
A Story of Hardship: दुर्गदुर्गेश्वर रायगडाच्या समोर बेलाग सुळक्यांची पर्वतरांग उभी आहे. त्यातील एक लिंगाणा पर्वत. लिंगाणा किल्ल्यावर शिवरायांनी कैदखाना तयार केला होता. लिंगाण्याच्या पूर्वेला पहिले गाव लागते ते मोहरी! याच गावात शेतकरी दगडू रामा कचरे (५० वर्षे) आणि त्यांच्या पत्नी सौ. अनिता दगडू कचरे (४५ वर्षे) राहतात. या जोडीच्या संसाराची कहाणी थक्क करणारी आहे. दुसरी शिक्षण झालेल्या अनिताबाईं या याच डोंगररांगेतील पोळे गावातील शेतकरी विठ्ठल रामा ढेबे यांच्या कन्या.
अनिताचे वडील आणि आणि दगडूची आई सख्खे भाऊ बहीण. गरिबीमुळे दगडू शिकला नाही. दगडूला चार भाऊ. त्यांपैकी दोन वारले. तर तिसरा बबन कायमचा पुण्याला स्थायिक झाला. दगडू मात्र जिद्दीने एकाकीपणे डोंगरात राहिला. अनिताचे लग्न दगडूशी लावले गेले. अनिताबार्ईंनी दगडूवर जिवापाड प्रेम केले. मोठ्या कष्टाने संसार सांभाळला. नाचणी, वरईची शेती करीत दोघांनी संसार सुरू केला. मात्र आता डुकरं, वानरं शेतीची नासधूस करतात. त्यामुळे पाच एकर शेती पडीक आहे.
सारं कुटुंब वाहून गेलं असतं
‘‘आमचं लग्न लागलं तेव्हा नणंद सोनाबाई लक्ष्मण ढेबे लहानच होती. पण याच नणंदबाईंनी मला मैत्रिणीसारखे सांभाळले. आजही आमची घट्ट मैत्री आहे. लग्न झाल्यानंतर मला नणंद सोनाबाई, अनाबाई यांनी सांभाळून घेतले. त्यांच्याबरोबर मी घरकाम करीत असे. जात्यावरचं दळण, भात कांडणे, गवत कापणे, गाईगुरे वळणे, जंगलात लाकूडफाटा गोळा करणे, शेतमजुरी अशी सारी कामे आम्ही एकत्र केली. आमच्याकडे तेव्हा २५ गुरे आणि २० बकऱ्या होत्या’’, असे अनिताबाई सांगतात. दगडू आणि अनिताचा संसार लिंगाण्याच्या कुशीत फुलला. त्यांना सहा अपत्ये आहेत.
मोठा रामभाऊ पाचवी शिकला आणि टेम्पोचालक झाला. लक्ष्मण नववी शिकून तोदेखील गाडीचालक बनला. तिसरा अंकुश बारावी शिकतो आहे. त्यानंतर मुलगी सुनीता ही चौथी, तर संगीता, अलका, सविता या मुली सातवीपर्यंत शिकल्या. अनिताबाई आणि दगडूला अन्नधान्य आणण्यासाठी दिवसभर चालून वेल्ह्याच्या बाजारात जावे लागे. “एकदा पावसाळ्यात आमच्या झोपडीतील दाणापाणी संपला.
ज्वारी आणण्यासाठी आमचं सारं कुटुंब मग वेल्हा बाजारात निघालो. तुफान पाऊस चालू होता. गेवड्यांच्या नदीला पूर आला होता. आमच्या डोक्यावर धान्याची ओझी होती. आमची नणंद अनाबाई वाहू गेली असती. आम्ही पाचही जणांनी एकमेकांना पकडले आणि नदी ओलांडली. या घटनेत आमचं सारं कुटुंब वाहू गेलं असतं. पहाटे आम्ही पाड्यावरून निघालो आणि रात्री दहा वाजता पुन्हा घरी आलो.
जगण्यासाठी आम्हाला अशा अनेक संकटांना तोंड द्यावे लागत असे,” असे अनिताबाईंनी सांगितले. आजारी पडता औषधाची एक गोळी मिळविण्यासाठी दहा तासाचा प्रवास करावा लागणाऱ्या या भागात अनिताबाईंची सर्व बाळंतपणं सासूबाईंनी केली. त्या या दऱ्याडोंगरातील नावाजलेल्या सुईण होत्या. गरोदरपणातील सर्व काळजी सासूबाईंनी घेतली. मुलींना तेव्हाही दुय्यम वागणूक होती. दगडूने सर्व मुलांचे लसीकरण केले. मात्र मुलींना लस टोचली नाही. तरीदेखील डोंगरातील मुली धडधाकट आहेत. लस टोचण्यासाठी अनिताबाईंना उपाशीपोटी दिवसभर चालावे लागे.
अनिताबाई बनल्या अनुमामी
‘‘मला सासूरवास भरपूर झाला पण मी संसार निभावून नेला. आमची आधी साधी झोपडी होती. त्यानंतर आम्ही गवताची नवी झोपडी बांधली. त्यानंतर पुन्हा भक्कम घर बांधण्याचे ठरवले. त्यासाठी दोन लाखाचे कर्ज काढले. ते फेडण्यासाठी दहा वर्षे लागली. माझ्या लग्नात एकही सोन्याचा दागिना मिळाला नाही. खोट्या चांदीचे दागिने मिळाले होते. तेदेखील खेळताखेळता हरवले.
मी सासूरवास काढला तरी माझ्या सुनांना मात्र मी मुलींप्रमाणे वागवते. माझ्या अंगावरचे दागिने मोडून मी सुनांना सोन्याचे दागिने केले आहेत. हे सारे दिवस पालटले ते पर्यटकांमुळे! लिंगाणा पाहण्यासाठी पर्यटक येतात. त्यांना भाजीभाकरी देण्याचे काम मी चालू केले. त्यातून पैसे मिळतात. पर्यटक मला आपुलकीने ‘अनुमामी’ नावाने हाक मारतात. आम्ही आता कष्टाने पुण्यात एक गुंठा जागा घेतली आहे. तेथे मुलासाठी घर बांधायचे आहे’’, असे ‘अनुमामी’ सांगतात.
- सौ. अनिता दगडू कचरे
९६५७८९७४५०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.