Drought Conditions : पाण्याची तहान भागेना, पिकांनी टाकल्या माना

Rabbi Season : सोलापूर जिल्ह्यात पावसाने यंदा जेमतेम हजेरी लावल्यामुळे खरीप या आधीच हातचा गेला. आता सर्वाधिक भरवसा असणारा रब्बीही हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
Drought Conditions
Drought ConditionsAgrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात पावसाने यंदा जेमतेम हजेरी लावल्यामुळे खरीप या आधीच हातचा गेला. आता सर्वाधिक भरवसा असणारा रब्बीही हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक भागांत आतापासूनच विहिरी आणि बोअरच्या पाण्याने तळ गाठला आहे. पुरेशी ओल नसल्याने रब्बी ज्वारी, गहू उगवत नसल्याचे चित्र आहे.

तर पाण्याची तहान भागत नसल्याने कांदाही माना टाकू लागला आहे. कांद्यात सर्वाधिक आघाडीवर असलेल्या रानमसले (ता. उत्तर सोलापूर) गावात दरवर्षी या हंगामात सुमारे ३ हजार एकरांवर कांदा असतो, यंदा मात्र तो १५०० एकरांवर म्हणजे ५० टक्क्यांवर खाली आले आहे. शिवाय त्यापैकी किती कांदा तग धरेल, याची शाश्‍वती नाही.

Drought Conditions
Rabbi Season 2023 : दक्षिण सोलापुरात खरीप वाया; रब्बी पेरणी खोळंबली

जिल्ह्यात रब्बी हंगामात ज्वारी, गहू या पारंपरिक पिकांसह कांदा हे नगदी पीक म्हणून घेतले जाते. जिल्ह्यातील बार्शी, उत्तर सोलापूर, पंढरपूर, मोहोळ, करमाळा या भागांत काही ठरावीक गावे खास कांद्यासाठी प्रसिद्ध आहेत.

त्यापैकीच एक सोलापूर- बार्शी महामार्गावरील वडाळ्यापासून आता सात-आठ किलोमीटरवरील रानमसले कांद्यातील आघाडीवरचे गाव. पण यंदाच्या हंगामात जेमतेम पावसामुळे गावाची रया गेली आहे. ४०० मिलिमीटरपर्यंत गावाच्या कार्यक्षेत्रात पाऊस पडणे अपेक्षित आहे.

पण यंदा केवळ १८३ मिलिमीटर पाऊस झाला. गावाचे भौगोलिक क्षेत्र ६६०० एकर आहे. त्यापैकी ३ ते ३५०० एकरांवर केवळ कांद्याचे उत्पादन होते. तर ५०० एकरांवर ज्वारी होते. पाण्यासाठी विहीर आणि बोअर हे स्रोत आहेत. पाण्याचा अन्य शाश्‍वत स्रोत नाही. पण आता विहिरी-बोअरची पातळीही तळाला गेली आहे.

५० ते ७० फुटांच्या विहिरींत आता दोन ते चार फुटांपर्यंत पाणी उरले आहे. कांद्याच्या लागणी गेल्या महिनाभरापासून सुरू आहेत. पण यंदा त्याच्या क्षेत्रात जवळपास निम्म्याने घट झाली आहे. आहे तो कांदा जगविण्याची धडपड सुरू आहे. पण पाण्याची काही तहान भागेल, अशी स्थिती नाही.

Drought Conditions
Drought Condition : मंडलनिहाय दुष्काळ जाहीर करण्यासाठी २०१८ चे निकष

अनेक शेतकऱ्यांनी ज्वारी, मका, गव्हाच्या पेरण्या केल्या आहेत. पण त्यापैकी अनेकांच्या ज्वारीची तर उगवणच झालेली नाही. ‘आम्ही मदतीसाठी प्रयत्न करतो आहोत, पण अद्याप काही मिळालेले नाही,’ असे सरपंच मनोहर क्षीरसागर आणि उपसरपंच रमेश सुतार यांनी सांगितले. गावात दोन ते अडीच हजार गाई-म्हशी आहेत. त्यांच्याही चारा आणि पाण्याचा प्रश्‍न आहे, असेही ते म्हणाले.

तरुण शेतकरी रमाकांत गरड म्हणाले, ‘‘यंदा खरिपात सोयाबीन केलतं, पण एकरी १५ क्विंटलचा उतारा, ५-६ वर आला. आता रब्बीत ७ एकर कांदा केला आहे. पण पाणी कमी पडते आहे, विहिरीत फक्त २-४ फुटांवर पाणी खाली गेलंय.

आता दोन-तीन एकरच कांदा पाणी पितोय, बाकीचा सोडून द्यावा लागेल. कांद्याची लागण होऊन अडीच महिने झालेत, आता लिंबाएवढा आकार व्हायला पाहिजे, पण आता तो पार काळवंडून गेलाय, आतापर्यंत एकराला ५० हजारांचा खर्च झाला आहे, तोबी निघतो का नाही काय ठावं. ज्वारी तर उगवलीच नाही.’’

शेतकरी आणि कृषी सेवा केंद्र चालक सुधाकर सिरसट म्हणाले, ‘‘माझ्याकडे अडीच एकर कांदा, अडीच एकर टोमॅटो, तीन एकर घेवडा आहे. तर एक एकर ज्वारी आहे. पाण्याची सर्वाधिक अडचण आहे, पण त्याबरोबर विजेचीही अडचण आहे. आता केवळ ४ तास वीज मिळते, तीही सतत खंडित होते.

त्याऐवजी आठ तास सलग वीज मिळायला हवी. पण जेमतेम पाणी असूनही मला त्याचा वापर विजेअभावी करता येत नाही. एवढा एखादा महिनाच पाणी पुरेल, पुन्हा टंचाई जाणवणार आहे, तसंच फक्त शेतीलाच नव्हे, जनावराच्या पाण्याचा प्रश्‍न बिकट होईल.’’

तरुण युवा शेतकरी योगेश गरड म्हणाले, ‘‘पिकांची पाण्याची तहान भागत नसल्याने मोठी अडचण झाली आहे. माझ्याकडे ५ एकर कांदा आहे. पण विहिरीची पातळी खाली गेली आहे. आता फक्त २ ते ४ फुटांवर पाणी आहे. साधारण महिना-दीड महिनाच पाणी पुरेल. कांद्याच्या पाच एकरांपैकी आता २ एकरच जपतोय. नाइलाजाने तीन एकर कांदा केवळ पाण्याअभावी सोडून द्यावा लागतो आहे.’’

उत्पादनासह उत्पन्न निम्म्यावर

दरवर्षी कांद्याची जवळपास ३५०० एकरांवर लागवड होते. एकरी किमान १५ क्विंटल उत्पादन इथला शेतकरी घेतोच, पण यंदा ते उत्पादन ५० टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे उत्पादनासह उत्पन्नातही तेवढीच घट झाली आहे.

या हंगामात एकट्या रानमसले गावातून केवळ कांद्याची उलाढाल सुमारे चार कोटी रुपयांच्या आसपास असते, त्यात यंदा निम्मी म्हणजे २ कोटींच्या आतच उलाढाल होण्याची शक्यता आहे. शिवाय या सगळ्याचं गणित पुन्हा कांदा दरावरही आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com