Drip Irrigation: ठिबक संचातील उपकरणांची वाढवा कार्यक्षमता

Farm Irrigation Technology: पाण्याच्या स्रोतापासून पिकांच्या मुळांपर्यंत पाणी आणि खत योग्य प्रमाणात पोहोचवण्याचे काम करते. आपल्या ठिबक सिंचन संचातील प्रत्येक उपकरणाबाबत व्यवस्थित माहिती घेऊन देखभाल केल्यास त्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.
Drip Irrigation Equipment
Drip Irrigation EquipmentAgrowon
Published on
Updated on

सतीश राठोड, अरुण देशमुख

Smart Irrigation: ठिबक सिंचन प्रणालीमध्ये  पाण्याचा पंप, फिल्टर, मुख्य वाहिनी, उप-वाहिनी, लॅटरल पाइप्स, ड्रीपर, व्हॉल्व्ह, प्रेशर गेज, व्हेंच्यूरी इनजेक्टर, खत टाकी, आणि एण्ड कॅप  अशी अनेक उपकरणे असतात.  या उपकरणांच्या एकत्रीकरणातून ठिबक सिंचन यंत्रणा तयार होते. पाण्याच्या स्रोतापासून पिकांच्या मुळांपर्यंत पाणी आणि खत योग्य प्रमाणात पोहोचविण्याचे काम करते. आपल्या ठिबक सिंचन संचातील प्रत्येक उपकरणाबाबत व्यवस्थित माहिती घेऊन देखभाल केल्यास त्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.

गाळण यंत्रणा

ग्रॅव्हल फिल्टर

ग्रॅव्हल किंवा सॅंड फिल्टर ही ठिबक सिंचन प्रणालीतील एक प्राथमिक गाळण (फिल्टर) यंत्रणा आहे. सहजासहजी डोळ्यांना दिसणारी व न दिसणारी पाण्यातील घाण किंवा कचरा उदा. गाळ, शेवाळ, काटक्या, झाडांची पाने, जीवजंतू इ. मोठ्या आकाराचे कण काढून टाकतो. यामुळे ठिबक नळी (लॅटरल) व ड्रिपर्स बंद पडत नाहीत. संपूर्ण प्रणाली सुरळीत चालते.

वापरातील मर्यादा

ग्रॅव्हल फिल्टरमध्ये वाळू आणि गोटे भरलेले असतात. त्यामुळे वजनाने खूप जड होऊन वाहून नेणे किंवा हलविणे कठीण जाते.

अतिशय सूक्ष्म गाळ, घटक पूर्णपणे गाळले जात नाहीत. त्यामुळे स्क्रीन किंवा डिस्क फिल्टरची जोड द्यावी लागते.

या यंत्रणेला दर काही काळानंतर बॅक फ्लश करावे लागते. त्यासाठी ‘ऑटो बॅक फ्लश’ यंत्रणा वापरल्यास त्याची कार्यक्षमता वाढते.

डिस्क फिल्टर

डिस्क फिल्टर हा ठिबक सिंचनातील दुसरी महत्त्वाची गाळण यंत्रणा (फिल्टर) आहे. हा फिल्टर ग्रॅव्हल फिल्टरनंतर बसवला जातो. त्यात सामान्यतः सूक्ष्म गाळ, शेवाळ, मातीचे कण इ. अडवले जातात. या सूक्ष्म घटकांमुळे ड्रीपर्स बंद होऊ शकतात.

मर्यादा ः पारंपरिक डिस्क फिल्टर हे जास्त गढूळ, गाळयुक्त किंवा सेंद्रिय पदार्थ असलेल्या पाणी कार्यक्षमतेने गाळू शकत नाही. त्यामुळेच त्याचा वापर प्राथमिक गाळण यंत्रणेनंतर (उदा. ग्रॅव्हल फिल्टर) केला जातो.

डिस्क फिल्टर प्रभावीपणे चालण्यासाठी विशिष्ट इनलेट दाब आवश्यक असतो. कमी दाब असल्यास पाणी गाळण योग्य प्रकारे होत नाही. हे फिल्टर वापरताना पाण्याची गुणवत्ता, देखभाल सुविधा व खर्च विचारात घेणे आवश्यक असते.

Drip Irrigation Equipment
Irrigation Management : शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोेचले तरच प्रकल्पांचा उपयोग

नावीन्यपूर्ण ऑटोमॅटिक डिस्क फिल्टर

बाजारात अलीकडे नावीन्यपूर्ण डिस्क फिल्टर तंत्रज्ञान आले असून, त्याद्वारे गाळण प्रणाली स्वयंचलित, अधिक कार्यक्षम, कमी देखभालीची बनत आहे.

