुंगे आकर्षित होतात. या गंधाचा परिणाम त्याच्या गुणवत्ता आणि प्रमाणकानुसार २ ते ५ महिन्यांपर्यंत टिकतो. सापळ्याची परिणामकारकता वाढविण्यासाठी सापळ्यामध्ये अननस फळाचे छोटे तुकडे किंवा नारळ फळाचा रस टाकावा. हे सापळे झाडाच्या खोडावर न लावता नारळ बागेमध्ये खांब उभारून त्यावर २.५ ते ३ मीटर उंचीवर लावावेत. तसेच सापळ्याच्या आजूबाजूच्या ८ ते १० झाडांवर भुंग्याच्या प्रादुर्भावासाठी लक्ष ठेवावे.

६) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर नसेल तर खोडावर असणाऱ्या छिद्रातून किडीच्या सर्व अवस्था धारदार कोयत्याने आणि तारेच्या हुकाने काढून माराव्यात. त्या ठिकाणी डांबर लावावे.
७) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास, इमिडाक्लोप्रिड (१७.८ एस.एल.) १.५ मि.लि किंवा स्पिनोसॅड (४५ एस.सी.) ०.५ मि.लि. प्रति लिटर पाणी किंवा डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) २० मि.लि. समप्रमाणात पाणी या प्रमाणे तयार केलेले द्रावण नरसाळ्याच्या साह्याने सर्वांत वर असलेल्या छिद्रातून खोडात सोडावे. यासाठी सर्वप्रथम खोडावरील छिद्रांचे निरीक्षण करून, सर्वांत वर असलेल्या छिद्राच्या एक फूट वर इतक्या उंचीवर सुताराकडील गिरमिटच्या साह्याने खोडाला १० सेंमी. तिरपे छिद्र पाडावे. त्यामध्ये नरसाळ्याच्या साह्याने वरील द्रावण सोडावे. नरसाळे त्वरित न काढता १० ते १५ मिनिटांपर्यंत तसेच ठेवावे. सर्व द्रावण झाडाच्या खोडात झिरपेल असे पाहावे. ही प्रक्रिया करण्यापूर्वी खोडातील अन्य सर्व छिद्रे मातीने बंद करावीत.
८) जर प्रादुर्भाव शेंड्यातून असेल तर हेच द्रावण हळूहळू शेंड्याकडील छिद्रातून ओतावे. कीटकनाशक हळूहळू खाली येऊन खोडातील किडींचा नाश होतो.
९) शिफारशीप्रमाणे खत मात्रा द्यावी. नारळ बागेमध्ये प्रादुर्भाव होऊ नये म्हणून निमपेंड १०० ग्रॅम अधिक हिंग भुकटी ५ ग्रॅम यांचे मलम करून माडाच्या खोडावर लावावे.

नोंद - वरील नमूद कीटकनाशकांना लेबल क्लेम नाही, मात्र ती व सर्व शिफारशी या ICAR-CPCRI, कासारगोड यांनी ती सूचित केलेली आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com