
एस.एन.पाटील
Water Saving in Farming: जमीन समतोल असेल तर नॉन प्रेशर कॉम्पेसेटिंग ठिबक वापरावे. जमीन चढ उताराची असेल तर प्रेशर कॉम्पेसेटिंग ठिबक वापरावे. नियंत्रित शेती किंवा संरक्षित शेतीसाठी प्रेशर कॉम्पेसेटिंग विथ एंटी-लीक ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा.
आज आपल्यापैकी बहुतांश जणांना ठिबक, तुषार सिंचन संचाची माहिती आणि त्याचे उपयोग संपूर्णपणे माहिती नाहीत. बहुतांश लोकांचा समज हा ठिबक म्हणजे पाण्याची बचत एवढ्यापुरताच मर्यादित आहे. ठिबक सिंचन संचाचे बरेच उपयोग आहेत.
पाण्यासोबत १०० टक्के विरघळणारे खते (विद्राव्य खते) ठिबकद्वारे दिले तर खतांची बचत मोठ्या प्रमाणात होते. विजेची बचत होते. हवे तेव्हा हवे तेवढे पाणी व खते पिकांच्या मुळाशी देता येतात.
जमिनीत सतत वाफसा स्थिती ठेवता येते, जेणेकरून हवा व पाणी यांचे योग्य प्रमाण असल्याने पिकांना त्यांच्या मुळांद्वारे योग्य शोषण करता येते. पिकास एकसमान पाणी, खते मिळत असल्याने एकसमान वाढ होते.
जमीन समतोल असेल तर नॉन प्रेशर कॉम्पेसेटिंग ठिबक वापरावे. जमीन चढ उताराची असेल तर प्रेशर कॉम्पेसेटिंग ठिबक वापरावे. नियंत्रित शेती किंवा संरक्षित शेतीसाठी प्रेशर कॉम्पेसेटिंग विथ एंटी-लीक ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा.
इनलाइन ठिबक हे प्रामुख्याने कापूस, ऊस, केळी, भाजीपाला, मिरची, टोमॅटो, बटाटे, आले, हळद, मका, तूर, सोयाबीन इत्यादी पिकासाठी वापरले जाते. ऑनलाइन ठिबक हे प्रामुख्याने द्राक्ष, आंबा, डाळिंब, काजू इत्यादी या फळपिकांसाठी वापरले जाते. फळपिकांमध्ये अती घन तसेच घन पद्धतीत उंच गादीवाफ्यावर लागवड होत असल्याने यामध्ये इनलाइन ठिबकचा वापर वाढत आहे. उंच गादीवाफा पद्धतीत जमिनीमध्ये हवा व पाणी यांचे संतुलन चांगले राहत असून मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते.
पाण्याचा प्रवाह
नॉन प्रेशर कॉम्पेसेटिंग ः २ लि/तास, ४ लि/तास, ८ लि/तास
प्रेशर कॉम्पेसेटिंग ः १.६ लि/तास, २ लि/तास, ४ लि/तास
प्रेशर कॉम्पेसेटिंग विथ एंटी-लीक ः १.२ लि/तास, १.६ लि/तास, २ लि/तास, ४ लि/तास
महत्त्वाच्या बाबी
जमीन प्रकार (काळी / चोपण, मध्यम, हलकी)
ठिबक सिंचनाखाली आणावयाचे क्षेत्र (एकरमध्ये ः लांबी (मी) व रुंदी (मी))
पिकातील आणि ओळीतील अंतर
पाण्याची प्रत व उपलब्धता
वीज उपलब्धता (तास / दिवस)
पंपाचे फ्लो व हेड/ हॉर्स पॉवर
विहिरीची खोली, इत्यादी
सर्व प्रकारच्या इनलाइन ठिबकमध्ये दोन ड्रिपरमधील अंतराचे विविध पर्याय उपलब्ध आहेत (२० सेंमी, ३० सेंमी, ४० सेंमी, ५० सेंमी, ६० सेंमी इत्यादी)
जमिनीचा प्रकार, पिकाच्या गरजेनुसार, पाण्याची गुणवत्ता, विजेची उपलब्धता व आपल्या उपलब्ध पंपाच्या फ्लो व हेडनुसार ड्रिपरचा डिस्चार्ज निवडावा.
