Indigenous Buffalo: भारतीय म्हशींची वैशिष्ट्यपूर्ण विविधता: स्थानिक जातींचे महत्त्व आणि संवर्धन

Indian Livestock: भारतातील म्हशींच्या जाती त्यांच्या भौगोलिक वातावरणाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेसाठी ओळखल्या जातात. नागपुरी, मराठवाडी, पंढरपुरी अशा अनेक स्थानिक जाती दुधाच्या उत्पादनात आणि रोगप्रतिकार शक्तीत उत्कृष्ट आहेत. या लेखात भारतीय म्हशींच्या जनुकीय विविधतेचे महत्त्व, त्यांचे वैशिष्ट्ये आणि संवर्धनाच्या गरजेवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
Buffalos Breeds
Buffalos BreedsAgrowon
Published on
Updated on

Rural Livestock Farming:

भारतीय म्हशींची जनुकीय विविधता

उत्क्रांतीच्या वाटेवर वन्य म्हशीपासून (Bubalus arnee) विभक्त होत नदीच्या पाण्यात डुंबणाऱ्या (रिव्हर वॉटर : उदा. मुऱ्हा, सुरती, नागपुरी इत्यादी) आणि दलदलीच्या प्रदेशात वावरणाऱ्या (स्वाम्प : उदा. तोडा, तराई, चिलीका इत्यादी) असे दोन प्रकार आढळतात. जगाच्या पाठीवर म्हैस प्रामुख्याने दक्षिण आशियायी देशांत आढळते. भारताबाहेरील म्हशींच्या प्रमुख जातींचे मूळस्थान भारतीय सप्तसिंधूच्या प्रदेशात दिसून येते.

अनॅटोलीयन म्हैस इ.स. सातव्या शतकात तुर्कस्थानात स्थलांतरित झालेली आहे; इराण आणि लगतच्या प्रदेशातील अझेरी म्हैस नवव्या शतकात तर बांगलादेशी म्हैस किंवा बल्गेरियन म्हैस भारतीय वंशाच्या म्हशींपासून निपजल्या गेल्या आहेत. वन्य म्हशींची संख्या जगाच्या पाठीवर केवळ ३५०० च्या आसपास असून, त्यापैकी ९० टक्के वन्य म्हशी भारतात आढळून येतात. म्हणूनच वैश्‍विक स्तरावर महत्त्वाच्या असलेल्या भारतीय म्हशींचे संवर्धन आणि त्यांची विविधता जाणून घेणे गरजेचे ठरते.

स्थानिक हवामानात अनुकूलरीत्या जुळवून घेण्याची विलक्षण शक्ती निसर्गाने प्रदान केलेली असून सकस दूध देण्याची क्षमता असते. याशिवाय निकृष्ट दर्जाचा चारा पचविण्याची क्षमता, काही रोगांविरुद्ध प्रतिकार क्षमता यांसारखे गुणधर्म देशी पशुधनात आढळतात. भौगोलिक वैशिष्ट्यानुसार म्हशींच्या जातींमध्ये विविधता पाहायला मिळते. नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेअंतर्गत राष्ट्रीय पशू आनुवंशिकी संसाधन ब्युरो, कर्नाल (हरियाना) या संस्थेमार्फत देशभरातील पाळीव पशूंची नोंदणी केली जाते. भारतात आजमितीला शास्त्रीय पातळीवर नोंदणीकृत एकूण २० जाती आहेत.

Buffalos Breeds
Livestock Farming: खाद्य, आरोग्य व्यवस्थापनावर भर

मुऱ्हा ही उत्तर भारतीय म्हशीची जात आहे. स्निग्धयुक्त दुधासाठी या म्हशीला पसंती आहे. ही जात भारतात सर्वाधिक (४२.८ टक्के) प्रमाणात आढळते. मुऱ्हा म्हणजेच कुरळ्या केसांप्रमाणे मागे वळलेली वक्राकार शिंगे आणि काळा कुळकुळीत रंग (जेट ब्लॅक) मुऱ्हाचे प्रमुख वैशिष्ट्य. हरियाना राज्याच्या दक्षिण भागात हिचे माहेरघर आहे. ही जात दिल्ली या नावानेही सुपरिचित आहे.

फाळणीपूर्व पंजाब राज्यात सतलज आणि रावी नद्यांच्या खोऱ्यात नीली आणि रावी या दोन भिन्न जातींच्या म्हशींपासून निपजलेली आजची नीली रावी म्हैस. घारे डोळे आणि इतर म्हशींपासून वेगळेपण दर्शविणारे चारही पाय आणि माथ्यावरील पांढऱ्या खुणांमुळे नीली रावीस ‘पंचकल्याणी’देखील म्हणतात.

