Rajya Gomata Day: गोशाळा बनतील शाश्वत विकासाचे केंद्र

Gaushala Management: आज ‘राज्य गोमाता दिन’ साजरा होत आहे. याचे औचित्यसाधून महाराष्ट्र गोसेवा आयोगाने जातिवंत देशी गोवंश पैदास, संवर्धन, पूरक उद्योग, सेंद्रिय खत निर्मितीतून गोशाळा, पशुपालक आणि महिला बचत गट आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे धोरण आखले आहे.
Animal Husbandry
Animal HusbandryAgrowon
Published on
Updated on

Animal Husbandry: राज्यातील देशी गोवंश संगोपन, संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी ७ जुलै २०२३ रोजी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना झाली. शेती तसेच देशी गोवंश संगोपनातील आव्हाने लक्षात घेऊन आम्ही शाश्वत विकासासाठी दहा धोरणे निश्चित केली आहेत. यामध्ये गोसंगोपन, गोसंवर्धन, गोसंरक्षण, गोमय मूल्यवर्धन, गोशाळा सक्षमीकरण, गोरक्षक, गोपालक, गोआधारित शेती, गो साक्षरता आणि गो पर्यटनावर भर दिला आहे. आयोगाकडे राज्यातील ९५० गोशाळांची नोंदणी आणि तेथील जनावरांचे टॅगिंग पूर्ण झाले आहे. नोंदणीकृत गोशाळांना आम्ही अनुदान प्रक्रियेशी जोडलेले आहे.

सरकार व्यवस्था पाहू शकते, परंतु गोवंशाची अवस्था आपल्यालाच पाहावी लागणार आहे. त्यादृष्टीने ‘देशी गोवंश वाचवा’ ही मोहीम सुरू केली. या अंतर्गत स्वयंसेवी संस्था, सीएसआर फंडाची मदत घेतली आहे. सुधारित गोसंवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेअंतर्गत गोशाळा सक्षमीकरण होत आहे. या माध्यमातून एका तालुक्यात एका गोशाळेस अनुदान देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ५६० गोशाळांसाठी परिपोषण योजना सुरू झाली आहे. आयोगाचे स्वतंत्र ॲप, संकेतस्थळ आहे. ‘ई-गोकट्टा’ उपक्रमाच्या माध्यमातून राज्यभरातील पशुपालक आणि तज्ज्ञांमध्ये शास्त्रीय संवाद सुरू झाला आहे.

Animal Husbandry
Desi Cow Conservation Day: देशी गोवंशसंवर्धन दिन २२ जुलै रोजी साजरा होणार

पशुपालक, गोशाळा सक्षमीकरण

केवळ अनुदान देऊन गोशाळांचे व्यवस्थापन शक्य नाही. गोशाळा स्वतःच्या उत्पन्नातूनच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे आमचे धोरण आहे. त्यादृष्टीने आयोगातर्फे जिल्हानिहाय गोशाळांचे पदाधिकारी, पशुपालक, महिला बचत गटांच्या सदस्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. गोमय मूल्यवर्धन लक्षात घेऊन शेण, गोमूत्रापासून सेंद्रिय खते, कीडनाशके तसेच विविध ग्राहपयोगी उत्पादनावर भर दिला आहे.

जमीन आणि मानवी आरोग्याची समस्या गंभीर झाली आहे. जमीन सशक्त असेल तरच शेतीमालाचे पोषणमूल्य चांगले असेल, त्यासाठी सेंद्रिय खतांची उपलब्धता महत्त्वाची आहे. हे लक्षात घेता गोशाळांना सेंद्रिय खतांची निर्मिती आणि विक्रीची चांगली संधी आहे. सीएसआर उपक्रमातून वीस निवडक गोशाळांमध्ये सौर ऊर्जा साधनांचा वापर करत आहोत. गोठ्यांच्या छतावर सोलर पॅनेल बसविण्यात येत आहेत. यामुळे वीज बिलाचा आर्थिक ताण संपणार आहे.

शहरी तसेच ग्रामीण भागातही पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाबाबत जागृती झाली आहे. आयोगातर्फे आम्ही गोमय गणेश मूर्ती संकल्पनेला चालना दिली. पहिल्यावर्षी पाच हजार, दुसऱ्या वर्षी पन्नास हजार गोमय गणेशाची स्थापना नागरिकांनी केली आहे. यंदाच्या वर्षी किमान दोन लाख घरांमध्ये गोमय गणेशाची स्थापना होत आहे. यावर्षी ३५ हजार गोमय गणेश मूर्ती परदेशातील भारतीयांसाठी निर्यात होत आहेत. यातून गोशाळा तसेच स्थानिक मूर्तिकारांना शाश्वत रोजगार संधी वाढत आहेत.