दोन रोपातील अंतर व भविष्यातील पिके ( पीक बदल) या नुसार दोन ड्रीपर मधील अंतर निवडावे. जेणे करून हाच ठिबक संच इतर पिकांसाठी सुद्धा त्याच जमिनीत उपयोगात येईल.
ठिबक संचातील घटक
पीव्हीसी/ एचडीपीइ पाइप.
फिल्टरः पाण्याच्या गुणवत्तेनुसार फिल्टर निवडावा.
स्क्रीन/ डिस्क फिल्टर : विहिरीतील पाणी स्वच्छ असेल तर या फिल्टरचा वापर केला तरी चालतो.
सॅन्ड फिल्टर (मीडिया फिल्टर) : पाण्यात जर शेवाळ, पालापचोळा असेल (नदी किंवा धरण किंवा शेततळे किंवा कॅनॉल) तर या फिल्टरचा वापर करावा.
सॅन्ड सेपरेटर/ हायड्रो सायक्लोन फिल्टर : जर पाण्यासोबत वाळू येत असेल (कूपनलिका / नदी ) तर या फिल्टरचा वापर करावा.
फिल्टर्सची स्वच्छता
फिल्टर्समध्ये घाण जमा झाल्यास ते वेळोवेळी स्वच्छ करणे खूप गरजेचे आहे. फिल्टर स्वच्छता ही मनुष्यचलित पद्धतीने, अर्ध स्वयंचलित आणि स्वयंचलित पद्धतीने करता येते.
खते देण्यासाठी पर्याय
व्हेंचुरी : हा सर्वात स्वस्त पर्याय आहे. यामध्ये पाणी, खतांचा प्रवाह दर एकसमान राहत नाही प्रेशर डिफरन्स निर्माण करावा लागतो.
फर्टिलायझर टॅंक : स्वस्त, साधा व सोपा पर्याय. परंतु यात एकसमानता पाहिजे तेवढी ठेवता येत नाही.
पिस्टन पंप : पाणी, खतांचा प्रवाह दर एकसमान राहतो. त्यासाठी पाण्याचा प्रवाह दाब एकसारखा ठेवावा लागतो, कारण हे पाण्याच्या दाबावर अवलंबून असते.
इलेक्ट्रिक पंप : पाणी, खतांचा प्रवाह दर एकसमान राहतो.
ऑटोमेटेड पंप : पाणी, खतांचा प्रवाह दर एकसमान राहतो. पाण्याचा सामू, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मोजता येते.
व्हॉल्व्ह, फिटिंग्स : गरजेप्रमाणे व्हॉल्व्ह, फिटिंग्जची निवड करावी.
एचडीपीइ पाईपचा वापर
शेती, पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन तसेच ड्रेनेज, गॅस, उद्योग क्षेत्र, कॉलम पाइप तसेच इत्यादीसाठी एचडीपीइ पाईपचा वापर वाढला आहे. भारतात बऱ्याच ठिकाणी चांगल्या जमिनी पाण्याचा निचरा न झाल्यामुळे खराब झाल्या आहेत.जमिनीत क्षाराचे प्रमाण वाढल्याने पिकांचे नुकसान होते किंवा जमिनी नापीक होतात. त्यासाठी ड्रेनेज पाईपचा वापर केल्यास पाण्याचा खूप चांगल्या प्रकारे निचरा होऊन जमिनीतील क्षार कमी होण्यास मदत होते. पिकांचे नुकसान टळते. तसेच पूर्वी कूपनलिकेसाठी मेटल पाइप वापरले जायचे, परंतु मेटल केसिंग लवकर गंजून जाते. आता पीव्हीसी केसिंग, कॉलम पाईप वापरले जातात. पंप काढताना अडचणी येतात. बऱ्याच वेळेस पंप कूपनलिकेमध्ये अडकणे, पंप सटकणे वगैरे घटना घडतात, त्यावर पीव्हीसी पाईप हा योग्य उपाय आहे.
-एस.एन.पाटील, ९४२२२९२१०२
(विपणन प्रमुख,जैन इगिरेशन सिस्टिम्स लि., जळगाव)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.