वैशिष्ट्ये

स्वयंचलित स्वयंस्वच्छता प्रणाली : फिल्टरमध्ये गाळ जमा झाला की तो आपोआप साफ होतो. त्यामुळे मानवी हस्तक्षेपाची किंवा सफाईची गरज राहत नाही. बॅकफ्लशिंग दरम्यानसुद्धा पाणीपुरवठा चालू राहतो. त्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागत नाही.

स्मार्ट सें सिंग यंत्रणा : फिल्टरमध्ये दाब कमी झाल्यानंतर एक संदेश दिला जातो. त्याद्वारे बॅकफ्लशिंग सुरू होते. त्यामुळे फिल्टर वेळेवर साफ होतो. जाम होण्याची शक्यता कमी असते.

Chart
ChartAgrowon

खते देण्यासाठी यंत्रणा (फर्टिगेशन)

व्हेंच्यूरी

व्हेंच्यूरी इन्जेक्टर हे उपकरण ठिबक सिंचन प्रणालीमध्ये पाण्यात विद्राव्य खत, कीडनाशके किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये गरजेनुसार मिसळून पिकांच्या मुळापाशी देण्यासाठी वापरले जाते. हे पाण्याच्या नलेट व आउटलेटमध्ये असलेल्या दाबातील फरकांवर चालणारे सोपे आणि स्वस्त उपकरण आहे. त्यात हलते भाग नसल्यामुळे देखभालही फारशी करावी लागत नाही.

मर्यादा

पुरेसा दाब नसल्यास खत शोषले जात नाही. खत कमी जास्त प्रमाणात जाण्याचा धोका असतो.

लहान क्षेत्रांसाठी (१ ते ५ एकर) योग्य असले तरी मोठ्या क्षेत्रासाठी कार्यक्षमता मर्यादित असते.

व्हेंच्यूरीला नावीन्यपूर्ण आणि प्रभावी पर्याय

सध्या बहुतांश शेतकरी फर्टिगेशनसाठी व्हेंच्यूरीचा वापर करत असले तरी त्याच्या मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजेत. विशेषतः मोठ्या क्षेत्रासाठी अचूक खत नियंत्रण मिळण्यासाठी अधिक प्रभावी आणि कार्यक्षम पर्यायांची माहिती घेऊ.

१) डोझर पंप

ही यंत्रणा ठिबक सिंचनाच्या मुख्य नलिकेतील पाण्याच्या दाबावर कार्य करते. त्यामुळे त्याच्या दाबामध्ये फारसा फरक पडत नाही. फर्टिगेशन टाकीतून आवश्यक प्रमाणात खत किंवा रसायनांचे द्रावण अचूक प्रमाणात पाण्यात मिसळते.

फायदे :

खताचे प्रमाण, वेळ व दर अचूक प्रमाणात देता येते.

व्हेंच्युरीप्रमाणे मुख्य लाइनचा दाब कमी करत नाही.

शेताच्या सर्व भागामध्ये समान प्रमाणात खत पोहोचवले जाते.

स्वच्छता करणे सोपे असते.

१० एकर किंवा त्याहून अधिक क्षेत्रासाठी उत्तम ठरते.

Drip Irrigation Equipment
Drip Irrigation Subsidy: पोकरा’च्या धर्तीवर नवी योजना; शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा!

२) स्वयंचलित फर्टिगेशन प्रणाली

लहान, मोठ्या क्षेत्रासाठी ठिबक यंत्रणा करताना अलीकडे स्वयंचलित फर्टिगेशन प्रणालीला प्राधान्य दिले जात आहे. एकेकाळी महागडी असलेली ही प्रणाली बऱ्यापैकी मध्यम शेतकऱ्यांच्या आवाक्यात आलेली आहेत.

फायदे :

मोठ्या क्षेत्रावरील अचूक अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी उपयुक्त.

मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांच्या मिश्रणासाठी स्वतंत्र टाक्या असतात. त्यामुळे ती गरजेनुसार देणे सुलभ होते.

पिकांना समान व प्रमाणबद्ध खते देणे शक्य होते.

खतमिश्रित पाण्याचा ईसी (विद्युत वाहकता) सातत्याने तपासली जाते.

मिश्रणासाठी सामू नियंत्रित ठेवण्यासाठी गरजेनुसार योग्य ती आम्ले किंवा आम्लारी मिसळण्याची क्रियाही स्वयंचलितपणे करण्याची व्यवस्था असते. त्यासाठी वेगळ्या टाक्या दिलेल्या असतात.

नोंदविलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार रोजच्या रोज किंवा योग्य वेळी स्वयंचलितपणे खते पिकांना दिली जातात.

वर्षभरात कोणत्या खतांचा किती प्रमाणात वापर झाला, याचा अहवाल उपलब्ध होऊ शकतो.

