Watermelon Cultivation : प्रयोगशीलता जपत केली खरबूज लागवड

Fruit Crops Management : नवनाथ देशमुख हे मागील दहा वर्षांपासून सव्वाचार एकरांत खरबूज या वेलवर्गीय फळपिकाची लागवड करत आहेत.
Navnath Deshmukh and Melon Farm
Navnath Deshmukh and Melon FarmAgrowon

Management of Fruit Crops : शेतकरी नियोजन

पीक : खरबूज

शेतकरी : नवनाथ कोंडीबाराव देशमुख

गाव : मुदखेड, ता. बारड, जि. नांदेड

एकूण शेती : ६ एकर

खरबूज लागवड : सव्वाचार एकर

नवनाथ देशमुख हे मागील दहा वर्षांपासून सव्वाचार एकरांत खरबूज या वेलवर्गीय फळपिकाची लागवड करत आहेत. वडिलोपार्जित शेतीमध्ये ते दरवर्षी ऊस, सोयाबीन, हरभरा अशा विविध पिकांची लागवड करत आहेत. दरवर्षी साधारण तीन टप्प्यांत खरबूज लागवडीचे नियोजन असते.

बारड शिवाराला इसापूर प्रकल्पाचे पाणी मिळाल्याने हा भाग बागायती झाला आहे. केळी, ऊस, हळद ही या भागांतील मुख्य पिके आहेत. तसेच अनेक शेतकरी हंगामी फळपिकांची लागवड करतात. यात पपई, टरबूज, खरबूज यांचा मुख्यतः समावेश असतो. याशिवाय काही शेतकरी भाजीपाला उत्पादनावर देखील भर देत आहेत. सुरुवातीच्या काळात गावातील काही मोजके शेतकरी खरबूज पिकाची लागवड करीत होते. मात्र खरबूज पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्याने खरबूज लागवड क्षेत्र तितकेसे नाही. परंतु नवनाथ देशमुख यांनी मागील दहा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या खरबुजाच्या लागवडीत प्रयोगशीलता जपत सातत्य राखले आहे.

२०११ ते २०१२ च्या दरम्यान नवनाथ देशमुख यांचा खरबूज पिकाकडे कल वाढला. बारड शिवारामध्येच काही शेतकऱ्यांनी खरबुजाची लागवड केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशमुख यांनी पहिल्या टप्प्यात पहिल्या सव्वा एकरामध्ये लागवड करण्याचे ठरविले. सध्या ते दरवर्षी तीन टप्प्यांत खरबूज लागवड करत आहेत. सव्वा एकरापासून सुरुवात केलेली खरबूज लागवड आज सव्वाचार एकरांपर्यंत श्री. देशमुख यांनी वाढविली आहे. यंदाच्या हंगामात एकरी सरासरी १५ टन उत्पादन मिळाले आहे.

Navnath Deshmukh and Melon Farm
Watermelon Farming : पीक पद्धती बदलत केली कलिंगड लागवड

लागवड नियोजन

दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात रोपांच्या लागवडीचे नियोजन असते. त्यानुसार भाजीपाला रोपवाटिकेत रोपांची निर्मिती केली जाते.

पूर्वतयारी करतेवेळी दरवर्षी शेतामध्ये गांडूळ खताचा वापर केला जातो. एकरी सुमारे १५ ते १६ क्विंटल गांडूळ खत शेतात पसरले जाते. त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन रोपांची चांगली वाढ होण्यास मदत मिळते. तसेच जमिनीती सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. गांडूळ खतासोबतच शेणखत देखील जमिनीत मिसळले. या खताच्या मात्रा दिल्यानंतर जमिनीची चागंली मशागत केली.

साधारणतः २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरपर्यंत रोपांची बेडवर पुनर्लागवड करण्याचे नियोजित असते. त्यानुसार सर्व पूर्वतयारी करून घेतली.

लागवडीसाठी आठ बाय चार फूट अंतराचे गादीवाफे तयार केले.

