
Dhule News : जिल्ह्यात एकही दमदार पाऊस न झाल्याने पेरणी खोळंबली असून, शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण आहे. शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसले आहेत. जुलै उजाडला तरी जिल्ह्यात खरिपाची केवळ ३३.६० टक्के पेरणी झाली आहे. त्यातही कपाशीची लागवड सर्वाधिक म्हणजे ५५.३९ टक्के झाली आहे.
अत्यल्प क्षेत्र वगळता धुळे जिल्हा अद्यापही दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात अनेक ठिकाणी केवळ जूनच्या शेवटी दोन दिवस पाऊस झाला. बागायतदार शेतकऱ्यांनी जूनमध्येच कपाशी लागवड केली. मात्र पेरणीनंतर पावसाचा लहरीपणा सुरू आहे. त्यामुळे उर्वरित पेरणी रखडली आहे.
जिल्ह्यात तीन लाख ८४ हजार १५९ हेक्टर क्षेत्र पेरणीचा लक्ष्यांक असून, त्यांपैकी एक लाख २९ हजार १०७ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. अद्याप दोन लाख ५५ हजार ५२ हेक्टर म्हणजे ६६.४० टक्के क्षेत्रात पेरणी लांबली आहे. धुळे तालुक्यात सर्वाधिक ४१ टक्के, तर शिरपूर तालुक्यात सर्वांत कमी म्हणजे २९ टक्के पेरणी झाली आहे.
धुळे तालुक्यात एक लाख सात हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी ४४ हजार ३९९ हेक्टर म्हणजे ४१ टक्के, साक्री तालुक्यात एक लाख एक हजार ८५० हेक्टरपैकी ३० हजार १५२ हेक्टर म्हणजे ३० टक्के, शिरपूर तालुक्यात ७४ हजार ८३८ हेक्टरपैकी २० हजार ८३० हेक्टर म्हणजे २९ टक्के आणि शिंदखेडा तालुक्यातील ९९ हजार ६७९ हेक्टरपैकी ३४ हजार ७२६ हेक्टर म्हणजे ३४ टक्के पेरणी झाली आहे.
जिल्ह्यात खरिपात कपाशी, बाजरी, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन आदींचे उत्पादन घेतले जाते. मात्र लवकरच पाऊस न झाल्यास चिंतेत भर पडणार आहे. जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र सर्वांत जास्त असून, सूर्यफुलाचे क्षेत्र सर्वांत कमी आहे. सूर्यफुलाच्या शेतीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे.
जिल्ह्यात एकूण पेरणीची टक्केवारी
तृणधान्य ६.०३
कडधान्य ५.४४
गळीत धान्य २८. ५३
कपाशी ५५.३९
एकूण पेरणी ३३.६०
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.