Dussehra Festival : दसरा ः उत्सव अन्नसमृद्धीचा, समतेचा आणि एकतेचा

आनंदी-समाधानी असण्यासाठी समानता, एकता व विपुलता असेल तर अनेक कला, विचार व नावीन्य जोपासले जाते. यालाच तर समृद्धी म्हणतात. ही समृद्धी जपण्याचा पूर्वजांचा अखंड प्रयत्न, सर्वदूर दिसतो.
Dussehra: Festival of food prosperity, equality and unity
Dussehra: Festival of food prosperity, equality and unityAgrowon

मागील काही लेखांत आपण निसर्ग (Nature), शेती (Agriculture) व लोकजीवन यांची समरसता मानवी समाजजीवनात कशी गुंफलेली आहे, याची माहिती घेतली. निसर्गातील हंगाम (Season) आणि त्याप्रमाणे असणारे सण-उत्सव व शेतातील पिकांना असणारे महत्त्व आपण पाहिले. मानवी समाजजीवनात खाणे जितके महत्त्वाचे तितकेच माणसामाणसांत एकोपा महत्त्वाचा. आनंदी-समाधानी असण्यासाठी समानता, एकता व विपुलता असेल तर अनेक कला, विचार व नावीन्य जोपासले जाते. यालाच तर समृद्धी म्हणतात. ही समृद्धी जपण्याचा पूर्वजांचा अखंड प्रयत्न, सर्वदूर दिसतो.

Dussehra: Festival of food prosperity, equality and unity
श्रावण ‘सृष्टीचा उत्सव’

सध्या निसर्ग त्याच्या सर्वोच्च आनंदात दंग झाला आहे. पाऊसपाणी आटोपून रानातल्या अल्पजीवी वनस्पतींना नाना रंगांची फुले आलेली आहेत. यात पिवळ्या, निळ्या फुलांची संख्या जास्त दिसते. चकचकीत ऊन वातावरणातील आल्हाददायकता वाढवते आहे. डोंगर-माळ रानफुलांनी बहरून आलेय. पिवळी सोनकी, निळी-गुलाबी कारवी, लाल, गुलाबी, पांढरा तेरडा, निळी निळवंती आणि पांढऱ्या रंगांची पंद-पलंद या प्रसन्न वातावरणात खास उठून दिसतात. मधमाश्या, भुंगे, फुलपाखरे अशा सर्व कीटकांना या दिवसांत मधुरसाची मेजवानी मिळत असणार म्हणून तर त्यांचे स्वच्छंदी, उन्मुक्त बागडणे सुरू असते. अशा वेळी भटकंतीसाठी बाहेर निघणे मनाला मोठीच उभारणी देणारे असते. शेतीच्या कामातून मिळालेली उसंत उत्सवात प्रसन्नता वाढवते. पूर्वजांबद्दल कृतज्ञता म्हणून पितृ-पंधरवडा साजरा केला जातो. त्यापाठोपाठ स्त्रीशक्तीचा सन्मान व आदर म्हणून नऊ दिवस नवरात्र साजरी केली जाते. नवदुर्गाच्या माध्यमातून स्त्री ही शक्तिमान आहे, अन्याय सहन न करणारी आहे, दुष्ट प्रवृत्तींना पायबंद घालणारी आहे, हा संदेश मिळत राहतो. अशा या स्त्रीशक्तीच्या जागराची परिणिती होते ती दसरा सणाने.

Dussehra: Festival of food prosperity, equality and unity
Bedana Rate : दसरा, दिवाळीच्या निमित्ताने बेदाण्याच्या दरात सुधारणा

दसऱ्याच्या दिवशी शेतात नवीन आलेले धान्य, पिकांची कणसे, आपट्याची पाने (जंगल समृद्धीचे प्रतीक असावे का?), शेतीत वापरली जाणारी अवजारे जसे पेरण्याची पाभर वगैरे असे सर्व घेऊन घरातील कर्ता पुरुष मंदिरात पूजेसाठी घेऊन येतो. त्यास आमच्या भागात सीमोल्लंघन असे म्हणतात. जुन्या काळी लढाईला निघताना हा दसऱ्याचा मुहूर्त साधून सीमोल्लंघन होत असे. या परंपरेत काळानुसार बदल झाला असावा. त्यानंतर हा पुरुष घरी येतो तेव्हा घरातील स्त्रिया त्याला ओवाळतात, मग गावातील मंडळी एकमेकांच्या घरी जाऊन सोने (आपट्याची पाने) वाटतात. घरोघरी आंब्याची पाने आणि झेंडूंच्या फुलांनी घराची सजावट केली जाते. जसे आपल्याकडे फुलांची तोरणे लावली जातात, तसे आदिवासी भागात घरांवर शेणाने बनवलेल्या गोळ्यांतून, रानातल्या फुलांतून, पानांतून सजावट केली जाते. घरोघरी गोड-धोड बनवले जाते.

