Soybean Seed : केवळ बीजोत्पादनासाठी घ्या उन्हाळी सोयाबीन

खरीप हंगामाच्या तुलनेमध्ये उन्हाळी हंगामात सोयाबीन एकरी उत्पादकता ही खूपच कमी आढळते. त्यामुळे केवळ नवीनतम किंवा अधिक उत्पादनक्षम वाणाच्या बीजोत्पादनाच्या दृष्टीने उन्हाळी सोयाबीनचे आपत्कालीन उत्पादन घ्यावे असे सांगितले जाते. केवळ बीजोत्पादनासाठी उन्हाळी सोयाबीनची लागवड करावी.
Soybean Seed
Soybean SeedAgrowon

खरिपामध्ये लागवडीसाठी (Kharif Soybean Sowing) अधिक उत्पादनक्षम आणि नवीनतम वाणांच्या बियाण्यांची (Seed Shortage) कमतरता नेहमी जाणवते. अशा वाणांच्या बीजोत्पादनासाठी (Soybean Seed Production) ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, अशा शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात सोयाबीनची लागवड (Summer Soybean Cultivation) केल्यास बियाण्यांची उपलब्धता परिसरातील शेतकऱ्यांना होऊ शकते. स्वतःची व परिसरातील शेतकऱ्यांकडूनची मागणी याचा विचार करून तितकेच क्षेत्र ठरवा. शक्यतो शेताला संरक्षक कुंपण असावे.

Soybean Seed
Soybean Market : सोयाबीन बाजारात अस्थिरता का?

प्रचलित पद्धतीच्या तुलनेमध्ये नावीन्यपूर्ण सुधारित जोडओळ पेरणी पद्धतीने पेरणी केल्यास बियाण्यामध्ये मोठी बचत होते.

उन्हाळी हंगामात उत्पादित सोयाबीन बियाण्याचा रंग किंचित पिवळसर हिरवा राहतो. तसेच दाण्यांचा आकारसुद्धा खरीप हंगामाच्या तुलनेत लहान राहतो.

खरिपामध्ये ज्या शेतात सोयाबीन उत्पादन घेतले होते, तिथे पुढील समस्या उद्‍भवल्या असतील तर तिथे उन्हाळी लागवड करू नये.

अ) सोयाबीन पिकावर मूळसड अथवा मानकुज या बुरशीजन्य रोगाच्या अधिक प्रादुर्भाव झालेला असल्यास.

ब) सोयाबीन पिकाचे खोडमाशीच्या अळीमुळे नुकसान झालेले असल्यास.

क) अतिपावसामुळे सोयाबीनचे कमी उत्पादन आले.

अशा शेताऐवजी अन्य शेतामध्ये सोयाबीन लागवड करावी.

Soybean Seed
Soybean Vaydebandi : वायदेबंदीमागचे गौडबंगाल

वरील प्रकारच्या कोणत्याही समस्या नसलेल्या शेतात खरिपातील सोयाबीननंतर पुन्हा उन्हाळी सोयाबीन घ्यावयाचे असल्यास, खरिपातील पीक कापणी झाल्याबरोबर लगेचच दोन अथवा तीन फाळी नांगराच्या साह्याने साधारणत: १५ ते २० सेंमी खोलीपर्यंत नांगरट केलेली असावी.

शेताची निवड ः योग्य निचऱ्याची, ओलिताचे पानी जमिनीच्या पृष्ठभागावर दीर्घकाळपर्यंत साचून न राहणारी, मध्यम ते भारी प्रकारची जमीन निवडावी.

बीजप्रक्रिया ः शेतात पेरणीपूर्वी सोयाबीन बियाण्याला ॲझॉक्सिस्ट्रॉबीन (२.५%) अधिक थायोफिनेट मिथिल (११.२५%) अधिक थायोमिथॉक्झॉम (२५ % एफएस) याची १० मिलि प्रति किलो बियाणे याप्रमाणे प्रक्रिया करावी. त्या शिवाय पेरणी करू नये.

