खानदेश, पश्‍चिम विदर्भात कापसाचे ३५ लाख गाठी उत्पादन शक्य

खानदेशात मे अखेरीस लागवड केलेल्या कापूस पिकात वेचणी सुरू झाली आहे. खासगी जिनींग प्रेसिंग कारखान्यांमध्येही रुई, सरकी उत्पादनासंबंधी पूर्वतयारी सुरू झाली आहे.
cotton procurement
cotton procurement

जळगाव : खानदेशात मे अखेरीस लागवड केलेल्या कापूस पिकात वेचणी सुरू झाली आहे. खासगी जिनींग प्रेसिंग कारखान्यांमध्येही रुई, सरकी उत्पादनासंबंधी पूर्वतयारी सुरू झाली आहे. परंतु यंदाही गेल्या वर्षाप्रमाणे खासगी कारखान्यांमध्ये रुईचे उत्पादन कमी होईल. कापूस महामंडळ (सीसीआय) व पणन महासंघाच्या भाडेतत्त्वावरील जिनींग प्रेसिंग कारखाने व खासगी कारखान्यांमध्ये मिळून सुमारे ३५ ते ३८ लाख गाठींचे उत्पादन खानदेश व पश्‍चिम विदर्भात होऊ शकते, असा अंदाज आहे. यंदा कोरडवाहू कापसाची स्थिती बरी आहे. मे अखेरीस लागवड केलेल्या कापसाचे नुकसान झाले आहे. पहिल्याच वेचणीला पावसाचा फटका बसला आहे. कोरोनामुळे कापूस बाजार संकटात असल्याने खासगी कारखानदार, व्यापारी कापसाची खेडा खरेदी व कारखान्यातील खरेदी कमी करीत आहेत. सावध भूमिका ही मंडळी घेत आहेत.  परंतु शासनाने कापूस खरेदी गेल्या हंगामात केली. शासकीय यंत्रणांकडे खानदेशात भाडेतत्त्वावर घेतलेल्या कारखान्यांमध्ये उत्पादित सुमारे २५ लाख गाठी आहेत. शासनाने खासगी कारखान्यांच्या तुलनेत कापूस गाठींचे अधिकचे उत्पादन केले आहे. देशभरात सीसीआयने सुमारे १२९ लाख गाठींची विक्रमी खरेदी केली आहे. कारण व्यापारी, कारखान्यांकडून खरेदीच फेब्रुवारीनंतर बंदावस्थेत होती.  यंदाही कोरोनाच्या संकटात वित्तीय अडचणी, नुकसानीची भिती व वाढलेले हमीभाव ही कारणे सांगून खासगी कारखानदार खरेदी कमीच करण्याचे नियोजन करीत आहेत. खानदेशात सुमारे ११५ जिनींग प्रेसिंग कारखाने आहेत. यातील किती कारखाने सुरू होतील, याबाबत कुठलीही माहिती कारखानदारांकडून स्पष्टपणे सांगितली जात नसल्याची स्थिती आहे.  परंतु खानदेश व पश्‍चिम विदर्भात ‘सीसीआय’ व इतर शासकीय यंत्रणा मिळून सुमारे २३ खरेदी केंद्र सुरू करतील. यातील जळगाव, जामनेर व इतर दोन खरेदी केंद्रांसाठी अतिरिक्त प्रक्रिया केंद्रही नियुक्त केले जातील. म्हणजेच एका केंद्रातील प्रक्रिया व खरेदीचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार आहे. गेल्या हंगामातही जळगाव, जामनेरात अतिरिक्त प्रक्रिया, खरेदी केंद्रासंबंधी जिनींग प्रेसिंग कारखाने भाडेतत्त्वावर ‘सीसीआय’ने घेतले होते.  ‘सीसीआय’ व पणन महासंघातर्फे सुमारे २७ ते २८ लाख गाठी व खासगी कारखानदारांतर्फे पाच ते सात लाख गाठींचे उत्पादन होऊ शकते. शासकीय खरेदीत खासगी कारखान्यांच्या तुलनेत अधिक दर शेतकऱ्यांना मिळतात. शासनाने कापसाचा हमीभाव मध्यम धाग्यासाठी ५५१५ व लांब धाग्यासाठी ५८२५ रुपये प्रतिक्विंटल, असे जाहीर केले आहेत. या दरात खासगी कारखानदार, व्यापारी खेडा खरेदी किंवा कारखान्यातील खरेदी करणार नाहीत. मजूर, वीजबिले, कर्ज आदी समस्या खासगी कारखानदार सांगत आहेत.

गुजरातमधील मागणीही कमी गुजरातमधील खासगी कारखानदार मध्यस्थांच्या मदतीने खानदेशात कापसाची खरेदी करतात. नोव्हेंबर ते डिसेंबरच्या अखेरपर्यंत रोज २२०० ते २५०० क्विंटल कापसाची खरेदी गुजरातमधून केली जायची. परंतु गेल्या हंगामात अमेरिका व चीनमधील तणावाच्या स्थितीत ही खरेदी अल्प होती. फेब्रुवारीत तर खरेदीच थांबली. यंदाही गुजरातमधून मागणी कमी असू शकते, असे सांगितले जात आहे.

प्रतिक्रिया खासगी कारखाने खानदेशच नव्हे तर विदर्भ व इतर भागातही कमीच उत्पादन करतील. खानदेश व पश्‍चिम विदर्भात एकूण कापूस उत्पादनातील फक्त १८ ते २०  टक्के कापासाची खरेदी व्यापारी, खासगी कारखानदार करू शकतील. शासन किंवा ‘सीसीआय’ व इतर संस्था सर्वाधिक खरेदी करतील. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारातील दर, मागणी लक्षात घेता हमीभावात खरेदी व्यापाऱ्यांना परवडणारी नाही. - अरविंद जैन, माजी अध्यक्ष, खानदेश जिनींग प्रेसिंग कारखानदार  असोसिएश

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com