Kolhapur Flood : वैभवशाली पंचगंगा काठाला सुतकी कळा

Panchganga River : करवीर तालुका समृद्ध झाला तो विविध नद्यांनी. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि धामणी नद्यांच्या प्रवाहातून तयार होणारी पंचगंगा.
Kolhapur Flood
Kolhapur Flood Agrowon
Published on
Updated on

Kolhapur Rain News : करवीर तालुका समृद्ध झाला तो विविध नद्यांनी. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि धामणी नद्यांच्या प्रवाहातून तयार होणारी पंचगंगा. कोल्हापूर शहर व आसपासच्या ग्रामीण भागाची जीवनदायिनी नदी म्हटलं की पंचगंगेचे नाव प्राधान्याने पुढे येते. नदीकिनारी पिकणारा ऊस, भौगोलिक परिस्‍थितीमुळे होणारा चवदार गूळ.

हे करवीर तालुक्याचे वैभव. पण हेच वैभव यंदाही धोक्यात आले ते जुलैच्या उत्तरार्धात. पाऊस सुरू झाला आणि पंचगंगेचे पाणी इंचाइंचाने वाढत गेले. इतर जिल्‍ह्यांच्या तुलनेत नदीचे पात्र विस्‍तीर्ण नसल्याने सर्वात पहिल्यांदा पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडते. यंदाही तसेच झाले. जोरदार पाऊस व राधानगरी धरणातील अखंड विसर्गामुळे पाण्याने काठावरील वैभव गिळंकृत करण्यास सुरुवात केली.

बहारदार आलेले उसाचे मळे पाण्‍याखाली गेले. नुकतीच उगवण झालेला कोवळा भात, सोयाबीन भुईमुगासह भाजीपालाही पाण्याखाली गेला. एरवी दोन ते तीन दिवसांत पूर ओसरतो. पण यंदा तब्बल वीस दिवसांहून अधिक काळ पुराच्या पाण्याने शिवारात मुक्काम केला.

वीस दिवस शेतात पाणी राहिले तर पिकांची अपेक्षा तरी काय करायची. तब्बल वीस दिवसांहून अधिक काळ वस्ती केल्यानंतर पाणी पात्राकडे जाऊ लागले त्या वेळी शेतीचे भयानक रूप दिसू लागले.

Kolhapur Flood
Flood Control Project Kolhapur : पूरनियंत्रण प्रकल्प कामास तत्काळ सुरुवात करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

अधिक पाण्‍याला न जुमानणारा भातासारख्या पिकानेही माना टाकल्या. हिरव्यागार असणाऱ्या भात लोंब्या चिखलात असहायपणे उभ्‍या असल्याचे चित्र वेदनादायीच आहे. पूर ओसरून पंधरा दिवस होत असले, तरी शिवाराची अवस्था बिकटच आहे.

दोन ते तीन फूट असणाऱ्या उसाची शिवारे गाळाने माखून गेली आहेत. मुळातच तीस ते चाळीस टन सरासरी उत्पन्न करवीर तालुक्यात असते. आता शिवारात पडलेला राडीचा थर आणि खुंटलेली वाढ यामुळे बुडालेला ऊस किती उत्पन्न येईल या बाबत साशंकताच आहे.

विशेष वडणगे, आंबेवाडी, चिखली या गावांमध्ये नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. या गावातील नागरी वस्‍त्यांमध्येही पुराच्या पाण्याने एन्ट्री केली. पण नागरी वस्तीतून एक, दोन दिवसांत पाणी हटले, पण शिवारे मात्र बुडालेलीच राहिली.

नगदी पिकांबरोबरच या भागात दुग्ध व्यवसाय मोठा आहे चहूबाजूंनी पाणी असल्याने चाऱ्यासाठी मोकळी शिवारे हातावर मोजण्याइतपच राहिली, उसाबरोबर चाऱ्यासाठी महत्त्वाचे असणारे मका पिकेही बुडून गेल्याने आता करवीर तालुक्यात अनेक गावांपुढे चाऱ्यांचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

बुडालेल्या शिवारातून चारा येणे अशक्य बनले आहे. यामुळे नजीकच्या काळाच चांगला ऊसही चाऱ्यासाठी तुटण्याची शक्यता निर्माण झाली. नदीकाठावरील गवतांची अवस्था दयनीय असल्याने आता उसाशिवाय दुसरा चाराच उरला नाही. यामुळे पहिल्यांदाच केवळ उसावरच चाऱ्यासाठी अवलंबून राहावे लागत असल्याने पशुपालकांची चाऱ्यासाठी पळापळ सुरू आहे.

Kolhapur Flood
Kolhapur Flood : ‘रेड लाईन’मधील बेकायदा बांधकामे पाडा, विभागीय आयुक्तांचे अधिकाऱ्यांना खडे बोल

उन्हामुळे अनेक शिवारे मोकळी आणि कोरडी होत असली, तरी कुजलेल्या पिकांचे अवशेष अजूनही शिवारात असल्याने हिरवीगार शिवारे आता लालसर छटांनी नुकसानीच्या कळा दाखवत असल्याचे चित्र तालुक्यांतील गावांतून फिरताना दिसते.

या पिकांचे पुढे काय होणार याचे उत्तर कोणाकडेच नाही. ज्या शेतकऱ्यांचे कमी नुकसान झाले आहे, तो शेतकरी शेती स्वच्छ करून अधिक नुकसान टाळण्याचा प्रयत्न करीत आहे. पण ज्याचे शिवारच बुडून गेले आहे, त्याच्या पुढे येथून पुढे काय हा प्रश्‍न उभा ठाकला आहे.

करवीर तालुक्यातील नुकसान असे (हेक्‍टरमध्ये)...

- एकूण नुकसान ७८००

- जिरायती क्षेत्र ५२२

- बागायती ७३१५

- नुकसान झालेले शेतकरी २९ हजार ७००

पाऊस पडू लागला की पुराची चाहूल लागते. यंदाही धाकधुकीत भाताची पेरणी केली. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत सगळे सुरळीत असताना त्यानंतर मात्र पूरस्‍थिती झालीच. आनंदाने केलेली भाताची पेरणी पाण्यात वाहून गेली. आता पिकाकडे बघवत नाही. आता पुन्हा पेरणी करायचीही माझी इच्छा राहिली नाही.
- पांडुरंग पाटील, चिखली
तालुक्यात उसाचे नुकसान सर्वाधिक झाले आहे. पंचनामे गतीने सुरू आहेत. इतर कामांबरोबर पंचनाम्याच्या कामाला प्राधान्य देण्यात येत आहे. पंचनाम्याचे काम जवळ जवळ अंतिम टप्पात आले आहे.
- अरुण भिंगारदिवे, उपविभागीय कृषी अधिकारी करवीर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com