Soybean Rate : सोयाबीन बाजार कसा राहील?
पुणेः देशातील अनेक बाजारांमध्ये नवीन सोयाबीन दाखल (Soybean Arrival) झालंय. पुढील काही दिवसांमध्ये सोयाबीनची आवक वाढले. मात्र बाजारात सध्या पिकाची स्थिती (Soybean Crop Condition) आणि उत्पादनाबाबत (Soybean Production) वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. उद्योगाच्या मते पिकाची स्थिती चांगली असून उत्पादनही चांगलं येईल. पण शेतकऱ्यांनी पिकाचं नुकसान होत असल्याचं सांगितलं.
देशातील सोयाबीन हंगाम आता सुरु झाला, असं म्हणायला हरकत नाही. देशातील अनेक बाजारांमध्ये नवं सोयाबीन विक्रीसाठी येत आहे. यंदा महत्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये अनेक भागांत जून महिन्यात कमी पाऊस झाला होता. त्यामुळं सोयाबीन लागवड मागं-पुढं झाली.
मात्र बहुतेक लागवडी या जवळपास १५ दिवसांनी उशीरा झाल्या. परिणामी सोयाबीन आवकही साधारणपणे १५ दिवसांनी वाढेल, असा अंदाज व्यक्त होतोय. यंदा सोयाबीनचा पेरा गेल्यावर्षीएवढाच झाला. आजपर्यंत देशात १२० लाख ९० हजार हेक्टरवर सोयाबीनची नोंद झाली.
यंदा सोयाबीनचा पेरा वाढला नसला तरी देशात सोयाबीन पिकाची स्थिती चांगली असल्याचं सांगितलं जातं. उद्योगांच्या मते सप्टेंबर महिन्यापर्यंत सोयाबीन पिकाला पावसाचा किंवा कीड-रोगाचा फटका बसला नाही.
मात्र शेतकऱ्यांनी हा मुद्दा खोडून काढला. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात अनेक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार आणि सतत पाऊस झाले. तसचं खोड कीड आणि येलो मोझॅक रोगाचाही प्रादुर्भाव दिसून आला. त्यामुळं सप्टेबरपर्यंत संपूर्ण पीक चांगलं आहे हा उद्योगाचा दावा खोटा आहे, असंही शेतकऱ्यांनी सांगितलं.
त्यातच उद्योग यंदा गेल्या हंगामातील शिल्लक सोयाबीन जास्त असल्याचं सांगत आहे. सध्या जवळपास १२ ते १५ लाख टन सोयाबीन शिल्लक आहे. याचाही दबाव नव्या हंगामावर असेल, असाही दावा उद्योगाकडून केला जात आहे. मात्र जाणकारांना हे मान्य नाही.
एरव्ही देशात आवकेचा हंगाम संपल्यानंतर सोयाबीनचे दर वाढतात. मात्र सरत्या हंगामात आवक संपल्यानंतर बाजार दबावात आला. सोयाबीनचे दर सरासरी ७ हजार रुपयांवरून ५ हजार रुपयांपर्यंत आले आहेत. त्यातच यंदा उत्पादन वाढीचा बातम्या पसरल्यानं बाजारात काहीसे चढ-उतार सुरु आहेत.
मात्र शेतकऱ्यांनी येथे एक गोष्ट लक्षात घ्यावी, ती म्हणजे आताच देशातील सोयाबीन उत्पादन किती राहील, हे सांगता येत नाही. मागील काही वर्षांमध्ये ऑक्टोबरमध्ये पाऊस होतोय आणि त्यामुळं सोयाबीनचं नुकसान वाढतंय. त्यामुळं ऑक्टोबरमध्ये पाऊस कसा राहील, यावरून उत्पादन ठरवावं लागेल. जाणकारांच्या मते पुढील महिनाभर सोयाबीनला किमान ५ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी पुढील महिनाभर बाजाराचा आढावा घेऊन विक्री करणं फायदेशीर ठरेल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.