Dussehra: Festival of food prosperity, equality and unity
आजपासून नवरात्रोत्सव; कोल्हापुरातील शाही दसरा सोहळा यंदाही नाही

काही आदिवासी (महादेव कोळी) गावातील सर्व कुमारवयीन मुली ‘भोडाई’ नावाचा खेळ या काळात खेळतात. म्हणजे या सर्व मुली गावातून तांदूळ, पैसे गोळा करतात. नवरात्रीच्या सर्व दिवसांत हा त्यांचा क्रम चालतो. यांच्यासोबत एक कलश असतो, त्यात शेतात असलेल्या नाचणी, वरईची हिरवी कणसे, भाताच्या लोंब्या, खुरासनीची फुले, कुरडूची भाजी असा सर्व ‘अन्नसमृद्धी’चा कलश डोक्यावर घेऊन नाचवतात, गाणी म्हणतात. हा कलश म्हणजेच भोंडाई.

या वेळी जमलेल्या सर्व तांदळाची दसऱ्याच्या दिवशी खीर बनवली जाते. खिरीचे इतर साहित्य जमलेल्या पैशातून आणले जाते. गावातील सर्व लोक एकत्र येऊन ती खीर खातात. वाटून खावे, एकत्र राहावे, निसर्ग जपावा हेच तर यातून प्रतीत होते.

Dussehra: Festival of food prosperity, equality and unity
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीची

गडचिरोलीतील आदिवासी (माडिया गोंड) भागात एक गोष्ट बघायला मिळाली. लहान मुले-मुली एकत्र आलेली, मोठे त्यांना गावाच्या सीमेवर घेऊन आलेले. तिथे पाण्याने भरलेले कलश रस्त्यावर ओतून सरळ रेषा त्यांनी आखली आणि त्या रेषेचे पूजन त्यांनी केले. यात जास्त करून मुली होत्या, हे विशेष. कदाचित जुन्या पिढीकडून नवीन पिढीला आपल्या सीमेची माहिती देण्याची ही पद्धत असावी.

Dussehra: Festival of food prosperity, equality and unity
दसरा मेळाव्याबाबतचा निर्णय कायद्यानुसारच ः फडणवीस

धुळे जिल्ह्यातील आदिवासी (कोंकणा) भागात दसऱ्याच्या दिवशी जाण्याचा योग आला होता. सर्व गावातील महिला पुरुष सकाळी एकत्र जमून, वाद्यांच्या तालात वाजत-गाजत निघालेले. हा जमाव गावातून चालत-चालत नदीच्या दिशेने निघतो. गावातील आबालवृद्ध सगळे यात समील होतात. काही महिलांच्या डोक्यावर पाट्या (बांबूची टोपली) होत्या. या टोपलीत शेतात पिकलेल्या मोठ्या काकड्या होत्या. हे सर्व जण गावच्या नदीवर पोहोचतात. मग पुरुष नदीत अंघोळ करतात. नदीची पूजा होते व सर्वांनी आणलेल्या काकड्या कापून त्या प्रसाद म्हणून खातात. त्यानंतर सगळे घरी येतात. घर स्वच्छ सारवलेले असते. गाव प्रसन्न असते. सर्व मिळून दोन-तीन बोकड कापतात. जेवढी घरे, तेवढे वाटे केले जातात. म्हणजे कलेजा असेल तर त्याचे छोटे-छोटे पनीरच्या क्यूब सारखे रेखीव क्यूब बनवले जातात. असे बोकडाच्या इतर सर्व अवयवांची वाटणी केली जाते. प्रत्येक घराच्या वाट्यात प्रत्येक भाग. त्या दिवशी संध्याकाळी घरोघरी मटण शिजवले जाते. इथेही सर्व गाव एकत्र येते हे महत्वाचे.