ग्राहकांना पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची उपलब्धता झाली आहे. अंत्यविधीसाठी लाकडाऐवजी गोकाष्ठ वापराबाबत सूचना देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. या उपक्रमातून अंत्यविधीसाठी लागणाऱ्या लाकडांचा वापर थांबण्यास काही प्रमाणात मदत होईल, पर्यावरण आणि वनसंवर्धनही होईल. गोकाष्ठ निर्मितीतून गोशाळांना कायमस्वरूपी उत्पादनाचे साधन तयार झाले आहे. यंदाच्या अक्षय तृतीयेला गोमय उत्पादन विक्री दिवस साजरा झाला. गोशाळांनी राज्यातील सत्तर एसटी स्टॅन्ड तसेच मंत्रालयात गोमय उत्पादनांचे स्टॉल लावले होते, यातून थेट ग्राहकांच्यापर्यंत गोमय उत्पादनांची माहिती गेली.

Animal Husbandry
Desi Cow Research: देशी गाय संशोधन, प्रशिक्षण केंद्रातून दिशादर्शक काम : तुषार पवार

खादी ग्रामोद्योगाच्या धरतीवर गोमय उत्पादनांच्या विक्रीसाठी आयोगाने पुढाकार घेतला आहे. गोमय उत्पादनांची निर्मिती आणि विक्रीसाठी प्रमाणीकरण पद्धत आणि ब्रॅण्ड विकसित करत आहोत. यासाठी सरकारी प्रयोगशाळांची मदत घेतली आहे. या उत्पादनांवर आयोग प्रमाणीकरण स्टॅम्प येणार आहे. यामुळे ग्राहकांना योग्य गुणवत्तेची उत्पादने मिळतील, उत्पादकाला योग्य भाव मिळेल. धूप, दंतमंजन, गोनाईल आदी दैनंदिन ग्राहपयोगी वस्तूंच्या निर्मितीतून महिला बचत गटांना प्रशिक्षण दिले जात आहे. आयोगाच्या माध्यमातून ग्रामीण भागात ‘स्टार्ट अप’ उभारणीसाठी प्रोत्साहन दिले आहे.

शाश्वत शेती केंद्रस्थानी

आयोगाने देशी गोवंश संवर्धनासोबत जमीन सुपीकता आणि पोषणमूल्य असणारे धान्य, चारा उत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, गोखूर खत, जीवामृत, दशपर्णी अर्क, गोमूत्रापासून कीडनाशक निर्मितीतून देशी गोवंश पशुपालक तसेच गोशाळांना उत्पन्नाचे साधन तयार झाले आहे. गोशाळांच्यामध्ये बायोगॅस उभारणीला आम्ही चालना दिली आहे.

आयोगाने पुढाकार घेत कृषी विभाग, पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने राज्यातील ३२४ तालुक्यांमध्ये गोआधारित शेतीबाबत प्रशिक्षण घेतले. याचा येत्या काळात चांगला परिणाम दिसेल. याचबरोबरीने कमी लागवड क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांच्या गटांना गोशाळेच्या माध्यमातून बैलजोडी आणि बैलचलीत शेती अवजारांची उपलब्धता करणार आहोत. गोशाळेसोबत जोडलेले शेतकरी आणि शहरी ग्राहकांच्या समन्वयातून शेतीमाल विक्रीला चालना दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर आणि ग्राहकाला गुणवत्तापूर्ण शेतीमाल उपलब्ध होणार आहे.

जातिवंत पशुपैदास धोरण

गोशाळेच्या माध्यमातून खिलार, डांगी, देवणी, लालकंधारी, गवळाऊ, कोकण कपिला आणि कठाणी या राज्यातील देशी गोवंशाच्या जातिवंत पैदाशीसाठी पैदासक्षम नोंदणीकृत वळूंच्या संगोपनाच्या बरोबरीने भ्रूण प्रत्यारोपण, कृत्रिम रेतन, सरोगेटेड मदर, सॉर्टेड सिमेन या नवीन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत.

यासाठी राज्यातील प्रयोगशील गोशाळांची निवड करून माफसू तसेच पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने संबंधित विभागानुसार जातिवंत गोवंश पैदास केंद्र विकसित होत आहे. या ठिकाणाहून शेतकऱ्यांना खात्रीशीर जातिवंत गोवंश मिळेल. याबरोबर गोशाळांच्या माध्यमातून देशी गाईच्या दुधाची डेअरी प्रस्तावित आहे. दूध विक्रीच्या बरोबरीने प्रमाणित दुग्धजन्य प्रक्रिया पदार्थांचे उत्पादन आणि विक्रीला आम्ही प्रोत्साहन देत आहोत. गोवंश संगोपन, संवर्धनाच्या बरोबरीने शाश्वत शेती, रोजगार आणि महिला गटांचे आर्थिक सक्षमीकरण हेच आमचे ध्येय आहे.

mhgosevaayog@gmail.com

(लेखक महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत.)

(शब्दांकन : अमित गद्रे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com