
Indian Politics and Development Policies : स्वातंत्र्यापूर्वी भारतीय समाजात जी काही घुसळण झाली, त्या प्रबोधनपर्वातील वादचर्चांमध्ये ‘बोलके सुधारक’ आणि ‘कर्ते सुधारक’ असा वाद झडला होता. मात्र त्याचा संदर्भ सामाजिक होता. डॉ. मनमोहनसिंग यांचे स्मरण करताना त्यांचे आर्थिक क्षेत्रातील ‘कर्ते सुधारक’पण प्रकर्षाने डोळ्यासमोर येते. जुन्या समजुती, धारणा, प्रस्थापित विचारव्यूह यांच्या विरोधात जाऊन आर्थिक सुधारणांचा मार्ग आचरतानाही आततायीपणा करून चालत नाही, हे जसे या नेमस्त नेत्याने दाखवून दिले, तसेच दबाव आला म्हणून आपल्या मार्गावरून हटायचे नसते, या कणखरपणाचीही प्रचिती दिली.
नरसिंह राव पंतप्रधान असताना १९९१मध्ये त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री या नात्याने मांडलेला अर्थसंकल्प ही देशाच्या दृष्टीने एका नव्या पर्वाची नांदी होती. कररचना, बॅंकिंग प्रणाली, वित्तीय सेवा, चलनविषयक धोरण यांतील आमूलाग्र बदलांना त्यांनी हात घातला. कालबाह्य नियमनाचे साखळदंड भिरकावून दिल्याने उद्योजकीय गुणवत्ता आणि कर्तृत्वाला मोकळा अवकाश मिळायला सुरुवात झाली.
मंदपणे वाटचाल करणाऱ्या आर्थिक विकासदराची गती वाढली. दारिद्र्याच्या गर्तेतून कोट्यवधी लोकांना बाहेर काढण्यात देशाला यश मिळाले. परकी चलनाची गंगाजळी कोरडी पडून सोने गहाण ठेवण्याची वेळ ओढविलेल्या आणि त्यामुळे अक्षरशः हतबल बनलेल्या भारताला स्वसामर्थ्याची जाणीव होण्यास ज्यांचे कर्तृत्व कारणीभूत ठरले, त्यात मनमोहनसिंग यांचे नाव झळाळून उठते.
पण केवळ नांदी म्हणून त्यांचे कार्य थांबले नाही. पुढे आणखी महत्त्वाची भूमिका त्यांच्या वाट्याला यायची होती. तशी ती अचानक त्यांच्याकडे आली आणि तिचे त्यांनी सोने केले. २००४ ते २०१४ या तब्बल दहा वर्षांच्या काळात पंतप्रधान या नात्याने त्यांनी आर्थिक सुधारणांचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी अथक प्रयत्न केले. म्हणूनच आपल्या पंतप्रधानपदाच्या अखेरच्या टप्प्यात ‘‘प्रसारमाध्यमांनी माझी कशीही प्रतिमा रंगविली, तरी इतिहास मला न्याय देईल’’, असा आत्मविश्वास व्यक्त केला होता. तो किती सार्थ होता हे मनमोहनसिंग यांच्या वाटचालीवर नजर टाकली तर लक्षात येते.
एकीकडे डॉ. मनमोहनसिंग यांनी खासगीकरण, उदारीकरणाचा मार्ग सोडला नाही. त्याच वेळी कल्याणकारी योजनाही आणल्या. २००८मध्ये शेतकऱ्यांची ७१ हजार कोटींची कर्जमाफी, विदर्भातील शेतकऱ्यांसाठी दिलेले विशेष पॅकेज, मनरेगा कायदा, शेतीमाल हमीभावात चांगली वाढ हे सगळे त्यांच्याच कारकिर्दीतील. ‘आधार’ही त्यांच्याच काळातला. उदारीकरण-पर्वाचे ते नायक होते; पण हे उदारपण केवळ अर्थकारणापुरते नव्हते.
खुला विचारविनिमय त्यांना हवा असे. त्यांच्या दुसऱ्या ‘डावा’मध्ये म्हणजे २००९ ते २०१४ या काळात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आल्यानंतर त्यांच्यावर दुर्बल, बिनकण्याचा अशाप्रकारच्या टीकेचा भडिमार होऊ लागला. त्या वेळीही तो झाला आणि आजही तेवढ्याच उच्चरवाने होत आहे. काही जण दुसऱ्या टोकाला जाऊन त्यांना ‘भीष्माचार्य’ म्हणतात. यात अर्थातच अतिशयोक्ती आहे.
पण एका साधर्म्याचा उल्लेख करता येईल. अजेय अशा भीष्माचार्यांना हरवणे कठीण आहे, हे कळल्यावर भगवान श्रीकृष्णांनी त्यांनाच त्यांचे मर्मस्थान, दुर्बलस्थान काय आहे, असे विचारले होते. मनमोहनसिंग आर्थिक नवप्रवर्तनाच्या दिशेने जात असताना त्यांना जर कोणी असा प्रश्न विचारला असता तर कदाचित या नेत्याने उत्तर दिले असते ः माझ्या धोरणांमुळे आकांक्षांचे धुमारे फुटलेल्या आणि विस्तारलेल्या मध्यमवर्गातूनच माझे प्रखर टीकाकार पुढे येतील... हेही द्रष्टेपण त्यांच्याकडे होते. ‘इतिहासाविण कुणी करावा यांचा सन्मान?’ या गदिमांच्या ओळी अशावेळी आठवल्याशिवाय राहत नाहीत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.