भक्कम शरीरयष्टी, भलेमोठे डोके, खालच्या बाजूने झुकलेली शिंगे, झोपी जाऊ पाहणारे डोळे अशा वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक गुणांची गुजरातच्या गीर जंगलातील भावनगरी किंवा जाफरी नावाने सुपरिचित जाफराबादी म्हैस. निकृष्ट चारा खाऊनदेखील दुधात उच्च स्निग्धांश (सरासरी ७.६८ टक्के) देणारी म्हैस आणि ओझे वाहतुकीच्या कामात उपयोगी रेडा अशा दुहेरी फायद्यासाठी जाफराबादी म्हैस लोकप्रिय आहे.

उत्तर प्रदेशातील भदावरी म्हैस तिच्या सर्वाधिक स्निग्धांशासाठी (६ ते १४ टक्के) लोकप्रिय आहे.गुजरात राज्यातील सुरती आणि पंजाबमधील मुऱ्हा म्हशीच्या संयोगातून उत्क्रांत झालेली मेहसाणा म्हैस दुधासाठी उत्तम आहे. ओडिशा राज्यात चिलिका सरोवराच्या दलदलयुक्त त्रिभुज प्रदेशातील चिलिका म्हैस स्थानिकांना मोठा आधार आहे.

Buffalos Breeds
Animal Husbandry : भारतातील विविध समुदायांच्या पारंपारिक पशुपालन संस्कृतीचे भव्य चित्र

महाराष्ट्रातील म्हशींच्या जाती

महाराष्ट्रात पूर्व विदर्भातील काळ्या रंगाची नागपुरी म्हैस; पश्‍चिम विदर्भातील राखाडी रंगाची पूर्णाथडी म्हैस, मराठवाड्यातील मराठवाडी आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील लांबलचक शिंगांची पंढरपुरी म्हैस आपले गौरवशाली पशुधन आहेत.

विदर्भातील नागपूर आणि वर्धा जिल्हे मुख्यतः पैदासक्षेत्र असणारी नागपुरी म्हैस गवळणी किंवा आर्णी नावाने लोकप्रिय आहे. कपाळावर असलेल्या पांढऱ्या रंगाच्या भागामुळे या म्हशीला कपाळ भोंडी, गालभोंडी, चंद्री, अर्धचंद्री म्हणून ओळखले जाते. तलवारीसारखी शिंगे रुबाबदार देखणेपण बहाल करतात. म्हशी दिवसाला सुमारे ५ किग्रॅ दूध देतात. रेडे ओढकामासाठी वापरले जातात.

शारीरिकदृष्ट्या नागपुरी म्हशींशी साधर्म्य दर्शविणारी मात्र रंगाने राखाडी आणि पश्‍चिम विदर्भाच्या पूर्णा नदीच्या खोऱ्यात अकोला, अमरावती जिल्ह्यांत आढळणारी म्हैस म्हणजे पूर्णाथडी. दूध उत्पादन क्षमता तुलनेने कमी असली तरी दुधातील स्निग्ध प्रमाण अधिक असल्याने स्थानिक म्हैसपालकांत विशेष लोकप्रिय आहे.

‘काळं सोनं’ म्हणून लोकप्रिय असलेली मराठवाडी म्हैस लातूर, नांदेड, परभणी, जालना, बीड आदी भागांत दुधनाथडी म्हणून ओळखली जाते. काळा ते गडद काळा रंग आणि खांद्यापर्यंत पोहोचणारी शिंगे मराठवाडी म्हशीला इतर जातींपासून विभक्त करतात.

गडद काळा रंग, केसाळ काया आणि मुख्य म्हणजे लांबलचक शिंगे ही सोलापूर, सांगली, कोल्हापूर या भागातील पंढरपुरी म्हशीचे वैशिष्ट. कमीत कमी नियोजन खर्चात उत्तम दूध देण्याची क्षमता या म्हशीमध्ये आहे.

महाराष्ट्रातील म्हशींच्या जाती या स्थानिक वातावरणाला अनुकूल करून घेणाऱ्या असून रोगप्रतिकार शक्ती आणि दूध उत्पादनाला उत्तम आहेत. याशिवाय नैसर्गिक घटक आणि अानुवंशिकतेच्या दृष्टिकोनातून पशुधनाची थोड्याबहुत फरकाने उपजाती सुद्धा आढळतात. जसे - नागपुरी म्हशीच्या गौळणी, एलिचपुरी, शाही, चांदा अशा उपजाती विदर्भात आहेत. याशिवाय विविध भागांत अवर्णीत म्हशी असून, त्यांचा शास्त्रोक्त अभ्यास महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत सुरू आहे. राष्ट्रीय पशू आनुवंशिकी संसाधन ब्युरो यांच्या साह्याने ‘नेटवर्क’ प्रकल्पांतर्गत गवळाऊ म्हैस (यवतमाळ) आणि मेळघाटी म्हैस (अमरावती) यांसारख्या देशी जातींचे नोंदीकरण प्रगतीपथावर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com