Kharif Season : पावसाने आधी उशिरा केला अन् आता दिली ओढ...

Kharif Crop : खानदेशात माॅन्सूनच्या पावसाने उशिर केला. त्यानंतर जेमतेम पेरणी झाल्या. पण आता ओढ दिल्याने पिके संकटात आली आहे.
Kharif season
Kharif seasonAgrowon

Dhule News : ‘‘पावसाअभावी जुलैच्या मध्यात कोरडवाहू पेरणी झाली..त्यावर लगेच पाऊस झाला, आता पिके वाढीच्या स्थितीत असतानाच पावसाने ओढ दिलीय. पिकांची ५० टक्के हानी झाल्यात जमा आहे. पुढे कितीही पाऊस आला तरी, उपयोग नाही,’’ अशी व्यथा कापडणे (ता.जि.धुळे) येथील शेतकरी नरेंद्र पाटील यांनी मांडली.

धुळे जिल्ह्यात यंदा पाऊसमान हवे तसे नाही. फक्त शिरपूर तालुक्यात पीकस्थिती ठीक आहे. अनेर प्रकल्प शिरपुरात आहे, पण यंदा चांगले प्रवाही पाणी आले नाही. धुळे, शिंदखेडा भागात स्थिती चांगली नाही. शिरपूर, शिंदखेडा, धुळे, साक्री तालुक्यात मिळून सुमारे २२ हजार हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस आहे. जिल्ह्यात एकूण दोन लाख हेक्टरपैकी कोरडवाहू कापसाचे क्षेत्र सुमारे एक लाख ८० हजार हेक्टर एवढे आहे. एकूण खरीप क्षेत्र चार लाख हेक्टर आहे. यंदा ९३ टक्के पेरणी झाली आहे.

Kharif season
Kharif Sowing : धुळे जिल्ह्यात केवळ ३३ टक्के पेरणी

शिंदखेडा तालुका बाजरीसाठी प्रसिद्ध आहे. बेटावद, नरडाणा, मुडावद, पाष्टे, टाकरखेडा, शिंदखेडा, विखरण व परिसरात बाजरी होते. यंदा बाजरीची पेरणी झाली, पण, वरुणराजा बरसला नाही, पीक वितभर वाढले आहे. साक्री तालुक्यात पीकस्थिती बरी आहे. पश्चिम भागातील वार्सा व लगत भात लागवड आटोपली आहे. जोरदार पावसाची गरज आहे.

‘धुळे तालुक्यात अनेक गावांत दुबार, तिबार पेरणी करावी लागली. पाऊस न आल्याने पीकपाणी जमलेच नाही,’ असे शेतकरी दीपक पाटील म्हणाले. धुळ्यात वर्षभरात ५६५ मिलीमीटर पाऊस पडतो. आत्तापर्यंत २६७ मिलीमीटर, फक्त ३९ टक्के एकूण पाऊस झाला आहे. अपवाद वगळता प्रकल्प रिकामेच आहेत. साक्री, शिंदखेडा व नंदुरबारच्या लाभदायी ठरू शकणारा बुराई प्रकल्प यंदा भरलेला नाही. तसेच सोनवद, अमरावती, मालनगाव हे प्रकल्पदेखील तळ गाठत आहेत. धुळे तालुक्यात लामकानी, हेंकळवाडी, तामसवाडी, सोनगीर आदी भागात पीकस्थिती बिकट आहे.

Kharif season
खानदेश, पश्‍चिम विदर्भात कापसाचे ३५ लाख गाठी उत्पादन शक्य

शिरपूर तालुका कापूस उत्पादनात आघाडीवर आहे. परंतु, यंदा पावसाअभावी पीक जोम धरत नसल्याची स्थती आहे. ‘पिकाला पावसाचे पाणी हवेच. पीक पावसानेच हिरवेगार होते,’ असे निमझरी (ता.शिरपूर) येथील शेतकरी छगन पाटील म्हणाले. शिरपुरातील निम, बलकुवे, अर्थे, तऱ्हाडी या नंदुरबारनजीकच्या भागात कमी पाऊस आहे. पपई पीक तऱ्हाडी, निमझरी, तरडी, बभळाज, होळनांथे, जापोरे आदी भागात फुलोऱ्यावर आहे. मात्र, पाऊस दडून बसला आहे, असे शेतकरी पद्माकर पाटील (तरडी, ता.शिरपूर) यांनी सांगितले.

‘शिंदखेड्यातील उडीद, मुगाची पेरणी कमी आहे. तूरीचे भवितव्य अंधारात आहे. यंदा तास-दोन तास पाऊसच झालाच नाही,’ अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या. धुळ्यातील म्हशींच्या बाजारातील उलाढाल ३० ते ४० टक्के कमी झालीय. ‘पाऊस नसल्याने पशुधनाला चारा कुठून आणायचा, चारा-पाणी महाग होईल,’ असे दूध उत्पादक सोमनाथ निकुंभ (धुळे) म्हणाले.

Kharif season
Kharif Season : धुळे जिल्ह्यात पेरण्या रखडत; पावसाची प्रतीक्षा

कांदा लागवडीत अडथळे

खानदेशात खरिपात सर्वाधिक चार हजार हेक्टरवर कांदा लागवड धुळे जिल्ह्यात होते. ‘यंदाही शेतकऱ्यांनी लागवडीची तयारी केली. रोपे तयार झाली. पण, पुढे पावसाने पाठ दिल्यास विहिरींना जलसाठा कमी असल्याने सिंचन कसे करणार,’ असा प्रश्न शिंदखेडा, धुळ्यातील शेतकऱ्यांसमोर आहे. कापडणे, लामकानी परिसरात लागवडींवर परिणाम झाला आहे.

सर्वत्र कमी पाऊस आहे. परंतु पीकस्थिती बिकट, चिंताजनक नाही. मुरमाड, अतिशय हलक्या जमिनीत पावसाची पिकांना गरज आहे. शिंदखेडा, धुळे तालुक्यात काही भागात पिकांची वाढ कमी आहे. शिरपूर व इतर भागातील काळ्या कसदार जमिनीत, कापूस पीक चांगले आहे. पण, पावसाची गरज पूर्ण होणे सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.
कुरबान तडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धुळे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com