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी (भिल्ल) गावांत या दिवसांत गावच्या ‘कणसारी’ देवीची यात्रा भरते. कणसरी देवी धान्यांची देवी म्हणून प्रसिद्ध आहे. सर्व गावकरी एकत्र येतात, एकमेकांना भेटतात, सर्व जण नवीन कपडे परीधान करतात. महिला त्यांचे ठेवणीतले पारंपरिक चांदीचे दागिने अंगावर चढवतात. गावात रोज विशिष्ट प्रकारात नाच-गाणे होते. सर्व तरुण मुले-मुली यात सहभागी होतात. घरोघरी आपल्या शेतातील गावठी चविष्ट मक्याची कणसे, शेतात निघालेल्या घुंगऱ्याच्या शेंगा भाजून खाल्ल्या जातात. खाणे, पिणे, एकत्र येणे, संघटन, चर्चा अशा सर्वच गोष्टी मोठ्या आनंदाने साजऱ्या होतात. या भागातली ‘काठ्याची यात्रा’ यासाठी खूप प्रसिद्ध आहे. आजूबाजूच्या गावांतील लोकही यात सहभागी होतात. पाहुणे-रावळे-मित्र परिवार सर्वच. मोठा उत्साह आणि आनंद असतो इथे. त्यावेळी नागली, वरी, मोर-बर्टी, ज्वारी अशी पिके शिवारात बहरून आलेली दिसतात.

कोकणातील मंदिरात शिवलग्न लागते. या लग्नात गावातील सर्व देवतांच्या प्रतिनिधी देवकाठी निघतात. या गावउत्सवात जबाबदारी सर्व स्तरांतील, सर्व जातींतील लोक आदराने, सन्मानाने उचलतात. वाजत-गाजत काठ्या जमतात आणि मग शिवाचे लग्न लागते. आपट्याच्या पानांच्या चुंबळीबरोबर. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या उत्सवात सर्व गाव एक होते. गावराहटी चालवायची असेल तर सर्वसमावेशकता व संघटन आवश्यकच असते. इथे त्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेला नवअन्नपौर्णिमा साजरी केली जाते.

भारतभर देखील दशहरा वेगवेगळ्या भागात थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. पश्चिम बंगालचा दुर्गोत्सव तर प्रसिध्द आहे. मध्य भारतात देवीची उपासना करण्यासाठी पुरुषदेखील नऊ दिवस उपवास करतात. कर्नाटक राज्यातला म्हैसूरचा दसरा ऐतिहासिक आहे. ओडिशा राज्यात देखील या काळात नवाखाई उत्सव साजरा होतो. या सर्वांत गाव एकत्र येते. आनंदाने, उत्साहाने एकी निर्माण केली जाते.

जशी शक्तीची देवी महाकाली, समृद्धीची देवी लक्ष्मी, ज्ञानाची देवी सरस्वती, तशी धान्यांची देवी कणसारी. या कणसारी मातेच्या पूजेला गावागावांतून लोक येतात. ते आपले घरचे धान्य इथे वाहतात आणि जाताना तिथले दुसरे वाहिलेले धान्य प्रसाद म्हणून घरी नेतात. एक प्रकारे बियाण्यांची अदलाबदल करण्याचा हा शिरस्ता आहे.

Dussehra: Festival of food prosperity, equality and unity
Soybean Rate : सोयाबीन बाजार कसा राहील?

दसरा सण साजरा करण्याच्या पद्धती गावोगावी खूप भिन्न आहेत. भारतामध्ये एकूण ५५० आदिवासी जमाती वास्तव्य करतात. यात किती विविधता असेल याची कल्पना येऊ शकते. या सर्वांत एक समान दुवा आढळतो, तो म्हणजे शेतीबद्दलचे ज्ञान, अन्नसमृद्धी व त्याबद्दलचा आदर, सामूहिकता व संघटनाचे महत्त्व, स्त्रीशक्तीची जाणीव व सन्मान आणि निसर्गानुरूप जगण्याची जिजीविषा! बुधवारी येणारा दसरा सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवचैतन्य, एकोपा व समृद्धी घेऊन येवो अशी सदिच्छा व्यक्त करूया.

Dussehra: Festival of food prosperity, equality and unity
Cotton Rate : पूर्वहंगामी कापूस पिकात दोनच वेचण्या होणार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com