Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

Guava Production : दुष्काळी जत तालुक्यातील बागलवाडी (जि. सांगली) आणि परिसरातील गावांमधील शेतकरी एकत्र आले. बदलत्या हवामानात तग धरू शकेल व बाजारपेठेत मागणी असेल या दृष्टीने पेरू हे पीक त्यांना आश्‍वासक वाटले. परिसरातील आठ गावांत पेरूचे ‘कल्चर’ तयार झाले.
Guava Farming
Guava Farming Agrowon

अभिजित डाके

Success Story of Guava Farming : सांगली जिल्ह्यात दुष्काळाचे कायम उग्र स्वरूप धारण केलेला तालुका म्हणजे जत. इथली बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावरचीच म्हणजे कोरडवाहूच असते. तालुक्यातील बागलवाडी हे यातीलच एक गाव. येथील सेवानिवृत्त शिक्षक अशोक खिलारे यांची वडिलोपार्जित २० एकर शेती आहे. पाण्याअभावी ज्वारी, बाजरी मका या पिकांवरच ही शेती व्हायची. त्यांना तीन मुलगे. पैकी थोरले शहाजी शिक्षक आहेत.

मधले शिवाजी बीएएमएस’ डॉक्टर असून सतरा वर्षांपासून वैद्यकीय सेवा देत आहेत. सोबत शेती सुरू असताना १९९२ मध्ये त्यांनी डाळिंब बाग उभारली. तीव्र दुष्काळामुळे ती काढली. पाण्याची परिस्थिती सुधारल्यानंतर ते पुन्हा २००९ मध्ये डाळिंबाकडे वळले. पण बदलत्या वातावरणात तेलकट डाग, पिन होल बोरर, कुजवा आदींनी हैराण केले. आर्थिकदृष्ट्या गणित जमेनासे झाले. मग हे पीकही थांबवावे लागले.

पेरूचा मिळाला पर्याय

डॉ. शिवाजी यांचा बागलवाडीपासून जवळच्या शेगाव येथे दवाखाना आहे. त्यामुळे या गावसह बागलवाडी, कासलिंगवाडी, वाळेखिंडी या पाच किलोमीटर परिसरातील गावांशी त्यांचा कायम संपर्क असायचा.

गावातील शेतकरी दवाखान्यात यायचे. त्या वेळी कायमचा दुष्काळ, हवामान बदल आदींच्या अनुषंगाने कोणते पीक शाश्‍वत ठरेल, कोणते उपाय नामी ठरतील यावर चर्चा व्हायची. दरम्यान, सांगोला तालुक्यात मोठ्या आकाराच्या (जंबो) पेरूवाणाची लागवड झाली होती. त्याची माहिती मिळाल्यानंतर त्यावर चर्चा सुरू झाली.

Guava Farming
Guava Farming : पडोळ यांनी लोकप्रिय केला श्रीहरी ब्रॅण्ड पेरू

अभ्यास ठरला महत्त्वाचा

बागलवाडी व परिसरातील गावांतील दादासो शिंदे, सत्यजित नाईक, दत्ता बजबळकर, चंद्रकांत गायकवाड, विनायक कुटे यांनी पुढाकार घेतला. लागवडीपूर्वी इंदापूर, निमगाव केतकी, बारामती आदी पेरूसाठी प्रसिद्ध भागांचा दौरा केला. या वाणाची वैशिष्ट्ये, हवामानाशी सुसंगतता, टिकवणक्षमता, अर्थकारण आदी बाबी जाणून घेतल्या. मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर येथील ‘मार्केट’ जाणून घेतले.

त्यानंतर सहा-सात शेतकऱ्यांकडून २०२० मध्ये जंबो पेरूची लागवड झाली. खिलारे यांनी तीन एकरांत हे नियोजन केले. भागात हा प्रयोग नवा होता. त्यामुळे अनेक जण उत्पादन व त्याच्या अर्थकारणाविषयी साशंक होते. पण हा धाडसी प्रयोग यशस्वी झाला. आश्‍वासक रक्कम हाती आली मग सकारात्मक चर्चा सुरू झाली.

