Groundnut Cultivation : भुईमुगाच्या शेंगांची ही खासियत ठाऊक आहे का?

आपले बी आपणच जमिनीत पेरत असल्यामुळे भुईमुगाला अन्य कडधान्यांप्रमाणे न पचणारे व अत्यंत कडक असे अखाद्य बीज निर्माण करण्याची गरज भासत नाही. इतर कडधान्यांच्या बियांवरील अपाच्य टरफल काढून त्याची डाळ तर केली जातेच
Groundnut Cultivation
Groundnut CultivationAgrowon
Published on
Updated on

भुईमूग (Groundnut) हे सोयाबीनप्रमाणेच फाबेसी कुटुंबातील एक जागतिकदृष्ट्या महत्त्वाचे पीक आहे. त्याची लागवड मुख्यतः खाद्यतेलासाठी (Edible oil) केली जाते. तेलगिरण्या शेतकऱ्यांकडून शेंगदाणे घेत नाहीत तर शेंगा खरेदी करतात. शेंगांमध्ये त्यांच्या शुष्कभाराच्या सुमारे ३५ टक्के तेल असते.

या वनस्पतीच्या शेंगा जमिनीखाली लागत असल्याने तिच्या नावात भुई हा शब्द वापरला गेला आहे तर तिच्या नावातील मूग हा शब्द तिचे कडधान्य गटाशी असणारे नाते दर्शविते. जमिनीखाली शेंगा किंवा फळे धारण करणाऱ्या इतरही काही वनस्पती आहेत; पण एक पीक म्हणून लागवड केल्या जाणाऱ्या वनस्पतींपैकी जमिनीखाली फळे असलेली भुईमूग ही एकमेव वनस्पती आहे.

Groundnut Cultivation
Crop Damage Compensation : सांगलीत नुकसानग्रस्तांच्या खात्यावर ३५ कोटी वर्ग

सर्व कडधान्ये फाबेसी या कुटुंबात मोडतात. या कुटुंबातील वनस्पतींची फळे शेंगा या स्वरुपातच असतात. त्यांचे वैशिष्ट्य असे असते, की त्यांमधील बी पक्व झाले की या शेंगा वाळून तडकतात आणि त्यांचे बी जमिनीवर सांडते. त्यामुळे शेतात पीक म्हणून लावलेल्या कडधान्य पिकाची काढणी त्याच्या शेंगा तडकून त्यातले बी जमिनीवर सांडण्याअगोदरच केली जाते.

पण नैसर्गिक पर्यावरणात या कुटुंबातील वनस्पतींच्या बिया पुढील पावसाळ्यापर्यंत जमिनीवरच पडून राहतात. अशा परिस्थितीत त्या बिया पक्षी तसेच उंदीर इत्यादी प्राण्यांच्या भक्ष्यस्थानी न पडता पावसाळ्यापर्यंत शाबूत राहाव्यात यासाठी निसर्गानेच काही योजना आखलेल्या आहेत. त्यापैकी एक योजना म्हणजे या बियांवर एक जाड टरफल असते आणि या टरफलात प्राण्यांच्या पचनक्रियेत बाधा आणतील असे काही पदार्थ समाविष्ट केलेले असतात.

Groundnut Cultivation
APMC Election : शेतकरी हित की राजकीय सोय

तसेच या बिया अत्यंत टणक असतात. या दोन्ही गुणधर्मांमुळे, जरी या बिया पक्षी अगर प्राण्यांनी खाल्ल्या तरी त्या न पचता त्यांच्या विष्ठेबरोबर शरिरातून बाहेर पडतात. गुंजेसारख्या काही वनस्पतींच्या बिया तर सरळ सरळ विषारीच असतात. परंतु इतक्या सर्व उपाययोजना करूनही या वनस्पतींच्या सर्व बिया काही रुजत नाहीत. हे टाळण्यासाठी भुईमुगाच्या वनस्पतीने एक वेगळीच शक्कल अंगिकारली. ती अशी की भुइमूग आपले बी आपणच जमिनीत पेरतो.

