
Crop Irrigation Management : उन्हाळी हंगामात तापमान वेगाने वाढते आणि त्यासोबतच मातीतील आर्द्रता कमी होते. यामुळे पिकांना वेळेवर आणि पुरेसे पाणी मिळणे आवश्यक ठरते. या काळात भूजल पातळी घटते आणि जलस्रोत आटू लागतात, परिणामी पाण्याची टंचाई जाणवते. यावेळी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे आवश्यक आहे.
पिकांना आवश्यक तेवढे आणि योग्य वेळी पाणी दिले नाही, तर त्याचे गंभीर परिणाम होतात.पिकांची वाढ खुंटते, पाने सुकतात. फुलगळ आणि फळगळ वाढते, ज्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो. काही पिकांमध्ये, जसे की भाजीपाला किंवा फळपिके, गुणवत्ता देखील घटते.
उन्हाळ्यात सूर्यप्रकाश तीव्र असतो आणि वाऱ्याचा वेग अधिक असतो. या दोन्ही गोष्टींमुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढते. खुल्या नाल्यांमधून पाणी देताना मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते. पारंपरिक पद्धतीने सिंचन केल्यास (उदा. फवारणी पद्धत न वापरता) पाने आणि मातीच्या पृष्ठभागावरूनही बाष्पीभवन होते. परिणामी, सिंचनासाठी वापरलेल्या उपयुक्त पाण्याचा अपव्यय होतो आणि सिंचन कार्यक्षमता कमी होते.
ठिबक सिंचनाद्वारे प्रत्येक झाडाच्या मुळाजवळ थेट पाणी पोहोचवले जाते. हे पाणी थेट मुळांवर पडते, त्यामुळे पाण्याची बचत होते. उष्ण हवामानात, जिथे बाष्पीभवन जास्त असते, तिथे ही पद्धत खूप फायदेशीर ठरते. पाणी आणि खत दोन्ही एकाच वेळी देता येतात, ज्यामुळे खताची कार्यक्षमता देखील वाढते. फळबागा, भाजीपाला आणि उसासाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त आहे.
तुषार सिंचन पद्धती मध्यम क्षेत्रासाठी उपयुक्त आहे. या पद्धतीने जमिनीवर एकसमान पाणी पडते, त्यामुळे मातीची संरचना टिकून राहते. हरभरा, गहू, ज्वारी, मका अशा पिकांमध्ये उपयुक्त ठरते. वाऱ्याच्या वेगानुसार थोडा अपव्यय होऊ शकतो, पण पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक कार्यक्षम ठरते.
विजेची समस्या असल्यास, सौरऊर्जा पंप एक चांगला पर्याय आहेत. यासोबत, मातीतील ओलावा मोजणारे सेन्सर वापरल्यास, पाणी देण्याची योग्य वेळ ठरवता येते. आता शेतीत ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ तंत्रज्ञान वापरून स्मार्ट सिंचन केले जाते.
यामध्ये जमिनीत खास सेन्सर लावले जातात, जे मातीतील ओलावा सतत मोजतात. जेव्हा माती कोरडी होते, तेव्हा हे सेन्सर सिंचन प्रणालीला सिग्नल देतात आणि पाणी आपोआप सुरू होते. पाण्याचा अचूक व शास्त्रीय वापर होतो आणि उत्पादनात वाढ होते. अत्याधुनिक फळबागा, ग्रीनहाऊस व आधुनिक शेतीसाठी उत्तम तंत्रज्ञान आहे.
प्लॅस्टिक, गवत, उसाचे पाचटाचे जमिनीवर आच्छादन केल्यास मातीतील ओलावा टिकून राहतो. त्यामुळे सिंचनाची वारंवारता कमी होते. बाष्पीभवन कमी होते आणि मातीचे तापमान नियंत्रित राहते. तण वाढत नाही, त्यामुळे तणनाशकांचा वापर कमी होतो. विशेषतः टोमॅटो, कोबी, वांगी, झेंडू अशा पिकांमध्ये उपयुक्त ठरते.
पिकांच्या वाढीच्या टप्प्यानुसार पाणी द्यावे. अंकुरण, फुलोरा, फळधारणा या टप्प्यांमध्ये पाणी कमी पडल्यास उत्पादनावर गंभीर परिणाम होतो.
येत्या काळात पावसाचे पाणी साठवण्यासाठी शेततळे तयार करावे. नाले खोल करून त्यात पाणी साठवणे, सिमेंट बंधारे/माती बंधारे बांधावेत. यामुळे भूजल पातळी टिकून राहते आणि उन्हाळ्यात पाणी मिळण्यास मदत होते.
शाश्वत जल व्यवस्थापनासाठी शेतकरी गट
सामूहिक जलस्रोत व्यवस्थापन : एका गावात अनेक शेतकऱ्यांकडे एकाच नाल्याचे किंवा तलावाचे पाणी असते. जर प्रत्येकाने वेगवेगळे पाणी घेण्याऐवजी सहकार्याने व्यवस्थापन केले, तर सगळ्यांना वर्षभर पाणी मिळू शकते. उदा. पाण्याचे वेळापत्रक, टप्प्याटप्प्याने सिंचन, पाणी साठवणूक यावर एकत्रित निर्णय घेणे.
पाणी वापर संस्था : सरकारने जल उपयोग संस्था सुरू केली आहे. यामध्ये शेतकरी मिळून पाण्याचे वाटप, निगा, देखभाल करतात. पारदर्शक पद्धतीने निर्णय घेतले जातात.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर
जीआयएस आणि रिमोट सेन्सिंग : हे तंत्रज्ञान उपग्रह चित्रांद्वारे मृदा, पाणी, पीक, हवामान यांची माहिती मिळवते. यामुळे शेतकऱ्याला त्याच्या क्षेत्रातील पाणी साठा, मातीची आर्द्रता, शेतातील समस्या यांचा अंदाज लवकर येतो.
जलस्रोत आणि आर्द्रतेचा नकाशा : शासकीय योजनांतर्गत आता जीआयएस आधारित टँकरने पाणी पुरवठा योजना, शेततळ्यांच्या लोकेशन मॅप्स, नाला पुनर्भरणाची जागा यांचे नकाशे तयार केले जात आहेत. आर्द्रता नकाशाद्वारे कोठे किती पाणी द्यायचे, हे ठरवता येते, त्यामुळे पाण्याची बचत होते.
मोबाइल ॲप्स आणि हवामान आधारित सल्ला : विविध ॲप्स वापरून शेतकरी हवामान, रोग, पीक अवस्था, खत सल्ला मिळवू शकतो. काही ॲप्समध्ये माती परीक्षणाच्या रिपोर्टवर आधारित खत सल्ला मिळतो. हवामान आधारित सल्ल्यामुळे योग्य दिवशी सिंचन व फवारणी करता येते, ज्यामुळे पाण्याची आणि खर्चाची बचत होते.
- डॉ. राहुल शेलार, ९८८१३८०२२७ (मृद व जल संधारण अभियांत्रिकी विभाग,महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.