गादीवाफे तयार केल्यानंतर मल्चिंग पेपर अंथरून घेतला. मल्चिंग पेपरच्या वापरामुळे पिकामध्ये तणांची प्रादुर्भाव होण्यापासून अटकाव केला जातो. त्यामुळे निंदणीचा खर्चात बचत होते.

सिंचनासाठी ठिबकच्या लॅटरला टाकून घेतल्या. ठिबकमधून विद्राव्य खतांच्या मात्रा देणे सोपे होते.

साधारण १८ ते २० दिवसांची रोपे पुनर्लागवडीसाठी वापरली जातात. पूनर्लागवडीपूर्वी शिफारशीप्रमाणे बुरशीनाशकांची फवारणी घेतली.

मल्चिंग पेपरवर पावणेदोन फूट बाय १० इंच अंतरावर झिगझॅक पद्धतीने रोपांची लागवड केली.

तीन टप्प्यांत लागवडीचे नियोजन असते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २० ऑक्टोबरला लागवड केलेल्या रोपांची पुर्नलागवड १० नोव्हेंबरला केली. त्यानंतर २५ दिवसांनी दुसऱ्या टप्प्यातील लागवड आणि तिसऱ्या टप्प्यातील लागवड त्यानंतर २५ दिवसांची होईल, असे नियोजन करण्यात आले. त्यामुळे व्यवस्थापन योग्यप्रकारे करणे शक्य होते. तसेच काढणी कालावधी देखील मागे पुढे होऊन चांगले दर मिळण्यास मदत होते.

रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर पाचव्या दिवशी बुरशीनाशक आणि कीडनाशकांच्या फवारण्या घेतल्या. त्यामुळे रोपे स्थिरावतेवेळी कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होते.

Navnath Deshmukh and Melon Farm
Watermelon Processing : अशी तयार करा कलिंगडापासून जॅम, टॉफी

खत व्यवस्थापन

 खरबूज लागवडीमध्ये रासायनिक खतांचे बेसल डोस दिले. त्यात डीएपी दोन पोती, म्युरेट ऑफ पोटॅश १ पोते, निंबोळी पेंड २ पोती, दुय्यम अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये प्रति एकर प्रमाणे जमिनीत मिसळून घेतले. त्यानंतर बेडची आखणी करून जमीन लागवडीसाठी तयार केली.

लागवडीनंतर पाच दिवसांनी १९:१९:१९ हे खत १५ किलो प्रति एकर प्रमाणे दिले.

त्यानंतर आठ दिवसांनी कॅल्शिअम ५ किलो, मॅग्नेशिअम ५ किलो प्रमाणे ड्रीपद्वारे दिले.

त्यापुढील ३ दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्ये १ किलो प्रति एकर प्रमाणे देण्यात आले.

वेल फुलोऱ्यात आल्यानंतर कॅल्शिअम ५ किलो आणि बोरॉन अर्धा किलो प्रमाणे दिले.

वेलीवरील आच्छादन काढल्यानंतर पिकाला १२:६१:० हे विद्राव्य खत वीस किलो प्रमाणे दिले.

लागवडीच्या ४० ते ४५ दिवसांनी १३:०:४५ हे खत दहा किलो, ०:५२:३४ हे खत १० किलो ड्रीपद्वारे दिले. त्यानंतर पीक ७० दिवसाचे झाल्यानंतर ०:०:५० हे खत सहा किलो एकरी दिले.

पुन्हा पाच दिवसांनी ०:०:५० हे विद्राव्य खत सहा किलो एकरी दिले.

पीक संरक्षण

गादीवाफ्यावर रोपांची पुर्नलागवड केल्यानंतर त्यावर रसशोषक किडी तसेच रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आच्छादन केले जाते. त्यासाठी पेपर आच्छादन वापरले जाते. त्यामुळे रोपांची वाढ चांगली होण्यास मदत होते. पेपर आच्छादन टाकल्यानंतर साधारण २५ दिवसांनी ते काढले जाते. त्यानंतर वेलीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शिफारशीत घटकांची रासायनिक फवारणी घेतली जाते.

नवनाथ देशमुख, ९३२५६ ७३६७५

(शब्दांकन : कृष्णा जोमेगावकर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com