
New Delhi News : माजी पंतप्रधान आणि थोर अर्थशास्त्रज्ञ मनमोहनसिंग यांचे गुरुवारी (ता. २६) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज (ता. २८) दिल्लीतील राजघाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. डॉ. मनमोहनसिंग यांच्या निधनामुळे सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या पार्थिवावर आज (ता.२८) सकाळी १० ते ११ च्या दरम्यान दिल्लीतील राजघाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मनमोहनसिंग यांची मुलगी शुक्रवारी रात्री उशिरा अमेरिकेहून दिल्लीला पोहोचणार आहे. यानंतर त्यांचे पार्थिव शनिवारी काँग्रेस मुख्यालयात आणले जाईल. या ठिकाणी काँग्रेस नेते आणि दिग्गज नेते त्यांना श्रद्धांजली वाहतील. यानंतर त्यांच्या पार्थिवावर राजघाटाजवळ अंत्यसंस्कार केले जातील.
डॉ. मनमोहनसिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काँग्रेस पक्षाने २८ डिसेंबरच्या पक्षाच्या स्थापना दिनासह, पुढच्या सात दिवसांसाठी सर्व अधिकृत कार्यक्रम रद्द केले असल्याचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी जाहीर केले. या कालावधीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल. तसेच कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच काँग्रेसने बेळगाव अधिवेशनातील सगळे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याप्रमाणेच सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. डॉ. मनमोहनसिंग यांच्या निधनामुळे भारतासह जगभरात दुःख व्यक्त होत आहे.
आंतरराष्ट्रीय माध्यमांत ठळक प्रसिद्धी
सिंग यांच्या निधनाचे वृत्ताला आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये ठळक प्रसिद्धी दिली असून, जगातील नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘अनुत्सुक राजा’ आणि ‘भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार’ असे त्यांचे वर्णन परदेशी वृत्तपत्रांनी केले आहे.
डॉ. मनमोहनसिंग हे मितभाषी आणि विद्वान असल्याचे सांगत ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने दूरगामी बदलांचे श्रेय त्यांना दिले. चीनशी स्पर्धा करण्यास त्यांनी भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम केले, असेही वृत्तात म्हटले आहे. मनमोहनसिंग यांचा भारतीय राजकारणातील कारकिर्दीचा आढावा अमेरिकेच्या ‘असोसिएट प्रेस’ने घेतला आहे. त्यांनी केलेल्या १९९१ च्या आर्थिक सुधारणांमुळे भारतातील संभाव्य आर्थिक संकट कसे दूर झाले यावर प्रकाश टाकला आहे.
‘ऑक्सफर्डमधून शिकलेल्या या मितभाषी अर्थतज्ज्ञाच्या आर्थिक सुधारणांमुळे त्यांनी त्यांच्या संघर्षग्रस्त, गरिबीने ग्रासलेल्या देशाला उदयोन्मुख शक्तीमध्ये रूपांतरित केले,’ असे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे. अनेक भपकेदार कपडे आणि पंचतारांकित हॉटेलच्या वाऱ्या करणारे अनेक भारतीय नेते चर्चेत असताना साधा पेहराव आणि शाळेतील शिक्षकाप्रमाणे काळे बूट घालणारे मनमोहनसिंग काटकसरीचे जीवन जगले, असेही या वृत्तपत्राने म्हटले आहे.
पंतप्रधानपदाच्या काळात पडद्यामागे वावर असल्याने ‘गार्डियन’ने मनमोहनसिंग यांना ‘अनुत्सुक पंतप्रधान’ असे संबोधले आहे. ‘अत्यंत इमानदार आणि प्रामाणिक व्यक्ती म्हणून मनमोहनसिंग यांनी नाव कमावले. आर्थिक अनिश्चिततेच्या कठीण काळात डॉ. सिंग यांच्या सरकारने ग्रामीण भागातील गरिबांसाठी रोजगार कार्यक्रमासारख्या कल्याणकारी योजना आणून देशातील संपत्तीचे संरक्षण केले,’ असे ‘अल जझिरा’ या दोहा येथील माध्यम संस्थेने म्हटले आहे.
