
New Delhi News : देशातील आधुनिक अर्थक्रांतीचे प्रणेते मानले जाणारे डॉक्टरसाब ऊर्फ माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना शनिवारी (ता. २८) शासकीय इतमामात साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. दिल्लीतील निगमबोध घाट स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर शीख परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कन्येने भडाग्नी दिल्यानंतर डॉ. मनमोहनसिंग यांचे पार्थिव पंचतत्वात विलीन झाले.
नव्वदीच्या दशकात अर्थमंत्रिपदी असताना आपल्या आर्थिक धोरणांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला नवा चेहरा प्रदान करणाऱ्या आणि ‘यूपीए’ सरकारच्या काळात तब्बल एक दशक पंतप्रधान राहिलेल्या डॉ. मनमोहनसिंग यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. डॉ.सिंग यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (एम्स) अखेरचा श्वास घेतला होता. दीर्घकाळापासून आजारी असलेल्या डॉ.सिंग यांना २६ डिसेंबरला अत्यवस्थ वाटू लागल्याने ‘एम्स’ मध्ये दाखल करण्यात आले होते. रात्री ९.५१ ला ‘एम्स’ च्या व्यवस्थापनाने डॉ. सिंग यांचे निधन झाल्याची घोषणा केली. शनिवारी त्यांच्या पार्थिवावर निगमबोध घाट स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात आणि शीख पंथातील विधीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कॉग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री, सरसेनाध्यक्ष (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) अनिल चौहान, तिन्ही सेना दलांचे प्रमुख, भुतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोब्गे, त्याचप्रमाणे मॉरिशसचे परराष्ट्रमंत्री मनीष गोबिन यांच्यासह परदेशी राजनैतिक अधिकारी देखील डॉ. मनमोहनसिंह यांच्या अंत्यसंस्कारासाठी निगमबोध घाट येथे उपस्थित होते.
२१ तोफांची सलामी
भारतीय राजकारणाचा सौम्य आणि उदारमतवादी चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंतिम प्रवासाला निघालेल्या या नेत्याला २१ तोफांची सलामी देण्यात आली. तत्पूर्वी, निगमबोध स्मशानभूमीमध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसह उपस्थित मान्यवरांनी डॉ. मनमोहनसिंग यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यानंतर डॉ. सिंग यांच्या शोकाकूल पत्नी गुरशरण कौर आणि उपिंदर सिंग, दामन सिंग आणि अमृत सिंग या तिन्ही कन्यांचे सांत्वन केले.
काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांकडून निरोप
डॉ. मनमोहनसिंग यांचे पार्थिव हे ‘३- मोतीलाल नेहरू मार्ग’ या शासकीय निवासस्थानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी डॉ. सिंग यांचे यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले आणि श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांचे पार्थिव सकाळी साडेनऊला काँग्रेसच्या ‘२४- अकबर रोड’ या मुख्यालयामध्ये आणण्यात आले. मनमोहनसिंग यांची ओळख बनलेली निळी पगडी त्यांच्या पार्थिवावर ठेवण्यात आली होती. तेथे काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.
बड्या नेत्यांची हजेरी
डॉ. सिंग यांच्या पत्नी गुरशरण कौर आणि तिन्ही कन्या देखील यावेळी काँग्रेस मुख्यालयात पोहोचल्या होत्या. मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी- वद्रा तसेच पक्षाच्या अन्य नेत्यांनी पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली आणि सिंग कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन केले. काँग्रेस कार्यकारिणी सदस्य, माजी मंत्री, काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षनेते, प्रदेशाध्यक्ष हे देखील अंत्यदर्शनासाठी आले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुख्खू, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांचा त्यात समावेश होता.
राहुल गांधींनी दिला खांदा
फुलांनी सजविलेल्या लष्करी वाहनांतून डॉ. मनमोहनसिंग यांचे पार्थिव निगमबोध घाट स्मशानभूमीत नेण्यात आले. येथे लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी काँग्रेस मुख्यालयाबाहेरच्या अकबर मार्गावर कार्यकर्ते चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी मनमोहनसिंग ‘अमर रहे, जब तक सूरज चांद रहेगा मनमोहनसिंग तेरा नाम रहेगा,’ अशा घोषणा देत डॉ. मनमोहनसिंग यांना अलविदा करण्यात आला. राहुल गांधी यांनी डॉ. सिंग यांच्या पार्थिवाला खांदा दिला. तसेच अंत्ययात्रेदरम्यान राहुल गांधी हे डॉ. सिंग यांचे पार्थिव असलेल्या लष्करी वाहनामध्ये बसले होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.