मजुरी खर्च आणि खतांच्या खर्चात बचत होते.

ड्रीपर

पिकांच्या मुळांपर्यंत पाणी पोहोचवणारा अंतिम आणि सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे ड्रिपर होय. ड्रीपर हे ठिबक सिंचनाचे हृदय आहे. योग्य प्रवाह दर, योग्य अंतर आणि योग्य देखभाल केल्यास पाण्याची बचत तर होते. शिवाय उत्पादनात लक्षणीय वाढ होते.

प्रेशर कॉम्पेन्सेटिंग (पीसी ड्रीपर)

प्रेशर कॉम्पेन्सेटींग (पीसी) ड्रीपर हे पाण्याचा दाब स्थिर ठेवणारे ड्रीपर. हे ड्रिपर लॅटरलमधील दाब कमी-जास्त झाला तरी सर्वत्र शेवटच्या बिंदूपर्यंत एक सारखे पाणी सोडतात. त्याचा एक प्रकार प्रेशर कॉम्पेन्सेटिंग नॉन ड्रीप (पीसीएनडी) म्हणजेच गळती न होणारे ड्रिपर. या दोन्ही प्रकारांचा वापर अति चढउताराच्या व अडचणीच्या भूप्रदेशासाठी केला जातो.

पाण्याचा दाब कमी-जास्त असला तरी एकसारखे पाणी सोडतात.

अडचणीच्या भूप्रदेशासाठी उपयुक्त.

काळजी

अयोग्य प्रवाह दर असलेले ड्रिपर वापरल्यास झाडांना पाणी कमी/अधिक होऊ शकते.

ड्रीपर व्यवस्थित कार्यान्वित राहण्यासाठी यंत्रणेमध्ये योग्य ती गाळणयंत्रणा आणि पाण्याचा योग्य दाब आवश्यक असतो.

ड्रीपरमध्ये गाळ अडकल्यास त्या ठिकाणी पाणी आणि खत मिळत नाही.

कमी प्रवाह दरांच्या ड्रीपरचे महत्त्व

कमी प्रवाह दर ड्रीपर म्हणजे काय?

१ ते २ लिटर प्रति तास (एलपीएच) इतक्या

कमी प्रवाह दराचे ड्रीपर कमी पण अचूक पाणी देतात.

पुरेसे पाणी देण्यासाठी ते अधिक काळ चालवावे लागू शकतात. मात्र ५ ते २५ मीटरपर्यंत चढ उतार

असलेल्या जमिनीतही असे ड्रीपर हे एकसमान पाणी देऊ शकतात.जमिनीखालील ठिबकसाठी (सबसरफेस) उपयुक्त असतात.

कमी प्रवाह दराचे ड्रीपर का महत्त्वाचे आहेत?

कमी प्रवाह दराचे ड्रीपर हे केवळ पाण्याची बचतच करतात, असे नव्हे तर सिंचनामध्ये अचूकता साधण्यास मदत करतात.

पाण्याचा अधिक परिणामकारक वापर शक्य.

कमी थेंबांनी पाणी झिरपत मुळांपर्यंत पोहोचते.

मातीतील आर्द्रता योग्य ठेवते, पाणी वाया जात नाही.

सेंद्रिय आणि हलक्या जमिनीसाठी उपयुक्त.

कमी प्रवाह दराचे ड्रीपर वापरताना घ्यावयाची काळजी

फिल्टर सिस्टिम मजबूत असावी. १३०/१५० मायक्रॉन स्क्रीन फिल्टरचा वापर करावा.

जमिनीच्या प्रकारानुसार ड्रीपरची निवड करावी. हलकी जमीन असल्यास कमी प्रवाह दराचे ड्रीपर जास्त उपयुक्त ठरतात.

मातीच्या पाणी झिरपण्याच्या दरानुसार ड्रिपरमधील अंतर योग्य ठेवले पाहिजे. उदा. हलक्या जमिनीसाठी ३० सें. मी.अंतरावर आणि पाण्याचा विसर्ग

१ लिटर प्रति तासापेक्षा कमी असावा. तर मध्यम जमिनीसाठी दोन ड्रिपरमधील अंतर ४० सें .मी.

आणि पाण्याचा विसर्ग १ ते २ लिटर प्रति तास असावा. भारी जमिनीसाठी ५० सें. मी. अंतरावर आणि २ लिटर प्रति तास पाण्याचा विसर्ग असलेले ड्रीपर निवडावेत.

- सतीश राठोड (वरिष्ठ कृषी विद्यावेत्ता), ९१६८६१२४१०

- अरुण देशमुख, (प्रमुख, उपसरव्यवस्थापक - मध्य आणि उत्तर भारत), ९५४५४५६९०२

कृषी विद्या विभाग, नेटाफिम ठिबक, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com