हवामान ः सोयाबीन पिकाला ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान बाधक ठरते. त्यामुळे उन्हाळी सोयाबीन घेताना आपल्या परिसरातील तापमानाचा अंदाज घ्यावा. पेरणीसाठी निवडलेल्या नवीनतम वाणाचे कालावधीनुसार फुलोरावस्था ते शेगांमध्ये दाणे भरण्याची अवस्था या काळात तापमान ३५ अंशांपेक्षा जास्त राहणार नाही, असे पाहून पेरणीचा कालावधी ठरवावा. सर्वसाधारण परिस्थितीत २५ डिसेंबरपूर्वी पेरणी करून घेणे क्रमप्राप्त ठरते.

वाणांची निवड ः उन्हाळी सोयाबीनसाठी अधिक उत्पादन देणारे नविनतम वाण निवडावे.

Soybean Seed
Soybean Rate: सोयाबीनला आज काय दर मिळाला?

अ) अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठद्वारे विकसित वाण ः सुवर्ण सोयाबीन (एएमएस-एमबी -५-१८), पीकेव्ही अंबा (एएमएस -१००-३९) इ.

ब) परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाद्वारे विकसित वाण ः एमएयूएस-१५८, एमएयूएस-६१२ इ.

क) राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठद्वारे विकसित वाण ः फुले दूर्वा (केडीएस-९९२), फुले किमया (केडीएस-७५३),

ड) इंदूर येथील राष्ट्रीय सोयाबीन संशोधन केंद्राचे जेएस-२०-२९, जेएस-२०-६९, जेएस-२०-११६, जेएस २०-३४ इ.

वरील सर्वच नवीनतम वाण अधिक उत्पादनक्षम आणि साधारणत: १०० दिवस कालावधीचे आहेत. त्यानुसार पेरणीचा कालावधी ठरवावा.

बियाणे निवडताना ः खरीप हंगामाच्या उत्पादनातील चांगल्या प्रतीचे, चाळणी केलेले, एकसमान दाण्यांचा आकार असलेले, अंकुरण क्षमता ७०% पेक्षा जास्त असलेले आणि शक्यतो घरचेच बियाणे वापरावे.

बियाणे प्रमाण ः पेरणीसाठी प्रति एकर केवळ १२-१४ किलो (मजुरांद्वारे जोडओळ पद्धतीने टोकण करण्यासाठी) आणि १५ ते १७ किलो (ट्रॅक्टरद्वारे जोडओळ पद्धतीने) पेरणीसाठी लागेल. अर्थात, बियाण्याचा आकार आणि पेरणीच्या दोन ओळींतील, दोन झाडांतील अंतर यानुसार काही बदल संभवतो.

जोडओळ पद्धतीने पेरणीचे फायदे ः

बियाण्याची व खताची सरळ सरळ ३३ % बचत शक्य होते.

जोडओळीच्या दोन्ही बाजूंनी मोकळी जागा उपलब्ध असल्यामुळे फवारणीसह अन्य सर्व व्यवस्थापन करणे सोपे होते. बीजोत्पादनासाठी सोयाबीन घेत असल्याने बियांचा गुणवत्ता व दर्जा राखता येतो.

प्रत्येक खाली ठेवलेल्या तिसऱ्या ओळीमध्ये डवऱ्याच्या फेरीवेळी डवऱ्याच्या जानोळ्याला गच्च दोरी गुंडाळून सऱ्या पाडून घ्याव्यात. यामुळे बेमोसमी अवकाळी पाऊस अथवा ओलिताचे पाणी जास्त झाले तरी नालीमध्ये निचरा होऊन जातो.

खाली ठेवलेल्या ओळीच्या ठिकाणी सरी पाडलेली असल्यामुळे पाटपाणी देता येते अथवा स्प्रिंकलरद्वारे पाणी देताना पाइपची हालचाल करणे सोपे ठरते.