‘महत्त्वपूर्ण उदारीकरणाच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार,’ असे डॉ. सिंग वर्णन ‘बीबासी’ने केले आहे. पंतप्रधानपदी त्यांची नियुक्ती एका महत्त्वाकांक्षी आणि अभूतपूर्व आर्थिक सुधारणा कार्यक्रमासाठी मोलाची ठरली. करकपात, रुपयाचे अवमूल्यन असे निर्णय घेत सरकारी कंपन्यांचे खासगीकरण आणि परकी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले, अशी नोंद ‘बीबीसी’ने घेतली आहे.
३३ वर्षे खासदार
१९९१ मध्ये राज्यसभेच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीची सुरुवात
माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री
२००४ ते २०१४ असे
दहा वर्षे पंतप्रधान
१९९८ ते २००४ या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेते
शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झालेल्या विदर्भातील जिल्ह्यांसाठी ३७५० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा
झळाळती कारकीर्द
२००४ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या आघाडीचा पराभव झाला आणि काँग्रेसच्या नेतृ़त्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) सरकार सत्तेवर आले. ‘यूपीए’च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अगदी अनपेक्षितरीत्या पंतप्रधानपद नाकारले आणि मनमोहनसिंग पंतप्रधान झाले. पंतप्रधानपदासाठी मनमोहनसिंगांचे नाव सुचवल्यावर अनेकांना धक्का बसला. तथापि, सर्व स्तरांतून असलेला पाठिंबा, भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप नसलेला राजकारणी ही त्यांची प्रतिमा भावली. त्यांनी २२ मे २००४ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
सिंग यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने अनेक कल्याणकारी निर्णय घेऊन कार्यवाहीत आणले. सलग दोनदा देशाच्या पंतप्रधानपदी राहून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाशी सर्वप्रथम बरोबरी करणाऱ्या डॉ. मनमोहनसिंग यांनी देशाच्या अर्थकारणाला नवी दिशा, नवे वळण आणि खुलेपणाने नवे अवकाश मिळवून दिले. डॉ. मनमोहनसिंग केवळ देशाच्या आर्थिक सुधारणांचेच जनक ठरले नाहीत, तर त्यांचे इतर क्षेत्रांतील योगदानही अतिशय मोलाचे ठरले आहे.
पंतप्रधानपदाच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात देशात दारिद्र्यरेषेखाली राहणाऱ्या १४ कोटी लोकसंख्येचे जीवनमान उंचावण्यात त्यांनी निर्णायक भूमिका बजावली. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात माहितीचा अधिकार देणारा कायदा मंजूर झाला. ग्रामीण भारतातील कोट्यवधी गरिबांना रोजगाराची हमी देणारी मनरेगा योजना त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात प्रभावीपणे राबविली. स्वतःचे सरकार संकटात टाकून त्यांनी ऐतिहासिक भारत-अमेरिका नागरी अणुकरार मार्गी लावला.
देशात कोणालाही उपासमार घडणार नाही, हे निश्चित करण्यासाठी त्यांच्या कार्यकाळात महत्त्वाचा अन्न सुरक्षा कायदा मंजूर केला. नवीन करणप्रणाली व्हॅटच्या रूपाने आणली, ग्रामीण भागात देशव्यापी रोजगार हमी लागू केली, शिक्षण हक्क कायदा केला, ग्रामीण आरोग्यासाठी मोठे निर्णय घेतले. भूसंपादन कायद्यात सुटसुटीतपणा आणला. त्यांच्याच काळात ग्रामीण आरोग्य मिशन, युनिक आयडेंटिटी अॅथॉरिटी म्हणजेच आधार योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजना आणि माहिती अधिकाराचा हक्क कायदा यांची कार्यवाही झाली.
अमेरिकेसोबत नागरी आण्विक करार करत असताना, सत्तेत सामील डाव्या आघाडीने पाठिंबा मागे घेतल्याने पेच निर्माण झाला होता. तथापि, त्यावरही मात करत त्यांचे सरकार २००८ मध्ये तरले. ‘यूपीए’च्या पहिल्या टप्प्यात देशाची अर्थव्यवस्था चांगली घोडदौड करत होती. तथापि, २००८ मध्ये झालेला मुंबईवरील अतिरेकी हल्ला आणि माओवाद्यांचा वाढता उपद्रव यांनी सरकारला आव्हान दिले गेले, सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत गेले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.