आपले बी जमिनीत पेरण्यासाठी भुईमुगाला अनेक वैशिष्ट्ये निर्माण करावी लागली. इतर वनस्पतींप्रमाणेच भुईमुगालाही जमिनीच्या वरच फुले लागतात; पण परागीकरणानंतर फुलाच्या पाकळ्या गळून पडतात आणि त्या फुलाचा देठ १८० अंशांत वळवला जातो. आभाळाकडे तोंड असणाऱ्या फुलाचे तोंड जमिनीकडे वळविले जाते. तसेच बीजांडकोषाच्या तळाशी असणाऱ्या पेशिकांचे गुणन सुरू होऊन त्यांपासून एक सतत लांब होत जाणारा नवा देठ तयार होतो.

या देठाच्या टोकाशी फलित बीजांडे असलेला बीजांडकोष असतो. त्याच्या मागचा देठ सतत जमिनीच्या दिशेने वाढत असल्याने बीजांडकोश जमिनीत घुसविला जातो. तो जमिनीत घुसविण्याची क्रिया सुकर व्हावी यासाठी बीजांडकोश सुईप्रमाणे टोकदार व अत्यंत टणक अशा आवरणाने मढविलेला असतो.

या टणक व टोकदार टोकामुळे या देठाला भुईमुगाची आरी असे म्हणतात. आपल्यावर मातीचा दाब किती आहे हे जाणून घेण्याची बीजांडकोशात क्षमता असते. आणि तिचा वापर करून जमिनीत किती खोल जावे हे बीजांडकोशच ठरवितो. मातीचा दाब पुरेसा झाला की आरीच्या देठाची वाढ थांबते आणि बीजांडकोशाची, म्हणजेच भुईमुगाच्या शेंगेची, वाढ सुरू होते.

Groundnut Cultivation
Onion Cultivation : कांदा लागवडची लगबग सुरू

कडधान्य गटातील वनस्पतींच्या शेंगा सुरुवातीला चपट्या असतात. जसजसे त्यांच्यात दाणे भरू लागतात तसतशी त्यांची जाडी वाढू लागते. पण भुईमुगाच्या शेंगांची वाढ जमिनीत होत असल्याने जर दाणे भरण्यापूर्वीच शेंगांच्या सभोवतालची माती वाळली, तर शेंगेला कडक झालेल्या मातीला बाजूला ढकलून वाढावे लागेल. आणि माती फारच कडक झाली असेल तर कदाचित अशा परिस्थितीत शेंगेत दाणेच भरू शकणार नाहीत.

Groundnut Cultivation
CIBIL Agri Loan: शेती कर्जांना ‘सीबील’मधून वगळण्याच्या मागणी | ॲग्रोवन

हे टाळण्यासाठी भुईमुगाच्या वनस्पतीने आणखी एक शक्कल लढविली. ती अशी की आरीच्या देठाची वाढ थांबली, की लगेच बीजांडकोशातील पेशिकांचे गुणन सुरू होऊन दाणे भरण्यापूर्वीच शेंग भराभर फुगू लागते. दाणे भरल्यानंतर तिचा जेवढा आकार व्हावयाचा असतो तेवढ्या आकाराची ती होते.

म्हणजेच शेंगेचा जेवढा अंतिम आकार होणार असतो तेवढी जागा ती शेंग मातीत आधीच रिझर्व करून ठेवते. त्यामुळे दाणा भरण्याच्या वेळी जरी माती वाळली असली तरी या फुगलेल्या शेंगेत दाणा भरला जातो. आपण जेव्हा ओल्या शेंगा विकत घेतो तेव्हा त्यांमध्ये अशा भरीव पण दाणे नसणाऱ्या शेंगासुद्धा कमी-अधिक प्रमाणात येतात हे प्रत्येकाने अनुभवले असेल.