पेरणी पद्धतीनुसार करावयाचे बदल ः

मजुरांच्या साह्याने टोकण ः या पद्धतीने पेरणी करताना दोन ओळींतील अंतरानुसार (३० ते ४५ सेमी) संपूर्ण शेतात काकर पाडून घ्यावेत. मजुरांद्वारे दोन झाडांतील अंतर १० ते १५ सेंमी यानुसार प्रत्येक ठिकाणी २-३ बियाणे लावावेत. बियाणे टोकण करताना प्रत्येक दोन ओळींनंतर तिसरी ओळ खाली ठेवावी. म्हणजेच जोडओळीत पेरणी होईल. यासाठी नावीन्यपूर्ण मानवचलित सुधारित टोकण यंत्रही वापरता येते.

ट्रॅक्टरचलित सात दाती पेरणी यंत्राने जोडओळीत पेरणी करताना ः पेरणीयंत्राचे बियाण्याच्या व खताच्या कप्प्यातील पहिले, चौथे (मधले) व सातवे (शेवटचे) नळीचे छिद्र बंद करावे. बियाण्याच्या कप्प्यांमध्ये बियाणे व खताच्या कप्प्यांमध्ये खत भरावे. अशा प्रकारे पेरणी करताना प्रत्येक वेळी ट्रॅक्टर पलटून येताना व जाताना शेवटच्या खाली काकरामध्ये ट्रॅक्टरचे शेवटचे दाते ठेवावे. म्हणजेच प्रत्येक दोन ओळींनंतर तिसरी ओळ खाली राहील. सोयाबीनची जोडओळीत पेरणी शक्य होईल. सोबतच खतही दिले जाईल.

ट्रॅक्टरचलित सहा दाती पेरणी यंत्राने जोडओळीत पेरणी करताना ः पेरणीयंत्राचे बियाण्याच्या व खताच्या कप्प्यातील दोन नंबरचे व पाच नंबरचे नळीचे छिद्र बंद करावे. बियाण्याच्या कप्प्यामध्ये बियाणे व खताच्या कप्प्यांमध्ये खत भरावे. अशा प्रकारे पेरणी करताना ट्रॅक्टर प्रत्येक वेळी पलटून येताना व जाताना नेहमीप्रमाणे प्रचलित पद्धतीसारखी पेरणी करावी. म्हणजेच काठावरच्या ओळीच्या बाजूला पुन्हा एक ओळ सोयाबीनची येऊन जोडओळीत पेरणी शक्य होते.

छोट्या ट्रॅक्टरच्या पाच दाती पेरणीयंत्राने जोडओळीत पेरणी करताना ः पेरणी यंत्राचे मधले म्हणजेच तीन नंबरचे, बियाणे व खताच्या कप्प्यामधील नळीचे छिद्र बंद करावे. प्रत्येक वेळी ट्रॅक्टर पलटून येताना व जाताना एक ओळ सुटेल एवढी खाली जागा सोडावी. म्हणजेच दोन ओळीतील अंतर ३० सेंमी असल्यास या ठिकाणी ६० सेंमी (दोन फूट) अंतर सुटेल. अशा प्रकारे प्रत्येक तिसरी ओळ खाली राखली जाऊन जोडओळीत पेरणी शक्य होईल.

बैलजोडीचलित तिफणीने अथवा काकरी व सरत्याने जोडओळीत पेरणी करताना ः तिफणीची मधली नळी बंद करावी. काकरीच्या व सरत्याचा वापर करताना मधल्या सरत्याने बियाणे पेरू नये. प्रत्येक वेळी पलटून येताना व जाताना नेहमीप्रमाणे प्रचलित पद्धतीसारखी पेरणी करावी. म्हणजेच प्रत्येक तिसरी ओळ खाली राहील.

जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७

(सहयोगी प्राध्यापक -कृषी विद्या, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com