मुकुंद पिंगळे
Fruit Farming : हवामान, भौगोलिकता, त्या अनुषंगाने पीक व्यवस्थापन, विक्री व्यवस्था, खर्च कमी करण्याची तंत्रे आदी विविध गोष्टींचा बारकाईने अभ्यास संजयराव पडोळ (वरखेडा, जि. नाशिक) यांनी केला. त्यातूनच नाशिकच्या द्राक्ष, डाळिंब पट्ट्यात विविध वाणांसह ३० ते ३५ एकरांत पेरूची शेती त्यांनी यशस्वी करून दाखविली आहे. शेतीचा सर्वांगीण अभ्यास करा, एकत्र या या संकल्पनेतून शेतीचे भविष्य उज्वल असेल असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
नाशिक जिल्ह्यातील आघाडीच्या प्रयोगशील शेतकऱ्यांमध्ये वरखेडा (ता.दिंडोरी) येथील कै.दौलतराव त्र्यंबकराव पडोळ यांचे नाव घ्यावे लागते. सन १९७६ पासून त्यांनी द्राक्षशेतीत काम सुरू केले. पुढे थोरले पुत्र शिवाजीराव व १९८२ पासून धाकटे पुत्र संजयराव यांनी शेतीची सूत्रे हाती घेतली.
डाळिंब, मोसंबी, आंबा आदींचे प्रयोग केले. संजयरावांची आजमितीला एकूण शेती ४० ते ४५ एकर आहे. त्यात पेरूसह ऊस व केशर आंबा व गीर गायींचा गोठा आहे. नाशिकच्या पट्ट्यात द्राक्ष, डाळिंब अशी मुख्य फळपिके असताना संजयरावांचे पाच वर्षांपासून पेरू हे मुख्य पीक झाले आहे. अर्थात त्याला कारणही तसेच आहे. जमीन धरणाजवळ असल्याने कायम पाणी व ओलावा राहात असल्याने द्राक्ष पिकात अनेक समस्या उद्भवत होत्या. त्यातून सर्व विचार करून सुरवातीला अडीच एकरांत पेरूचा प्रयोग केला. पुढे टप्प्याटप्प्याने पेरूचे क्षेत्र यश मिळत जाईल त्यानुसार वाढवत नेले. आज हे क्षेत्र ३० ते ३५ एकर आहे.
संजयरावांच्या शेतीची वैशिष्ट्ये वा टिप्स
- शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यावर भर. आपल्या भागातील अधिकाधिक स्रोत व निविष्ठांचा त्यासाठी वापर. उदा. पाचटाच्या बंडलचा बोदात वापर. त्यातून पाण्याची बचत व तण नियंत्रण झाले.
जमिनीची सुपीकता वाढली. सेंद्रिय निविष्ठांच्या वापरात गूळ, डाळींचे पीठ, गोमूत्र, शेण यापासून जीवामृत निर्मिती.
-आपल्या भागातील हवामानाचे घटक ओळखून त्यानुसार व्यवस्थापन.
-पीकनिहाय लागवडीचे अंतर तसेच ज्या निविष्ठा वा तंत्र वापरणार त्यामागील कारणे समजून घेणे गरजेचे.
- पेरूच्या गुणवत्तापूर्ण, रोग विरहित रोपांची निवड
-महाराष्ट्रासह गुजरात. राजस्थान वा परराज्यातील शेतकऱ्यांच्या शेतांना संजयराव नियमित भेटी देतात. त्यांचे प्रयोग समजून घेतात.
-वर्षातून दोन बहार घेणे फायदेशीर. मेच्या दरम्यान छाटणी घ्यायची.
त्याचा ‘हार्वेस्टिंग’ काळ नोव्हेंबरच्या दरम्यान संपतो. यावेळी काही उत्पादन, त्यानंतर पुन्हा छाटणी घ्यायची व मे च्या दरम्यान त्याची फळे म्हणजे उर्वरित उत्पादन घेता येते.
-दर्जेदार उत्पादनासाठी फळांची मर्यादित संख्या. त्यासाठी विरळणी.
-झाडाला आधार होण्यासाठी ‘स्ट्रक्चर’ असल्याने फळांची वाढ चांगली होऊन नुकसान कमी होते.
-डागरहित फळे मिळण्यासाठी तापमान व हंगामानुसार क्रॉप कव्हर, फळांना बॅगेचे आच्छादन. त्यामुळे फळमाशी, सनबर्निंग यांच्यापासूनही संरक्षण.
-प्रति ४०० ग्रॅम वजनाच्या फळासाठी पिशवी, फोम व कागद बांधणीसाठी मजुरी असा ५ रुपये खर्च.
पेरूचे वाण लागवड(एकर).
वाण वैशिष्ट्ये
रेड डायमंड... ६... गडद लाल व गोड
छत्तीसगड मधील जंबो पेरू- १२...सफेद गर व टिकाऊ फळ
तैवान पिंक- १४...फिकट गुलाबी व टिकाऊ फळ
रेड डायमंड आर १ (नवे- प्रस्तावित)....५
उत्पादन व दर
-एकरी ८ ते १० टन उत्पादन मिळते.
-दर (रुपये प्रति किलो)
किमान...कमाल...सरासरी...)
जबो पेरू-२०...८०...४०...
रेड डायमंड...३०...११०...५०
उभारली विक्री व्यवस्था
संजयराव सांगतात की गुजरातसारख्या राज्यात समुदाय (कम्युनिटी) पद्धती आहे. त्यांना थेट विक्री केल्यास व्यापाऱ्यांचा अडसर न राहाता थेट नफा हाती पडतो. आम्ही याच विक्री पध्दतीचा आधार घेऊन पेरूची थेट विक्री व्यवस्था उभारली आहे. मुंबई, नाशिक येथेही त्याच धर्तीवर विक्री करतो.
थेट दिल्ली बाजारपेठेतही माल पाठवतो. पेरूचे 'श्रीहरी फार्म्स' नावाने ब्रॅण्डिग व पॅकेजिंग केल्याने
ग्राहकांमध्ये वेगळी ओळख तयार होऊन तो आपल्याशी ‘कनेक्ट’ राहतो. शेतकऱ्यांनी एकमेकांशी सतत संवाद साधला पाहिजे. त्यातून बाजारपेठांचा अभ्यास, दर यांबाबत चर्चा करायला हवी. एखादे पीक आज यशस्वी झाले तर उद्या ते अयशस्वी होऊ शकते. अनेकवेळा दर नीचांकी घसरतात. पण नाउमेद होण्याची गरज नाही. सातत्य ठेवल्यास पुन्हा यश मिळवता येते.
मुलाला आणले शेतीतच
संजयरावांचा मुलगा हृषिकेश वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेतीची सूत्रे सांभाळतो. त्याने एमबीए पदवी
व आयात-निर्यात विषयक अभ्यासक्रम पुणे येथून पूर्ण केला आहे. वडिलांनी मुलाला अट घातली होती
की शिक्षणानंतर शेतीच करायची. संजयराव सांगतात की लोक शेती विकून शहरात चालले आहेत. नोकऱ्या शोधत आहेत. अशा लोकांना मला मुलाचे प्रत्यक्ष उदाहरण पुढे ठेऊन संदेश व प्रेरणा द्यायची आहे की शेती तुम्हाला चांगल्या प्रकारे पैसा मिळवून देऊ शकते. प्रगतिपथावर नेऊ शकते.
संपर्क: संजयराव पडोळ- ९६५७४७०२७०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.