कासलिंगवाडीचे मच्छिंद्र कुटे सांगतात, की परिसरातील गावांतील अधिकाधिक शेतकरी प्रोत्साहित झाले. बागलवाडी, शेगाव, कासलिंगवाडी, वाळेखिंडीसह कोसारी, बनाळी, मोकाशेवाडी, रेवनाळ या गावांतही पेरू लागवड सुरू झाली. या शेतकऱ्यांना कृषी विभागाने मदतीचा हात दिला. भाऊसाहेब पांडुरंग फुंडकर व ‘मनरेगा’ मधून फळबाग लागवड योजनेचा १४७ शेतकऱ्यांनी लाभ घेतला.त्यातून आजमितीस या भागात १८० एकरांवर पेरूची लागवड झाली आहे. दोन्ही योजनांमधून सुमारे एक कोटी २८ लाखांचे अनुदान मिळाले.

Guava Farming
Guava Processing : आरोग्यदायी पेरूचे मूल्यवर्धन...

व्यवस्थापनातील बाबी

जंबो पेरूसह तैवान पिंक व गुजरातमधील लाल वाणाची निवड शेतकऱ्यांनी केली आहे. जंबो पेरू मध्यम गोडीचा असून त्यात बियांचे प्रमाण कमी व गर जास्त आहे. काढणीपश्‍चात २० ते २१ दिवसांपर्यंत टिकवणक्षमता आहे.

पेरू डागरहित, गुणवत्तापूर्ण असावा यासाठी त्याला फोमचे आच्छादन होते. उन्हाळ्यात बाष्पीभवन कमी करण्यासाठी ऊस पाचटाचे मल्चिंग केले जाते. गणेश उत्सव, नवरात्री, दसरा आदी काळात मागणी अधिक असते. जुन्या बागेतून प्रति एकरी १० टन ते त्यापुढे उत्पादन मिळते.

विक्री व्यवस्था

या भागातील दर्जेदार पेरूने लोकप्रियता मिळविण्यास सुरुवात केली आहे. स्थानिकसह नवी दिल्लीचे मार्केट त्यांनी मिळवले आहे. अनेक शेतकऱ्यांचा माल एकाचवेळी अधिक प्रमाणात जात असल्याने वाहतूक भाडेखर्चातही बचत झाली आहे. सरासरी दर प्रति किलो ५० ते ५० रुपये, दसरा, दिवाळी व अन्य सणांच्या काळात हा दर ७० रुपयांपासून ते कमाल १०० रुपयांपर्यंत मिळतो.

काही व्यापारी जागेवरून खरेदी करतात. डाळिंब, द्राक्षांच्या तुलनेत बदलत्या हवामानात पेरूची बाग चांगली तग धरते. मागणीही वर्षभर असते यामुळे हे पीक किफायतशीर वाटू लागल्याचे शेतकरी विनायक कुटे सांगतात.

अपेक्षित उत्पन्न हाती येत असल्याने शेतीच्या अन्य नियोजनासाठी पैसा शिल्लक राहू लागला आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी गावात आले असल्याने शेतकरी कालव्यावरून थेट पाइपलाइन करण्यासाठी पुढे येत आहेत. शासनाने सुरू केलेली ‘किसान रेल’ सध्या बंद आहे. सांगोला येथून ती पुन्हा सुरु करावी अशी मागणीही शेतकऱ्यांकडून होते आहे. परिसरातील बहुतांश शेतकरी ‘ॲग्रोवन’चे वाचक आहेत. त्यातील पेरू संदर्भाने लागवड तंत्रज्ञान, बाजारपेठा आदींबाबतचे मार्गदर्शन उपयोगी ठरत आहे.

डॉ. शिवाजी खिलारे ९८८१७९५९३७

शहाजीराव खिलारे ९५६१६७९६५५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com