Groundnut Cultivation
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

आपले बी आपणच जमिनीत पेरत असल्यामुळे भुईमुगाला अन्य कडधान्यांप्रमाणे न पचणारे व अत्यंत कडक असे अखाद्य बीज निर्माण करण्याची गरज भासत नाही. इतर कडधान्यांच्या बियांवरील अपाच्य टरफल काढून त्याची डाळ तर केली जातेच पण ती डाळसुद्धा बराच वेळ शिजवल्यानंतरच आपण खाऊ शकतो. मोड आणण्याच्या प्रक्रियेनेही आपण कडधान्यांची पाच्यता वाढवू शकतो.

पण भुईमुगाच्या दाण्याच्या बाबतीत असे काहीही करण्याची गरज नसते. कोणतीही प्रक्रिया न करता आपण भुईमुगाचे कच्चे दाणे खाऊ शकतो. पण याचा एक दुष्परिणाम असा होतो की काढणीपासून बाजारापर्यंतच्या वाहतुकीपर्यंत लोक एकसारखे भुइमुगाचे दाणे खातात. यावरही एक उपाय आहे आणि तो म्हणजे निदान तेलासाठी तरी अशी वाणे काढायची की ज्यांचे दाणे चवीला तुरट किंवा कडवट असतील. भुईमुगाचे मूलस्थान द. अमेरिका असल्याने तेथील काही रानटी जातींमध्ये हा गुणधर्म असण्याची शक्यता आहे. अशा जातींमधून तो गुण आपल्या जातींमध्ये आणणे काही अवघड नाही.

Groundnut Cultivation
Crop Insurance: पीकविम्याबाबत घेतली कृषीमंत्री सत्तार यांनी बैठक

भुईमूग आणि कडधान्य कुटुंबातील इतर वनस्पतींची एक खासियत म्हणजे त्यांच्या मुळांवर नायट्रोजनचे (नत्र) स्थिरीकरण करणाऱ्या ऱ्हायझोबियम या जिवाणूच्या गाठी. या जिवाणूंमुळे कडधान्य गटातील वनस्पतींना इतर वनस्पतींच्या मानाने अधिक नायट्रोजन उपलब्ध होतो. त्यामुळे या वनस्पती मर्यादित जागेत सुद्धा अधिक बीजनिर्मिती करू शकतात.

परंतु दाटीवाटीने लावलेल्या वनस्पतींची एकमेकींवर सावली पडून त्यांची बीजनिर्मिती घटते, असा सर्वसाधारण अनुभव असताना कडधान्य कुटुंबातील वनस्पती मात्र अत्यंत दाट लावल्या तरीही चांगले उत्पन्न कसे देतात हे एक कोडेच होते. पण मी त्याचे उत्तर शोधून काढले. कडधान्य कुटुंबातील सर्व वनस्पती संध्याकाळी आपली पाने मिटून घेतात. त्यामुळे सूर्यास्तापूर्वीचा शेवटचा सूर्यप्रकाश या दाट लावलेल्या पिकाच्या पर्णसंभारातून जमिनीपर्यंत जातो.

म्हणजे रात्रीची सुरुवात होण्यापूर्वी या वनस्पतींना असा संदेश मिळतो की तुझ्यावर कोणाचीही सावली नाही आणि दिवसभर तू प्रकाशसंश्‍लेषणाने जे अन्न निर्माण केले आहेस ते बीजोत्पादनासाठी वापरू शकतेस. हा शोध मी १९८३ मध्ये लावला होता पण ज्याची बीजनिर्मिती जमिनीखाली म्हणजे अंधारात होते अशा भुईमुगालाही हा नियम लागू होतो हा शोधनिबंध मी १९८४ साली प्रसिद्ध केला. १९८७ मध्ये बर्लिन येथे भरविण्यात आलेल्या इंटरनॅशनल बोटॅनिकल कॉन्फरन्समध्ये या विषयावर बोलण्यासाठी मला खास आमंत्रण देण्यात आले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com